दलदलीत पडलात तर..!

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 20 सप्टेंबर 2021

‘जर तर’च्या गोष्टी

दलदलीत पडल्यावर कशाचा आधार सहजासहजी मिळत नाही आणि त्यातून सोडवायला कोणी आलाच तर तोही तसाच आत ओढला जातो, हे खरं. तरीही धीर सोडला नाही तर जीव जाण्याची भीती नाही असंच आश्वासन वैज्ञानिक देत आहेत.

अलीकडेच एक बातमी आली होती ती तुमच्या नजरेखालून गेली होती का? धुवांधार कोसळत असलेल्या पावसानं कोकणात प्रलय आल्यासारखा झाला होता. दरडी कोसळल्या होत्या. त्याच्या ढिगाऱ्याखाली कितीतरी जीव गाडले गेले होते. पूर आणि पाऊस ओसरल्यावर जेव्हा मदतकार्य करायला मंडळी उतरली तेव्हा एका वेगळ्याच संकटाचा सामना त्यांना करावा लागला. त्या मातीच्या ढिगाऱ्याचा चिखल झाला होता. त्यात पाऊल ठेवताच ते आणखीच खोलात जात होतं. म्हणजे मदतगारच चिखलात गाडला जायची भीती होती. 

चिखल, दलदल, पुळणी, खाजणं अशीच फसवी असतात. वरवर साधी वाटतात पण त्यांच्या खोलीचा अंदाज येत नाही. पाऊल तिथं ठरतच नाही. समुद्राच्या किनाऱ्यावर तयार झालेली पुळण म्हणजे केवळ ओली वाळूच असल्याचा भास होतो. पण खरंतर तो आत ओढून घेणारा डोह असतो. इंग्रजीत त्यालाच ‘क्विकसॅंड’ म्हणतात. तिथं टाकलेलं पाऊल जीवघेणं ठरू शकतं. निदान चित्रपटातली दृश्यं तरी आपली अशीच समजूत करून देतात. वैज्ञानिकांच्या मते मात्र ती अतिशयोक्ती आहे. त्यात पडल्यावर कशाचा आधार सहजासहजी मिळत नाही आणि त्यातून सोडवायला कोणी आलाच तर तोही तसाच आत ओढला जातो, हे खरं. तरीही धीर सोडला नाही तर जीव जाण्याची भीती नाही असंच आश्वासन वैज्ञानिक देत आहेत. 

अमेरिकेच्या भूविज्ञान सर्वेक्षण संस्थेतील डेनिस डेमुशेल यांनी या प्रकारच्या भोवऱ्यांचा सखोल अभ्यास केला आहे. ते कसे तयार होतात याचं विवेचनही त्यांनी केलं आहे. त्यासाठी ते समुद्रकिनाऱ्यावर तयार होणाऱ्या पुळणीचं उदाहरण देतात. लाटेच्या टोकाला ओल्या वाळूचा ढिगारा साचतो. चिपळूणमध्ये चिखलाचा साचला होता तसा. वरवर पाहता तो घट्ट असल्यासारखा वाटतो. पण पायाच्या अंगठ्यानं चिवडला तर त्याचे कण स्थिर नसल्याचं आढळून येतं. ते हलतात. इकडेतिकडे पसरू पाहतात. अंगठा काढून घेतला की परत जागेवर येऊ पाहतात. तसंच पाहिलं तर कोरड्या वाळूचा ढिगाराही तसा टणक नसतो. त्याचे कणही एका जागी स्थिर राहत नाहीत. त्यातही पाऊल टाकलं तर ते आत जातं. पण फार खोल नाही. त्या मानानं मातीचा ढिगारा अधिक घट्ट असतो. त्यात टाकलेलं पाऊल बुडत नाही. तिथं टाकलेल्या पावलाच्या दाबाला माती विरोध करते. पाऊल वरच्या दिशेनं रेटू पाहते. खरं तर हे आपल्याला चालण्याच्या दृष्टीनं उपयुक्तच ठरतं. वाळू त्या मानानं तेवढा विरोध करत नाही. त्यामुळं वाळूत चालताना आपल्याला विशेष कष्ट घ्यावे लागतात. त्यातही ओल्या वाळूचा ढिगारा असेल तर अधिकच. याचं कारण म्हणजे त्या वाळूच्या दोन कणांमधलं घर्षण कमी झालेलं असतं. घर्षण पर्याप्त असेल तर ते दोन कणांना एकत्र धरून ठेवायला आधारभूत ठरतं. घर्षण कमी झालं की ते कण एकमेकांपासून दूर होऊ शकतात. तशी माती किंवा वाळू एका जागी स्थिर राहत नाही. कणांची अशी अलग होण्याची हालचाल सुरू झाली की पावलाला करता येणारा विरोध लुळा पडतो. पाऊल अधिक खोलवर जात राहतं.

या कणांच्या खाली असलेलं पाणी दोन कणांच्या मधल्या जागेत झिरपून त्यांच्यामधलं घर्षण कमी करतं. पाण्याचं प्रमाण वाढत जातं तसं घर्षणही किमान पातळीकडे जाऊ लागतं. पाणी आटलं तर चिखलाचा गोळा घट्ट होऊ लागतो. पण जोवर ते पाणी तिथंच आहे तोवर तो गोळा थुलथुलीत राहतो. त्याच्या कणांमधलं घर्षण जवळजवळ नाहीसंच होतं. 

अशा या चिखलात किंवा पुळणीत माणूस पडतो तेव्हा नेमकं काय होतं? सर्वसाधारणपणे मानवी शरीराची घनता एक ग्रॅम प्रति मिलिलिटर आहे. थोडक्यात ती पाण्याच्या घनतेपेक्षा अंमळ कमीच आहे. त्यामुळं माणूस पाण्यावर सहजासहजी तरंगू शकतो. त्यानं वेडीवाकडी धडपड करण्याचा प्रयत्न केला नाही तर तो बुडण्याची शक्यता कमीच असते. पण ज्याला पोहता येत नाही अशी व्यक्ती घाबरून जाऊन वेडीवाकडी धडपड करते, त्यापायी नाकातोंडातून आत पाणी जात घनता वाढते, पाण्याच्या घनतेपेक्षा जास्ती होते. माणूस बुडायला लागतो. चिखलाची, दलदलीची किंवा पुळणीची घनता तर पाण्याच्या जवळजवळ दुप्पट असते. त्यामुळं अशा दलदलीवर कमी घनतेचा माणूस सहजगत्या तरंगू शकतो. पण त्यासाठी घायकुतीला न येता शांत राहता यायला हवं. हे सांगणं तसं सोपं आहे. पण कृतीत उतरवणं कठीण. कारण ती दलदल किंवा क्विकसॅंड हा एक सजीव आहे आणि तो आपल्याला खोलवर ओढून नेतो, अशीच सर्वांची समजूत आहे. कथाकादंबऱ्यांमधून आणि चित्रपटांमधून या समजुतीला खतपाणीच घातलं गेलं आहे. त्यामुळं दलदलीत पडल्यावर माणूस जोरजोरानं हातपाय हलवत राहतो, शरीर जास्ती घुसळत राहतो. त्याची परिणती त्या चिखलात खोल खड्डा खणण्यातच होते. त्या खड्ड्यात मग ती व्यक्ती सहज ओढली जाते.

डेमुशेल यांनी प्रत्यक्ष प्रयोग करून दाखवून दिलं आहे की अशा खाजणात पडल्यावर सुरुवातीला माणसाचं वजनच त्याला बुडवायला जबाबदार ठरतं. वजन जेवढं जास्ती तेवढी बुडण्याची शक्यता अधिक. सडपातळ माणसापेक्षा लठ्ठंभारती माणसाला धोका जास्ती. त्यातही गंमत म्हणजे जर वाढीव चरबीमुळं वजन वाढलं असेल तर शरीराची घनता कमीच भरते. कारण माणूस अधिक फोफसा असतो. तेव्हा या वजनापायी जेवढं खोलवर जाणं असेल तेवढं जास्तीची हालचाल न करता होऊ द्यावं. त्यानंतर त्या चिखलावर पालथं किंवा उताणं पडावं. म्हणजे शरीराचं वजन अधिक क्षेत्रफळावर पसरेल. तसं करण्याऐवजी माणूस त्या दलदलीत अडकलेलं पाऊल काढण्याची धडपड करतो. आपलं वजन दुसऱ्या पायावर ढकलतो. आता तो पाय जड झाल्यामुळं तो अधिक खोल जातो. असं सीसॉ करत राहिल्यामुळं हलवून खुंटा बळकट करावा तसा माणूस अधिकाधिक खोलवर जाऊ लागतो. पण डेमुशेलच्या सांगण्यानुसार पालथं पडल्यावर माणूस जरासा तरंगायला लागतो. अडकलेलं पाऊल थोडंसं निसटतं. त्यानंतर पोहल्यासारखं किंवा रांगल्यासारखं करत दलदलीच्या किनाऱ्याकडे जाण्याचा प्रयत्न करत राहावं. एकदा का तो गाठला की टुणकन उडी मारून तिथून निसटावं. कोरड्या जमिनीवर यावं. 

डेमुशेलचं हे सांगणं तर्कसंगत आणि भौतिक विज्ञानाच्या नियमांना धरून आहे यात शंका नाही. पण माणसाच्या शरीरात मन नावाचा कोणत्याही चाचण्यांमध्ये न सापडणारा वेगळाच अवयव आहे. तोच या खाजणात पडलेल्या माणसाच्या शरीराच्या चलनवलनाचं नियंत्रण करतो. तेव्हा डेमुशेलची दीक्षा प्रत्यक्षात कशी राबवायची हा सवाल उरतोच. त्याचंच उत्तर आता मिळवायला हवं.

 

संबंधित बातम्या