विमानाचं चाक पडलं तर..!

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 19 जुलै 2021

‘जर तर’च्या गोष्टी

विमानतळावर जेव्हा विमानं वावरत असतात तेव्हा रबराची चाकं असलेल्या पायांचाच वापर करतात. विमानाचे पंख आणि इंजिन ही त्याची जितकी महत्त्वाची अंगं आहेत, तितकीच ही चाकंही महत्त्वाची असतात. विमानाला जमिनीवर उतरायचं असतं, त्यावेळी ही चाकं कळीची भूमिका बजावतात... अशी ही चाकंच निखळली तर?

तुम्ही पक्ष्यांना उडताना कधी निरखून पाहिलंय? नसेल, तर पाहा. त्यांचे पाय कुठं दिसतच नाहीत. जणू त्यांना पायच नाहीत. पण तसं नाही. पक्षी जमिनीवर असताना आपल्या दोन पायांवरच उभे राहतात, चालतात किंवा टुणटुण उड्या मारतात. पण उडण्यासाठी झेप घेतली की ते आपले पाय दुमडून पोटाशी घेतात. जोवर ते हवेत असतात तोवर पाय असेच पोटाशी बांधून ठेवलेले असतात. परत जमिनीवर किंवा झाडाच्या फांदीवर उतरायची वेळ आली की ते ताठ करतात. 

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) नावारूपाला आणण्याचं श्रेय ज्यांना जातं ते इस्रोचे दुसरे अध्यक्ष प्रा. सतीश धवन यांनी ‘बर्ड्स इन फ्लाईट’ हा अतिशय वाचनीय ग्रंथ लिहिला आहे. त्यात पक्ष्यांच्या उड्डाणाची तपशीलवार आणि तरीही मनोरंजक माहिती त्यांनी दिली आहे. धवन एरोनॉटिकल इंजिनिअर होते. त्यामुळं ज्या एरोडायनॅमिक तत्त्वांचा वापर पक्षी आपल्या उड्डाणासाठी करतात त्यांचं विवेचनही त्यांनी प्रासादिक भाषेत केलं आहे. हवेतील विहरणं सुकर व्हावं, हवेचा विरोध किमान पातळीवर आणावा, यासाठी शरीर एका विशिष्ट रचनाबंधात आणण्याचं कौशल्य उपजतच पक्ष्यांकडे असतं. त्यामुळं उडण्यासाठी लागणाऱ्‍या ऊर्जेचीही बचत होत असते. 

पक्ष्यांच्या या गुणधर्मांचा वापर विमानांच्या रचनेसाठी केला जातो. त्यामुळं त्यांचा घाट, विशेषेकरून ती जेव्हा हवाई प्रवास करत असतात त्या वेळी, पक्ष्यांच्या शरीररचनेवरच बेतलेला असतो. अर्थातच विमानांनाही पाय असतात. त्याच्या आकारानुसार कधी दोनच असतात, कधी तीन तर कधी त्याहूनही जास्ती. विमानतळावर जेव्हा विमानं वावरत असतात तेव्हा या रबराची चाकं असलेल्या पायांचाच वापर करतात. विमानाचे पंख आणि इंजिन ही त्याची जितकी महत्त्वाची अंगं आहेत, तितकीच ही चाकंही महत्त्वाची असतात. खास करून हवाई प्रवास करून आल्यावर जेव्हा परत जमिनीवर उतरायचं असतं, त्यावेळी ही चाकं कळीची भूमिका बजावतात. म्हणूनच त्यांना ‘लँडिंग गिअर’ म्हणतात. 

जमिनीवर असताना ही चाकं विमानाशी काटकोनात ताठ असतात. पण हवेत झेप घेतली की ती पक्ष्यांसारखीच आपल्या पोटाशी दुमडून घेतली जातात. त्यासाठी खास कप्पे त्यांच्या पोटात तयार केलेले असतात. त्यात ही चाकं गडप होतात. जोवर विमान हवेतच उडत असतं तोवर ती तिथंच राहतात. मुंबई ते थेट न्यू यॉर्क असा दीर्घ पल्ल्याचा प्रवास करणाऱ्‍या विमानांची चाकं सोळा सतरा तास अशी त्या कप्प्यातच बंदिस्त राहतात. पण जमिनीवर उतरायची वेळ आली, जमिनीपासून चार पाचशे मीटर म्हणजेच हजार बाराशे फूट उंचीवर पोचली, की ही चाकं आपल्या कप्प्यातून बाहेर पडतात, ताठ होतात आणि महाकाय विमानाचा सारा भार आपल्यावर घेत विमानाला धावपट्टीवर सुरक्षित उतरायला मदत करतात. 

पण काही वेळा या लँडिंग गिअरमध्ये बिघाड होतो. तो आपल्या कप्प्यामधून नीटसा बाहेरच येत नाही. किंवा उड्डाण करतानाच त्याचं एक चाक निखळून पडतं. जर ते असं पडलं तर अर्थातच विमानाचं उतरणं कठीण होऊन बसतं. असा काही प्रसंग आलाय याची जाणीव प्रवाशांना झाली, तर त्यांच्या पोटात गोळा आला नाही तरच नवल. आता आपलं काही खरं नाही, अशी त्यांची समजूत होण्याची शक्यता असते. पण कुशल वैमानिक त्याही परिस्थितीत प्रवाशांच्या जिवाला काही अपाय होऊ न देता विमान सुखरूप उतरवतात. दर वर्षी असे किती तरी प्रसंग घडल्याची नोंद आहे. तरीही जीवितहानी झाल्याची उदाहरणं नाहीत. 

जर विमानाचं चाक निखळलं तर लँडिंग गिअरचा नाद सोडून वैमानिक विमानाला त्याच्या पोटाचाच उपयोग करून जमिनीवर उतरवतात. यालाच ‘बेली लँडिंग’ म्हणतात. तसं करताना अर्थातच विमान धावपट्टीवर वेगानं घासत जातं. त्यापायी होणाऱ्‍या घर्षणामुळं उष्णता निर्माण होते. ठिणग्याही पडू शकतात. विमानाचं इंधन अतिशय ज्वालाग्राही पदार्थ असतो. त्या टाकीजवळ या ठिणग्या पोचल्या तर ते पेट घेऊन भडका उडू शकतो. आग्यामोहोळच उसळतो. 

 ते टाळण्यासाठी अशा आणीबाणीच्या प्रसंगात विमानाला हवेतच घिरट्या घालायला लावून इंधन संपवण्याचा प्रयत्न केला जातो. उतरण्यासाठी जे किमान इंधन लागेल तेवढंच जेमतेम उरलं की मगच विमान उतरवण्याची तयारी सुरू होते. अलीकडेच नागपूरहून निघालेल्या एका हवाई रुग्णवाहिकेचं चाक विमान उड्डाण करतानाच निखळून पडलं होतं. त्यामुळं ती मुंबईतच उतरवण्यात आली. 

त्यासाठी जसं त्या विमानाच्या सारथ्यांनी हवेतच दोन तास घालवत इंधन संपवलं तसंच विमानतळावरही आपत्ती व्यवस्थापन केलं गेलं. अग्निशमन दल, डॉक्टर, मेकॅनिक वगैरे सज्ज ठेवण्यात आलेच. पण धावपट्टीवर एक खास प्रकारचा फेस पसरवण्यात आला. त्यामुळं विमानाचं जमिनीशी होणारं घर्षण आटोक्यात ठेवण्यास मदत होते. विमान जमिनीला टेकतं तेव्हाही त्याचा वेग ताशी दीड दोनशे किलोमीटर एवढा असतो. त्या वेगानंच ते धावपट्टीला घासत जातं. ब्रेक लावून तो कमी केला गेला तरी मधल्या काळात प्रचंड प्रमाणात घर्षण होतं. पण त्यापोटी उष्णता प्रमाणाबाहेर वाढणार नाही याची तजवीज केल्यानं ठिणग्या उडून आग लागण्याची शक्यता टाळली जाते. तरीही विमानाचं नुकसान होतंच. अर्थात तेही कमीत कमी होईल याचीही सोय त्या फेसाच्या फवारणीमुळं केली जाते. त्याहून महत्त्वाचं म्हणजे प्रवाशांच्या जिवाला असलेला धोका संपूर्णपणे टाळला जातो. त्या रुग्णवाहिकेतल्या रुग्णासहित इतर सर्वच प्रवासी मुंबईत सुखरूप उतरले. काही वेळा जरी एक चाक निखळून पडलं असलं तरी उरलेल्या चाकांचा उपयोग विमान उतरवण्यासाठी केला जातो. अशा वेळी विमानाचा तोल सांभाळण्याची कसरत वैमानिकाला करावी लागते. समजा पुढचं चाक निखळलं असलं तर मग फक्त पाठच्या चाकांवरच ते उतरवण्याची किमयाही काही वैमानिकांनी केली आहे.

कधी कधी ती चाकं आपल्या कप्प्यातून व्यवस्थित बाहेरच येत नाहीत. तसं झाल्याचा संदेश वैमानिकाला मिळतोच. ते झाल्यास नियंत्रण कक्षाला ते कळवून बेली लँडिंगची सोय केली जाते. पण काही वेळा अनवधानानं वैमानिक ती चाकं कप्प्याबाहेर काढायचंच विसरून जातात. वास्तविक ती व्यवस्थित उघडली आहेत असा संदेश लाल दिवा हिरवा करून वैमानिकाला देण्याची व्यवस्था केलेली असते. तरीही त्याकडे दुर्लक्ष होऊ शकतं. अशा घटना अपवादात्मकच आहेत आणि त्या स्थितीतही प्रवाशांच्या जिवाला असलेला धोका टाळून विमान सुखरूप उतरवलं गेलं आहे. तेव्हा जर विमानाचं चाक निखळलं तर हाय खाण्याची गरज नाही. प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत विमान सुखरूप उतरवलं जाईल याची खात्री बाळगा. जमिनीवरच नाही तर पाण्यावरही. 

संबंधित बातम्या