पेट्रोलचा साठा संपला तर..!

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 3 जानेवारी 2022


‘जर तर’च्या गोष्टी

पेट्रोलचा, खरंतर खनिज इंधनाचा जगातला साठा संपून गेला तर काय, हा प्रश्न सध्या अनेकांना भेडसावत आहे. हा केवळ काल्पनिक भस्मासूर नाही. कारण जगातले खनिज इंधनाचे साठे अमर्याद नाहीत, मर्यादितच आहेत. पण म्हणून हवालदिल होण्याचं कारण नाही. वाहतुकीसाठी, वीजनिर्मितीसाठी व्यवहार्य आणि तगडे पर्याय आजच उपलब्ध झाले आहेत.

अलीकडेच एक बातमी फेसबुकवर झळकत होती. डेहराडूनहून दिल्लीला आलेल्या एका खासगी विमानकंपनीच्या उड्डाणाचं स्वागत करण्यासाठी एक नाही, दोन नाही, तब्बल पाच केंद्रीय मंत्री विमानतळावर हजर होते. त्या विमानात कोणी उच्चपदस्थ परदेशी पाहुणा नव्हता. सारे प्रवासी घडीचेच होते. तरीही त्या उड्डाणाचं एवढं भव्य स्वागत का केलं गेलं? कारण त्या विमानात नेहमीचं एव्हिएशन फ्युएल म्हणजे खास पेट्रोलचं इंधन न वापरता बायोफ्युएल हे जैविक इंधन वापरण्यात आलं होतं. 

ही मोठीच उत्साहवर्धक घटना होती. कारण पेट्रोलचा, खरंतर खनिज इंधनाचा जगातला साठा संपून गेला तर काय, हा प्रश्न सध्या अनेकांना भेडसावत आहे. हा केवळ काल्पनिक भस्मासूर नाही. कारण जगातले खनिज इंधनाचे साठे अमर्याद नाहीत, मर्यादितच आहेत. त्यात गेल्या अर्धशतकात त्यांचा वापर फार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मागणीच्या मानानं पुरवठा कमी पडतो आहे. याचा परिणाम पेट्रोलच्या किमतीवर झाला आहे. त्याची झळ साऱ्‍या जगाला सोसावी लागत आहे. आपल्या देशातही गेल्या वर्षभरातच पेट्रोलच्या भावात दिवसागणिक वाढ होते आहे. नोव्हेंबर महिन्यात त्यावरच्या काही करांमध्ये केंद्र सरकारनं कपात केल्यामुळं थोडासा दिलासा मिळाला आहे, हे खरं. तरीही खनिज तेलाच्या आयातीपोटी देशाच्या तिजोरीवर असह्य ताण पडत आहे हेही सत्य आहे. 

एका बाजूला पेट्रोलचा साठा संपून गेला तर काय करायचं हा प्रश्न ‘आ’ वासून उभा आहे. त्यामुळं त्याच्या वापरात कपात करावी लागणार हे उघड आहे. त्याच बरोबर या खनिज तेलांच्या अतिवापरापोटी प्रदूषणाचाही भडका उडतो आहे. त्यामुळंही त्यात कपात करून उत्सर्जित कार्बनच्या पदचिन्हांमध्ये लक्षणीय घट करण्याची निकड भासू लागली आहे. ग्लास्गो इथं नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सर्वच देशांनी कार्बनचं उत्सर्जन शून्यावर आणण्याचा संकल्प सोडला आहे. आपल्या पंतप्रधानांनी तर २०७० ही तारीखही त्यासाठी मुक्रर केली आहे. 

तेव्हा पेट्रोलच्या वापराला संपूर्ण आळा घालावा लागेल हे भविष्य स्पष्ट झालं आहे. त्याला पर्याय म्हणूनच आता बायोफ्युएलवर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. अलीकडेच रस्ते आणि भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देशातल्या वाहन निर्मिती उद्योगाला मोटारींच्या इंजिनांमध्ये आवश्यक ते बदल करून ती इथेनॉल म्हणजे मद्यार्काचा इंधन म्हणून वापर करण्यासाठी सक्षम करण्याचं आवाहन केलं आहे. उद्योगसंस्थांनीही त्याला अनुकूल प्रतिसाद देत आवश्यक ते संशोधन करायला घेतलं आहे. येत्या वर्षभरातच अशी नवी इंजिनं असलेल्या मोटारी बाजारात येतील अशी चिन्हं आहेत. या मोटारी सध्या तरी पेट्रोल आणि मद्यार्क या दोन्ही इंधनांचा वापर करण्यास सज्ज असतील. जेव्हा नैसर्गिक वायूचा वापर करणाऱ्‍या मोटारींचं उत्पादन झालं, त्यावेळीही अशाच संकरित वाहनांचा वापर सुरू झाला होता. जेव्हा टाकीतलं पेट्रोल संपेल तेव्हा एक कळ दाबून तेच इंजिन नैसर्गिक वायूवर चालू शकेल अशी व्यवस्था केली गेली होती. तशीच आता पेट्रोल आणि मद्यार्क यांचा आलटून पालटून वापर करणाऱ्‍या मोटारी रस्त्यांवर धावू लागतील. त्यापायी प्रदूषणात घट तर होईलच. पण उसापासून साखर करताना मद्यार्क हा मळीपासून बायप्रॉडक्टसारखा मिळवता येत असल्यामुळं खर्चातही कपात होऊ शकेल. विजेवर चालणाऱ्‍या मोटारी तर आजच उपलब्ध आहेत. पण त्यांच्यासाठी जी वीज लागेल तिच्या उत्पादनासाठीही खनिज इंधनाची गरज भासते. 

कारण खनिज इंधनाचा वाहनांइतकाच, किंबहुना कदाचित त्याहीपेक्षा जास्ती वापर वीजनिर्मितीसाठी केला जातो. कोळशाच्या टंचाईपायी देशातली काही वीजनिर्मिती केंद्र बंद पडण्याची पाळी आली होती. तेव्हा वीजनिर्मितीसाठीही पर्यायी व्यवस्था करणं आत्यंतिक गरजेचं होऊन बसलं आहे. सुदैवानं इथंही परिस्थिती अनुकूल आहे. वीजनिर्मितीसाठी अपारंपरिक इंधनांच्या वापराला प्रोत्साहन दिलं जात आहे. जलविद्युत तर फार पूर्वीपासून निर्माण होत आहे. परंतु त्यासाठी मोठी धरणं बांधावी लागतात. त्यापायी विस्थापितांचा प्रश्न निर्माण होतो. काही वेळा सुपीक जमीन पाण्याखाली जाऊन शेतीवर संकट येतं. तसंच या धरणातील पाण्याचा साठा मोसमी पावसावर अवलंबून असल्यामुळं जर एखाद्या वर्षी अवर्षण झालं, तर वीजनिर्मितीवरही त्याचा अनिष्ट परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. 

परंतु, आता इतर पर्यायही व्यवहार्य स्तरावर पोचले आहेत. त्यातील महत्त्वाचा आहे तो सौरऊर्जेचा पर्याय. संपूर्ण देशावर पडणाऱ्‍या सूर्यप्रकाशापासून पन्नास लाख अब्ज युनिट वीज निर्माण करता येऊ शकते. हे अर्थात व्यवहार्य नाही. तरीही एक चौरस किलोमीटर प्रदेशातून दर दिवशी चार ते सात युनिट वीज निर्माण करणं शक्य आहे. सूर्यप्रकाशाच्या उष्णतेपासून वाफ तयार करून तिच्या मदतीनं टर्बाईन्स चालवून वीजनिर्मिती होऊ शकते. परंतु हा आडवळणाचा मार्ग न स्वीकारता फोटोव्होल्टेक पद्धतीच्या सौर पॅनेलद्वारे थेट वीज निर्माण करता येते. गेल्या पाच वर्षांमध्ये एकंदरीत वीजनिर्मितीतला सौरऊर्जेचा हिस्सा लक्षणीयरीत्या वाढला आहे. आजमितीला जवळजवळ चाळीस हजार मेगावॉट सौरऊर्जेचं उत्पादन देशात होत आहे. पुढील वर्षापर्यंत ते एक लाख मेगावॉटपर्यंत वाढविण्याचं उद्दिष्ठ ठेवलं गेलं आहे. 

पेट्रोलला सौरऊर्जेचा पर्याय आजवर फारसा आकर्षक वाटत नव्हता. याचं कारण सौर पॅनेलच्या न परवडणाऱ्‍या किमती हेच होतं. पण आता त्यांच्या किमतीत मोठी घट झाली असून आता सौरऊर्जा निर्मितीचा खर्च पेट्रोलपासून औष्णिक ऊर्जा निर्मितीच्या खर्चाएवढाच झाला आहे. तरीही दोन अडचणी आहेत. पहिली, सौर पॅनेल उभी करण्यासाठी लागणारी जागा. पण राजस्थानमधील वाळवंट किंवा अशीच भाकड जमीन देशात आहे, तिचा उपयोग यासाठी करून आपलं उद्दिष्ट साध्य करता येऊ शकतं, असंच तज्ज्ञांचं मत आहे. शिवाय आता नद्या आणि समुद्र यांसारख्या जलाशयांवरही ही पॅनेल उभी करण्याचं तंत्रज्ञान विकसित करण्यात आलं आहे. दुसरी बाब आहे ती दिवसा निर्माण झालेली वीज रात्री जेव्हा सूर्यप्रकाश नसतो त्यावेळी साठवून ठेवण्याची. त्यासाठी आवश्यक असणाऱ्‍या बॅटरी अजूनही खर्चिक आहेत. परंतु त्यांचा उत्पादन खर्च कमी करणारं तंत्रज्ञानही विकसित होत आहे. याव्यतिरिक्त पवनऊर्जेचा पर्यायही उपलब्ध आहे. पूर्व आणि पश्चिम किनाऱ्‍यावर अशा प्रकारे विंड एनर्जी फार्म्स तयार केली गेली आहेत. त्यापायी पवनऊर्जेची टक्केवारीही वाढते आहे. 

त्यामुळं पेट्रोलचा साठा संपून गेला म्हणून हवालदिल होण्याचं कारण नाही. वाहतुकीसाठी तसंच वीजनिर्मितीसाठी व्यवहार्य आणि तगडे पर्याय आजच उपलब्ध झाले आहेत. त्यांचं संवर्धनही जोमदारपणे होत आहे.

संबंधित बातम्या