रसिक श्रोत्यांचे सुखनिधान

डॉ. केशव साठ्ये
सोमवार, 25 जानेवारी 2021

विशेष

जैसलमेर सीमेवरून एक पत्र मुंबईच्या आकाशवाणी कार्यालयात आले. पत्र अर्थातच एका सैनिकाचे होते. त्यात त्यांनी म्हटले होते, ‘अतिशय कडक उन्हाळ्यात गरम हवेत जीव करपून जातो. अशावेळी आडोशाला उभे राहिले की बरे वाटते, पण तीही जागा कमी असली तर मी स्वतः उन्हात उभा राहतो आणि माझा ट्रान्झिस्टर मात्र सावलीत ठेवतो. कारण तो तापला की विविध भारती नीट लागत नाही.’ विविध भारती केंद्राची लोकप्रियता आणि जनमानसातील प्रतिमा किती उंचीवर आहे, हे याहून वेगळे सांगायची गरज आहे का? 

एकोणीसशे नव्याण्णवच्या युद्धातही कारगिलला सैनिकांच्या सोबतीला विविध भारती होती आणि ‘हॅलो कारगिल’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून तिने सैनिकांना आपल्या कुटुंबीयांशी संवाद साधण्याची सोनेरी संधी मिळवून दिली होती. हे आठवण्याचे कारण असे, की ‘देशकी सुरेली धडकन’ असे सार्थ नाव धारण करणारी ‘विविध भारती’ ही प्रसार भारतीच्या अखत्यारीत काम करणारी रेडिओ सेवा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आली होती. एका बातमीमुळे रसिक श्रोत्यांच्या मनात एकच खळबळ माजली. विविध भारतीवरील महत्त्वाचे कार्यक्रम बंद होणार आणि ती केंद्रे स्वतः तयार केलेले कार्यक्रम त्यावर वाजवणार अशा आशयाची ही बातमी होती, आणि वाईट बातमी नेहमीच खरी वाटणे हा मानवी स्वभाव. त्यानुसार वृत्तपत्रात वाचकांची पत्रे आली. समाज माध्यमावर तर गान शौकिनांमध्ये स्मरण रंजनाचा सिलसिला सुरू झाला. रेडिओ केंद्राला फोन गेले. खरपूस टीका झाली. प्रसार भारतीच्या अरसिकपणावर तोंडसुख घेतले गेले... आणि का हो वाईट नाही वाटणार? गेली सहा दशके भारतीय रसिकांना, श्रोत्यांना भरभरून सेवा दिलेली ही विविध भारती अशी अचानक लुप्त होणार की काय?आकुंचन पावणार की काय? या विचाराने माणूस सैरभैर होईल नाहीतर काय! पण शेवटी खुलासा झाला. ज्या कार्यक्रमांनी वर्षानुवर्षे रसिक मनांवर मोहिनी घातली आहे, ते लोकप्रिय कार्यक्रम आपल्याला नियमित ऐकता येणार आहेत. पण अनेक खासगी रेडिओ स्टेशन्स, शेकडो वाहिन्या, समाज माध्यमांवरून मनोरंजनाचा एवढा मारा होत असताना विविध भारतीचे काही कार्यक्रम बंद होणार या आशंकेने समस्त रसिकांचा जीव घाबरा होणे यातच या वाहिनीचे यश सामावलेले आहे.

रात्री अकरा वाजता ‘बेला के फुल’ ऐकल्याशिवाय न झोपणारे लाखो श्रोते, रात्री दहा वाजता लागणारे ‘छायागीत’ कानात प्राण आणून ऐकणारे गानरसिक, अंगांवर मूठभर मांस चढवणारा सैनिक दोस्तांसाठी सादर होणारा ‘जयमाला’ हा कार्यक्रम ही विविध भारतीची आभूषणे आहेत. ‘हवा महल’सारखा हलक्या फुलक्या नाटिका सादर करणारा कार्यक्रम काय किंवा ‘आज के फनकार’सारखी संगीत  कलावंतांशी मनमुराद संवाद साधणारी मालिका काय किंवा ‘भुले बिसरे गीत’च्या माध्यमातून स्मरणरंजनाची सैर घडवून आणणारा सांगीतिक अनुभव काय, ही या वाहिनीची अक्षय्य लेणी आहेत. गिरीजा देवी, पंडित जसराज, शिवकुमार शर्मा, राम नारायण, हरीप्रसाद चौरसिया अशा नामवंत गायक, वादकांनी विविध भारतीला आपले मानले म्हणूनच ‘संगीत सरिता’सारख्या कार्यक्रमातून सर्वसामान्य रसिकांना शास्त्रीय संगीताची तोंडओळख झाली. सोहराब मोदी, नर्गिस, राजकपूर, मीना कुमारी, देव आनंद यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांच्या मनमुराद गप्पांचा खजिना या वाहिनीनेच रसिकांसाठी खुला केला. वाड्या वस्त्यांवर, झोपडपट्टीत, चाळीत, कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये, टेलरच्या दुकानात, शेताच्या खळ्यावर कुठेही जा, ही वाहिनी हा सारा अवकाश व्यापून टाकते. ही कहाणी आजची नाही, गेल्या सहा दशकांची आहे.

तीन ऑक्टोबर, १९५७ या वाहिनीचा जन्मदिवस. हिचा जन्म कसा झाला याचाही एक किस्सा आहे. तत्कालीन माहिती नभोवाणी मंत्री बी. व्ही. केसकर यांची सिनेसंगीताबद्दलची मते पूर्वग्रहदूषित होती. रेडिओवर सिनेसंगीत एकूण वेळेच्या १० टक्क्यांपेक्षा जास्त वेळ वाजता कामा नये, असा फतवाच निघाला होता. त्यावेळी सिनेउद्योगाने याच्या निषेधार्थ आकाशवाणीवर बहिष्कारच टाकला. याला पर्याय म्हणून सिलोन हे केंद्र मग रसिक श्रोते ऐकत. ते कमालीचे लोकप्रिय होत गेले. ‘बिनाका गीतमाला’ही तिथेच सुरू झाली. भारतीय उत्पादकांचा जाहिरातीचा पैसा सिलोन केंद्राला जाऊ लागला. सिनेसंगीताची महती आणि श्रोत्यांच्या मनातील गारुड ओळखून सरकारला अखेर असे केंद्र सुरू करण्याचा निर्णय घ्यावा लागला. पंडित नरेंद्र शर्मा यांच्या संकल्पनेतून याचे नामकरण ‘विविध भारती’ असे झाले. केशव पांडे, गोपालदास, गिरिजा कुमार माथुर अशा लेखक, कलावंतांनी याला आकार दिला. १९६७ साली या वाहिनीने जाहिरातीही घेण्यास सुरुवात केली. व्यावसायिकता आणि श्रोत्यांच्या प्रती असलेले उत्तरदायित्व याचा चांगला मेळ साधत एक भक्कम उत्पन्नाचे साधन आकाशवाणीने तयार केले. महाराष्ट्रातील सर्व विविध भारती केंद्रांमध्ये, पाच-सहा कोटी रुपयांच्या आसपास वार्षिक महसूल गेली काही वर्षे मिळवत पुणे विविध भारती आघाडीवर आहे; आणि एक लक्षात आले का? विविध भारती पुणे आपण १०१ मेगाहर्ट्झवर ऐकतो. एक प्रकारे १०१ टक्के  ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाची हमीच यात लपलेली आहे.

आपले आवडते कार्यक्रम विविध भारतीवरून हद्दपार होणार का या शंकेने सुरू झालेली चर्चा प्रसार भारतीच्या खुलाशामुळे आता संपली आहे. पण याच अर्थ असा नव्हे, की भविष्यातही हेच चित्र असेल. अर्थात असे काही झाले तरी ‘न्यूज ऑन एआयआर’ या अद्‍भुत अशा मोबाइल ॲपमुळे जगात कुठेही बसून आपण आकाशवाणीचे कोणतेही कार्यक्रम कोणत्याही अडथळ्याशिवाय ऐकू शकतोच की. शिवाय एका गोष्टीबाबत विविध भारती काय किंवा आकाशवाणीच्या मुख्य कार्यक्रमांच्या ढाचाचे कौतुक करायला हवे, ते म्हणजे वारा वाहील तशी पाठ त्यांनी फिरवली नाही; आपली प्रकृती ओळखली. दूरदर्शनने जसे खासगी वाहिन्यांशी स्पर्धा करताना आपले स्वत्व विसरून भ्रष्ट नक्कल करण्याचा प्रयत्न केला, तसे या वाहिन्यांनी केले नाही. रेडिओचा उद्‌घोषक हा निवेदकच राहिला त्याचा आरजे झाला नाही. त्यामुळे ढणढणाट करणाऱ्या खासगी एफएम वहिनींच्या विश्वात, एकसारखा तोंडावळा असलेल्या गर्दीत आपला वेगळा चेहेरा विविध भारतीने टिकवला आहे. शिवाय हे करताना नव्या संकल्पना, सादरीकरण पद्धती वापरल्या. गेली काही वर्षे नव्या दमाच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांनी, उद्‌घोषकांनी सुरू केलेले कार्यक्रम श्रोत्यांच्या पसंतीला उतरले आहेत. ‘आकाशवाणीच्या संग्रहातून’ या काळाच्या पडद्याआड गेलेल्या नामवंतांच्या मुलाखती, ‘सुवर्णदीपिका’सारखा अतिशय मन लावून केलेला, उत्तम संहिता असलेला संगीतमय कार्यक्रम. ‘सांजधारा’ हा मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम, ‘विशेष गीतगंगा’ हा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या आवडीच्या गाण्यात गुंफलेला; त्यांच्या जीवन प्रवासाबरोबर हातात हात घालून जाणारा कार्यक्रम लोकप्रियतेच्या शिखरावर विराजमान आहेत. हे आकाशवाणीचे आजचे वर्तमान आहे व भविष्यही आणि ते अतिशय उत्साहवर्धक, आशादायी आहे.

संबंधित बातम्या