जर अॅल्युमिनियम फॉईल मायक्रोवेव्हमध्ये ठेवली तर..!

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

‘जर तर’च्या गोष्टी

परवाचीच गोष्ट. एक मोठा बाका प्रसंग होता होता टळला. त्याचं काय आहे, या लॉकडाउनच्या काळात जेवायला बाहेर जाणं जमत नाही. पूर्वी कसं आमचं सगळं कुटुंब आठवडा दोन आठवड्यातून कुठं तरी जाऊन जिभेचे चोचले पुरवून येत असे. पण रेस्टॉरन्टना टाळं लागलं आणि ते सगळंच थांबलं. आता ती उघडली असली तरी अजूनही तिथं जाण्याचं धाडस करवत नाही. दुधाची तहान ताकावर भागवावी, तसा मग होम डिलिव्हरीचा पर्याय स्वीकारलाय. त्याचीही थोडी गोची आहेच. कारण आमच्या सोसायटीत अजूनही कुणाला वर घरपोच सेवा देता येत नाहीय. जे काही सामान असेल ते खाली वॉचमनकडे ठेवून द्यायचं आणि आम्ही खाली जाऊन ते वर घेऊन यायचं.

त्या दिवशीही अशीच एक डिलिव्हरी आली. व्यवस्थित अॅल्युमिनियमच्या बनवलेल्या छोट्या छोट्या डब्यांमधून. सीलबंद केलेले पदार्थ. रोटी तर चक्क अॅल्युमिनियमच्या फॉईलमध्ये गुंडाळलेली. चांगली गरमागरम राहावी म्हणून. पण रेस्टॉरन्टपासून इमारतीपर्यंत यायला लागलेला वेळ, डिलिव्हरी आल्यानंतर वॉचमनला आम्हाला निरोप द्यायला लागलेला वेळ आणि ती वर घरी आणण्यासाठी लागलेला वेळ, सर्व धरून मामला तसा थंडच व्हायला लागला होता. ते अन्न गरम करण्यासाठी मुलीनं ती अॅल्युमिनियम फॉईलमध्ये गुंडाळलेली रोटी तशीच्या तशीच मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये ठेवली आणि ती बटन दाबणार तोच ते पाहून तिची आई ओरडली, ‘अग थांब थांब. काय करते आहेस? धातूची कोणतीही वस्तू मायक्रोवेव्हमध्ये ठेवायची नसते. विसरलीस!’

मुलीनं घाईघाईनं ती रोटी बाहेर काढली. पण त्याचवेळी तिनं त्या ओव्हनचा आतला भाग चांगला न्याहाळून पाहिला आणि म्हणाली, ‘पण का? हा मायक्रोवेव्हचा आतला भाग तर सगळा धातूचाच बनवलेला आहे. स्टील असेल नाहीतर अॅल्युमिनियमच असेल. ते चालतं तर मग ही रोटीभोवती गुंडाळलेली फॉईल का चालत नाही? काय होईल जर अॅल्युमिनियम फॉईल मायक्रोवेव्हमध्ये ठेवली तर!’

खरंच काय होईल?

मायक्रोवेव्ह म्हणजे खरं तर आपण पाहतो त्या प्रकाशलहरींचाच भाऊबंद. आपल्या डोळ्यांना केवळ तानापिहिनिपाजा या चौकटीतल्याच प्रकाशलहरी दिसू शकतात. म्हणून तर त्यांना दृश्यप्रकाश म्हणतात. पण त्यांच्या दोन्ही टोकांपलीकडे या लहरींचा संसार पसरलेला असतो. कोणतीही लहर म्हटली की ती सतत वरखाली होत राहते. म्हणजेच प्रत्येक लहरीला माथा असतो तसाच पायथाही असतो. शेजारशेजारच्या दोन लहरींमधलं अंतर म्हणजे त्या लहरींची तरंगलांबी. ही तरंगलांबी म्हणजेच त्या त्या लहरींचं ओळखपत्र. जांभळ्या प्रकाशलहरींची तरंगलांबी साधारण साडेतीनशे नॅनोमीटर एवढी असते. तर दुसऱ्या टोकाच्या तांबड्या प्रकाशाची सातशे नॅनोमीटर. एक नॅनोमीटर म्हणजे एका मीटरचा एक अब्जांश भाग.

निळ्याच्या पलीकडं असतात जंबूपार म्हणजे अल्ट्राव्हायोलेट आणि तांबड्याच्या पलीकडं अवरक्त म्हणजेच इन्फ्रारेड. त्याच्याही पलीकडं रेडिओलहरी असतात. आपल्या रेडिओच्या कार्यक्रमांचं प्रक्षेपण याच लहरींचं बोट पकडून केलं जातं. तसंच यांचा वापर संदेशवहनासाठीही होतो. दूरदूरचे तारेही याच लहरी उत्सर्जित करतात. त्या पकडून त्यांच्यासंबंधीची माहिती मिळवता येते. 

या रेडिओलहरींचंच दुसरं नाव आहे मायक्रोवेव्ह. यांची तरंगलांबी असते एक सहस्त्रांश मीटर ते एक दशांश मीटर. म्हणजेच एक मिलिमीटर ते दहा सेंटिमीटर. प्रकाशलहरी जेव्हा कोणत्याही पदार्थावर पडतात तेव्हा त्या एक तर परावर्तित होतात. आल्या दिशेनंच त्यांना माघारी पाठवलं जातं. आरसे हेच करतात. पण आरशाऐवजी नुसतीच काच असेल तर हे प्रकाशकिरण त्यांच्या आरपार जातात. तिसराही एक पर्याय आहे. काही पदार्थांमधून या लहरी आरपारही जात नाहीत की परावर्तितही होत नाहीत. त्या शोषल्या जातात. साधंच उदाहरण द्यायचं तर हिरव्या रंगाच्या वस्तूकडून तानापिहिनिपाजामधला हिरवा रंग सोडल्यास बाकी सर्व लहरी शोषल्या जातात. फक्त हिरव्या रंगाच्याच लहरी परावर्तित होतात. काळी वस्तू सर्वच प्रकाश शोषून घेते. म्हणून तर तिला कोणताही रंग नसतो. युरोपसारख्या थंड प्रदेशात काळ्या रंगाचे कपडे घालतात ते यासाठीच. त्या काळ्या रंगाकडून सर्व लहरी शोषल्या गेल्यामुळं शरीर उबदार राहायला मदत होते. उलट प्रकार वालुकामय अरबी प्रदेशात, तिथं सारं पांढरंधोप. 

मायक्रोवेव्हचेही हेच गुणधर्म आहेत. त्यांचाच उपयोग मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये पदार्थ शिजविण्यासाठी केला जातो. पाणी, तुपासारखे स्निग्ध पदार्थ किंवा शर्करामय पदार्थ या लहरी शोषून घेतात. तसं शोषण झाल्यामुळं या पदार्थांचे अणुरेणू चेतवले जातात. ते उंडारू लागतात. धुमशान घालू लागतात. म्हणजेच ते तापतात. गरम होतात. पदार्थ शिजतो. 

या उलट प्लास्टिक, काच किंवा चिनी माती या लहरी शोषत नाहीत. त्यामुळं ते गरम होत नाहीत. चिनी मातीच्या कपातला चहा गरम होतो, पण कप त्या मानानं थंडच राहतो. सगळी उष्णता त्या चहालाच मिळते. 

पण धातूंचं काय? कारण ओव्हनच्या आतल्या भिंती सगळ्या धातूच्याच बनलेल्या असतात. त्याचं कारण म्हणजे या धातूंचे जाड पत्रे असतील तर ते आरशासारखे या लहरी परतवून लावतात. शोषत नाहीत. जर तुम्ही धातूच्या अशा जाडजूड पत्र्याच्या भांड्यात अन्न ठेवलंत तर ते शिजणार नाही. कारण ते भांडं सगळ्या लहरी परतवून लावेल, त्यांना अन्नापर्यंत पोचूच देणार नाहीत. मग ते अन्न गरमही होणार नाही, तर शिजण्याचा प्रश्नच नाही. 

पण याच धातूचे पातळ पत्रे, तुकडे यांची बाब निराळी आहे. कारण या लहरी त्यांच्यावर पडल्या की त्या तुकड्यांमधून विद्युतप्रवाह वाहू लागतो. तसंच पाहिलं तर त्या भिंतींच्या जाड पत्र्यांमधूनही असा करंट वाहायला लागतो. पण ते तो सहन करू शकतात. छोट्या तुकड्यांमध्ये ती सहनशक्ती नसते. ते त्या विद्युतप्रवाहापायी चटसारी गरम होतात. आणि तेही इतक्या झपाट्यानं की क्षणात ते पेट घेतात. ओव्हनमध्ये आग पसरते. आणि त्यात काही ज्वलनशील वस्तू असेल, कागदाचा तुकडा असेल, तर मग बघायलाच नको. आगडोंबच उसळेल. 

अॅल्युमिनियमची फॉईल अशीच पातळ असते. शिवाय तिच्या कडाही धारदार असतात. टोकं अणकुचीदार असतात. त्यांच्यामधून विद्युतप्रवाह वाहू लागला की ठिणग्या उडतात. त्या दुसऱ्या कशावर पडल्या तर त्या गोष्टीही पेटू शकतात किंवा ती ठिणगी जर त्या ओव्हनच्या इलेक्ट्रॉनिक घटकांवर पडली तर काय अनर्थ होईल सांगता येत नाही. तेव्हा चमचा, सुरी, अॅल्युमिनियम फॉईल यांना मायक्रोवेव्ह ओव्हनपासून दूरच ठेवलेलं बरं. काय!

संबंधित बातम्या