हंगामी किंवा तात्पुरती घरे

विश्वास भावे
सोमवार, 21 मार्च 2022


अरण्यवाचन

एखाद्या प्राण्याचा पत्ता शोधायचा असेल तर दोन मार्ग आहेत... एक म्हणजे त्यांची ‘घरं’ माहिती असणं किंवा त्यांच्या नेहमीच्या वावराच्या, बसण्याच्या, विश्रांतीच्या जागा माहिती असणं.

‘प्राण्यांचे पत्ते’ यामध्ये आपण पहिल्या लेखात बघितलं की किती प्रकारची घरं असू शकतात. घरांच्या बाबतीत प्राण्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत; घर नसलेले, हंगामी घर असलेले किंवा फिरतीचे घर असलेले. तसं तर कोणत्याच प्राण्याचं घर वर्षभर कायम नसतं, पण हंगामापुरतं घर केलं जातं आणि नंतर मोडलं जातं. 

बिळं, गुहा, झुडपं, घरटी, रातनिवारे, ढोल्या, रुस्टिंग, पर्चिंगची ठिकाणं असे हे घरांचे प्रकार असू शकतात. ससा, हरिण, रानडुक्कर अशा प्राण्यांची घरे नसतात. एखादा झुडपाचा किंवा गवताचा पॅच बघून वीण केली जाते, पिल्लं लपवली जातात आणि नंतर ते घर कायम राहत नाही. वाघाच्या बाबतीत तर भटकं जनावर असल्यानं, विश्रांतीच्या ठिकाणी जवळ असलेल्या एखाद्या ठिकाणी रात्र काढली जाते आणि नंतर दुसरीकडे. पण साळिंदराची बिळं असतात; तर तरस, रानकुत्री यांची मात्र विणीच्या हंगामात बिळासारख्या ‘डेन’ असतात. मुंगूस, साळींदर, कोल्हा, खवल्या मांजर यांसारखे प्राणी छोट्या बिळांमध्ये किंवा डेनमध्ये राहतात. पाणमांजर किंवा ऑटर हा प्राणी पाण्याच्या परिसरात राहतो, ऑटर पाणवठ्याच्या काठावर काट्या-कुट्यांची घरटी तयार करतात.

रानातले ससे बिळात राहतात, असा एक समज आहे पण ते खरं नव्हे. ते छोट्या छोट्या झुडपात, गवतात राहतात आणि त्यांचासुद्धा ‘पर्मनंट रेसिडेन्स’ असा काही नाही. बगळे, करकोचे यांचे मोठमोठे थवे रात्री विशिष्ट झाडांवर वस्ती करतात आणि तिथं त्यांना गाठणं खूप सोपं आहे. अशा वसाहतींना सारंगागार म्हणतात. बऱ्याच पक्ष्यांना विशिष्ट झाडांवर रात्री ‘रुस्टिंग’  करायची सवय असते. यात रानकोंबडे, चकोत्री, मोर असे कित्येक सभासद आहेत. हे त्यांचे रातनिवारे आहेत. त्यांच्या सवयी माहीत असतील तर ते अगदी पहाटे, किंवा संध्याकाळी कुठं भेटू शकतील हे समजते. 

कित्येक पक्ष्यांना काही हुकमी जागेवर जाऊन बसायची सवय असते. उदाहरणार्थ, खंड्या म्हणजेच किंगफिशर... एखाद्या वाहत्या प्रवाहावर झुकलेल्या झुडपाच्या फांदीवर तुम्हाला हा छोटा खंड्या कायम बसलेला दिसेल आणि शिकार दिसली की पाण्यात झेपावेल. खंड्याचं घर कोणतं असेल? एखादी नदी किंवा नाल्याच्या मातीच्या उभ्या काठावर बिळ केलेलं असतं, तेच त्याचं घर. अशा एखाद्या मातीच्या धसावर कित्येक बिळं दिसतील... ऑस्प्रे, गरुड यांसारखे पक्षी अशाच हुकमी उंचावरच्या जागा बघून बसतात आणि शिकार शोधतात.  

घरट्यांमध्ये तरी किती प्रकार? फाल्कन, गिधाडे यांची घरं कडेकपारींवर, तर वर सांगितल्याप्रमाणे किंगफिशरची घरटी नदी, नाले यांच्या काठच्या मातीच्या धसांवर केलेल्या बिळांमध्ये; टिटवी तलावाकाठच्या ओलसर भागात किंवा अगदी पीक काढलेल्या भाताच्या ओलसर शेतात अगदी उघड्यावर पण दिसेल अशी घरटी करते. तिच्या वावरावरून, कॉल्सवरून आणि नीट निरीक्षण करूनच तिचं घरटं शोधता येतं. जकानासारख्या काही पक्ष्यांची घरटी तर पाण्यामधील तरंगणाऱ्या एखाद्या गवताच्या तुकड्यामध्ये असत. शिंपी पक्ष्याचं घरटं मोठी पानं असलेल्या झाडांवर असतं, तर नाचण पक्ष्याचं घरटं बेल, अनंत अशा छोट्या झाडांवर. गरुडाची घरटी उंच झाडांवर थोडी अस्ताव्यस्त आकाराची असतात आणि काही गरुड तर वर्षानुवर्षं तीच तीच जागा घरटी करण्यासाठी वापरतात. पोपटाची घरटी एखाद्या रेडीमेड ढोलीमध्ये किंवा दुसऱ्‍या पक्ष्यांनी सोडून दिलेल्या फांदीवरच्या भोकात आढळेल. तांबट झाडाच्या एका सुकलेल्या फांदीवरही खालच्या बाजूनं घरटं करतो. धनेशाचं घरटं म्हणजे तर एक गंमतच आहे. एखाद्या ढोलीमध्ये तो घर वसवतो. मादी ढोलीमध्ये राहते. घरटं मातीनं लिंपून बंद केलं जातं. फक्त चोच बाहेर येईल इतकीच फट ठेवली जाते. मादी ढोलीत बसून अंडी उबवते, पिल्लं वाढवते. या संपूर्ण काळात मादी आणि पिल्लांची काळजी नर घेतो. त्यांच्यासाठी अन्न आणण्याचं काम नर दिवसभर करत असतो. 

बुलबुल, नाचण यांसारखे पक्षी वाटीच्या आकाराची घरटी तयार करतात. ही घरटी तुम्हाला फांद्यांच्या बेचकीमध्ये दिसू शकतात. बागांमध्ये अंगणातल्या झाडांवर ही घरटी दिसतील. नाचण पक्ष्याचं घरट्याचं रक्षण करतानाचं वर्तन पाहायचं असेल तर नक्की लक्ष ठेवा. आमच्या घराच्या  अंगणात नाचण पक्ष्याचं घरटं होतं. आमच्याकडे रोज येणाऱ्‍या मांजराला आम्ही खाणं ठेवायचो, ते मांजर खरंतर घरट्याकडे पाहायचंसुद्धा नाही. ते खाऊ खाऊन निघून जायचं. पण हे दोन नाचण पक्षी त्याच्या अवतीभोवती घिरट्या घालून आवाज करत राहायचे. 

स्विफ्ट, स्वॉलो आणि असे पाकोळ्यांच्या जातीतले पक्षी ओल्या मातीनं भिंतीवर किंवा टेकड्यांच्या कड्यावर घरटी करतात. यांची घरटी ओल्या मातीनं लिंपून तयार केली जातात. घराचं छत आणि भिंत यांच्या कोनामध्ये यांची घरटी दिसतील. 

मोर, रानकोंबडा यांसारखे पक्षी एखाद्या झाडाच्या आडोशाला पाचोळ्यापासून घरटी करतात. या पद्धतीमुळं त्यांचं घर आजूबाजूच्या रंगात सहज मिसळून जातं.

पक्षी घरं कशी, कुठं करतात हे कळणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच घरं केव्हा, किती काळासाठी करतात हे माहिती असणंही महत्त्वाचं आहे. एखाद्या प्राण्याचा निवारा वापरण्याचा ऋतू आणि किती काळ तो निवारा वापरला जाणार आहे हे माहिती असायला हवं. फक्त अशा ठिकाणांचं निरीक्षण सांभाळून, प्राण्यांना जराही त्रास न देता, अंतर राखूनच करायचं असतं. प्राण्यांची घरं हा पुनरुत्पादनासाठी आवश्यक घटक आहे, आणि अशा ठिकाणी आपला हस्तक्षेप जराही करायचा नसतो. 

आता हे सर्व झालं प्राण्यांच्या पत्त्याबाबत. पुढच्या लेखापासून आपण अरण्यवाचनाच्या पुढच्या पानांकडे वळूया... ते म्हणजे पाऊलखुणा!

संबंधित बातम्या