जर बुरशी आलेला पाव खाल्ला तर...!

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 19 एप्रिल 2021

‘जर तर’च्या गोष्टी

ग्यानबा म्हणजे अचाट गडी. त्याच्या विचाराची गाडी कुठून कुठं कधी जाईल सांगता यायचं नाही. नुकतंच त्याच्या शिक्षकांनी त्याला पेनिसिलिन या, जणू जादूची गोळी असल्यासारख्या, औषधाची कुळकथा सांगितली होती. ती सगळीच त्याला व्यवस्थित कळली की नाही हे समजायला मार्ग नाही. पण त्यातला एक कळीचा मुद्दा मात्र त्यानं व्यवस्थित लक्षात ठेवला होता. पेनिसिलिनची निर्मिती एका प्रकारच्या बुरशीपासून होते. झालं! त्याचं डोकं वेगात चालू लागलं. तेच घेऊन तो आला होता. 

‘आपण आजारी पडल्यावर हे डागदर महागडी पेनिसिलिनची गोळी देतात की नाही?’

‘मग बरोबरच आहे त्यांचं. आहेच ते एक खूप गुणकारी औषध.’

‘ते खरं, पण ते तयार कशापासून करतात? बुरशीपासूनच ना! म्हणून परवा माझी आई बुरशी आलेला पाव टाकून द्यायला निघाली तेव्हा मी तिला अडवलं. आणि म्हणालो दे इकडे, मी खातो, म्हणजे मग महागडं औषध घ्यायला नको. तर कातावली. म्हणाली जादा शहाणपणा करू नकोस. टाकून दे तो. आणि तिनं माझ्या हातातून तो ओढून घेत कचऱ्याच्या पेटीत टाकूनच दिला. किती नुकसान झालं सांगा पाहू!’

‘छे, उलट तिनं तुला होणाऱ्या नुकसानीपासून वाचवलं. बुरशींचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी एका चांगल्या बुरशीपासून ते पेनिसिलिन तयार करतात. म्हणून सगळ्याच बुरशींमध्ये ते औषध सापडेल असं नाही. बुरशी बांडगुळासारखी वाढते. ज्याच्या जिवावर ती आपला अंमल बसवते त्याच्याकडून स्वतःच्या वाढीसाठी पोषक पदार्थ ती घेते. हे म्हणजे आगंतुकानी घरच बळकावल्यासारखंच झालं. फरक इतकाच की या आगंतुकाला आपण आमंत्रण देत नाही. त्याला बोलावून घेत नाही. तो घुसखोरासारखा येतो. तसं पाहिलं तर आपण ज्या चवीनं खातो त्या अळंब्या म्हणजे मशरूम याही बुरशीच्याच जातकुळीतल्या. अर्थात रानात उगवणाऱ्या सगळ्याच कुत्र्याच्या छत्र्या खाण्यालायक असतात, असं नाही. काही विषारीही असतात. पावसाळ्याच्या सुरुवातीला पेण पनवेलजवळच्या भागातल्या रानात उगवणारी शेवळं ही भाजीही बुरशीच आहे. चीजची लज्जत वाढवण्यासाठी एक प्रकारची बुरशी वापरतात. या चीजवर निळ्या रेषा दिसून येतात. त्यांची चव काही चीजशौकिनांना खूप आवडते. डेन्मार्कमध्ये या चीजचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होतं. ‘ब्लू व्हेन चीज’ या नावानंच ते ओळखलं जातं. पण हे अपवाद. कितीतरी बुरशी विषारी असतात. त्या मायकोटॉक्सिन प्रकारचं गरळ ओकतात. त्यातही अॅफ्लाटॉक्सिन नावाचं एक जहाल विष आहे. ते अॅस्पर्जिलस कुळातल्या काही बुरशींमध्ये तयार होतं.  

ते कर्करोगाला कारणीभूत असल्याचं दिसून आलं आहे. क्वचित प्रसंगी ते जीवघेणंही ठरतं. चुकूनही ते खाणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे. जसा देवीरोगाचा आपण नायनाट केला आहे तसाच या अॅफ्लाटॉक्सिनचा करण्याचेही प्रयत्न होत आहेत. परंतु त्यांना अद्याप यश आलेलं नाही. तरीही त्याचं प्रमाण हाताबाहेर गेलेलं नाही. त्यापासून असलेला धोका आटोक्यात ठेवला गेला आहे. 

पावावर वाढणारी बहुतेक बुरशी हिरव्या रंगाची असते. इतरही अनेक रंगढंग बुरशी दाखवतात. पांढरा, पिवळा, हिरवा, निळा, काळा अगदी ‘तानापिहिनिपाजा’चा रंगपटच म्हण ना. त्यामुळं केवळ रंगावरून बुरशीची ओळख पटवणं शक्य नसतं. तेव्हा विषाची परीक्षा न करता असा ज्यावर बुरशीची वाढ झाली आहे असा पदार्थ सरसकट टाकून देणंच योग्य ठरेल. 

कित्येक जणांना बुरशीची अॅलर्जी असते. अशा व्यक्तींच्या खाण्यात बुरशीजन्य पदार्थ आल्यास त्यांच्या ठायी अॅलर्जीची लक्षणं दिसू लागतात. नाक फुलून येतं. लालेलाल होतं. श्वासोच्छ्वासाला अडथळा येऊ लागतो. अंगाला खाज सुटते. शरीरभर लाललाल रागीट दिसणारे चट्टे उठतात. अॅलर्जी तीव्र स्वरूपाची असेल तर तिच्या जीवघेण्या अॅनॅफिलॅक्टिक रिअॅक्शन या अवताराची बाधा होऊ शकते. अशा वेळी तातडीनं उपाय करण्याची गरज भासते. त्यापेक्षा या बुरशीला चार हात दूर ठेवणंच अधिक सुरक्षित असतं. 

वनस्पतींची वाढ जशी बियाणापासून होते तशी बुरशीची वाढ बीजाणूपासून होते. बुरशीपासून निघालेले हे छोटे छोटे कण इतरत्र पसरत जातात. हवेतूनही ते उडून दुसरीकडे जाऊ शकतात. म्हणूनच कोणत्याही पदार्थावरच्या बुरशीचा वास घेण्याचाही प्रयत्न करू नका, असाच सल्ला डॉक्टर देतात. कारण तो वास घेताना काही बीजाणू शरीरात प्रवेश करू शकतात. तिथं मग बुरशीची वाढ होऊन त्याचा शरीरस्वास्थ्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. म्हणूनच पावाचं वेष्टण काढून तो उघड्यावर ठेवण्यानं त्याच्यावर बुरशी आपलं बस्तान बसवण्याची शक्यता वाढीस लागते. रेफ्रिजिरेटरमध्येही तो बंद डब्यात ठेवणंच श्रेयस्कर. त्या तापमानात बुरशीची वाढ अजिबातच होत नाही असं नाही. काही बुरशी त्या तापमानावरही मंद गतीनं वाढू शकतात. शिवाय डब्याबाहेर ठेवलेल्या पावावरचे बीजाणू इतर अन्नांमध्ये शिरकाव करू शकतात. त्या पदार्थांना आपले यजमान बनवतात. 

काही जणांचा असा होरा असतो की बुरशीनं पावाचा जेवढा भाग व्यापलेला आहे तो कापून टाकला तर उरलेला पाव खाण्यास हरकत नाही. ही समजूत चुकीची आहे. कारण स्पष्टपणे दिसणारी बुरशी म्हणजे तिचा शेंडा असतो. तिची मुळं आत लपून बसलेली असतात व तिथूनच ती पसरत जातात. त्यामुळं पावाचा जो भाग वरवर मोकळा दिसतो त्यातही बुरशीनं आपलं घर केलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा तो सर्वच्या सर्व पाव कचऱ्यात टाकणंच योग्य ठरेल. तसंच पाव टोस्टरमध्ये घालून किंवा तव्यावर भाजल्यानं बुरशीचा नाश होईल ही शक्यताही पूर्णपणे खरी नाही. काही बुरशी तशा राकट असतात. त्या उच्च तापमानातही तगून राहू शकतात. 

बहुतेक पाव जास्ती दिवस टिकावेत आणि त्यांना बुरशीचा संसर्ग होऊ नये म्हणून त्यांच्यामध्ये काही रासायनिक पदार्थांचा समावेश केला जातो. तरीही उघड्यावर तो चार दिवसांपेक्षा जास्ती टिकत नाही. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जेव्हा वातावरण दमट असतं तेव्हा तर बुरशींचं फावतं आणि पाव लवकरच बुरशीग्रस्त होतो. आजकाल ग्राहकांना असे रासायनिक प्रिजर्वेटिव्ह घालणं आवडत नाही. कोणत्याही रसायनांची, मग ती कितीही हितकारक असोत, भेसळ त्यांना पसंत नसते. अशा वेळी तर पाव रेफ्रिजिरेटरमध्येच ठेवणं आणि जास्त दिवस तो न ठेवता लवकरात लवकर संपवणं  हाच योग्य मार्ग आहे.’

संबंधित बातम्या