जर केस कापलेच नाही तर..!

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

‘जर तर’च्या गोष्टी

या कोरोनापायी आलेल्या लॉकडाउनमुळे सगळंच काही ठप्प झालं. दुकानं बंद झाली, रेल्वे, बस बंद झाल्या. नाट्यगृह, सिनेमा बंद झाले. एकमेकांना भेटणं बंद झालं. आणि हो, केश कर्तनालये बंद झाली. त्यामुळं केस कापण्याची पंचाईत झाली. प्रत्येक जण हे शिप्तर डोक्यावर बाळगून राहू लागला. काहींचे चेहरे तर दाढीमिशांनीच भरून गेले. मास्कची गरजच भासू नये इतपत. काहींची दाढी तर छातीवर रुळायला लागेल की काय असं वाटू लागलं. आमच्या चिंतातूर जंतूला हे आणखी एक निमित्त मिळालं. तो आलाच तणतणत, ‘हे केस असेच वाढत राहिले ना तर माझ्याच केसांमध्ये पाय अडकून मी धडपडेन एक दिवस.’

खरंच तसं होईल? जर केस कापलेच नाही तर डोक्यापासून पायापर्यंत ते पोचतील? खरं तर ज्यांना आपण केस म्हणतो तो त्याचा आपल्या कवटीबाहेर दिसणारा भाग असतो. तो मृत अवयव असतो, आपल्या नखांसारखाच. म्हणून तर तो कापताना आपल्याला अजिबात वेदना होत नाहीत. मग त्यांची वाढ कशी होते? त्याचं कारण कवटीच्या आत न दिसणारी त्याची मुळं. ती लहानखुरीच असली तरी त्यांची वाढ होते. तसं होत असताना ते कठीण होत जातात, रंग धारण करतात आणि  कवटीच्या बाहेर डोकावतात. केस वाढतात. 

ठीक आहे. पण ही मुळांची वाढ सतत होत असतेच ना! म्हणजे मग केसांची लांबीही अशीच अनिर्बंध वाढत जाणार आणि एक दिवस आपल्याच पायात घोटाळणार. घोटाळाच करणार. तर तसं नाही. कारण कोणत्याही एका वेळी या मुळांचा पंधरा ते वीस टक्के भाग सुप्तावस्थेतच राहतो. त्याची वाढ होत नाही. शिवाय डोक्यावरचे केसही सतत झडत असतात. ती एक साधारण प्रक्रियाच आहे. दर दिवशी पन्नास ते शंभर केस असे गळून पडतात. विश्वास बसत नसेल तर केसांतून जरा जोरानं हात फिरवून पहा. झडणाऱ्या केसांचा पाऊस दिसेल. किंवा कंगवा फिरवा. झडणारे केस त्यात अडकून पडलेले दिसतील. स्त्रियांना तर या गळणाऱ्या केसांची धास्तीच वाटते. पण पुरुषांनाही वाटते. टक्कल पडलेलं कोणाला आवडतं!

तरीही काही प्रमाणात वाढ होतच असते. म्हणून तर महिन्या दोन महिन्यांनी आपल्याला सलूनमध्ये जाऊन डोकं तिथल्या कारागिराच्या स्वाधीन करावं लागतं. स्त्रियाही पार्लरमध्ये जाऊन काटछाट करून घेत असतातच. तर ही वाढ होते तरी किती याचं गणित करूया ना. सर्वसाधारणपणे दर महिन्याला सव्वा ते दीड सेंटीमीटर वाढतात. म्हणजे अर्धा इंच. त्यात हे केसही काही अमर नसतात. त्यांचं आयुष्य दोन ते सहा वर्षांचंच असतं. म्हणजे एकदा वाढलेले केस तेवढा काळच टिकतात. नंतर गळून पडतात. आता महिन्याला दीड सेंटीमीटर म्हणजे वर्षाभरात किती झाले? करा गणित, मोडा बोटे. ते झाले अठरा सेंटीमीटर. आणि त्यांचं आयुर्मान पाच वर्षांचं धरलं तर तेवढ्या काळात त्यांची लांबी होईल अठरा पंचे नव्वद सेंटीमीटर. एक मीटर धरून चालू. 

खरं तर तेवढीही होणार नाही, असंच कुंतलतज्ज्ञ हॅली बिव्होना सांगताहेत. त्या म्हणतात की केस असे कापलेच नाहीत तर त्यांची लांबी वाढण्याऐवजी घटण्याचीच शक्यता जास्ती आहे. कारण जेव्हा आपण केस कापतो तेव्हा त्यांच्या शेंड्याकडचा भागच कापतो. तो तसाही जर्जर झालेला असतो. कमजोर असतो. त्याचे तुकडे पडायला लागलेले असतात. ते तसेच ठेवले तर मग केवळ शेंडाच नाही तर सगळाच केस कमजोर होऊन जातो. तो अकालीच गळून पडायला लागतो. त्यामुळं मग लांबी कमीच होऊ लागते. नियमित केस कापण्यानं आपण या कमजोर शेंड्यांची छाटणी करत राहतो. उरलेल्या केसांना बळकटी देतो. त्यांची निकोप वाढ व्हायला मदत करतो. ज्यांना केसांची लांबी वाढवायची आहे अशा तरुणींना म्हणूनच तर केस नियमित कापत चला असाच सल्ला त्या देतात. 

केस विरळ होणं हाही वाढत्या वयाचा परिणाम असतो. कोणताही तणाव, अयोग्य आहार यांची त्यात भर पडते आणि अधिक संख्येनं केस गळायला लागतात. ते धुण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचाही प्रभाव पडत असतोच. ते क्षारयुक्त किंवा आम्लयुक्त असेल तर त्यापायीही केसांचं आरोग्य बिघडू शकतं. 

केसांचं कपड्यांबरोबर घर्षणही होत असतं. काहींना डोक्यावर गॉगल ठेवून मिरवण्याची हौस असते. त्यांच्या काढण्याघालण्यापायीही काही केस तुटू शकतात. सतत धुळीच्या वातावरणात, उन्हातान्हात वावरावं लागलं तर केस कोरडे होतात. त्यांचा परिणाम मुळांवरही होतो आणि त्यांच्या वाढीला अटकाव होतो. त्यांचा वेग मंदावतो. 

आता कोणी म्हणेल हा केसांच्या वाढीचा सरासरी वेग झाला. म्हणजे काहींच्या केसांच्या वाढीचा वेग कमी असेल तसा जास्तीही असेल. अशा वेगवान केसधारकांचं काय! त्यांचाही विचार करू. समजा त्यांच्या केसांच्या वाढीचा वेग दीडपट असेल तर त्यांच्या केसांची वाढ होईल दीड मीटर, साडेचार फूट. तेव्हा त्यांची मजल पायापर्यंत जाण्याची शक्यता तशी कमीच. हं, आता कोणी अगदीच बुटबैंगण असेल, देढफुट्या असेल, तर त्याच्या पिंढऱ्या झाकल्या जातील. तरीही त्यांच्या जंजाळात पाय अडकून धडपडण्याची शक्यता तशी नगण्यच. 

पण अशा काही व्यक्तींची नोंद 

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झालेली आहे. त्यांच्या केसांची वाढ 

आपण केलेल्या गणितातल्या कमाल वाढीपेक्षाही जास्ती झाल्याचं व्यवस्थित पडताळून नमूद केलं गेलेलं आहे. १९९३मध्ये अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्समधील डियान विट या महिलेच्या केसांची लांबी मोजली गेली. ती चक्क बारा फूट आठ इंच भरली. म्हणजे ३८० सेंटीमीटर. आणि आपल्याच माता जगदंबांनी तर यावरही कडी केली होती. १९९४मध्ये या विक्रमवीरांगनेच्या केसांची लांबी होती तब्बल तेरा फूट साडेदहा इंच. म्हणजे ४१८ सेंटीमीटर. त्यांचा हा केससंभार पायात येत नसला तरी एवढं ओझं डोक्यावर बाळगत कसं चालायचं हा प्रश्नच आहे. 

पण हे झाले अपवाद. तुमच्याआमच्यासारख्या सर्वसामान्यांची गणना त्यात होऊ शकत नाही. तेव्हा जर केस कापताच आले नाहीत तर तोंड कदाचित लपवावं लागेल, किंवा आपोआपच लपेल. पण त्याहून फार मोठा अनर्थ होण्याची शक्यता नाही!

संबंधित बातम्या