जर बस लागली तर..!

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 9 ऑगस्ट 2021

‘जर तर’च्या गोष्टी

पुलंची ‘म्हैस’ ही कथा वाचली नाही, किंवा त्यांच्याच आवाजात ऐकली नाही, अशी व्यक्ती विरळाच.  कोकण रेल्वे अस्तित्वात येण्यापूर्वीच्या काळातली ती गोष्ट आहे. त्यामुळं कोकणातला प्रवास बहुतांश एसटीच्या गाडीनंच केला जाई. त्यात वाट सगळी वळणावळणाची. पुलंच्याच शब्दात सांगायचं तर ‘रस्त्याला लागणारी वळणं प्रवाशांना वेगळ्या अर्थानं ‘लागत’’. 

आधीच कोकणचा प्रवास तसा घायकुतीचाच. त्यात जर बस ‘लागली’ तर बघायलाच नको. कोकण रेल्वे आल्यापासून ती पीडा टळली असली, तरी अनेकांना अजूनही बस लागते. रस्ता वळणावळणाचा नसला तरी. पोटातली मळमळ ओकून टाकता टाकता मनात तळमळ सुरू होते. बस अशी लागतेच का?

तसं पाहिलं तर बसच लागते असं नाही. बोटही लागते. काही जणांना विमानही लागतं. एवढंच काय पण मोटारगाडीही लागते. जत्रेमध्ये जे आकाशपाळणे असतात किंवा आजकाल सर्वत्र पसरलेल्या अॅम्युझमेन्ट पार्कमध्ये जे वेडीवाकडी वळणं वेगानं घेत अक्षरशः पिळवटल्याप्रमाणे फिरवून आणणारे रोलर कोस्टर्स असतात, तेही लागतात. कोणत्याही गतिमान प्रवासात जे भोवंडल्यासारखं होऊन उलटी होते तिला म्हणूनच इंग्रजीत मोशन सिकनेस म्हणतात. सागरी प्रवासात सी सिकनेस आणि हवाई प्रवासात एअर सिकनेस. 

आपण नेहमीच काही स्थिर नसतो. चालणं, पळणं, उड्या मारणं वगैरे शरीराची हालचाल स्वाभाविकपणे करतोच. म्हणजे गतिशील असण्याचा अनुभव नसतो असं नाही. तरीही त्या गतिमानतेचा वेग वाढल्यावरच शरीर असं अस्वस्थ का व्हावं? पोटात असं ढवळून का यावं?

याचं कारण वैज्ञानिकांनी शोधून काढलं आहे. आपल्या शरीराची स्थिती काय आहे, याची खबर आपल्या काही अवयवांकडून मेंदूला सतत मिळत असते. आपल्या डोळ्यांना आपण स्थिर आहोत की गतिशील आहोत हे दिसतं. ती माहिती ते मेंदूला पुरवतात. आपल्या कानातल्या आतल्या भागात असलेल्या नलिकांमध्ये एक द्रवपदार्थ असतो. आपण जेव्हा हालचाल करतो तेव्हा तो द्रवही हलतो आणि ती माहितीही मेंदूला पुरवली जाते. हा द्रवपदार्थच आपला तोल सांभाळण्याचं काम बजावतो. त्या द्रवात खळबळ उडाली की मग त्याला आपलं काम नीटपणे करता येत नाही. आपल्या विविध स्नायूंनाही आपली गतिशीलता जाणवते. तेही त्यांची वार्तापत्रं मेंदूला पाठवतात.

कोणत्याही क्षणी या विविध संवेदकांकडून मिळालेल्या माहितीचं एकत्रित विश्लेषण मेंदू करतो. जोवर ही निरनिराळ्या अवयवांकडून मिळालेली माहिती एकमेकीशी सुसंगत असते, तोवर तिचा अर्थ लावण्यात मेंदूला काहीच अडचण येत नाही. पण जेव्हा या अवयवांकडून मिळणारे संदेश एकमेकांशी ताळमेळ राखणारे नसतात, परस्पर विसंगत असतात, तेव्हा मेंदूचा गोंधळ उडतो. तुम्ही जेव्हा बसमधून प्रवास करता तेव्हा खिडकीतून बाहेर पाहताना बाहेरची सृष्टी वेगानं पाठीपाठी जात असलेली तुम्हाला दिसते. तुमची नजर कोणत्याही एका जागेवर ठरत नाही. पण तुमचे स्नायू आणि आतला कान मात्र तुम्ही एकाच जागी बसलेले आहात, असंच मेंदूला सांगत असतात. यातलं कोणतं खरं हे मेंदूला ठरवता येत नाही. त्याची जी तारांबळ त्यामुळं उडते, ती तुम्हाला बस लागण्यात रूपांतरित होते. 

बोटीतून प्रवास करतानाही तुमच्या शरीराला समुद्राच्या लाटांचा प्रभाव जाणवतो. बोट सतत वरखाली किंवा एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला हलत असते. ती कानातल्या द्रवाला जाणवते. पण तुमच्या डोळ्यांना मात्र समुद्र शांत असल्याचंच दिसतं. या दोन संदेशांमधला अंतर्विरोध मेंदूला संभ्रमात पाडतो. जेव्हा समुद्र खवळलेला असतो, तेव्हा तर तोल सांभाळण्याची कामगिरी पार पाडणं कानातल्या द्रवालाच काय पण स्नायूंनाही जड जातं. तोल असा सतत ढळत असल्यामुळं मग पोटातला ऐवजही तसाच ढवळून निघतो. क्रूझवर जाणाऱ्या महाकाय बोटी तशा समुद्रातल्या खळबळीला फारशी दाद देत नाहीत. पण लहान बोटींना मात्र स्वतःला सावरणं जड जातं. अशी बोट लागतेच. 

काही वीर असे असतात की त्यांना मोटारगाडी लागते. पण फक्त ते प्रवासी असतानाच. पण एकदा का त्या गाडीचं सुकाणू हातात घेत ते ‘चक्रधर’ झाले, की त्यांना तीच गाडी लागत नाही. निरनिराळ्या संवेदकांकडून मेंदूला मिळणारे विरोधी संदेश मोशन सिकनेसला कारणीभूत असतात या निष्कर्षाची पुष्टी करणारा पुरावाच ही मंडळी देतात. कारण जेव्हा ते नुसतेच प्रवासी असतात, तेव्हा त्यांची नजर त्यांना ते वेगानं जात असल्याचं सांगते. पण आतला कान मात्र ते एका जागी स्थिर असल्याचीच बातमी मेंदूला देतो. उलट जेव्हा ते स्वतःच गाडी चालवत असतात तेव्हा त्यांची नजर समोरच्या रस्त्यावर केंद्रित झालेली असते. त्यामुळं आजूबाजूची सृष्टी वेगानं आपल्या विरुद्ध दिशेनं पळतेय याकडे त्यांचं लक्षच जात नाही. ते त्यांना ‘दिसतच’ नाही. साहजिकच मेंदूला एकमेकांच्या विरोधात असलेले संदेश जात नाहीत. त्याचा गोंधळ उडत नाही. गाडी लागत नाही.

याचा अर्थ जोवर असा वेगवान प्रवास होत नव्हता तोवर मोशन सिकनेस नावाची व्याधी छळतच नव्हती असं नाही. कारण ग्रीक आणि रोमन दस्तावेजांमध्ये मोशन सिकनेसचे स्पष्ट उल्लेख आढळतात. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’नंही याची दखल घेतलेली आहे. कारण अंतराळवीरांनाही याचा त्रास होण्याची शक्यता असते. 

लहान मुलांना या मोशन सिकनेसचा जास्ती त्रास होतो असं दिसून आलं आहे. पण साधारण वयाची बारा वर्षं उलटली की त्यावर मात केली जाते. वाढत्या वयात मोशन सिकनेसचा त्रास होण्याचं प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होत जातं. 

यावर काही साधे उपाय डॉक्टरांनी सांगितले आहेत. निरनिराळ्या संवेदकांकडून एकमेकांच्या विरोधातले संदेश पाठवले जाणार नाहीत अशी दक्षता घेतली, तर मोशन सिकनेसपासून बचाव होऊ शकतो. त्यासाठी डोळे मिटून स्वस्थ पडून राहणे योग्य. किंवा मोटारीत पुढच्या सीटवर बसणं. किंवा नजर दूरवर क्षितिजावर केंद्रित करणं. ते स्थिर असल्याचंच वाटतं. तसं केल्यानं तुमचे डोळे आणि कान एकमेकांविरुद्ध संदेश पाठवत नाहीत. क्रूझ बोटीवर प्रवास करताना शक्यतो बोटीच्या मध्यभागातली जागा पटकावलीत तर मोशन सिकनेस टाळता येतो. कारण तो भाग सर्वात कमी डुचमळतो.

मोशन सिकनेसची लक्षणं वेगवेगळी आहेत. नुसतीच चक्कर येणं, गरगरल्यासारखं होणं, तोंडाची चव जाऊन भूक मंदावणं, अतिरिक्त लाळ सुटणं, पोट ढवळून येणं आणि वांती होणं. बस किंवा बोट अशी लागते तर प्रवासच करू नये असं मात्र नाही. त्या व्याधीपासून मुक्त होऊन सुखाचा प्रवास करता यावा यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ल्यानं काही औषधं घेता येतात. ती त्यांची मोशन सिकनेसच्या तडाख्यातून सुटका करू शकतात. तेव्हा बोट लागली तर हवालदिल होण्याची गरज नाही. थोडी काळजी घ्या. शुभास्ते पंथानः संतु!

संबंधित बातम्या