पॅरॅशूटशिवाय उडी मारली तर..!

डॉ. बाळ फोंडके
शुक्रवार, 31 डिसेंबर 2021

‘जर तर’च्या गोष्टी

पॅरॅशूटशिवायच उडी घ्यावी लागली तर... तर काय होईल? खरंतर असं होण्याची शक्यता फारशी नसते. तरीही कोणतंही यंत्र केव्हा बिघडेल हे सांगता येत नाही. त्यामुळं पॅरॅशूटशिवाय उडी घ्यावी लागली तर, हा प्रश्न अजिबातच कानाआड करता येत नाही.

सैन्यदलामध्ये अनेक वेगवेगळे गट असतात. प्रत्येकावर सोपवलेली जबाबदारी निरनिराळी असते. भूदलामध्ये रणगाडा गट असतो, तोफखाना गट असतो तसाच एक छत्रीधारी सैनिकांचाही गट असतो. त्यांना पॅराट्रूपर्स म्हटलं जातं. विमानातून पॅरॅशूटच्या साहाय्यानं ते शत्रूप्रदेशात उडी घेतात, शत्रूच्या सैनिक फळीच्या मागल्या बाजूला सज्ज होऊन तिथून शत्रूवर हल्ला चढवतात. ‘डी डे’ या नावानं ओळखल्या जाणाऱ्या ६ जून १९४४ या दिवशी हिटलरच्या जर्मनीनं काबीज केलेल्या फ्रान्सची सुटका करण्यासाठी नॉर्मंडीच्या किनाऱ्यावर दोस्त सैन्यानं आपले सैनिक उतरवले. त्याचवेळी पॅरॅट्रूपर्सची तुकडी त्या पाठीमागच्या भागात उतरली होती. त्यांच्या पॅरॅशूटनी त्यांना दगा दिलेला नसतानाही रात्रीच्या अंधारात मोहीम राबवल्यामुळं त्यातले काही सैनिक झाडांमध्ये अडकून पडले, काही जण दगडांवर आदळले. 

दिवसाउजेडी करायच्या मोहिमेमध्येही काही धोके असतातच. सैनिकांना भेडसावणारा त्यातला सर्वात मोठा धोका म्हणजे उडी घेतल्यानंतर पॅरॅशूट उघडलंच नाही तर! जर पॅरॅशूटशिवायच उडी घ्यावी लागली तर... तर काय होईल? खरंतर असं होण्याची शक्यता फारशी नसते. कारण सैनिकांना दिल्या जाणाऱ्या शस्त्रात्रांची, उपकरणांची परिपूर्ण तपासणी केली जाते. तरीही कोणतंही यंत्र केव्हा बिघडेल हे सांगता येत नाही. त्यामुळं पॅरॅशूटशिवाय उडी घ्यावी लागली तर, हा प्रश्न अजिबातच कानाआड करता येत नाही.

किती उंचीवरून पडल्यानंतरही माणूस जिवंत राहू शकतो याची माहिती संशोधकांनी मिळवलेली आहे. त्यानुसार साधारण चार मजली इमारतीवरून म्हणजेच ५० फुटांवरून पडल्यानंतर शरीराची बरीच मोडतोड झाली तरी जिवंत राहण्याची शक्यता असते. पण विमानं तर त्यापेक्षा कितीतरी अधिक उंचीवरून विहार करत असतात. जेट विमानं तर तब्बल चाळीस हजार फूट उंचीवरून उडत राहतात. विमानातून उडी घेत आकाशात काही खेळ करत राहणारे वीर आहेत. त्यांना स्काय डायव्हर्स म्हणतात. त्यांच्याजवळ पॅरॅशूट असतं. ते कमी उंचीवरून उडी घेतात. पण उडी घेतल्याबरोबर ते ताबडतोब पॅरॅशूट उघडत नाहीत. काही अंतर गेल्यावर आणि धरतीच्या बरंच जवळ आल्यानंतर ते पॅरॅशूटची दोरी खेचतात. मध्यंतरीच्या काळात आकाशात तरंगत ते काही कसरती करतात. काही वेळा पाचसहा स्कायडायव्हर्स एकाच वेळी उडी घेऊन तरंगत तरंगत एकमेकांजवळ येत हात धरतात, रिंगण करतात आणि एकसाथ कसरती करतात. ठरावीक उंचीवर आल्यानंतर मात्र ते पॅरॅशूटची मदत घेतात. जमिनीवर उतरतात. 

उडी घेतल्यानंतर गुरुत्वाकर्षणाची ओढ तुम्हाला खाली खेचत राहते. गुरुत्त्वाकर्षणाच्या ओढीमुळं कोणत्याही वस्तूला मिळणाऱ्या वेगात ९.८ मीटर प्रति सेकंद वर्ग अशी वाढ होते. त्यामुळं खाली पडताना वेग वाढतच जातो. अर्थात काही अंतर गेल्यावर हा वेग स्थिर होतो. त्याला अंतिम वेग, टर्मिनल व्हेलॉसिटी, म्हणतात. आपलं पोट आणि छाती जमिनीच्या दिशेनं करून पालथं होत उडी घेणाऱ्या स्कायडायव्हरच्या अंतिम वेगाचं मोजमाप करण्यात आलं आहे. हात पाय पसरलेले असताना त्यांचा अंतिम वेग साधारण दर सेकंदाला पंचावन्न मीटर म्हणजेच ताशी २१० किलोमीटर असतो. त्या वेगानं व्यक्ती जेव्हा जमिनीवर आदळते तेव्हा त्याचा हा वेग झपाट्यानं शून्यावर येऊ पाहतो. त्या पायी जो धक्का बसतो,  किंवा जितक्या ऊर्जेचा सामना करावा लागतो, तोच शरीराची हानी करण्यास जबाबदार असतो. हा धक्का पचवण्याची काही सोय करता आली, एखादा शॉक अॅब्सॉर्बर मिळाला, तर मग या धक्क्याची तीव्रता कमी होऊ शकते. त्यातून मग वाचण्याची शक्यता बळावते. तुम्ही बारा हजार फूट उंचीवरून पडणार असाल तर हा सगळा सव्यापसव्य करण्यासाठी तुमच्याकडे फक्त साठ सेकंदांचाच अवधी असतो. ज्या वेगानं तुम्ही धरतीकडे झेपावत असता त्यापायी तेवढ्याच वेळात ते अंतर कापलं जातं. 

युगोस्लाव्हियाच्या एका विमान कंपनीत हवाई सुंदरी असलेल्या व्हेस्ना व्हुलोविच हिची गिनीज बुकात नोंद झालेली आहे. दहा किलोमीटर म्हणजे एव्हरेस्टपेक्षाही अधिक उंचीवरून पॅरॅशूटशिवाय पडूनही ती जिवंत राहिली होती. ती असलेल्या विमानाच्या आकाशातच ठिकऱ्या झाल्या आणि ती बाहेर फेकली गेली. पण त्यावेळी ती विमानातली खाद्यपदार्थ देण्याची ट्रॉली आणि दुसऱ्या एका कर्मचाऱ्याचं कलेवर यांच्यामध्ये अडकून पडली होती. शिवाय विमानाच्या शेपटाचा एक तुकडा या सगळ्यांना आधार देत होता. त्यामुळं जमिनीवर पडल्यानंतर जो धक्का बसला त्याचा जास्तीत जास्त मारा त्या सगळ्यांनी झेलला आणि व्हेस्ना सहीसलामत बचावली. मानसिक धक्क्यापायी ती काही काळ कोमात गेली होती. पण त्यातून ती बाहेर आली. 

या अनुभवातूनच जर अशी उडी घेतल्यानंतर स्वतःला वाचवायचं असेल तर अशा शॉक अॅब्सॉर्बरचा शोध घ्या, असा सल्ला दिला जातो. जलाशय हा त्यातल्या त्यात उत्तम शॉक अॅब्सॉर्बर आहे. खाली जर नदी किंवा समुद्र असेल तर त्यात पडण्यापायी वाचण्याची शक्यता वाढीस लागते. कारण ज्या जोरानं टणक असलेली जमीन पडणाऱ्या वस्तूवर प्रतिहल्ला करते त्या मानानं द्रवरुप आणि म्हणूनच लवचिक असणाऱ्या पाण्याचा प्रतिहल्ला सौम्य असतो. तरीही धक्का बसतोच. पण तो सहन करणं शक्य आहे, असंच तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मात्र तो जलाशय उथळ नसावा. कारण एवढ्या उंचीवरुन उडी घेतल्यानंतर पाण्यात शिरल्यावर माणूस खोलवर जातो. तेवढी खोली जलाशयाला नसेल तर मग त्याच्या कठीण असलेल्या तळावर माणूस आपटेल, आणि तो धक्का सौम्य नसेल.

दुसऱ्या महायुद्धामध्ये ब्रिटिश सैनिक अल्केमेडे हा असाच एका बॉम्ब टाकण्याच्या मोहिमेवर असताना त्याच्या विमानानं पेट घेतल्यामुळं त्याला उडी मारावी लागली होती आणि त्याचं पॅरॅशूट उघडलंच नव्हतं. पण त्यावेळी हिवाळा होता आणि तो आल्प्स पर्वताच्या रांगांमध्ये होता. तिथल्या पाईन वृक्षाच्या घनदाट जंगलात तो कोसळला आणि त्यातून खाली पडला तो हिमराशीवर. त्यामुळं पायाचं हाड तुटण्यावर निभावलं, तो वाचला, कारण ती झाडी आणि मुख्य म्हणजे भुसभुशीत व मऊसूत असलेल्या हिमराशीनं त्याच्या पडण्याला सौम्य प्रतिकारच केला. 

त्यातूनच मग पडणारच असाल आणि जलाशय नसेल तर झाडीचा किंवा हिमराशीचा शोध घ्या असंच वैज्ञानिक सांगतात. पण जर नागरी वस्तीवर पडणार असाल तर मग एखाद्या इमारतीच्या छपरावर तरणतलाव आहे की काय याचा शोध घ्या. तरच निभाव लागेल अन्यथा नाही. तेव्हा उडी घेण्यापूर्वी तुम्ही पॅरॅशूटची कसून चाचणी घेतलीत तरच तुमच्या जगण्याची शक्यता वाढीस लागेल, हे पक्कं ध्यानात ठेवायला हवं.

संबंधित बातम्या