दीर्घायुषी व्हायचं असेल तर...

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 4 एप्रिल 2022


‘जर तर’च्या गोष्टी

‘जीवेत शरदः शतम्’, अशा शुभेच्छा आपण आपल्या आप्तेष्टांना, मित्रपरिवाराला देत असतो. खास करून त्यांच्या वाढदिवशी त्यांनी वयाची शंभरी पूर्ण करावी, अशी सदिच्छा व्यक्त करत असतो. त्याचं मूळ आपल्या काही प्राचीन ग्रंथांमध्ये. वेदांमध्ये, बायबलमध्ये, इतरही धर्मग्रंथांमध्ये, मनुष्यप्राण्याचं सरासरी आयुर्मान शंभर वर्षांचं असल्याचं जे सांगितलं गेलं आहे, त्यात आहे. तरीही असे शतकवीर दुर्मीळच असतात. तसं पाहिलं तर गेल्या काही वर्षांमध्ये जगभरातच लोकांच्या सरासरी आयुर्मानात भरघोस वाढ झाली आहे. आपल्याच देशाचा विचार केला तर स्वातंत्र्य मिळालं त्या वेळी जेमतेम तिशीच्या उंबरठ्या अलीकडे पलीकडे रेंगाळणाऱ्या सरासरी आयुर्मानानं आता सत्तरी पार केली आहे. ऐंशी नव्वदी गाठलेली मंडळी आता आपल्या आसपास सहज आढळतात. 

या  दीर्घायुष्याला संसर्गजन्य रोगांवर आपण लशीकरणानं केलेली मात, तसंच विकसित आरोग्यसेवा कारणीभूत आहे यात शंका नाही. जन्मदरात जेवढी घट आपण साध्य केली नसेल तेवढी मृत्यूदरात केली आहे. तरीही असं दीर्घायुष्य लाभावं हे जरी आपल्या आनुवंशिक वारशात सामावलेलं असलं तरी त्याला पूरक अशी जीवनशैली आपण अंगीकारली नाही तर ते भविष्य प्रत्यक्षात साकारत नाही. त्यामुळंच एका बाजूला ऐंशी नव्वद पार करणारी मंडळी दिसतात तशीच अकाली मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्याही नगण्य नसल्याचंच दिसून येतं. 

उपजतच दीर्घायुष्याचा वारसा आपण घेऊन आलो असलो तरी तो साकार होण्यासाठी मिताहारी असावं, असा उपदेश जाणकार  मंडळी करतात. मिताहार केवळ संख्यात्मक नसावा त्याला गुणात्मकतेचीही जोड दिली गेली पाहिजे असंही सांगितलं जातं. वैज्ञानिक भाषेत बोलायचं तर दिवसभरात आपण किती उष्मांक, कॅलरी रिचवतो याचा विचार करायला हवा. त्या बाबतीत हात थोडा आखडताच घ्यायला हवा, दोन घास कमीच पोटात घालावेत असंही सांगितलं जातं. 

तरीही तो केवळ एक अंदाज आहे की त्यापाठी तसंच काही ठोस तर्कसंगत कारण आहे, असा सवाल कोणीही करेल. त्याचं उत्तर प्रयोगशाळेतील प्राण्यांवर केलेल्या काही प्रयोगांमधून मिळालं होतं. माश्या, कृमी आणि मूषक यांच्या उष्मांक सेवनात जेव्हा घट केली गेली तेव्हा त्यांच्या आयुर्मानात लक्षणीय भर पडल्याचं दिसून आलं होतं. तरीही हाच परिणाम मनुष्यप्राण्यामध्येही आढळेल का? हा सवाल अनुत्तरितच राहिला होता. 

तोच उलगडण्याचा चंग येल या ख्यातनाम विद्यापीठातील प्राध्यापक विश्वदीप दीक्षित यांनी बांधला आहे. त्यांच्या प्रकल्पाच्या लांबलचक नावातल्या आद्याक्षरांनी तयार केलेलं लघुनाम ‘कॅलरी’ असं मोठं समर्पक ठेवलेलं आहे. त्या प्रकल्पासाठी त्यांनी दोनशे निरोगी तरुणांची निवड केली.  

सुरुवातीला त्या सर्वांना त्यांचा नेहमीचा आहार घेण्याची मुभा दिली गेली. त्याची सरासरी काढून ते साधारणपणे किती उष्मांकांचं सेवन करतात याचं गणित केलं गेलं. त्यानंतर त्यांनी त्यांचे दोन समसमान गट केले. एका गटाला पूर्वीप्रमाणेच आहार दिला. दुसऱ्या गटातल्या व्यक्तींच्या उष्मांकांमध्ये मात्र १४ टक्क्यांची घट ठेवली. हा सिलसिला दोन वर्षं चालू ठेवला. आणि मग उष्मांकातल्या घटीपायी कोणते दीर्घकालीन परिणाम होतात याचा आढावा घेतला गेला.

वाढत्या वयापायी आरोग्याला जी काही कसर लागते त्याला आपली रोगप्रतिकारशक्ती दुबळी होणं कारणीभूत असते. याचं मूळ आपल्या गळ्याच्या घाटीत जो थायमस नावाचा छोटेखानी अवयव असतो त्याची कार्यक्षमता क्षीण होण्यात असल्याचं दिसून आलं होतं. ही ग्रंथी आपल्या रोगप्रतिकारयंत्रणेत कळीची भूमिका बजावणाऱ्या टी लिम्फपेशींची निर्मिती करते. साधारणपणे वयाच्या चाळिशीनंतर या ग्रंथीची कार्यक्षमता उताराला लागते. साहजिकच त्याची परिणती टी पेशींची संख्या कमी होण्यात किंवा त्यांची कार्यक्षमता कमजोर होण्यात होते. त्याचं कारणही वैज्ञानिकांच्या ध्यानात आलं होतं. वय वाढतं तसं थायमसमध्ये मेदाची म्हणजेच चरबीची बेसुमार वाढ होत जाते. तब्बल सत्तर टक्के मेदवृद्धी होते. साहजिकच त्यापायी निरनिराळ्या संसर्गजन्य रोगांची बाधा सहजगत्या होऊ लागते. आरोग्याला हानी पोचते. 

म्हणूनच दीक्षित यांनी एमआरआय तंत्रज्ञान वापरून या थायमसची स्पष्ट छायाचित्रं मिळवायला सुरुवात केली. ज्या प्रयोगार्थींनी आपला नेहमीचाच आहार सुरू ठेवला होता त्यांच्या थायमसमध्ये मेदानं अपेक्षेप्रमाणे घुसखोरी करून बराचसा भाग व्यापला होता. त्यामुळं त्याच्यावर सोपवलेली कामगिरी पार पाडण्यासाठी आवश्यक तेवढी जागा ग्रंथीमध्ये राहिली नव्हती. मग सक्षम टी पेशीची निर्मिती पर्याप्त प्रमाणात कशी व्हावी पण ज्यांनी कमी उष्मांकाचा आहार सतत दोन वर्षं घेतला होता त्यांच्या थायमसनं मेदवृद्धीला चांगलाच आळा घातला होता. चरबीनं त्या ग्रंथीचा थोडासाच भाग व्यापला होता आणि टी पेशी निर्मितीसाठी भरपूर भाग मोकळा सोडला होता. दीर्घायुषी व्हायचं असेल तर उष्मांक सेवनात घट करावी या उपदेशाचं तर्कसंगत कारण मिळालं होतं. 

तरीही हे नेमकं कसं साध्य केलं जातं, हा प्रश्न दीक्षित यांना छळत होताच. ज्या जनुकांच्या वारशापायी दीर्घायुष्य आपल्या ललाटी लिहिलेलं असतं त्या जनुकाची ओळख पटावी आणि त्याच्याकडून ज्या प्रथिनाची निर्मिती होते त्याच्या कार्यक्षमतेची परीक्षा घ्यावी या उद्देशानं त्यांनी आणखी सखोल संशोधन चालूच ठेवलं आहे.

त्याचेच काही निष्कर्ष अलीकडेच त्यांनी ‘सायन्स’ या मान्यताप्राप्त शोधनियतकालिकात प्रकाशित केले आहेत. त्यातूनच त्यांना अनपेक्षित माहिती मिळाली. टी पेशी निर्मितीच्या वेळी त्याच्या अवतीभवती जे सूक्ष्म पर्यावरण असतं त्यात कार्यरत असणार्‍या जनुकांची ही किमया असल्याचं कळून आलं. मेदवृद्धीपायी या पर्यावरणाची हानी होऊन त्या जनुकाच्या काम करण्याच्या पद्धतीला धक्का पोचत होता.

खरं तर हे जनुक तसं लाभदायक नाही. ते या पर्यावरणाला दूषित करून टी पेशींच्या निर्मितीत अडथळाच आणत असतं. जास्ती उष्मांकाचा आहार घेतल्यानं त्याचं फावतं आणि ते टी पेशींना कमजोर करतं, प्रसंगी त्यांच्या संख्येला क्षतीही पोचवतं. पण त्याच उष्मांकांच्या सेवनात कमतरता केल्यावर या जनुकाचीच काही प्रमाणात मुस्कटदाबी होते. टी पेशींच्या निर्मितीत अडसर आणण्याच्या त्याच्या हानिकारक वृत्तीला आळा घातला जातो. 

उष्मांक सेवनाचा प्रभाव थेट जनुक पातळीवर पडत असल्याचा याहून मजबूत पुरावा कोणता हवा त्याचा पाठपुरावा करत इतरही काही असेच दीर्घकालीन परिणाम घडवून आणणारे उपाय आहेत की काय याचा धांडोळा आता दीक्षित घेत आहेत. ते संशोधन परिपूर्ण करण्यासाठी त्यांना दीर्घायुष्य लाभो अशीच प्रार्थना आपण करणं सयुक्तिक नाही का होणार!

 

संबंधित बातम्या