पाऊलखुणा मार्जारवर्गीय प्राण्यांच्या...

विश्वास भावे
सोमवार, 18 एप्रिल 2022

अरण्यवाचन

पायाखालच्या पायवाटेकडे नीट नजर ठेवली तर प्राण्यांच्या पावलांचे ठसे प्रजाती, लिंग, दिशा, संख्या, कोणत्या पावलाचा ठसा आहे, जनावराचे आणि ठशाचे वय, वजन, आकार आणि इतरही कित्येक निरनिराळ्या गोष्टी सांगून जातात. आपण अगदी पायाभूत गोष्टींपासून सुरुवात करू.

आपण मागच्या लेखात जंगल डिटेक्टिव्हच्या एका महत्त्वाच्या ‘क्ल्यू’बद्दल बोलायला सुरुवात केली होती... तो म्हणजे पाऊलखुणा! मऊ पावलांच्या जनावरांचे साधारणपणे मुख्य दोन किंवा तीन भाग पाडू शकतो; मार्जारवर्गीय प्राणी आणि श्वानवर्गीय प्राणी आणि इतर म्हणजे ससा, उदमांजर, मगर वगैरे. अशा मऊ पावलांच्या ठशांना सर्वसाधारणपणे ‘पगमार्क’ म्हणून ओळखले जाते. तेव्हा आपणसुद्धा हाच शब्द वापरूया! 

‘पगमार्क’मध्ये तीन भाग असतात; चवडे, नखे आणि गादी. खूरवाल्या पाऊलखुणांपेक्षा अशा पगमार्कमध्ये बरीच निरीक्षणे नोंदवायला वाव असतो आणि अंदाजदेखील जास्त अचूक बांधता येतात. पण पगमार्कमध्ये नक्की काय काय बघायचे?

त्यातही नेहमी दुर्लक्षित राहणारी गोष्ट म्हणजे, एका पगमार्कपेक्षा त्याचा संपूर्ण ट्रॅक मिळाला तर खूप छान... फक्त पायाखालच्या पायवाटेकडे नीट नजर ठेवली तर प्रजाती, लिंग, दिशा, संख्या, कोणत्या पावलाचा ठसा आहे, जनावराचे आणि ठशाचे वय, वजन, आकार आणि इतरही कित्येक निरनिराळ्या गोष्टी हे ठसे सांगून जातात. आज आपण अगदी पायाभूत गोष्टींपासून सुरुवात करू.

आता समजा तुमाला जंगल वाटेवर एखादा ठसा मिळाला की सर्वप्रथम थोडे पुढे जाऊन तसे अजून काही ठसे मिळतात का, म्हणजेच संपूर्ण ट्रॅक मिळतोय का ते बघायचे. समजा तोही मिळाला तर एक संपूर्ण ट्रॅक आपल्याला काय माहिती देऊ शकतो हे बघण्यासाठी आता थोडी ‘डिटेक्टिव्ह’गिरी करूया. बघूया तर आपल्याला काय काय मिळते?  

१.     ठसे कोणाचे आहेत? : ठशांमध्ये 'साईझ' आणि 'शेप'अशा दोन्ही गोष्टी प्रथम बघाव्या लागतात. एक ढोबळ अंदाज असा की गादी मोठी, चवडे छोटे असतील तर मार्जारवर्गीय (वाघ, बिबळ्या, रानमांजर) आणि दोन्ही साधारण एका आकाराचे असतील तर श्वानवर्गीय (रानकुत्रे, कोळे, लांडगे, तरस) प्राणी. आपण आज फक्त मार्जारवर्गीय प्राण्यांच्या ठशांबद्दल बोलतोय, तेव्हा त्याचाच विचार करू. आता ‘साईझ’वरून वाघ, बिबळ्या की रानमांजर आहे ते सहज कळेल हे सांगायला नकोच. मोठी गादी-छोटे चवडे आणि छोटी गादी-मोठे चवडे म्हणजे मी काय म्हणतोय, ते तुम्हाला घराजवळच्या मांजराचे आणि कुत्र्याचे ठसे बघून सहज समजेल. आणखी एक मोठा फरक आहे. श्वानवर्गीय प्राणी हे पाठलाग करून शिकार करतात, तर मार्जारवंशीय प्राणी दबा धरून किंवा सावजाच्या अगदी जवळ जाऊन झडप घालतात. त्यामुळे त्यांच्या पावलाची नखे आत ओढून घेतली जातात आणि अगदी झडप घालण्याच्या शेवटच्या क्षणी नखे बाहेर येतात. साहजिकच त्यांच्या ठशामध्ये नख्यांच्या खुणा दिसत नाहीत, पण श्वानवंशीय प्राण्यांच्या ठशांमध्ये त्या स्पष्ट दिसतात. 

२.     नर आहे का मादी? : इथे ‘शेप’चा विचार करावा लागेल. मार्जारवंशीय प्राण्यांमध्ये ठशाचा एकूण आकार साधारण चौरसात बसेल असा असेल, तर तो नराचा असतो. मादीचे ठसे मात्र थोडे लांबुळके असतात आणि चवडेसुद्धा गोल नाही तर लांबट निमुळते असतात. 

३.     वय : तरुण जनावराचे ठसे एकदम नॉर्मल असतात, पण वय वाढले की गादीवर भेगा पडतात, पाऊल फाकले जाते आणि ठशांमध्ये हे सर्व दिसून येते.  

४.     वजन, आकार, लांबी वगैरे : पगमार्कवरून प्राण्याचे लिंग कळते, पण त्याच्या वजनाचा आणि लांबीचासुद्धा साधारण अंदाज येऊ शकतो.  जिम कॉर्बेटच्या ‘मॅनइटर्स ऑफ कुमाऊँ’मध्ये तर गवताचे पाते ठशावर ठेवून मिर्झापूरचे कोल जमातीचे लोक वाघाच्या वजनाबद्दल आणि लांबीबद्दल किती अचूक अंदाज बांधू शकतात त्‍याचे वर्णन आहे. ठशांची खोली, मातीचा स्वभाव यावरून अनुभवी लोक वाघ-बिबळ्याच्या वजनाचासुद्धा अंदाज बांधू शकतात. आपण अजूनही या क्षेत्रात एवढे तज्ज्ञ नाही, त्यामुळे याबद्दल लगेच खोल विचार करण्याची गरज नाही, पण लक्षात मात्र ठेवूया. 

५.     दिशा : या बाबतीत अगदी 'साधा' कॉमन सेन्स उपयोगी येईल. चवडे कोणत्या दिशेला आहेत आणि गादी कोणत्या दिशेला आहे हे बघितले, तर जनावर कोणत्या दिशेला गेले हे समजेल. पण कधीकधी एखाद्या ठिकाणी ठशांची एकदम गुंतागुंत दिसून येते, तर काही ठिकाणी चारही, पावलांचे ठसे दिसतात. इथे छावे खेळले आहेत हे समजून जावे.

६.     ठसा पुढच्या पावलाचा आहे का मागच्या, डाव्या की उजव्या? : हे ओळखणे अगदी सोप्पे आहे. आपण आपल्या हाताच्या पंजा बघितला तरी हे कळेल. दोन्ही हाताचे अंगठे आतल्या बाजूला दुमडा, आता तुमच्या लक्षात येईल की उजव्या हाताचे सर्वात लांब बोट आहे त्याच्या उजव्या बाजूला दोन बोटे आहेत आणि याच्या अगदी उलट डाव्या हाताच्या पंजामध्ये दिसेल. ठशामधील सर्वात लांबड्या बोटावरून अगदी याच प्रकारे आपण तो उजव्या पावलाचा आहे की डाव्या हे ओळखू शकतो. आता ठसा पुढच्या पावलाचा आहे का मागच्या हे ओळखण्यासाठी ठशांमधील सर्वात लांबडे बोट आणि त्याच्या अगदी शेजारचे बोट याच्या लांबीतला फरक बघा. पुढच्या पावलाचा असेल तर या बोटांच्या लांबीत अगदी कमी फरक असतो तर मागच्या पावलात हा फरक बराच असतो.    

या झाल्या अगदी पायाभूत गोष्टी. याशिवाय ठशाचे वय, संख्या, वेग, बरोबर पिल्ले आहेत का? असतील तर किती? या आणि अशा कित्येक गोष्टींबद्दलची माहिती ठशांच्या निरीक्षणातून मिळते. ते मात्र पुढच्या लेखात पाहू.

संबंधित बातम्या