जर आपण झोपलोच नाही तर..!

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 12 एप्रिल 2021

‘जर तर’च्या गोष्टी

चिंतूची झोप उडवायला काही खरोखरीचीच घटना घडायला हवी असं नाही. काही तरी ऐकून, वाचून तो आपल्या कल्पनेचा भस्मासुर असा काही मोकाट सोडतो की त्याचीच काय पण त्याच्या बरोबरच्या इतरांचीही झोप उडावी. परवा असंच झालं. स्लीप अॅप्निया नावाच्या एका व्याधीबद्दल त्यानं कुठंतरी काहीतरी वाचलं. ते त्याला व्यवस्थित समजलं की नाही हे सांगता येणं कठीण आहे. पण त्यातली एक बाब मात्र त्याच्या मनात पक्की रुजून बसली. या व्याधीची बाधा झालेल्या व्यक्तीचा श्वासोच्छ्वास झोपेमध्ये खंडित होतो. काही वेळा बंदच पडतो. बस्स. चिंतूला काळजी करायला एवढं पुरेसं होतं. उद्या आपण झोपलो आणि आपला श्वासोच्छ्वासच बंद पडला तर आपण जिवंत कसे राहणार, या प्रश्नानं त्यानं स्वतःला छळायला सुरुवात केली. त्यावरचा एकच उपाय त्याला सापडला होता. तोच घेऊन तो घाईघाईनं आला.

जर मी कधीही झोपलोच नाही, तर माझी या व्याधीपासून सुटका होईल की नाही? कायमचा झोपी जाण्यापेक्षा कधीच न झोपणंच चांगलं, काय! त्याचा हा सवाल सयुक्तिक वाटला तरी एक तर त्याला जिच्या वाचनानं सतावलं होतं ती व्याधी हा एक अपवाद आहे. फारच थोड्या व्यक्तींना तिची बाधा होते. त्यामुळं तुमच्याआमच्यासारख्यांना तिची भीती बाळगण्याचं कारण नाही. पण चिंतूला हे सांगून उपयोग होणार नाही. कारण तो म्हणेल मीच तो अपवाद कशावरून नसेन? त्यापेक्षा त्याला झोपेचं आपल्या आयुष्यात नेमकं काय स्थान आहे, तिचे काय फायदे आहेत, ते सांगणंच योग्य ठरेल.

माणूस जन्माला येतो तेव्हा त्याचा बराचसा काळ झोपेतच जातो. नुकतंच जन्मलेलं मूल दिवसातून वीस बावीस तास झोपलेलंच असतं. त्याची ती गरज असते. जसजसं वय वाढत जातं तशी ही झोपेची गरज कमी कमी होत जाते. चार वर्षं उलटली की साधारण बारा तासांची झोप पुरेशी ठरते. आणखी सहा वर्षांची वाढ झाली की वयाच्या दहाव्या वर्षी तोच काळ दहा तासांवर येतो. प्रौढ वयात सात ते नऊ तासांची झोप पर्याप्त ठरते. उतार वयात तर नैसर्गिकरीत्याच झोप कमी होते. पाच सहा तासांची झोप झाली की जाग येतेच. ही अर्थात सरासरी झाली. तसं पाहिलं तर आपल्याला किती झोपेची आवश्यकता आहे हे प्रत्येकाला समजतंच. कारण तेवढी झोप मिळाली की उठल्यावर कसं ताजंतवानं वाटतं. 

पण तसं का वाटावं? म्हणजे आपण झोपलेलो असतो तेव्हा असं काही घडतं का की त्यापायी आपण परत उत्साहित व्हावं? वैज्ञानिकांनाही या प्रश्नानं छळलं आहे. त्याचं उत्तर मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर संशोधन होत आहे. त्यातून निश्चितपणे असं दिसून आलं आहे की लहान मुलांची व्यवस्थित वाढ होण्यासाठी ज्या संप्रेरकाचा, ग्रोथ हार्मोनचा, पाझर शरीरात होणं आवश्यक असतं तो मूल झोपेत असतानाच होत असतो. थोडक्यात चांगली झोप मिळणं त्याच्या निकोप वाढीसाठी गरजेचं आहे. तसंच त्याची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठीही झोप आवश्यक आहे. कोरोनाच्या काळात हीच रोगप्रतिकारयंत्रणा अधिक मजबूत करण्यासाठी अनेक उपाय सुचवले जात आहेत. कोणी काही विशिष्ट औषध घ्यायला सांगतं, कोणी काही खास आहार घेण्याचा सल्ला देतं, कोणी काही तर कोणी काही. पण चांगली मस्त झोप मिळाली तर इतर काही उपायांची कदाचित काहीच गरज भासणार नाही, हे कोणीच सांगत नाही. म्हणून तर व्यवस्थित आणि पुरेशी झोप मिळाली नाही तर रोगबाधा होण्याची शक्यता बळावते. खास करून उतार वयातल्या व्यक्तींना तिची जास्त गरज असते. तसं पाहिलं तर त्यांची झोपेची गरज कमीच असते. पण तेवढीही पूर्ण झाली नाही तर मग रोगजंतूंना मैदान मोकळं मिळतं. 

झोपेसंबंधी आजवर बरंच संशोधन झालं आहे आणि अजूनही होतं आहे, तरीही हे झोपेचं गूढ काही वैज्ञानिकांना पुरेसं उलगडलेलं नाही. तसे आडाखे आणि सिद्धांत बरेच आहेत. आणि त्यांची चाचपणी करण्यासाठी प्रयोगही केले जात आहेत. काहींच्या मते जागेपणी आपल्या शरीराची, खास करून निरनिराळ्या स्नायूंची, झीज होत असते. कारण त्यांचा आपण सतत वापर करत असतो. झोपेमध्ये ही झीज भरून काढली जाते. तसंच या सततच्या वापरामुळं काही पेशी जर मृतप्राय झाल्या असतील तर त्या काढून टाकून त्यांच्या जागी ताज्या दमाच्या पेशींची स्थापना करण्याचं काम शरीर झोपेमध्ये करत असतं. रेल्वे नाही का दुरुस्तीचं काम करण्यासाठी मेगा ब्लॉक घेतात, तसंच! 

याहूनही महत्त्वाचं काम आपल्या मेंदूशी संबंध असणारं आहे. दिवसभरात आपल्या मेंदूवर अगणित माहितीचा मारा होत असतो. ती सगळीच जर जशीच्या तशी साठवली गेली तर मेंदूवर असह्य भार पडेल. झोपेत मेंदू या सगळ्या माहितीची व्यवस्थित छाननी करतो. जी माहिती फुटकळ किंवा अनावश्यक आहे तिचा निचरा करतो. जी उपयुक्त आहे तिची कायमची साठवून ठेवण्याची व्यवस्था करतो. निचरा करण्यात म्हणा किंवा कायमची साठवण करण्यात म्हणा स्वप्नांची फार मोठी भूमिका असते. पोलिस कसे गुन्ह्याचा शोध लावण्यासाठी जिथं गुन्हा घडला त्या स्थळाला भेट देतात किंवा त्या घटनेची नाट्यमय पुनरावृत्ती करतात, तसाच आपला मेंदू काही घटनांची किंवा सुप्त इच्छांची, विचारांची पुनरावृत्ती स्वप्नांमध्ये करत असतो. झोपच घेतली नाही तर स्वप्नंच पडणार नाहीत आणि मेंदूला स्वतःला परत ताजंतवानं करण्याची संधीच मिळणार नाही. संगणकांची किंवा मोबाईल फोनची बॅटरी जशी नियमितपणे रिचार्ज करावी लागते तशीच झोप ही मेंदूची रिचार्ज करण्याची व्यवस्था आहे. 

जागेपणी आपण जी वेगवेगळी कामं करतो त्यासाठी आपल्याला सतत ऊर्जेची गरज भासते. या ऊर्जेचा पुरवठा करण्यासाठी आपण आहार घेत असतो. दिवसभरात सहसा तीन वेळा आपण जेवतो. जागेपणी लागणारी ऊर्जा निर्माण करण्यासाठी तेवढा आहार सहसा पुरेसा असतो. झोपेमध्ये श्वासोच्छ्वास आणि रक्ताभिसरण यासाठीच ऊर्जेची गरज भासते. जागेपणीच्या गरजेपेक्षा ती कितीतरी कमी असते. थोडक्यात झोपेमुळे आपण ऊर्जेची बचत करत असतो. ती झोप मिळाली नाही तर साहजिकच ऊर्जेचा पुरवठा कमी पडेल आणि त्याची भरपाई करण्यासाठी आपल्याला जास्तीचा आहारही घ्यावा लागेल. चार किंवा पाच वेळा जेवावं लागेल. झोप न घेण्यानं चिंतू कदाचित त्या स्लीप अॅप्नियाची बाधा टाळू शकेल पण मग इतर व्याधींचा ससेमिरा त्याच्या पाठी  लागेल त्याचं काय.

संबंधित बातम्या