सावली हरवली तर..!

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 12 जुलै 2021

‘जर तर’च्या गोष्टी

तुमची साथ कधीच न सोडणारा तुमचा सोबती कोण आहे? एक, आयुष्याचा जोडीदार. दोन, इमानी कुत्रा. तीन, आयकर आणि चार, सावली. ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये सुरुवातीच्या हजार दोन हजार रुपयांसाठी जे साधे सोपे प्रश्न विचारले जातात त्यापैकी हा एक असू शकतो. याचं उत्तर कदाचित तुम्हाला धक्का देणारं वाटेल. कारण ते आहे पर्याय चार, सावली. ही तुमची नेहमीच पाठराखण करते, साथसंगत कधीच सोडत नाही, असंच आपल्याला सांगितलं जातं. पण ते कितपत खरं आहे?

अलीकडेच मे महिन्याच्या वीस- एकवीस तारखेला तुमची सावली हरवेल, असं मुंबईकरांना सांगितलं होतं. त्याचा अनुभव मात्र घेता आला नाही. कारण त्याच दिवशी तौते वादळाच्या कृपेनं मुंबईपुण्याचं वातावरण ढगाळ आणि पावसाचं राहिलं. सूर्यदर्शन झालंच नाही. सावली पाहण्याचा तर प्रश्नच नव्हता. पण नाउमेद होऊ नका. परत एकदा या आताच्या जुलै महिन्यात तशी संधी मिळेल असाही दिलासा दिला गेला आहे. तोही कितपत साध्य होईल हे सांगणं कठीण आहे. कारण जुलै महिना म्हणजे देशात सगळीकडेच संततधारेचा. निसर्गाची मेहेरबानी झाली तरच निरभ्र आकाश आणि स्वच्छ सूर्यप्रकाश यांचा लाभ होईल. तसं झालं तरच मग ही सावली हरवण्याची गंमत अनुभवायला मिळेल. 

ती मिळो न मिळो, एक प्रश्न मात्र सतावत राहीलच. मुळात सावली म्हणजे काय, ती कशी उत्पन्न होते आणि ती हरवते म्हणजे तरी नेमकं काय होतं?

सावलीची व्याख्या तशी सोपी आहे. कोणत्याही अपारदर्शक पदार्थाची ती काळसर प्रतिमा असते. आपलं शरीरही अपारदर्शक आहे. म्हणजे सूर्यकिरण, कोणतेही प्रकाशकिरण, त्याच्या आरपार जाऊ शकत नाहीत. ते अडवले जातात. साहजिकच मग आपल्या पाठी आपली काळसर प्रतिमा उमटते. ती आपली शरीररेखा दाखवते. तिचा आकार मात्र प्रकाशकिरण आपल्या अंगावर कोणत्या कोनातून पडताहेत यावर अवलंबून असतो. ज्या दिशेनं प्रकाशकिरण येतात त्याच्या विरुद्ध दिशेला सावली पडते. प्रकाशकिरण समोरून येत असतील तर सावली आपल्या पाठी आणि पाठीमागून येत असतील तर सावली आपल्या पुढेच पडते. तशीच ती आपल्या आजूबाजूलाही पडू शकते. 

जेव्हा आपल्या शरीरासारख्या उभ्या पदार्थाच्या नेमक्या डोक्यावरून प्रकाशकिरण येतात तेव्हा सावली आपल्या पायापाशीच घोटाळत राहते. प्रसंगी पावलांच्या आड दडून बसते. ती आपल्याला दिसतच नाही, आणि आपण सावली हरवली असा ओरडा करू लागतो. वर्षभरात दोन दिवस सूर्यमहाराज असे बरोबर आपल्या डोक्यावर येतात. त्यावेळी सावली आपली साथ, काही क्षणांपुरती का होईना, सोडून गेल्याचा अनुभव मिळतो.  

सूर्योदय, आणि सूर्यास्तही, जसा निरनिराळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी होतो तसाच सूर्य नेमका माथ्यावर येण्याचा दिवसही निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळा असतो. मुंबईत हा दिवस २१ मेचा होता तर औरंगाबाद आणि जालना इथं तो २० मे, नाशिकला २१ मे आणि नागपूरला तर २७ मेला आला होता. केरळमधील कालिकत इथं तर तो एप्रिलमध्येच येऊन गेला आणि आता ऑगस्ट महिन्यात परत येणार आहे. 

तेव्हा सावली म्हणजे प्रकाशाचा अभाव, असं जरी साधं समीकरण असलं, तरी भौतिक शास्त्रज्ञांचं प्रकाशाचं अध्ययन सावलीपासूनच सुरू होतं. काही सावल्या उपकारक असतात. एखाद्या वटवृक्षाचं छायाछत्र आपल्याला तळपत्या उन्हापासून संरक्षण देतं. उलट आपल्या पुस्तकावर पडलेली कोणाची तरी छाया वाचनानंदात बाधा आणते. आजकाल क्रिकेटचे सामने रात्रीही खेळवले जातात. त्यावेळी वापरल्या जाणाऱ्या फ्लडलाईटची रचना मैदानावर सावलीचा फारसा उपद्रव होणार नाही अशी करण्याची करामत करावी लागते. पण त्याच मैदानात तो सामना पाहण्यासाठी उपस्थित असलेल्या रसिकांच्या सुखासाठी स्टेडिअमवर आच्छादन घालून त्यांच्या डोक्यावर सावली असेल याची खातरजमा केली जाते. खेळाडूंसाठी सावली हरवणं मदतगार ठरतं पण प्रेक्षकांसाठी तेच क्लेशदायी होतं. 

आपल्या शरीराच्या अंधारात डोकावण्यासाठीही आपल्याला छायेची मदतच होते. शरीर जरी आपल्या ओळखीच्या प्रकाशासाठी अपारदर्शक असलं तरी याच प्रकाशाचा भाईबंद असलेल्या क्ष-किरणांना मात्र काही अंशी मोकळीक मिळते. तरीही हाडांसारख्या कठीण अवयवांमधून हे किरण आरपार जाऊ शकत नाहीत. त्यामुळं त्यांची छायाच त्यांच्या वाटेत ठेवलेल्या फिल्मवर पडते. त्यातून मग त्या अवयवांची स्थिती आपल्याला सहज समजून येते. जर हाड मोडलं असेल तर ते स्पष्ट दिसतं आणि मग ते परत सांधण्यासाठीची आवश्यक माहिती त्यांची छायाच देते. याच क्ष-किरणांचा कल्पक आणि संगणकाच्या मदतीनं वापर करत आपण सीटी स्कॅन करतो. त्यातून मग फुफ्फुसांसारख्या मऊ अवयवांचीही छाया मिळवू शकतो. सध्याच्या कोरोनाच्या काळात फुफ्फुसांच्या आरोग्याकडे बारकाईनं लक्ष देणं आवश्यक बनलं आहे. त्यासाठीही सीटी स्कॅनच्या मदतीनं मिळवलेली छाया उपयोगी ठरते आहे. ही छायाच जर हरवली तर कोरोनाविरुद्धच्या लढाईतलं हे प्रमुख शस्त्रच बोथट झाल्यासारखं होईल. 

कालमापनासाठीही सावलीचाच वापर केला गेला होता. मध्ययुगात इजिप्त आणि अनेक युरोपीय देशामधल्या गावांमध्ये एक निमुळता उंच स्तंभ मुख्य चौकात उभा केला गेला होता. त्याला ‘ओबेलिस्क’ म्हणतात. त्या स्तंभाची लांबलचक छाया सूर्योदयाच्या वेळी पश्चिमेकडे पडत असे. आणि जसजसा दिवस वर येत असे तसतशी त्या सावलीची लांबी कमी कमी होत माध्यान्हीला जेव्हा सूर्य थेट डोक्यावर येई तेव्हा ती हरवल्यासारखी होई. सूर्य पुढं कलू लागला की परत छायेची लांबी वाढत जाऊन सूर्यास्ताच्या वेळी ती कमाल पातळी गाठे. या सावलीच्या लांबीवरून किती काळ लोटला आहे हे मोजलं जाई. 

भर माध्यान्हीला जगाच्या निरनिराळ्या ठिकाणी पडणाऱ्या सावलीची लांबी मोजून पृथ्वीच्या आकारमानाचं पहिलं मोजमाप केलं गेलं होतं. तसंच जेव्हा शुक्राचं सूर्यावरून अधिक्रमण होतं. म्हणजेच तो सूर्यबिंबावरून प्रवास करतो त्यावेळीही अशाच प्रकारे जगातल्या निरनिराळ्या ठिकाणाहून त्याच्या सावलीचं अध्ययन करून सूर्यापासूनचं पृथ्वीचं अंतर मोजलं गेलं होतं. सावली कायमची हरवली असती तर हे कसं शक्य झालं असतं!

चंद्रग्रहणाच्या वेळी पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. तिच्याखाली मग चांदोबा लपून बसतात. उलट सूर्यग्रहणाच्या वेळी चंद्राच्या सावलीत आपण येतो. त्यामुळं भर दिवसा अंधाराचा अनुभव आपल्याला मिळतो. या सावलीच्या काळाचं मोजमाप करूनच चंद्र पृथ्वीपेक्षा लहान असल्याचं आपण ओळखलं होतं. तसंच त्याचं आपल्यापासूनचं अंतरही मोजलं होतं. सावली कायमचीच गडप झाली असती तर ही महत्त्वाची माहिती अशी सहजगत्या आपल्याला मिळाली नसती.

आता या महिन्यात काही क्षण सावली हरवण्याची गंमत अनुभवण्यात एक थरार असेल. पण ती कायमची आपली साथ सोडून जाणं मात्र परवडणारं नसेल. 

संबंधित बातम्या