जर पृथ्वीच्या गिरकीचा वेग वाढतच राहिला तर..!

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 5 एप्रिल 2021

‘जर तर’च्या गोष्टी

कॉफीनं भरलेला मग पुरता हातात घेण्याआधीच चिंतूनं त्याला सतावणारा प्रश्न विचारलाच. ‘पृथ्वीच्या गिरकीचा वेग असाच सतत वाढत राहिला तर? तो दुप्पट, चौपट, वीसपट झाला तर?’

‘पृथ्वीच्या गिरकीचा वेग वाढला तर त्याचे कितीतरी परिणाम होतील. पृथ्वीच्या सध्याच्या गिरकीचा वेग विषुववृत्तावर ताशी १६०० किलोमीटर एवढा आहे. पण जसजसं आपण उत्तरेला किंवा दक्षिणेला जात जाऊ तसतसा हा वेग कमी कमी होत जातो. दोन्ही ध्रुवांजवळ तर तो जवळजवळ शून्यावर पोचतो. त्यामुळं तू जो दुप्पट चौपटीचा विचार करतो आहेत तो पृथ्वीच्या गिरकीच्या सरासरी वेगाबद्दलच करायला हवा. हा सरासरी वेग साधारण ताशी १२५० किलोमीटर एवढा आहे. आता जर तो दुप्पट झाला तर मग पृथ्वी स्वतःभोवतीची एक प्रदक्षिणा निम्म्या वेळात पूर्ण करेल. म्हणजे दिवसाचे तास चोवीस न राहता बाराच होतील. वर्षाचा काळ हा पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या प्रदक्षिणेचा आहे. त्यात काहीच फरक पडणार नाही. पण एक वर्ष मात्र सध्यासारखं ३६५ दिवसांचं न राहता ७३० दिवसांचं होईल. 

आपलं दिवसाचं झोपेचं आणि जागेपणाचं वेळापत्रक सध्या चोवीस तासांच्या दिवसावर आधारलेलं आहे. आपल्या शरीरातलं हे आजीचं घड्याळ मग कोलमडूनच पडेल. दुपटीचा विचार जरा बाजूला ठेवूया. समज की या वेगात केवळ ताशी दोन किलोमीटरचीच वाढ झाली. तरीही मग दोन्ही ध्रुवांजवळचं पाणी विषुववृत्ताकडे धाव घेईल. तिथली पाण्याची पातळी काही सेंटिमीटरही वाढेल. तिनं आपलं लक्ष वेधून घ्यायला अर्थात काही वर्षं लागतील. पण तोच वेग समजा ताशी दीडशे किलोमीटरनं वाढला तर मग दिवस बावीस तासांचाच होईल. युरोप, अमेरिकेमध्ये दर हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात तिथल्या घड्याळांमध्ये एका तासाचा फरक करावा लागतो. म्हणजे हिवाळ्यात आपलं घड्याळ आणि लंडनचं घड्याळ यांच्यात साडेपाच तासांचा फरक असतो, तर उन्हाळ्यात तो साडेचार तासांचाच होतो. घड्याळातले काटे पुढंमागं करून ते सहज करता येतं. पण आजीच्या घड्याळात तसं एका रात्रीत करणं कठीण जातं. त्या बदलाचा सराव व्हायला शरीरातलं घड्याळ काही दिवसांचा अवधी घेतं. पण वेग एकाएकी वाढून दिवस खरोखरीच बावीस तासांचा झाला तर त्याचा सराव व्हायला चांगलाच अवधी लागेल. पण तो वेग हळूहळू वाढत गेला तर मात्र शरीराच्या घड्याळाला काही कष्ट पडणार नाहीत. नव्या वेगाचा सराव व्हायला आवश्यक तेवढा अवधी त्याला मिळेलच.

दिवसाच्या लांबीत पडलेल्या फरकाचा फटका आकाशात आपण प्रस्थापित केलेल्या भूस्थिर उपग्रहांनाही बसेल. आपण त्यांच्या परिभ्रमणाचा वेग पृथ्वीच्या गिरकीएवढाच ठेवलेला आहे.  म्हणूनच तर आकाशात एकाच जागी स्थिर असल्यासारखे वाटतात. आता पृथ्वीच्या फिरकीचा वेग वाढला की त्या वेगात आणि या भूस्थिर उपग्रहांच्या वेगात असलेला ताळमेळ नाहीसा होईल. ते एकाच जागी स्थिर असल्यासारखे राहणार नाहीत. या उपग्रहांचा वापर आपण टेलिफोनसाठी, टीव्हीच्या कार्यक्रमांचं जगभर प्रक्षेपण करण्यासाठी वापरतो. झालंच तर संरक्षण दलंही त्यांच्या संदेशवहनासाठी त्यांचा वापर करतात. त्या सर्वांमध्ये बिघाड होईल. आज तर आपल्या जीवनाची घडी या उपग्रहांच्या अचूक कार्यक्षमतेवरच नीटपणे बसलेली आहे. ती बिघडली तर काय होईल याची कल्पनाच करवत नाही. 

हा झाला केवळ दिवसाचा हिशेब. पृथ्वी जेव्हा गरगर फिरते तेव्हा त्यापायी तिच्या अंगावरच्या सर्व वस्तूंना तिच्या केंद्रापासून दूर ढकलणारं एक बल तयार होतं. याला केंद्रापसारी बल किंवा सेन्ट्रिफ्युगल फोर्स म्हणतात. शेतकरी हातातली गोफण जेव्हा गरगर फिरवत असतो तेव्हा त्या गोफणीतल्या दगडावरही याच बलाचा प्रभाव पडतो. त्यामुळं तो दगड गोफण सोडून दूर जाऊ पाहतो. पण हाताची पकड घट्ट असल्यामुळं त्या बलाला विरोध करणारं बल तयार झालेलं असतं. ते त्या दगडाला गोफणीतच बांधून ठेवतं. पण हाताची पकड जरा ढिली पडली तर मग त्या विरोधी बलाची मात्रा कमी होते आणि दगड गोफणीतून सुटून दूर फेकला जातो. पृथ्वीच्या गरगर फिरण्यापायी आपणही असे दूर फेकले जाऊ शकतो. पण पृथ्वीचं गुरुत्वाकर्षणाचं बल आपल्याला रोखून धरतं. आता जर या फिरकीचा वेग दुप्पट झाला तर मात्र ते केंद्रापसारी बल भारी होऊन आपण पृथ्वीवरून दूर अंतराळात फेकले जाऊ. त्याच बरोबर त्या बलापायी ध्रुवाजवळचं पाणी विषुववृत्ताकडे ओढलं जाऊन इथली पाण्याची पातळी शंभर मीटरनी वाढेल. इंडोनेशिया, सिंगापूर वगैरे देश तर पुरते बुडून जातील. 

या केंद्रापसारी बलाचा एक फायदा जरूर आहे. आताही तू जर उत्तर ध्रुवावर आपलं वजन केलंस आणि समजा ते ७५ किलो भरलं तर विषुववृत्तावर मात्र तुझं वजन ७४ किलोच भरेल. चक्क एक किलोनं ते कमी होईल. कारण विषुववृत्तावर गिरकीचा वेग जास्ती आहे. साहजिकच सेन्ट्रिफ्युगल फोर्सची मात्रा जास्ती आहे. ती गुरुत्वाकर्षणाच्या ओढीला विरोध करते. त्यामुळं जर हाच वेग दुप्पट झाला तर तुझं वजन घटेल. डाएट किंवा व्यायाम न करताही वजन कमी करता येईल कोणालाही. नासा या अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्थेतील एक अंतराळवीर ओडेनफील्ड यांनी गणित केलंय की जर पृथ्वीच्या गिरकीचा वेग ताशी साधारण २८,२२५ किलोमीटर एवढा झाला तर कोणाचंही वजन शून्य किलोच होईल. मात्र तसं होणं कोणालाही आवडणार नाही की परवडणार नाही. कारण तोवर ती व्यक्ती धरतीवरच आणि जिवंत तर राहायला हवी! 

हा झाला सहज ध्यानात येणारा किंवा जाणवणारा परिणाम. कारण धरतीबरोबर तिचं वातावरणही जोडलं गेलेलं आहे. पृथ्वीच्या फिरकीचा वेग वाढला की हे वातावरणही त्या वाढीव वेगानं फिरू लागेल. ती वाढ हळूहळू झाली तर वाऱ्यांच्या वेगात किंवा दिशांमध्ये फारसा फरक पडलेला जाणवणार नाही. पण ऋतूमानात मात्र वाकडेतिकडे हेलकावे येत राहतील. जसजसा वेग वाढेल तसतसे चक्रावर्तांना अधिक जोर येईल. त्यांच्यामध्ये गरगर फिरत राहणाऱ्या वाऱ्यांचा वेग वाढेल. ते अधिक विध्वंसक होतील. 

हे सगळं ऐकून तुझी दातखीळ बसली असेल तर ती उघड. तू, मी, कोणीही घाबरून जाण्याचं कारण नाही. अशी काही अस्मानीसुलतानी होण्याची शक्यता नगण्य आहे. गिरकीच्या वेगात बदल झालाच तर तो शतकानुशतकांच्या कालावधीत होत राहतो. तेव्हा आपल्या नेहमीच्या व्यवहारात काही उलथापालथ  होण्याची शक्यता नगण्यच आहे. 

तुझी कॉफी तशीच राहिलीय. थंड झाली असेल. चल, गरम करूयात.’

संबंधित बातम्या