अंतराळपर्यटन करायचं तर...!

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 10 जानेवारी 2022

‘जर तर’च्या गोष्टी

अंतराळ तसं अकटोपासून विकटोपर्यंत पसरलेलं आहे. अमर्याद आहे, तर मग त्याची सीमा कोणती? पण हीच तर खरी गंमत आहे. अंतराळाची ‘कारमान लाईन’ नावाची सीमा सर्वसंमतीनं निर्धारित केलेली आहे. आपल्या धरतीच्या पृष्ठभागापासून शंभर किलोमीटर उंचीवर ती सापडते. ती लक्ष्मणरेषा ओलांडली की आपण अंतराळात प्रवेश करतो.

त्या  अलेक्झांडरची एक गोष्ट सांगितली जाते. आपल्या पराक्रमानं त्यानं त्यावेळी ज्ञात असलेलं सर्व जग जिंकून घेतलं. आणि त्यानंतर आता जिंकायला काही उरलंच नाही म्हणून तो रडला म्हणे. खरं खोटं तोच जाणे. पण आज काही उत्साही आणि धाडसी मंडळींवर तशीच परिस्थिती ओढवली असल्यास नवल नाही. गेल्या काही वर्षांमध्ये मौजमजेसाठी प्रवास करायला सगळेचजण बाहेर पडत आहेत. एक तर जीवनावश्यक गरजा भागवून झाल्यावरही खिसा रिता होत नाहीये. आणि आपल्या परिसराबाहेरचं जग पाहण्याची मुळातली इच्छा उफाळून वर येऊ पाहत आहे. अशा सहली आयोजित करणार्‍या पर्यटन कंपन्याही फोफावल्या आहेत. त्यामुळं असा प्रवास जिकिरीचा राहिलेला नाही. त्यापायीच मग काही मंडळी जग फिरून आली आहेत. अगदी टिकलीएवढ्या देशांनाही भेट देऊन झाली आहे. सारं जग असं पालथं घातल्यानंतर आता आणखी कुठं जायला मिळत नसल्याची खंत या मंडळींना वाटत असल्यास नवल नाही. पण त्यांच्या या जगावेगळ्या समस्येवर आता तोडगा निघाला आहे. जगाबाहेरचं जग आता खुणावतं आहे. अंतराळ पर्यटन ही कल्पना केवळ विज्ञानकथांपुरतीच मर्यादित राहिलेली नाही. ती साकार करणाऱ्या कंपन्यांनीही आपली कवाडं खुली केली आहेत. 

या कंपन्याचे प्रणेते असलेले अॅमेझॉन कंपनीचे सर्वेसर्वा जेफ बेझॉस आणि व्हर्जिन अटलांटिक या हवाई प्रवास स्वस्तात घडवून आणणाऱ्या कंपनीचे संस्थापक सर रिचर्ड ब्रॅन्सन, हे असं पर्यटन करूनही आले आहेत. खरं तर विजेवर चालणाऱ्या मोटार गाडीचे उत्पादक एलॉन मस्क हे त्यांच्याच पंक्तीतले. फक्त त्यांचं स्वप्न पूर्णपणे सत्यात साकार होऊ शकलेलं नाही. बाकी दोघांनी मात्र अंतराळपर्यटनाचा पाया घातला आहे.

आपण जेव्हा स्वित्झर्लंडच्या सहलीवर जातो तेव्हा स्वित्झर्लंडची सीमा नेमकी कुठं सुरू होते याची परिपूर्ण माहिती आपल्याला असते. तसंच मग अंतराळाची सीमा नेमकी कुठं सुरू होते, हे समजायला नको! अंतराळ तसं अकटोपासून विकटोपर्यंत पसरलेलं आहे. अमर्याद आहे, तर मग त्याची सीमा कोणती हे कसं सांगता येईल, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ते स्वाभाविक आहे. पण हीच तर खरी गंमत आहे. अंतराळाची ‘कारमान लाईन’ नावाची सीमा सर्वसंमतीनं निर्धारित केलेली आहे. आपल्या धरतीच्या पृष्ठभागापासून शंभर किलोमीटर उंचीवर ती सापडते. ती लक्ष्मणरेषा ओलांडली की आपण अंतराळात प्रवेश करतो.

त्यामुळंच अंतराळपर्यटनाचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. काही जण त्या कारमान रेषेला भोज्ज्यासारखं शिवून परत येतात. ती ओलांडत नाहीत. त्याला उपकक्षीय अंतराळपर्यटन, सब ऑर्बिटल टुरिझम, म्हणतात. ती रेषा ओलांडता आली की मग आपण अनंत अंतराळात फिरायला मोकळे होतो. अर्थात त्यावेळीही आपला वेग किती आहे यावर आपण अंतराळात पोचल्यानंतरही पृथ्वीभोवतीच प्रदक्षिणा घालत राहणार की तिच्यापासून दूर होत चंद्राकडे, मंगळासारख्या इतर ग्रहांकडे, मोर्चा वळवणार हे ठरतं. अधिक वेग असल्यास आपल्या सौरमालिकेचा पाश तोडून आपण त्याहीपलीकडे सुदूर अंतराळात जाऊ शकतो. पृथ्वीभोवती एका कक्षेत परिभ्रमण करत राहिलो तर ते होईल कक्षीय पर्यटन, ऑर्बिटल टुरिझम. त्याही पलीकडे मग फ्री स्पेस टुरिझम. आजतरी सब ऑर्बिटल किंवा ऑर्बिटल टुरिझमच्या पर्यायांचाच विचार केला जात आहे. त्या पुढचा टप्पा गाठायला अजून तरी बराच अवकाश आहे. 

तरीही अंतराळपर्यटनाचं दालन आम जनतेला खुलं करण्यासाठीचं पहिलं पाऊल उचललंय, यात शंका नाही. ही यात्रा कशी करायची आणि मुख्य म्हणजे ती करून सुखरूप परत घरी कसं यायचं यासाठीचं तंत्रज्ञान विकसित झाल्याची ग्वाही मिळाली आहे. त्याचा आधार घेत अधिक धाडसी पर्यटनाची रुजवात केली जाईल. हे सगळं ऐकल्यावर आता तुम्हालाही अशीच अंतराळात भटकून येण्याची खुमखुमी आली असेल ना! पण सबूर. अशी सफर करणं म्हणजे ‘बॅग भरो निकल पडो’, इतकं सोपं नाही. त्या साठी अनेक प्रकारची पूर्वतयारी आवश्यक आहे. 

पहिली बाब तुमच्या तंदुरुस्तीची. ती सफर तुम्ही झेपवाल याची खातरजमा निघण्यापूर्वीच व्हायला हवी. त्यात आश्चर्य नाही. आजही मानसरोवराला भेट द्यायची तर तुमची संपूर्ण वैद्यकीय तपासणी केली जाते. ती पास होऊन डॉक्टरांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतरच तुम्हाला त्या सफरीवर जाण्याचा परवाना दिला जातो. एवढंच कशाला, पण आपल्याच लेह लडाखला जायचं तर तिथं पोचल्यावर एक अख्खा दिवस, क्वचित जास्तही, संपूर्ण आराम करत बिछान्यातच पडून राहावं लागतं. ऑक्सिजनची कमतरता असणाऱ्या तिथल्या विरळ वातावरणात वावरण्याची सवय तुमच्या शरीराला व्हावी लागते. मग अंतराळासारख्या शून्यवत गुरुत्वाकर्षण असणाऱ्या प्रदेशात फेरफटका मारायचा तर त्यासाठीही तुमच्या शरीराची तयारी करायला नको? तिथं अनिवार्य असलेलं ते स्पेस सूटचं ओझं अंगावर बाळगत फिरण्याची सवय व्हायला नको?

म्हणूनच तुम्हाला अंतराळपर्यटनाला निघायचं असेल तर नव्वद सेकंदांमध्ये तुम्हाला जिन्यानं सात मजले चढून जाता आलं पाहिजे. सात मजले का, तर ज्या मनोऱ्याला टेकून अग्निबाण आणि यान उभं केलेलं असतं त्याची उंची तेवढी असते. तिथं अर्थात लिफ्ट असली तरी समजा ती चालत नसेल तर तुम्ही चालत जाऊन ती उंची गाठू शकता, हे दाखवून द्यायला हवं. आणि हे करायचं तर तुमची उंची कमीतकमी पाच फूट आणि जास्तीतजास्ती सव्वा सहा फूट असायला हवी. तसंच वजनही पन्नास ते शंभर किलोग्रॅमच्या पट्ट्यात असायला हवं. याचा अर्थ असा नाही की उंची पाच फूट आणि वजन शंभर किलो असलं तरी चालेल. अशा लठ्ठंभारतीला जायची परवानगी मिळायचीच नाही. अर्थात असं अद्‌भुतरम्य पर्यटन करायचं तर तंदुरुस्तीची तेवढी किंमत तर मोजायलाच हवी ना! आता किमतीचाच प्रश्न निघाला तर या सफरीसाठी दोन ते अडीच लाख डॉलर्स म्हणजेच आजमितीला दीड ते दोन कोटी रुपये मोजण्याचीही तयारी ठेवायला हवी. भविष्यात ही कमी होऊन स्वस्तातली अंतराळयात्रा करण्याची संधी मिळू शकेल.

एवढी तयारी करूनही भागणार नाही. कारण त्यानंतर किमान पाच दिवसांचं प्रशिक्षण घ्यावं लागेल. त्यात मुख्यतः शून्यवत गुरुत्वाकर्षणात कसं राहायचं, आपले सगळे व्यवहार त्या परिस्थितीत कसे पार पाडायचे, हे शिकवलं जाईल. अर्थातच शरीरालाही त्या स्थितीत राहण्याची सवय होईल. तसंच उड्डाण करताना वेग झपाट्यानं वाढवला जातो. त्याचाही मुकाबला करण्याचं शिक्षणही दिलं जाईल. ते सहन न होऊन अस्वस्थ वाटू लागलं तर उपचार करण्यासाठी डॉक्टरांची टीमही प्रशिक्षण केंद्रात सज्ज असेल.

अशी जय्यत तयारी झाली की मग मात्र ‘स्काय वुड नो लॉन्गर बी द लिमिट’!

 

संबंधित बातम्या