एक वाढदिवस!

डॉ. वैशाली देशमुख
गुरुवार, 25 मार्च 2021

किशोर कथा

‘मी जशी आहे, तसं वागायला सुरुवात केली आणि इतरांच्या वागण्यातला बदल मला जाणवायला लागला... लोक काय म्हणतील याची आपण उगाचच काळजी करतो आणि कारण नसताना जरा जास्तच बिचकून-दबकून वागतो, बिनधास्त राहायला हवं...’

१ जून 

उद्या माझा चौदावा वाढदिवस! आई विचारत होती, काय करूया, कुणाला बोलवूया? या दोन्ही प्रश्नांना काय उत्तर द्यावं मला माहिती नाही. कुणी मित्र-मैत्रिणी असायला तर पाहिजेत बोलवायला! वर्गात मी एकटीच बसते आणि डबासुद्धा एकटीच खाते. कुणी खेळायला घेत नाही मला. उलट मी आले की बोलायचं थांबवतात एकदम. दर रविवारी त्यांचं काय काय ठरतं- मूव्ही, नाहीतर कुणाच्या घरी भेटायचं... एनी वे, मला कुणालाच बोलवायचं नाही आणि काहीच करायचं नाही, असं मी सांगितलंय आईला. या सोमवारी मराठीच्या तासाला निबंध लिहायचाय, तोसुद्धा नेमका आपापल्या वाढदिवसाच्या अनुभवावर. काहीतरी मनचं ठोकून द्यायला लागणार आहे मला. नाहीतर चक्क दांडी मारावी सोमवारी.

  २ जून

‘आई, झोपू दे ना गं मला! आज रविवार आहे ना?’ आई मला भल्या पहाटे उठवायला आली. उठल्या उठल्या मला वाढदिवसाचं आठवलं आणि माझा मूडच गेला. त्यावेळी मला कुठे माहिती होतं, आजचा दिवस इतका भारी जाणार आहे म्हणून! आंघोळ करून आल्यावर पहिलं सरप्राईज मिळालं, माझी लाडकी मावशी-काका आणि मावसभावंडं आली होती. मला जरा बरं वाटायला लागलं. आईनं, आज्जीनं आणि मावशीनं मला ओवाळलं. शी! खरंतर मला नाही आवडत हे ओवाळणं वगैरे. पण सगळ्यांसमोर काही बोलले नाही. ब्रेकफास्ट झाल्यावर सगळ्यांची गडबड सुरू झाली, ‘चला, चला, लवकर आटपा, निघूया आता, उशीर होईल.’ मी विचारलं, “अरे काय घाई आहे? कुठे चाललोय आपण?” पण कुणाला उत्तर द्यायला वेळ कुठे होता! बाबा, काका खाऊ आणि पाण्याच्या बाटल्या बास्केटमध्ये भरत होते. आई, मावशी गाड्या काढून तयार झाल्या आणि आम्ही निघालो. गावाबाहेरच्या मावशीच्या फार्महाऊसवर पोचलो. तिथं गेल्यावर पाणी-बिणी पिऊन झाल्यावर सगळ्यांनी हातात कुदळी आणि फावडी घेतली, मलापण एक दिलं. इथे आश्चर्याचा दुसरा धक्का बसला. माझ्या चौदाव्या वाढदिवसानिमित्त सगळ्यांनी मिळून चौदा झाडं लावली! मग शेतावरच्या काकांच्या मुलांना वह्या-पुस्तकं दिली, आणि आम्ही सगळ्यांनी मिळून तिथं आंब्याच्या झाडाखाली अंगतपंगत केली. धम्माल आली एकदम! आता आपापल्या झाडांची आम्हाला काकांच्या मदतीनं वर्षभर काळजी घ्यायचीय.  

३ जून

आज मराठीचा तास. टीचरनी आल्या आल्या आम्हाला निबंधाची आठवण करून दिली. मी आधीच एका मस्त पार्टीविषयी लिहायचं ठरवून ठेवलं होतं. माझे आवडते चायनीज पदार्थ, डेकोरेशनची हॅरी पॉटर थीम, त्यानुसार ड्रेस घातलेले पाहुणे, म्युझिक, डान्स, फुगे, असं सगळं. त्यात चेटकिणीच्या टोपीच्या आकाराचा केक आणि तो कापायला जादूच्या छडीच्या आकाराची सुरीही होती. ठरवल्याप्रमाणे मी लिहायला सुरुवात केली. पहिली एक दोन वाक्यं लिहिली आणि मी एकदम थांबले. ‘मी का लिहितेय असं सगळं खोटं खोटं? त्यापेक्षा माझ्या कालच्या दिवसाविषयी लिहायला पाहिजे. त्यात असं काही ग्लॅमरस नाहीये, पण निदान खरं तरी आहे. पण वर्गातली मुलं हसली तर? जाऊ दे, हसली तर हसली.’ कालचा सगळा दिवस माझ्या डोळ्यांपुढे लख्ख उभा राहिला. कसलाही विचार न करता मी झरझर लिहायला सुरुवात केली आणि बघता बघता माझा निबंध लिहून झालासुद्धा! 

६ जून

आज पुन्हा मराठीचा तास. टीचर काही निवडक निबंध वाचून दाखवणार होत्या. दोन-तीन निबंध त्यांनी वाचले आणि मला जरा वाईट वाटायला लागलं. कारण मी आधी जसं लिहायचं ठरवलं होतं, तशीच त्यातली वर्णनं होती. तेच लिहायला हवं होतं मी, उगीच बदललं. तेवढ्यात टीचर म्हणाल्या, “खरं सांगू का, निबंध म्हणून छान लिहिले आहेत तुम्ही सगळ्यांनी. पण त्यात काही कल्पकता, काही नावीन्य नाही दिसलं मला. पण आता जो निबंध मी वाचून दाखवणार आहे, तो सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका हं! मग तुम्ही म्हणाल, की अरेच्चा, वाढदिवस असाही साजरा करता येतो तर!” आणि त्यांनी चक्क माझ्या निबंध वाचून दाखवला. वर्गातले सगळे माझ्याकडे आश्चर्यानं बघत होते. त्यांच्या नजरेत माझ्याविषयी  तिरस्कार नव्हे तर आदर दिसत होता. सुखदा, नेत्रा आणि मनवा आज मधल्या सुटीत माझ्याकडे बघून हसल्या! एक लक्षात आलं माझ्या, की लोक काय म्हणतील याची आपण उगाचच काळजी करतो आणि कारण नसताना जरा जास्तच बिचकून-दबकून वागतो, बिनधास्त राहायला हवं.

१ जुलै

आजकाल हळूहळू मला इतरांच्या वागण्यात बदल जाणवायला लागलाय. अजूनही मला खूप मैत्रिणी आहेत असं नाही, पण वर्गात आता एकटं नाही वाटत. एकदा मी आईशी बोलले याविषयी. तेव्हा ती म्हणाली, “अगं, जेव्हा तू इतरांची कॉपी करायचा प्रयत्न करत होतीस, तेव्हा तुझं वागणं कृत्रिम असायचं. पण जेव्हा तू जशी आहेस तशी वागायला लागलीस, तेव्हा आपोआपच इतरांनी तुला स्वीकारलं.” मला पटलं ते. पुढच्या वर्षी वाढदिवसाला ओवाळून घ्यायला लाज नाही वाटणार मला, असं वाटतंय.

संबंधित बातम्या