फाल्कनरी-वाळवंटातील अनोखा खेळ

मृणाल तुळपुळे
सोमवार, 29 मार्च 2021

विशेष

फाल्कनरी म्हणजे बहिरी ससाण्याच्या मदतीने केलेल्या शिकारीचा खेळ. हा अनोखा खेळ अरब देशात शेकडो वर्षे खेळला जात आहे. 

बेडुईन ही वाळवंटातील भटकी अरब जमात. या लोकांनी सर्वप्रथम शिकारीसाठी ससाण्यांची मदत घेतली. शिकार या शब्दाचा अर्थ बघितला तर एखाद्या प्राण्याला वा पक्ष्याला खाण्यासाठी किंवा एक खेळ म्हणून मारणे असा होतो; पण ससाण्यांना माणसाळवून त्यांच्या मदतीने करण्यात येणारी शिकारीची ही पद्धत नेहमीच्या शिकारीपेक्षा अगदी वेगळी आहे. या प्रकारच्या शिकारीत ससाणे सावजाला न मारता जिवंत पकडून आणतात.

ससाणा हा हिंस्त्र पक्षी आहे, त्यामुळे त्याच्यात भक्ष्य शोधण्याचे उपजत ज्ञान आणि सहज प्रवृत्ती असते. वाळवंटी प्रदेशात शिकार करण्यायोग्य पक्षी व प्राणी दुर्मीळ असल्यामुळे बेडुईन लोकांनी शिकार मिळवण्यासाठी ससाण्यांचा उपयोग करून घेतला. ससाण्यांची नजर अतिशय तीक्ष्ण, म्हणजे मनुष्यप्राण्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त असते. सावज हेरल्यावर ते हवेतून प्रचंड वेगाने खाली येतात व झडप घालून आपल्या शक्तीशाली पायांनी व तीक्ष्ण नखांनी सावज पकडतात. त्यांचा हवेतून खाली येण्याचा वेग ताशी ३०० ते ३२० किमी एवढा असतो.  

ससाण्यांच्या जवळपास ४० जाती असून प्रत्येक जातीनुसार त्यांचा आकार, स्वभाव, बुद्धिमत्ता, शक्ती आणि उडण्याचा वेग निरनिराळा असतो. अरबी ससाण्यांना ‘सक्र’ किंवा ‘सकर’ असे म्हटले जाते. त्यांचे पंख चपटे, पातळ आणि लांब असतात. त्यामुळे त्यांना खूप उंचावरून आणि खूप वेगाने उडता येणे शक्य होते. पेरेग्रीन जातीचे ससाणे अतिशय दुर्मीळ व खूप महाग असतात. गडद हिरव्या रंगाचे टोकदार पंख असलेले हे ससाणे अतिशय वेगवान व चपळ हालचाली करून उडणाऱ्‍या पक्ष्यांची शिकार करण्यात पटाईत असतात. ससाणे अतिशय धूर्त असतात आणि ते आपल्या सावजाचा गुपचुप मागोवा घेतात व मगच त्याला पकडतात. 

ससाण्यांना योग्य प्रशिक्षण देणे, खाऊपिऊ घालणे आणि त्यांची उत्तम काळजी घेणे, हे एक खूप वेळखाऊ काम आहे. ससाणे संगतीप्रिय किंवा पटकन मैत्री करणाऱ्‍यातले नसतात. त्यामुळे शिक्षणाचा एक भाग म्हणून सर्वप्रथम त्यांना माणसाळवावे लागते. व्यायाम व सराव म्हणून त्या ससाण्यांना रोज उडवायला लागते; पण त्याआधी त्यांच्या पायात चामड्याच्या दोरीने लहानशी घंटा व ओळख पट्टी बांधली जाते. याशिवाय दोन्ही पायांत चामड्याच्या पट्ट्या घातल्या जातात. उडताना ससाणा जर हरवला तर त्याला शोधणे सोपे जावे यासाठी काही वेळा त्याच्या पायाला ट्रान्समीटरदेखील बांधला जातो.

शिक्षण देताना ससाण्याला काही काळ अन्नापासून दूर ठेवले जाते, तसेच त्याचे डोके बुरख्याने म्हणजेच कातडी टोपीने झाकले जाते. जमिनीवर असताना भक्ष्य दिसले तर त्याचे चित्त विचलित होऊ नये व तो शांत राहावा यासाठी त्याला बुरखा घातला जातो. हा बुरखा काढला की ससाण्याने शिकार शोधण्यासाठी उडायचे असे त्याला शिकवले जाते. जेव्हा फाल्कनर - ससाण्याचा शिक्षक आपल्या ससाण्याला शिकारीसाठी उडवतो तेव्हा त्याला तो शिकार घेऊन नक्की परत येईल का नाही याची पूर्ण खात्री नसते. तो परत येणे हा त्याला उत्तम शिक्षण दिल्याचा दाखला समजला जातो. 

अरबांनी ससाण्यांना खास शिक्षण देऊन तयार केले व त्यानुसार ते वाळवंटातील पक्ष्यांना किंवा लहान प्राण्यांना न मारता जिवंत पकडून आणतात. ससाण्याला अशा शिकारीचे तंत्र व इतर गोष्टी शिकवून तयार करणे यासाठी फाल्कनरला कमीत कमी पाच वर्षे शिक्षण व प्रत्यक्ष कामाचा अनुभव घ्यावा लागतो. त्यामुळेच ससाण्याच्या मदतीने शिकार करणाऱ्‍या फाल्कनरमध्ये आणि त्या ससाण्यात एक घट्ट नाते तयार होते. ससाण्याच्या पंजांपासून आणि नखांपासून रक्षण करण्यासाठी फाल्कनर आपल्या आपल्या हातात एक विशिष्ट प्रकारचा चामड्याचा हातमोजा घालतो.

या खेळात शिकार करण्यासाठी ससाण्यांना वाळवंटात नेले जाते व त्यांना उडायला मोकळे सोडले जाते. जोपर्यंत ससाणे आकाशात दिसत असतात, तोपर्यंत त्याचा मालक व फाल्कनर खालून त्यांच्याशी बोलत असतात. शिकार मिळाल्यावर ससाणे आपल्या मालकाचा आवाज ओळखतात व त्याच्या दिशेने परत येतात. शिकार आणल्याबद्दल त्यांना बक्षीस दिले जाते व ते अन्नपदार्थाच्या स्वरूपात असते. अन्नासाठी आपल्या मालकाशी प्रामाणिक असल्याने मोकळे सोडूनसुद्धा ससाणे आपल्या मालकाकडे परत येतात. 

अरब देशातील नियमानुसार कोणतीही व्यक्ती ससाणा विकत घेऊ शकत नाही. ससाणा विकत घेण्याआधी त्याला ससाण्याचे पालन पोषन करण्याचे शिक्षण घेऊन परवाना मिळवावा लागतो. पूर्वी शिकारीचा हा रंजक खेळ मध्यपूर्व देशातील राजघराण्यातील व अति श्रीमंत अरबांचा खेळ समजला जाई. त्यांच्याकडे स्वतःचे ससाणे असत व त्यांना शिकवणे आणि त्याच्या मदतीने शिकार करणे हा त्यांचा आवडता छंद समजला जाई.  

ससाण्याच्या मदतीने शिकार जरी केली नाही, तरी आजही अरब लोकांचे ससाण्यावरील प्रेम तसेच टिकून आहे. ते ससाणे पाळतात व त्यांची आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीसारखी काळजी घेतात. काही ससाणे पकडून आणलेले असतात तर काहींची पैदास केली जाते. अरब लोक आपल्या पाळलेल्या ससाण्यांना अतिशय मानाने वागवताना व त्यांना आपल्याबरोबर दुकानात, फिरायला अथवा कौटुंबिक सहलींना घेऊन जाताना दिसतात. आपल्या या खास मित्राला खांद्यावर किंवा हातावर घेऊन फिरण्यात त्यांना अभिमान वाटतो.

दिवसेंदिवस संयुक्त अमिरातीमध्ये फाल्कनरीची लोकप्रियता वाढतच चालली आहे. दुबई आणि अबूधाबीमध्ये या पक्ष्यांसाठी खास हॉस्पिटल्स काढली आहेत आणि तिथे त्यांची उत्तमप्रकारे काळजी घेतली जाते. ऐकून आश्‍चर्य वाटेल, पण या देशात ससाणा हा एकमेव पक्षी आहे की त्याला विमानातून कायदेशीररीत्या प्रवास करता येतो आणि तोसुद्धा बिझनेस आणि प्रथम श्रेणीच्या कक्षातून. इतकेच काय तर काही अरब देशांत ससाण्यांची तस्करी होऊ नये यासाठी त्यांचा पासपोर्टदेखील काढलेला असतो. शिकारीसाठी शिकून तरबेज झालेल्या व स्वत:चा पासपोर्ट असणाऱ्‍या अशा ससाण्यांची किंमत काही हजार अमेरिकी डॉलर्स किंवा जास्तसुद्धा असू शकते.

अरब संस्कृतीत अतिशय मौल्यवान पक्षी म्हणून ओळखल्या जाणाऱ्‍या ससाण्याने सर्वप्रथम सौदी अरेबियाचा राष्ट्रीय पक्षी होण्याचा मान मिळवला. आज कतार, ओमान, येमेन आणि संयुक्त अमिराती या देशांचादेखील तो राष्ट्रीय पक्षी झाला आहे. संयुक्त अमिरातीच्या इतिहासात व सामाजिक स्तरावर ससाण्यांनी एक महत्त्वपूर्ण स्थान मिळवले आहे व त्याचा दाखला म्हणजे आज त्या देशाच्या राष्ट्रचिन्हावर  सोनेरी ससाण्याचे चित्र दिसून येते.

अरब लोक म्हणतात की फाल्कनरी हा असा एक खेळ किंवा छंद आहे, की ज्यामुळे प्रतिस्पर्ध्याशी युक्ती व बुद्धिमत्ता वापरून कसे वागावे हे कळते. ते ससाण्यांकडे धाडस आणि शक्तीचे प्रतीक म्हणून बघतात. अनेक अरब लेखकांनी ससाण्यांवर कथा, कादंबऱ्‍या व निरनिराळे लेख लिहिले आहेत, तर त्यांच्यामुळे अनेक कवींना कविता लिहिण्याची स्फूर्ती मिळाली आहे. यावरून अरब संस्कृतीमध्ये ससाणा या पक्ष्याला  व फाल्कनरी या खेळाला किती महत्त्व आहे हे समजते.

संबंधित बातम्या