पाऊलखुणा

विश्वास भावे
सोमवार, 4 एप्रिल 2022

अरण्यवाचन

जंगलातल्या एखाद्या प्राणी-पक्ष्याचं प्रत्यक्ष दर्शन न होतासुद्धा केवळ पाऊलखुणांवरून काय काय गोष्टी कळू शकतात, हे समजलं तर आश्चर्य वाटेल. एक तर नुसत्या पाऊलखुणांवरून वन्यजीवांच्या वावराबद्दल, हालचालींबद्दल आणि त्याच्याशी निगडित असलेल्या जंगलात घडलेल्या घटनांची मांडणी करणं, ही एक अतिशय थरारक आणि मनोरंजक गोष्ट आहे आणि ती जिम कॉर्बेट किंवा त्याच्यासारख्या फार कमी जणांना जमलेली आहे.

नुसते निसर्गप्रेमी असणे केव्हाही चांगलेच, पण त्या नात्याने निसर्गामध्ये भटकंती करताना हळूहळू आपली जिज्ञासा जागृत होते आणि वाढत राहते. निसर्गात असंख्य घटक आहेत, जीव आहेत आणि आपल्याला त्यांच्या जीवनात थोडसं डोकवायची इच्छा होते. हा विशिष्ट जीव कुठं राहत असेल? याची भेट कुठं होऊ शकेल? याच खाद्य काय असेल? त्याच्या सवयी काय असतील? भाषा काय असेल? सहकारी कुठं असतील? हा पावसात कुठं निवारा शोधत असेल? 

यातील पहिल्या दोन प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा थोडासा प्रयत्न आपण लेखमालेतील मागच्या काही लेखांत केलाय आणि त्यांचे पत्ते कसे शोधायचे याचे काही मार्ग तरी आपल्याला माहीत झालेत. 

पण आता आपण अरण्यावाचनाच्या पुढच्या एकदम महत्त्वाच्या पैलूवर बोलणार आहोत... भटकंती करताना वन्यजीव प्रत्यक्ष दिसणं, त्यांच्या हालचाली निरखणं, अभ्यास करणं हे जरी मनोरंजक वाटलं, तरी ते तितकं सहज जमणारं नाही आणि वन्यजीव दिसले तरी त्यांच्या बाकीच्या पैलूंवर काही प्रकाश पडत नाही. पण जंगलवाटांवरून जाता-येताना सर्व वन्यजीव त्यांच्या हालचालींचे फोटोग्राफिक पुरावे मात्र मातीवर सोडून जातात आणि हाच आहे आपल्यातल्या ‘जंगल डिटेक्टिव्ह’साठीचा पुढचा क्ल्यू... पाऊलखुणा! 

जंगलातल्या एखाद्या प्राणी-पक्ष्याचं प्रत्यक्ष दर्शन न होतासुद्धा केवळ पाऊलखुणांवरून काय काय गोष्टी कळू शकतात, हे समजलं तर आश्चर्य वाटेल. एक तर नुसत्या पाऊलखुणांवरून वन्यजीवांच्या वावराबद्दल, हालचालींबद्दल आणि त्याच्याशी निगडित असलेल्या जंगलात घडलेल्या घटनांची मांडणी करणं, ही एक अतिशय थरारक आणि मनोरंजक गोष्ट आहे आणि ती जिम कॉर्बेट किंवा त्याच्यासारख्या फार कमी जणांना जमलेली आहे. अर्थात जंगलाच्या आसपास राहणारे आदिवासी किंवा स्थानिक लोक मात्र यात अत्यंत तरबेज असतात; फक्त त्यांचे हे ज्ञान ‘डॉक्युमेंट’ होत नाही. 

पाऊलखुणांचे प्रकार आणि एकूणच त्यांच्या निरीक्षणातून काय काय साधता येतं, हे आपण आज बघू आणि लेखमालेच्या पुढील पानांमध्ये आपण त्याचा एक एक पैलू उलगडूया.

 आपण आपल्या अभ्यासासाठी पाऊलखुणांचे दोन प्रकार पाडू; एक - खूर असलेले प्राणी (त्यांच्या ठशांना ‘हूफमार्क’ म्हणू या) आणि पावलाला गादी असलेले प्राणी (त्यांच्या ठशांना ‘पगमार्क’ म्हणू या). 

खूर असलेल्यांमध्ये चितळ, सांबर, भेकर यांसारखी सारंग हरणे, काळवीट, चिंकारा, नीलगायीसारखी कुरंग हरणे, रानडुकरे, गवे असे प्राणी येतात. तर, गादी असणाऱ्यांमध्ये अस्वल, कोल्हा, तरस, रानकुत्री, लांडगे यांसारखे श्वानवर्गीय प्राणी असतील तर वाघ, बिबळ्या, रानमांजर यांसारखे मार्जार कुलातील प्राणीही येतील! अर्थात याशिवाय साळींदर, उदमांजर, ससा, मगरी, जमिनींवर वावरणारे सातभाई, होले, मोर, रान कोंबडे, चकोत्री वगैरे इतरही आहेतच! 

आता हे एकदा डोक्यात फिट बसलं की आपलं आपोआप पायाखालच्या जंगलवाटांवर लक्ष जायला सुरुवात होईल; पण अशा वेळी ‘काय’ बघायला हवं हे कळणं आवश्यक आहे आणि ते आपण अगदी साधं लॉजिक लावून बघू!  ज्या वाटेवर ठसे उमटले आहेत, ती वाट कशी आहे; चिखल आहे का कोरडी माती आहे? ठसे खुरासारखे दिसतायत की पावलाच्या गादीसारखे दिसतायत? किती खोलवर रुतले आहेत? खूप संख्येत आहेत की एकटे दुकटे आहेत? एकाच ठिकाणी जवळजवळ आहेत का लांब आहेत, आकार काय आहे? (यात Size आणि Shape हे दोन्ही महत्त्वाचं आहे), स्पष्ट आहेत की त्यावर पडलेल्या माती, पानं यामुळे अस्पष्ट झालेत? ओले आहेत की कोरडे आहेत? या सर्व गोष्टींबरोबरच ठसा हा एकच न बघता ठशांचा ‘ट्रॅक’ बघणं जास्त उचित ठरेल. 

आपण प्रथम खूर असलेल्या प्राण्यांचा विचार करूया. इथं वरील सर्वसामान्य निरीक्षणांपेक्षा काही वेगळ्या गोष्टी बघायला लागतात. उदाहरणार्थ, खूर नेहमी समोरच्या दिशेला निमुळती आणि मागच्या दिशेला रुंद असतात, त्यामुळे ठशामध्ये कोणत्या दिशेला निमुळता भाग आहे हे नीट बघितलं तर ते जनावर कोणत्या दिशेला जातंय हे कळेल. आकारावरून सांबर-नीलगाय, चितळ-भेकर, रानडुक्कर, रानगवा असा प्राथमिक अंदाज येऊ शकतो. पण आकार किंवा आकृतिबंधावरून मात्र नक्की कोणाचा आहे ते कळतं. एका विशिष्ट जागेवर जास्त ठसे असतील, तर हा कळप आहे की एकटं जनावर आहे हेसुद्धा कळेल. अर्थात कोणता प्राणी कळपात वावरतो, कोणता एकटा वावरतो, वगैरे ज्ञानाचीसुद्धा जोड या अंदाजाला द्यावी लागतेच. पण खूरवाल्या प्राण्यांमध्ये फक्त ठशांवरून लिंग ओळखणं मात्र अवघड आहे. 

आता मऊ पावलांच्या जनावरांबद्दल थोडंसं. ‘पगमार्क’मध्ये तीन भाग पडतात; चवडे, नखं आणि गादी. आता पगमार्कमध्ये काय बघायचं? वर सांगितलेल्या गोष्टींशिवाय पगमार्कच्या संदर्भात याहीपेक्षा अधिक गोष्टी बघायला वाव असतो आणि अंदाजदेखील जास्त अचूक बांधता येतो. चवडे कोणत्या दिशेला आहेत आणि गादी कोणत्या दिशेला आहे हे बघितलं, तर जनावर कोणत्या दिशेला गेलं हे समजेल. त्याचबरोबर आकारावरून वाघ, रानमांजर, बिबळ्या, रानकुत्रा, अस्वल, तरस यापैकी कोण आहे, याचा तर्क आपण करू शकतो. आकार हा घटक मात्र पगमार्कबद्दल अतिशय महत्त्वाचा आहे, कारण त्यावरून लिंग आणि वय समजू शकते. 

माती कोरडी असेल, तर ठसा उमटल्यानंतर काही वेळानं त्याच्या भिंती ढासळू लागतील, त्यावर पालापाचोळा जमेल, आणि ठसा ‘ताजा’ आहे का ‘शिळा’ आहे हे समजेल. थोडक्यात ठशाचं ‘वय’ कळेल. म्हणजे फक्त पायाखालच्या वाटेकडं नजर ठेवली तर दिशा, संख्या, प्रजात, ठशाचं आणि जनावराचंही वय, वजन, आकार आणि इतरही कित्येक निराळ्या गोष्टी हे ठसे सांगून जातात. पण आपण त्याबद्दल नंतर सविस्तर बोलूया.

संबंधित बातम्या