उंटाची नक्कल केली तर..!

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 28 मार्च 2022

‘जर तर’च्या गोष्टी

उंटाची नक्कल केली तर, असा एक जगावेगळा विचार चीनमधील झियान विद्यापीठातील वायग्यू हुयांग यांच्या मनात चमकून गेला. त्यांनी उंटाच्या घ्राणेंद्रियाचा सविस्तर अभ्यास करून पेयजलाचा शोध लावण्याच्या त्याच्या गुणवैशिष्ट्याचा सखोल उलगडा करून घेतला व त्यावर आधारित एक आर्द्रता संवेदक, सेन्सर, विकसित केला.

काही जणांना त्यांचा काहीच दोष नसतानाही सदोदित कुचेष्टा, हेटाळणीच वाट्याला येते. आता उंटाचंच बघाना. कुरूपतेचा मूर्तिमंत आविष्कार असंच त्याला समजलं जातं. पाठीला आलेलं कुबड, काहींना तर दोन दोन कुबडं, वेडीवाकडी लांबलचक मान, पुढं आलेले लोंबणारे ओठ, शरीराच्या मानानं बारीक, काडीसारखे पाय आणि फतक फतक करत चालणं, एकही आवडावा असा शारीरिक अवयव नाही. उष्ट्राणां च विवाहेषु गीतं गायन्ती गर्दभः । परस्परं प्रशंसन्ति। अहो रूपमहो ध्वनिः।। या श्लोकात तर उंटाला गाढवाच्या पंगतीला बसवून, ‘अहाहा काय ते रूप’ असं म्हटलं आहे. याहून अधिक अवहेलना ती काय!

पण आपण शेवटी ‘वरलिया रंगाला’ भुलणारीच माणसं. उंटाच्या बेंगरूळ रूपाकडेच लक्ष देताना आपण त्याच्या अंगच्या काही गुणांकडे साफ दुर्लक्षच करतो. वास्तविक उंटाला ‘वाळवंटातलं जहाज’ असं म्हटलं जातं. जहाज हे तसं नेहमीच पाण्यातून विहार करतं. पण वाळवंटात तर पाण्याचा टिपूसही नसतो. त्या पर्यावरणातही पाण्यातून प्रवास करणाऱ्या जहाजाइतक्याच सहजतेनं तरंगत गेल्यासारखी पदक्रमणा करण्याची क्षमता असणाऱ्या उंटाला म्हणूनच तर जहाज असं संबोधलं गेलं आहे. वालुकामय प्रदेशातून दिवसेन दिवस प्रवास करताना कितीही तहान लागली तरी पाणी मिळणं मुश्कीलच नाही तर केवळ अशक्य. तरीही विनातक्रार उंटाची स्वारी चालत राहते. प्रवासाला निघण्यापूर्वी जे काही पोटभर पाणी पिऊन घेतलेलं असेल त्याचीच साठवण करत त्याचा अपव्यय होणार नाही याची खातरजमा करून घेत उंट चालत राहतो. कारण त्या तापलेल्या उन्हात घाम येणार नाही, अशीच त्याच्या त्वचेची रचना असते. तसंच मूत्रावाटेही शरीरातल्या पाण्यात घट होणार नाही यासाठी त्याचं मूत्रही घनरूपच राहतं. त्याचे स्फटिकच तो शरीराबाहेर टाकतो. अर्थात घाम आणि मूत्र या शरीरातल्या पाण्याचा निचरा करणाऱ्या दोन्ही प्रक्रियांचं त्याच्या अंगातलं स्वरूप वेगळंच असतं. 

तीच गत त्याच्या पावलांची. खरं तर वाळूतून चालणं तसं कठीणच. कारण मऊमऊ वाळू पावलांच्या तिच्यावर पडणाऱ्या दाबाचा कठीण जमिनीसारखा प्रतिकार करू शकत नाही. त्यामुळं पाऊल पुढं टाकण्यासाठी आवश्यक असलेली उचल मिळत नाही. म्हणूनच पाऊल घट्ट रोवतच चालावं लागतं. सर्वसाधारण तापमानालाही वाळूचे चटके पावलांना बसतातच. वाळवंटातली वाळू तर आग ओकत असते. अशा त्या धगधगीत निखाऱ्यांसारख्या वाळूवर पाय घट्ट रोवायचे म्हणजे तर ते भाजूनच निघायला हवेत. पण उंट मात्र मजेत रमतगमत फिरल्यासारखा त्या वाळूतून चालतो. कारण त्याच्या पावलांवर त्वचेचीच चामड्यांसारखी घट्ट आवरणं असतात. त्यामुळं वाढीव तापमान त्या पावलांच्या मऊसूत त्वचेपर्यंत पोचतच नाही. ते आवरण तिचं संरक्षण करतं. जणु निसर्गानंच त्याच्याच कातडीचे जोडे करून त्याच्या पावलांवर अडकवले आहेत.

या आणि अशाच नैसर्गिक गुणधर्मांमुळं एरवी ज्याची निंदा केली जाते त्या उंटाचीच आठवण वाळवंटातून आपला कबिला आणि विकावयाचा माल यांची नेआण करणाऱ्या व्यापाऱ्यांना होते. त्यांच्या त्या काडीसारख्या पायांना वेगही घेता येतो. म्हणून तर जेव्हा टपाल मुख्यत्वे खुष्कीच्या मार्गानंच पाठवलं जात असे, त्या काळात उंटांचा उपयोगही त्यासाठी केला जात होता. सैन्यातही सांडणी दल तैनात असे. खास करून मरुभूमीतल्या युद्धासाठी त्यांचा उपयोग अटळ होता. 

याच उंटाच्या आणखी एका वैशिष्ट्यानं आता वैज्ञानिकांना आकर्षित केलं आहे. सतत अतिशय कोरड्या प्रदेशातच वास्तव्य करावं लागत असल्यामुळं, पाण्याचा शोध घेण्याची क्षमता उंटांच्या अंगी उपजतच विकसित झालेली असते. जवळपास कुठं पाण्याचा साठा असेल तर त्याचा सुगावा त्यांना पटकन लागतो. त्यासाठी त्यांचं नाक तयार झालेलं आहे. त्याची रचना आणि त्याचे गुणधर्म त्याला पाण्याचा सुगावा लावण्यात मदत करतात. हे नाक इतकं तीक्ष्ण असतं की हवेतल्या बाष्पाचीही त्यांना चटकन ओळख पटते. हवेत आर्द्रता असेल तर त्यांचं नाक त्याची जाणीव करून देतं. 

उंटाची नक्कल केली तर, असा एक जगावेगळा विचार चीनमधील झियान विद्यापीठातील वायग्यू हुयांग यांच्या मनात चमकून गेला. त्याचाच पाठपुरावा करत त्यांनी उंटाच्या घ्राणेंद्रियाचा सविस्तर अभ्यास केला. पेयजलाचा शोध लावण्याच्या त्याच्या गुणवैशिष्ट्याचा सखोल उलगडा करून घेतला. त्यावर आधारित एक आर्द्रता संवेदक, सेन्सर, त्यांनी विकसित केला आहे. तो निरनिराळ्या अनेक पर्यावरणाच्या परिस्थितीत आर्द्रतेचं अचूक निदान करू शकतो, असा त्यांचा दावा आहे. अगदी औद्योगिक प्रदूषणग्रस्त पर्यावरणातही त्यांचं हे उपकरण आपली कामगिरी इमानेइतबारे बजावतं. एवढंच काय पण मानवी त्वचेवरच्या बाष्पाचाही छडा लावणं त्याला शक्य होतं. 

आजवर आर्द्रता संवेदक अस्तित्वातच नव्हते, अशातली बाब नाही. पण त्यांच्या मर्यादा आहेत. काही संवेदनशील आहेत पण टिकाऊ नाहीत. इतर काही नेमके यांच्या उलट आहेत. बरेचसे संवेदक खुल्या जागेत वापरता येत नाहीत कारण सूर्यप्रकाशात त्यांची क्षमता क्षीण पावते. उंटाला सूर्यप्रकाशाचा अजिबातच त्रास होत नाही. म्हणूनच त्याच्या नाकाच्या रचनेवर आधारित हा नवा संवेदक उघड्यावरही तीच अचूकता दाखवतो. 

उंटाच्या नाकात लहान लहान अरुंद वाहिन्या असतात. त्यांच्यामध्ये असलेल्या श्लेष्मल त्वचेत अतिशय अल्प प्रमाणातलंही बाष्प शोषून घेण्याची क्षमता असते. त्यात या वाहिन्यांची लांबी जास्त असल्यामुळं या त्वचेचं क्षेत्रफळही जास्त असतं. हुयांग यांनी त्याचीच नक्कल करत पॉलिमर पदार्थापासून असा पडदा तयार केला. त्यात श्लेष्मल त्वचेची नक्कल करणाऱ्या झ्विटरआयन कणांची पेरणी केली. या कणांच्या ठायी असलेल्या विद्युतरासायनिक गुणधर्मामध्ये पाण्याच्या संपर्कापायी मोजता येईल असा बदल होतो. आर्द्रतेत होणारे बदल या कणांनी दाखवलेल्या बदलांमध्ये प्रतिबिंबित होतात. 

काही जणांच्या तळहाताला घाम येतो. ते ओलसर होतात. त्यापायी त्यांना संगणकावर सुरळीत काम करता येत नाही. त्वचेवरील बाष्पाचीही चाहूल हुयांग यांच्या उपकरणामुळं लागत असल्यानं त्याचा उपयोग स्पर्शहीन संगणकाची रचना बनवण्यासाठी करता येईल, असा त्यांचा कयास आहे. त्यासंबंधीचे प्रयोग करून या उपकरणाच्या वापराचा विस्तार करण्याचे प्रयत्न ते सध्या करत आहेत. 

प्राण्यांमधील अनोख्या गुणधर्मांचा वापर करून इलेक्ट्रॉनिक यंत्रणा विकसित करण्याची ही पहिलीच वेळ नाही. वटवाघळांच्या संदेशवहनाची नक्कल  करत रडारचा शोध दुसऱ्या महायुद्धाच्या काळात लावला गेला होता. आता उंटाची नक्कल करून आर्द्रता संवेदक तयार झाला आहे.

संबंधित बातम्या