निखाऱ्यांवरून चालायचं असलं तर..!

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 16 ऑगस्ट 2021

‘जर तर’च्या गोष्टी

निखाऱ्यांवरून चालण्यापाठच्या विज्ञानाचा अभ्यास पिट्सबर्ग विद्यापीठातल्या भौतिक शास्त्राचे प्राध्यापक डेव्हिड विली यांनी केला आहे.

ग्यानबा धावत धावतच आला, सोसाट्याच्या वाऱ्यासारखा घरात शिरला. तो भलताच उत्तेजित झाला होता. धाप लागल्यामुळं त्याच्या तोंडून शब्दच फुटत नव्हता. मी त्याला सावरायला वेळ दिला. ‘काय झालंय एवढं... ’ असं मी विचारण्याआधीच तो म्हणाला,

‘चमत्कार, चमत्कार, मी चमत्कार पाहिला.’

‘काय झालंय ते नीट समजेल असं सांगशील का?’

‘तेच सांगायला आलोय. मी गावी गेलो होतो. तिथे जत्रा होती. तर तिथं अनेक गावकरी निखाऱ्यांवरून चालत गेले. त्यांचे पाय अजिबात भाजले नाहीत. काहीही जखम झाली नाही. मलाही जायचं होतं, पण माझ्या काकांनी अडवलं. म्हणाले अरे त्या लोकांच्या अंगी काही तरी दैवी शक्ती आहे. म्हणून ते निखाऱ्यांवरून चालू शकले. तुझ्याकडे आहे अशी शक्ती?’

‘तू ते साहस केलं नाहीस हे ठीक आहे. पण त्यात दैवी शक्तीचा काही संबंध नाही. साधं विज्ञान आहे. निखाऱ्यावरून चालावं लागलं तर ते समजून घे. मग तूही तसं करू शकशील. केवळ आपल्या देशातच नाही तर इतर देशांमध्येही लोक निखाऱ्यांवरून चालत जातात. ग्रीसमधल्या काही गावांमध्ये तर दर मे महिन्यात हा सोहळा पार पडतो. त्यासाठी दहा ते बारा फूट लांबीचा चर खणतात. दीड फूट रुंद असतो तो. त्यात तिथं सहज मिळणारा लाकूडफाटा आणि कोळसे घालतात. ते पेटवून दिले जातात. त्यातून उफाळणाऱ्या ज्वाळा खाली बसल्या की आग धुमसत राहते. काळा कोळसा लालेलाल होतो. तो ढिगारा सपाट केला जातो. त्यानंतर त्यावरून लोक एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत चालत जातात. 

यापाठच्या विज्ञानाचा अभ्यास पिट्सबर्ग विद्यापीठातल्या भौतिक शास्त्राचे प्राध्यापक डेव्हिड विली यांनी केला आहे. ते स्वतः कितीतरी वेळा असे निखाऱ्यांवरून चालत गेले आहेत. त्या निखाऱ्यांचं तापमान साडेपाचशे अंश असतं. म्हणजे पाणी ज्या तापमानाला उकळतं त्याच्या पाचसहा पट जास्ती. उकळत्या पाण्यात बोट बुडवलंस तरी चटका बसतो. मग एवढ्या जास्ती तापमानाच्या त्या निखाऱ्यांवरून चालताना तळव्यांना चटके का बसत नाहीत? जखमा का होत नाहीत?

त्याचं कारण तापमानात न बघता तसं चालताना तळव्यांना किती उष्णता मिळते याचा विचार करायला हवा. जर इजा व्हायची असेल तर वरच्या कातडीतून पुढं जात आतल्या स्नायूंपर्यंत ती उष्णता पोचायला हवी. कोणत्याही एका पदार्थापासून दुसऱ्या पदार्थाला उष्णता पोचवण्याचे तीन मार्ग आहेत. वहन, अभिसरण आणि विकिरण. जेव्हा एखादा उष्ण पदार्थ थंड पदार्थाला चिकटून असतो तेव्हा वहनाच्या मार्गानंच उष्णता एकाकडून दुसऱ्याकडे पोचवली जाते. 

यासाठी पदार्थांच्या उष्णतावाहकतेचा विचार करावा लागतो. सगळेच पदार्थ उष्णता सारख्याच मात्रेत वाहून नेत नाहीत. त्या निखाऱ्यांमध्ये असलेल्या लाकडाची उष्णतावाहकता कमीच असते. नाही पटत? मग सांग चुलीवरची आमटी ढवळण्यासाठी स्टीलचा चमचा वापरला तर हाताला चांगलाच चटका बसतो. पण त्या चमच्याला जर लाकडाचा दांडा असला तर आमटी कितीही गरम असली तरी हाताला ती उष्णता जाणवतच नाही. उकळत्या आमटीतली उष्णता स्टीलचा चमचा सहज वाहून नेतो. पण लाकडाच्या दांड्याजवळ आल्यावर त्या उष्णतेचा पुढचा प्रवास खडतर होतो. कारण लाकडाची उष्णतावाहकता स्टीलपेक्षा किती तरी कमी असते. स्टीलपेक्षाही तांब्याची उष्णतावाहकता जास्ती असते. म्हणून तर स्टीलच्या भांड्याला तांब्याचा तळ जोडतात. इंधनाची बचत त्यापायी करता येते. आपल्याला सहज समजेल असं एक उदाहरणही विली यांनी दिलं आहे. केक बनवण्यासाठी आपण भट्टी म्हणजेच ओव्हन वापरतो. त्याचं तापमान दीडदोनशे अंशांएवढं असतं. म्हणजे उकळत्या पाण्यापेक्षा जास्ती. आपण त्या भट्टीत हात घातला आणि आतल्या हवेत नुसता धरला तो भाजत नाही. कारण एक तर हातापेक्षा हवा हलकी असते आणि तिची उष्णतावाहकता अगदीच कमी असते. पण तेच त्या ओव्हनच्या धातूच्या पट्टीला कुठंही स्पर्श झाला तर मात्र हात भाजतो. कारण त्या धातूची उष्णतावाहकता किती तरी जास्ती असते. 

आपल्या मांसाची उष्णतावाहकताही कमीच आहे. म्हणून तर मासळीचा तुकडा तळताना तो वरचेवर परतावा लागतो. कारण तेलापेक्षा मासळीच्या मांसाची उष्णतावाहकता कमी आहे. त्या तुकड्याच्या एका टोकाला तेलापासून जितकी उष्णता चटकन मिळते ती दुसऱ्या तुकड्यापर्यंत तितक्या वेगानं पोचू शकत नाही. परतत राहिला नाही तर तुकड्याचा एक भाग जळेल आणि दुसरा कच्चाच राहील. 

तेव्हा त्या निखाऱ्यांच्या तापमानापेक्षा त्यांची कमी असलेली उष्णतावाहकता पायांना कमी प्रमाणात उष्णता देते. तेही परत चालताना तळव्यांचा किती भाग निखाऱ्यांच्या सान्निध्यात असतो त्यानुसार त्यांना किती उष्णता मिळणार आहे हे ठरतं. पटाईत मंडळी चालताना तळवा संपूर्णपणे निखाऱ्यावर टेकवत नाहीत. त्याचा थोडासाच भाग निखाऱ्यांच्या संपर्कात येतो. त्यातही ते निरनिराळा भाग निरनिराळ्या वेळी निखाऱ्यांना भिडेल याचीही काळजी घेतात. त्यामुळं तळव्याच्या कोणत्याही एका भागाला इजा होईल इतकी उष्णता मिळत नाही. शिवाय असा भागही किती काळ तापलेल्या निखाऱ्यांना भिडतो हेही महत्त्वाचं आहे. ही मंडळी आरामात फेरफटका मारल्यासारखी रमतगमत चालत नाहीत. महत्त्वाचं काम करण्यासाठी लगबगीनं चालावं तशी चालतात. त्यामुळं त्यांचे तळवे अतिशय कमी वेळ निखाऱ्यांना टेकतात. तेवढ्या वेळेत फार कमी उष्णता पायांना मिळते. 

कोणत्या प्रकारचा लाकूडफाटा किंवा कोळसा वापरला आहे यालाही महत्त्व आहे. विली म्हणतात की निरनिराळी लाकडं निरनिराळ्या तापमानाला जळतात. अशा सोहळ्यासाठी मग कमी तापमानाला जळणारी लाकडं वापरणं योग्य ठरतं. शिवाय त्यांचे निखारे होतात तेव्हाही त्यांचं तापमान उतरतं. ते थोडेफार थंड झालेले असतात. ते सपाट केले म्हणजे तळवे एकाच पातळीत त्यांच्या संपर्कात येतात. पेटत्या लाकडांवरून इजा न होऊ देता चालता येणार नाही. पण तेच त्यांचे निखारे होऊन त्यांच्यावर राखेचा थर जमला की तापमानही सहन होईल इतकं उतरतं. काही मंडळी निखाऱ्यांवरून चालण्यापूर्वी पाय धुतात. त्यामुळं एक तर तळव्यांचं तापमान उतरतं. शिवाय त्यांच्यावर पाण्याचा थर राहिल्यामुळं त्या पाण्याची वाफ होईपर्यंत तळव्यांना फारशी उष्णता मिळत नाही. तोवर माणूस पलीकडे पोचलेला असतो. 

उष्णतावाहकतेच्या या नियमांचा नीट अभ्यास करून त्यानुसार तो धगधगता चर तयार केला आणि चालतानाही योग्य ती दक्षता घेतली तर मग निखाऱ्यांवरून चालावं लागलं तरी ते शक्य होईल. त्यासाठी अंगी कोणतीही दैवी शक्ती असण्याची गरजच भासणार नाही. समजलं ग्यानबा!’.
 

संबंधित बातम्या