भोवळ येत असेल तर..!

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 20 डिसेंबर 2021

‘जर तर’च्या गोष्टी

माणसाच्या शरीराचा तोल सांभाळण्याची कामगिरी तशी मेंदूचीच. पण त्यासाठी मेंदूला अनेक अवयवांकडून माहिती मिळणं आवश्यक असतं. कानाच्या आतल्या भागात असलेला द्रवरूप पदार्थही तोल सांभाळण्याचं काम करतो. पण त्याच्यात जर फार खळबळ माजली तरी भोवळ येते.

चिंतू म्हणजे चिंतातूर जंतू. नेहमीच काही ना काही तक्रार घेऊन तो माझ्याकडे येतो. बहुतेक वेळा त्याची तक्रार काल्पनिक असते. त्यापायी तो विनाकारण स्वतःला त्रास करून घेत असतो. पण तशी ती तक्रार तर्कसंगतही असल्यामुळं तिचं तसंच सुसंबद्ध निराकरण करणं आवश्यक असतं. या वेळी मात्र तो स्वतः धावत धावत माझ्याकडे आला नाही. उलट त्यानंच मला घाईघाईनं त्याच्याकडे बोलावलं. त्याची तक्रारही ‘शून्यामाजी वसाहती वसवल्या…’ या थाटाची नव्हती. त्यानं सांगितलं की सकाळी नेहमीप्रमाणे तो उठला, पण उभा राहताच त्याला भोवळ आल्यासारखं झालं. खोली आपल्याभोवती फिरतेय असं वाटायला लागलं. पुढं पाऊल टाकणं तर सोडाच पण धड उभंही राहता येईल की काय अशी शंका त्याला सतावू लागली. तोल जात असल्यासारखं वाटायला लागलं. आपली शुद्ध हरपेल की काय अशी भीतीही त्याला वाटायला लागली. म्हणून तो मटकन खाली बसला. तरीही डोकं चक्रावल्यासारखं  वाटणं कमी झालं नाही. म्हणून तो बिछान्यात पडूनच राहिला. डोळे घट्ट मिटून. 

असं का होतंय हा त्याचा प्रश्न होता. खरं तर त्याच्या प्रश्नाचं नेमकं आणि एकमेव उत्तर देणं शक्य नव्हतं. त्याच्या या स्थितीची अनेक कारणं असू शकत होती. 

माणूस दोन पायांवर ताठ उभा राहायला लागला तेव्हाच त्याचा तोल सांभाळण्याची शरीरातील यंत्रणाही प्रस्थापित झाली. हा तोल सांभाळण्याची कामगिरी तशी मेंदूचीच. पण त्यासाठी मेंदूला अनेक अवयवांकडून माहिती मिळणं आवश्यक असतं. डोळे, कानातला आतला भाग, तळपायांशी निगडित असलेले मज्जातंतू, मणका या सगळ्यांकडून मिळालेल्या संदेशांचं वाचन करून मेंदू तोल सांभाळण्यासाठीच्या आवश्यक त्या सूचना देत असतो. आपण चित्रपट पाहतो त्यावेळी ती चित्रफीत विशिष्ट वेगानं डोळ्यासमोरून सरकत जाते. पण तीच जर तुफान वेगानं पळवली तरी चक्कर आल्यासारखं वाटतं. कारण डोळ्यांकडून मेंदूला मिळणाऱ्या संदेशांमध्ये गडबड होत राहते. कानाच्या आतल्या भागात असलेला द्रवरूप पदार्थही तोल सांभाळण्याचं काम करतो. पण त्याच्यात जर फार खळबळ माजली तरी भोवळ येते. ही झाली तशी साधी कारणं. पण या व्यतिरिक्त इतरही अनेक कारणं आहेत. 

रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढलं तर व्यक्ती मधुमेहानं पछाडली जाते. त्यासाठी मग काहींना नियमित इन्सुलिन घ्यावं लागतं. पण त्याचा अतिरिक्त डोस झाला किंवा उपाशी पोटीच ते घेतलं गेलं तर रक्तातलं साखरेचं प्रमाण झपाट्यानं खाली उतरतं. अशा प्रसंगीही डोकं हलकं झाल्यासारखं वाटतं. डोळ्यांपुढं अंधारी येते. आजूबाजूला काय घडतंय हे समजेनासं होतं. रक्तातलं साखरेचं प्रमाण योग्य पातळीवर आणण्यासाठी साखर किंवा चॉकलेट खाणं यावेळी फायद्याचं ठरतं. थोड्या विश्रांतीनंतर व्यक्ती ताजीतवानी होते. काही वेळा घाईघाईनं कार्यालयीन बैठकीला हजर राहण्यासाठी व्यक्ती उपाशी पोटीच धावपळ करते. ऐन बैठकीत खुर्चीत बसल्या बसल्याच ती खाली घसरायला लागते. डोकं चक्रावल्यासारखं झाल्यानं बैठकीतून लक्ष उडतं. हे रक्तातल्या साखरेचं प्रमाण योग्य पातळीच्या खाली घसरल्याचं लक्षण असतं. 

काहींना व्हर्टिगोचा त्रास असतो. या नावाचा आल्फ्रेड हिचकॉकचा सिनेमा आहे. त्यातल्या नायकाला उंचीची भीती वाटते. उंचावरून खाली पाहिल्यावर त्याला चक्कर येते. यामुळं अनेकांचा असा समज झाला आहे की उंचीच्या या अनाकलनीय भीतीपायी, फोबियापायीच, माणूस व्हर्टिगोची शिकार होतो. तसं नाही. जमिनीच्या पातळीवर असतानाही काहींना गरगरल्यासारखं होतं, पोट ढवळून आल्यासारखं वाटतं, आपण पडू की काय अशी भीती वाटू लागते. खरं तर हा आजारही नाही की व्याधीही नाही. ते एक लक्षण आहे. शरीराचा तोल सांभाळण्याच्या कामगिरीत कळीची भूमिका बजावणाऱ्या कानाच्या आतल्या भागातल्या द्रवात खळबळ माजत असल्याचं, काही तरी बिघाड झाल्याचं, ते लक्षण असतं. 

समजा तुम्ही बसलेले आहात. बराच वेळ संगणकावर काम करत आहात. कोणीतरी दारावरची बेल जोरजोरात वाजवतं. तुम्ही झटकन उठून तिकडे जाण्यासाठी उभे राहता आणि तुम्हाला भोवळ येते. ही सर्वसाधारण परिस्थिती आहे. हिलाच डॉक्टर ऑर्थोस्टॅटिक किंवा पोश्चुरल हायपोटेन्शन म्हणतात. कारण ज्या वेगानं तुम्ही तुमच्या स्थितीत बदल केलेला असतो त्या वेगानं रक्त मेंदूकडे पोचू शकत नाही. अपुऱ्या रक्तपुरवठ्यामुळं मेंदूला आपलं काम व्यवस्थित पार पाडता येत नाही. तुम्हाला चक्कर आल्यासारखं वाटतं. पण ही परिस्थिती जास्त काळ टिकत नाही. थोड्याच वेळात तुम्ही परत ताजेतवाने होता. उतार वयात याचा जास्ती त्रास होऊ शकतो. या वयात रात्रीच्या वेळेस कित्येकांना लघवीसाठी एक दोन वेळा उठावं लागतं. अशा वेळी तुम्ही बिछान्यातून घाईघाईनं उठू नये असाच सल्ला डॉक्टर देतात. उताण्या स्थितीतून हळूहळू उठत बसण्याच्या स्थितीत यावं. थोडा वेळ तसंच बसून राहावं आणि हळूहळूच उठून उभं राहावं. त्याही स्थितीत थोडा वेळ काढून मगच चालायला लागावं, असंच तज्ज्ञ सांगतात. तसं केल्यानं रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते. 

अतिरिक्त घाम आल्यामुळं शरीरात पाण्याची कमतरता भासते. डिहायड्रेशन होतं. कडक उन्हात क्रिकेट खेळताना काही वेळा खेळाडूंच्या पायात गोळे येतात त्याचं कारणही हेच असतं. अशा स्थितीतही भोवळ येऊ शकते. त्यासाठी वेळेवर आणि पुरेसं पाणी पिण्याची आवश्यकता असते. 

काही संसर्गामुळंही भोवळ येऊ शकते. दोन प्रकारच्या संसर्गामध्ये हा धोका वाढीस लागतो. आपल्या कानाचा आतला भाग मेंदूशी मज्जातंतूनं जोडलेला असतो. याला व्हेस्टिब्युलर नर्व्ह म्हणतात. विषाणूच्या संसर्गामुळं काही वेळा ती सुजते. त्या परिस्थितीत नीट ऐकूही येत नाही. तसं झालं असल्यास भोवळ येते. तसंच ‘मेनियर्स सिन्ड्रोम’ या नावानं ओळखल्या जाणाऱ्या आजारातही चक्कर येते. उलटीही होते. पोटात सतत ढवळल्यासारखं होत राहतं. पोश्चुरल हायपोटेन्शनप्रमाणे ही परिस्थिती क्षणभंगुर नसते. काही तास किंवा दिवसही ही स्थिती टिकून राहते. त्या संसर्गाचा पुरता बीमोड होईपर्यंत याचा त्रास सहन करावा लागतो. 

मेंदूला आपलं काम व्यवस्थित पार पाडण्यासाठी पर्याप्त प्रमाणात ऑक्सिजनची गरज असते. ती गरज सुरळीत असलेल्या रक्ताभिसरणातून मिळते. त्या प्रवाहात काही कारणांनी अडथळा आल्यास भोवळ येते. पोश्चुरल हायपोटेन्शनसारखा हा अडथळा तात्पुरत्या स्वरूपाचा असल्यास काहीही न करता परत सर्व काही मूळपदावर येतं. पण जर तो दूरगामी स्वरूपाचा असेल तर मात्र वैद्यकीय मदत ताबडतोब घेण्याचाच सल्ला दिला जाईल. खास करून भोवळ येण्याबरोबरच इतरही काही लक्षणं असतील तर पक्षाघाताचा किंवा हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. ते टाळण्यासाठी वैद्यकीय मदत घेणंच योग्य असतं.

संबंधित बातम्या