स्वप्नंच पडली नाहीत तर..!

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 5 जुलै 2021

‘जर तर’च्या गोष्टी

स्वप्न पडणं बंदच झालं तर उपयोगी माहितीची वर्गवारी आपला मेंदू कशी करू शकेल? आणि ती तशी झाली नाही तर मेंदूत अनेक जळमटं साठून राहतील, अनावश्यक माहितीची ढिगारा साचून राहील, मेंदूवर अतिरिक्त ताण पडेल. ते टाळण्यासाठी स्वप्नांची गरज असते. 

तुम्ही एका घनदाट जंगलातून जात आहात. एकटेच. सोबत रातकिड्यांचा आवाज. मधूनच अंगावर काटा आणणारे इतरही काही आवाज. एकदम वाघाच्या डरकाळीचा आवाज येतो. तुम्ही वळून पाहता. आता वाघ तुम्हाला स्पष्ट दिसतोय. तुमच्याच दिशेनं येतोय. तुम्ही पळायचा प्रयत्न करता. पण तुमचे पाय थिजलेले आहेत. त्यांच्यात त्राण नाही. तुम्ही किंकाळी फोडता. पण घशातून आवाजच उमटत नाही. आता आपली काही खैर नाही या भावनेनं तुम्ही डोळे घट्ट मिटून घेता....आणि तुम्हाला जाग येते. दरदरून घाम फुटलेला असतो. आपल्याला एक भयावह स्वप्न पडलंय याची तुम्हाला जाणीव होते. आता तुमची झोप उडाली आहे. तेच दुःस्वप्न परत पडण्याच्या भीतीनं तुम्ही झोपणंच नाकारता. मग मनात विचार येतो जर स्वप्नंच पडली नाहीत तर!

वास्तविक स्वप्नं हा आपल्या झोपेचा अविभाज्य भाग आहे. शिवाय स्वप्नं केव्हाही पडत नाहीत. झोपेच्या विशिष्ट टप्प्यावरच ती पडतात. आपण झोपतो आणि झोपेतून उठतो, या दोन टोकांचीच आपल्याला जाणीव होते. त्या दोन टोकांमध्ये आपल्याला सलग गाढ झोप लागते असं जरी तुम्हाला वाटत असलं, तरी ते खरं नाही. या दोन टोकांमध्ये आपल्या झोपेत किती तरी बदल होत असतात. झोप निरनिराळ्या अवस्थांमधून जात असते. सुरुवातीला झोप अतिशय हलकी, सावध असते. त्यावेळी आसपास जराही खुट्ट झालं तरी आपण लगेच जागे होतो. या अवस्थेनंतर आपण गाढ झोपेत जातो. या काळात आपला मेंदू श्वासोच्छ्वास, रक्ताचं अंगभर खेळवणं यासारख्या अत्यावश्यक आणि अनैच्छिक कामांशिवाय दुसरी कोणतीही कामं करत नाही. आपले डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा ही पंचेद्रियं अवतीभवतीच्या जगाविषयीची माहिती हरघडी आपल्या मेंदूकडे पाठवत असतात. तिथं तिचं विश्लेषण होऊन त्याचं सार मेंदूत साठवलं जातं. पण झोपेत मेंदूला या कामापासून विश्रांती मिळते. 

या गाढ झोपेतून आपण आणखी एका कालखंडात जातो. या काळात आपल्या मिटलेल्या पापण्यांच्या आड आपले डोळे म्हणजे बुब्बुळं इकडे तिकडे एकसारखी वेगानं फिरत राहतात. आपण अस्वस्थ झालो की कसे एकसारख्या पाठीपुढे येरझाऱ्या घालत राहतो तशीच. यालाच वैज्ञानिक भाषेत ‘रॅपिड आय मुव्हमेन्ट’ म्हणतात आणि झोपेच्या या अवस्थेला ‘आरईएम’ झोप म्हणतात. सावध झोप, गाढ झोप आणि आरईएम झोप असं झोपेचं एक आवर्तन पार पडतं. संपूर्ण झोपेत अशी चार पाच आवर्तनं पार पडत असतात. यापैकी फक्त आरईएम झोपेतच आपल्याला स्वप्नं पडतात. या कालखंडात मेंदू आपल्या सगळ्या स्नायूंना कुलूप लावतो. ते पॅरलाईज केले जातात. त्या भीतीदायक स्वप्नात वाघ आल्यावरही आपण पळू शकत नाही किंवा घशातून आवाज फुटत नाही, याचं हेच कारण आहे.

झोप एकसंध नसते, तिच्या अशा निरनिराळ्या अवस्था असतात हे जरी आता समजलं असलं तरी झोपेबद्दलची आपली वैज्ञानिक माहिती खूपच अपुरी आहे. या संबंधी अनेक संस्थांमध्ये जोमानं संशोधन सुरू आहे. त्यातूनच स्वप्नांचं नेमकं काय प्रयोजन आहे या विषयी काही सिद्धांत सादर केले गेले आहेत. 

ख्यातनाम स्टॅनफोर्ड विद्यापीठातील प्रा. राफेल पेलायसो यांच्या मते स्वप्नांचं एकच एक प्रयोजन नाही. गुरं जशी समोरचं खाद्य अधाशासारखी खात राहतात, साठवून ठेवतात आणि मग सावकाशीनं रवंथ करत त्याचं पचन करतात; साधारण त्याच प्रकारे मेंदू जागेपणी त्याच्याकडे येत असलेल्या माहितीच्या ढिगासंबंधीचं धोरण आखतो. जागेपणी ज्ञानेंद्रियांकडून त्याच्यावर माहितीचा इतक्या वेगानं मारा होत असतो की त्याच क्षणी त्या माहितीची वर्गवारी करायला वेळ नसतो. त्यामुळं त्यावेळी ती सर्व तो साठवून ठेवतो. तिचं विश्लेषण करायला झोपेत त्याला वेळ मिळतो. त्यातून मग तो प्रथम कोणती माहिती उपयोगी आहे, साठवून ठेवायला हवी आणि कोणती टाकाऊ आहे, ताबडतोब तिची विल्हेवाट लावायला हवी, या विषयी निर्णय घेतो. जी साठवायला हवी तिचीही परत वर्गवारी करणं आवश्यक असतं. काही माहिती आयुष्यभर उपकारक ठरणारी असते. तिचं दीर्घकालीन स्मृतीत रूपांतर करणं गरजेचं असतं. काही मर्यादित काळासाठीच उपयोगी असते. तिचं अल्पकालीन स्मृतीत रूपांतर करून भागतं. म्हणून मग स्वप्नात जागेपणीच्या अनुभवांना परत जागृत केलं जातं. जी घटना घडलेली असते ती तशीच्या तशी साठवलेली नसते. त्या घटनेचं जे काही आकलन झालेलं असतं त्यानुसार ती साठवलेली असते. त्यामुळं जागेपणीच्या अनुभवाची तंतोतंत पुनरावृत्ती स्वप्नात होत नाही. पण तिचं सार मात्र व्यवस्थित दिसतं. ते उपयोगी आहे की नाही यानुसार मग पुढची कारवाई केली जाते. जर स्वप्न पडणं बंदच झालं तर ही महत्त्वाची कामगिरी मेंदू कशी पार पाडू शकेल? आणि ती तशी पार पाडली गेली नाही तर मेंदूत अनेक जळमटं साठून राहतील, अनावश्यक माहितीचा ढिगारा साचून राहील, मेंदूवर अतिरिक्त ताण पडेल. ते टाळण्यासाठी स्वप्नांची गरज असते. 

कॅलिफोर्निया विद्यापीठातील प्रा. मॅथ्यू वॉकर म्हणतात की आपला भावनिक उद्रेक काबूत ठेवण्यासाठी स्वप्नांची मदत होते. जर मिळालेल्या माहितीचा भारवेत्ता होण्याऐवजी सारवेत्ता व्हायचं असेल, त्या माहितीचे ज्ञानात रूपांतर करायचं असेल, तर मग तो पसारा आवरून नीटनेटकेपणानं साठवायला हवा. तेच काम स्वप्नं करतात.  म्हणूनच स्वप्नं न पडणं हे झोप निरोगी नसल्याचं लक्षण आहे, असाही निष्कर्ष काढला गेला आहे. सुयोग्य झोप न मिळणं ही कोणती तरी शारीरिक किंवा मानसिक समस्या छळत असल्याचं निर्देशक आहे. 

स्वप्नंही दोन प्रकारची असतात. एक झोपेत पडणारं स्वप्न. त्यांचाच विचार आतापर्यंत आपण करत आहोत. पण दुसरं स्वप्न जागेपणी पाहिलं जातं, आणि ही दुसऱ्या ‍या प्रकारची स्वप्नं आपल्या जगण्याला काही अर्थ देतात असं माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी सांगून ठेवलेलं आहे. अशी स्वप्नं पाहणं म्हणजेच आयुष्यात काही तरी भरीव कामगिरी करण्याची प्रेरणा मिळणं आहे. ती स्वप्नं पाहिलीच नाहीत, तर अंगी गुणवत्ता 
असूनही तिचा पर्याप्त वापर केला जाणार नाही. ना स्वतःसाठी, ना समाजासाठी. डॉ. कलाम यांनी देशाचं नाव अंतराळसंशोधनाच्या जागतिक नामावलीत प्रस्थापन करण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते साकारही करून दाखवलं. म्हणूनच आपण मंगळापर्यंत मजल मारली आहे. अंतराळसंशोधन करणाऱ्या आघाडीच्या देशांमध्ये आपणही मानाचं स्थान पटकावलं आहे. अशी स्वप्नंच पडलीच नाहीत तर मग संस्कृत सुभाषितकार म्हणतात तसे आपण ‘साक्षात पशूः पुच्छविषाणहीनः’ होऊन जाऊ.

संबंधित बातम्या