वय होत आलं असेल तर..!

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 13 सप्टेंबर 2021

‘जर तर’च्या गोष्टी

‘साठी बुद्धी नाठी,’ असा एक वाक्प्रचार आहे. अलीकडे तो फारसा ऐकला जात नाही. फारसा कोणी तो ऐकवतही नाही. वयाची साठी उलटली की बुद्धी कमजोर होते, व्यवस्थित काम करू शकत नाही, असाच त्याचा मथितार्थ आहे. साठसत्तर वर्षांपूर्वी साठीच्या भोज्ज्याला शिवणं तसं दुर्मीळच होतं. चाळिशी पन्नाशीतच मंडळी इहलोकाची यात्रा संपवत असत. सरासरी आयुर्मानच मुळी तिशी-पस्तिशीत अडकलेलं होतं. त्यामुळं एखाद्या व्यक्तीनं साठीचा उंबरठा ओलांडला तर त्याचं बरंच कौतुक केलं जायचं. ‘षष्ठब्दीपूर्ती’ असं भलंमोठं नाव देत सोहळा साजरा केला जाई. पण त्याचबरोबर आता संन्यासाश्रमाची सुरुवात करावी असं सुचवलं जायचं. ती व्यक्तीही ते मान्य करत असे. निवृत्तीचं वयच मुळी पंचावन्न होतं. त्यानंतर कोणतंही काम करणं अशक्यच होतं. सर्जनशील कामगिरी तर दूरच राहिली.

सा ठीनंतर सर्जनशीलता कमी होण्याचं कारणही वैज्ञानिकांनी सांगितलं होतं. वयानुसार जशी सर्वच अवयवांची झीज होते तशीच मेंदूचीही होते. त्यात मेंदूमध्ये नव्या पेशी निर्माण होत नसल्यामुळं झीज भरून येण्याची शक्यताच मावळते. साहजिकच मग रक्ताभिसरण, श्वासोच्छ्वास, अन्नपचन वगैरे मेंदूच्या अनैच्छिक क्रियाही अडखळतच पार पडत. सर्जनशील कार्यासाठी कराव्या लागणाऱ्या ऐच्छिक क्रिया तर जवळजवळ बादच होत. स्मरणशक्तीही दगा द्यायला लागे. 

आज परिस्थिती बदलली आहे. सरासरी आयुर्मान दुप्पटीनं वाढलं आहे. साठीच्याच काय पण सत्तरीच्या आणि ऐंशीच्या घरात शिरणाऱ्या व्यक्तींची संख्याही लक्षणीय झाली आहे. निवृत्तीनंतरच्या काळात उपयोगी काम करण्याच्या संधीही सहजपणे मिळतात. त्यातच आता अमेरिकेतल्या काही संशोधकांनी साठीनंतर मेंदूचा लवचिकपणा कमी होत असल्याचा समज खोडून काढला आहे.

आपल्या मेंदूची ही खासियत आहे. त्याच्या चेतापेशी निरनिराळ्या कामांसाठी निरनिराळ्या जोडण्या करून जाळी तयार करतात. एखादं कौशल्य हस्तगत केलं, नवीन ज्ञान मिळवलं की त्याची स्मृती दीर्घ काळ टिकवण्यासाठी स्वतंत्र जाळं तयार करतात. पण त्याच वेळी जरूर भासली तर ते जाळं तोडून नव्यानं जाळं बांधण्याचीही मेंदूची तयारी असते. वैज्ञानिक यालाच ‘मेंदूची प्लास्टिसिटी किंवा लवचिकता’ म्हणतात. चिकणमातीचा गोळा कसा त्याला देऊ तसा आकार धारण करतो. म्हणूनच तो प्लास्टिक आहे, लवचिक आहे, असं म्हटलं जातं. तसाच आपला मेंदूही प्लास्टिक आहे. पण वयपरत्वे त्याची लवचिकता घटत जाते आणि त्यापायी मग उतार वयात माणूस काही नवीन शिकायला बघत नाही, नवा विचार आत्मसात करायला सहजासहजी तयार होत नाही, असं आजवर समजलं जात होतं. त्यातूनच मग त्या ‘साठी बुद्धी नाठी’ या समजाची रुजुवात झाली होती. 

पण अमेरिकेतील जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठातील वैज्ञानिकांच्या संशोधनातून असं दिसून आलं आहे की साठीपलीकडील व्यक्तीच्या डाव्या आणि उजव्या मेंदूमधील सहकार्य अधिक जोमदार असतं. मेंदूच्या या दोन भागांमध्ये कामांची विभागणी करण्यात आली आहे. उजवा मेंदू हा कलाविष्कारांचं, भावविश्वाचं नियंत्रण करतो तर डावा मेंदू गणित, तर्कसंगती, चिकित्सक विचार यात माहीर असतो. पण उतारवयात हे एकमेकांच्या हातात हात मिळवून अधिकाधिक कामं पार पाडत असल्यामुळं त्या व्यक्तींच्या सर्जनशीलतेला नवनवीन धुमारे फुटतात. आता तरुणांच्या मेंदूच्या कामाचा झपाटा जास्ती असतो. ‘तुझी चाल तुरुतुरू’ याला साजेसा असतो. त्या मानानं उतारवयातला मेंदू ‘संथ वाहते कृष्णामाई’ हे ब्रीद धरून चालतो. सहसा हे दोन भाग स्वतंत्रपणे काम करतात. एका वेळी कोणता तरी एकच लगबग करतो. परंतु उतारवयात मात्र डावा आणि उजवा सवता सुभा सोडतात. एकमेकांपासून अलग न राहता सहकार्यानं ते काम करत असल्यामुळं मेंदूची लवचिकता फक्त कायमच राहते असं नाही, तर उलट वाढते. त्याच्या क्षमतेची क्षितिजं विस्तारतात. त्यापायीच मग योग्य निर्णय घेणं अधिक सुलभ होतं. नकारात्मक विचारांना किंवा भावनांना थारा मिळत नाही. म्हणूनच या वैज्ञानिकांचा असा दावा आहे की मानवी मेंदू आपल्या पूर्ण क्षमतेनुसार वयाच्या सत्तरीत काम करतो. 

याचं कारणही त्यांनी सांगितलं आहे. मज्जारज्जूंवर मायेलिन या रसायनाचं संरक्षक कवच असतं. त्याचा उपयोग चेतापेशींमधील दळणवळणाला उपकारक ठरतो. त्याची वाढ झाल्यामुळं चेतापेशींमधील संदेशांची देवाणघेवाण अधिक वेगानं होते. एकंदरीत बौद्धिक क्षमतेत तब्बल ३०० टक्के वाढ होते, असंही या वैज्ञानिकांचं म्हणणं आहे. 

मॉन्ट्रियल विद्यापीठातील प्राध्यापक मोन्ची उरी यांनी एक कल्पक प्रयोगच केला. निरनिराळ्या वयोगटातील व्यक्तींना त्यांनी या प्रयोगामध्ये सामील करून घेतलं. त्यांना मेंदूचा वापर करावा लागेल अशी निरनिराळी कामं करायला दिली. काही तुलनेनं सोपी होती. काही जटिल, गुंतागुंतीच्या समस्यांचं समाधान करायला लावणारी होती. त्या प्रयोगातील निरीक्षणांच्या आधारे त्यांनी असा निष्कर्ष काढला आहे, की साठीच्या पुढील ज्येष्ठ ऊर्जाबचत करणाऱ्या, ऊर्जेचा पर्याप्त वापर करणाऱ्या मार्गाची निवड बौद्धिक कामासाठी करतात. त्यामुळं मेंदूला अनावश्यक काम करण्यापासून रोखलं जातं. गुंतागुंतीच्या समस्यांवरचा उपाय शोधण्यासाठी किमान ऊर्जा खर्च करावी लागते. मेंदूची कार्यक्षमता त्यापायीच कमाल पातळीच्या जवळपास पोचते. 

चेतापेशींची कधीही भरून न येणारी झीज होते, हा समजही त्यांनी खोडून काढला आहे. परंतु उतारवयात त्यांच्या मधले बंध तुटतात. ते परत जोडले जात नाहीत. त्यापायी मग मेंदूमध्ये अनावश्यक माहितीची साठवण केली जाते. ज्यावेळी माहितीचा मारा मेंदूवर होत राहतो, त्यावेळी त्यातली कुठली टाकाऊ आहे आणि कुठली उपयोगी आहे याची निवड करून मेंदू टाकाऊ माहितीचा निचरा करत राहतो. पण हे काम उतारवयात तितक्या कार्यक्षमतेनं केलं जात नाही. त्यामुळंच मग विस्मरण होऊ लागतं. चेतापेशींची झीज झाल्यामुळं नाही. शरीराला जशी तंदुरुस्तीसाठी नियमित व्यायामाची आवश्यकता असते तशीच मेंदूलाही भासते. त्यामुळं मेंदू सतत काम करत राहील याकडे ध्यान द्यायला हवा. माहितीचा फाफटपसारा टाळायला हवा. ब्रिजसारखा पत्त्यांचा खेळ, बुद्धिबळ किंवा शब्दकोडी सोडवणं यासारख्या कार्यक्रमांमध्ये स्वतःला गुंतवून घेण्यानं मेंदूला ताजंतवानं राहायला मदत होते. तो शिथिल होण्याचा धोका टळतो. रिकामटेकड्या मनात नको नको ते विचार येतात असं म्हणतात, याचं कारण मेंदूला जर त्याची कसोटी पाहणारं काम मिळालं नाही तर तो गंजून गेल्यासारखा होतो. 

तेव्हा वय होत आलं म्हणून आता सारं संपलं असं मानण्याचं मुळीच कारण नाही. व्यावहारिक नीतिनियमांनुसार निवृत्त व्हावं लागलं तरी आता भरपूर मोकळा वेळ असल्यानं स्वतःच्या अंगभूत प्रतिभेला बंधनमुक्त करून तिला फुलवण्याच्या प्रयत्नांना प्राधान्य द्या, ‘साठी बुद्धी नाठी’चा विचारही करू नका, असंच वैज्ञानिक सांगताहेत.

संबंधित बातम्या