आठवणीतील गणेशोत्सव

-
गुरुवार, 9 सप्टेंबर 2021

कव्हर स्टोरी

तुम्ही-आम्ही सर्वांनीच आत्तापर्यंत अनेक संस्मरणीय गणेशोत्सव साजरे केले आहेत; कधी घरात, कधी सार्वजनिक मंडळाबरोबर, तर कधी सोसायटीमध्ये! अशाच संस्मरणीय गणेशोत्सवाच्या आठवणी पाठवण्याचे आवाहन ‘सकाळ साप्ताहिक’ने आपल्या वाचकांना केले होते आणि त्याला देश-विदेशासह अनेक ठिकाणांहून भरभरून प्रतिसाद मिळाला. त्यातील काही प्रातिनिधिक आठवणी...

अमरावतीची आठवण अजून येते
कळायला लागलं तसा गणेशोत्सवाच्या आधीपासून मी गणपतीची मूर्ती बनवण्याच्या तयारीला लागायचो. आणि उत्सवाच्या एक दिवस अगोदर मूर्ती तयार करायचो. सोबतच आणखी श्रींची आणखी एक मूर्ती आणलेली असायची. मला वाटायचं माझा गणपती पण मंडळांसारखा वाजत गाजत यावा आणि  लोकांनी पहावा. मग आदल्या दिवशी मित्र गोळा करून प्रत्येक घरातून गणपती वाजत गाजत कसा येईल याचा प्लॅन व्हायचा. तेलाचे रिकामे डबे वाजवत गणपती घरी आणायचो. एकमेकांच्या घरी जाऊन गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करायचो. आरती झाली की गाणी लावून प्रसाद वाटायचो. पहिल्या ते शेवटच्या दिवसापर्यंत प्रसादात साखर- खोबरं असायचंच, दुसरा पदार्थ रोज बदलत असे. साखर खोबऱ्याचा प्रसाद इतका आवडता की पूर्ण वाटीभर प्रसाद सुद्धा मला कमी पडत असे. उत्सवाच्या काळात दहाही दिवस पहाटे पाचलाच उठायचो, कारण थोडासाही वेळ झाला की झाडांची फुले, दूर्वा इतरांनी नेलेल्या असायच्या. त्यामुळे पहाटे उठून फुले तोडून सकाळी आणि संध्याकाळी वेगवेगळे हार करायचो.
गणेशोत्सवात आमच्या भागात मित्रमंडळींमध्ये एकमेकांच्या घरी जेवणाचा कार्यक्रम होत असे. प्रत्येक जेवणाचे दिवस आम्ही वाटून ठेवायचो. विसर्जनाच्या दिवशी आपल्याच परिसरात विसर्जन करू, असं घरचे सांगत असले तरी आम्हा मित्रांना मित्रमंडळीला मोठ्या मंडळांसारखंच श्रींच्या मूर्तीचं विसर्जन करण्याची हौस असायची. मग पुन्हा तेलाच्या रिकाम्या डब्यांच्या निनादात व पाना फुलांची सजावट करून प्रत्येकाच्या घरातील गणेशमूर्ती शिस्तबद्ध पद्धतीने विसर्जनाला जात असे. आता पुण्यात असलो तरी  अमरावतीमधील गणेशोत्सव मनातून जात नाही. गणेशोत्सव आला की आजही त्या आठवणी जाग्या होतात आणि पावलांना आपसूकच गावाकडे निघायची ओढ लागते.
                                                                  वैभव तेलखडे, अमरावती

आमचा पहिला गणेशोत्सव
गणपती उत्सव म्हटलं की गाव असो वा शहर सगळीकडेच उत्साहाचे वातावरण असते. आठ -दहा वर्षांपूर्वी आम्ही गणपती बसवत नव्हतो. मला आणि माझ्या लहान भावाला नेहमी वाटायचं की आपल्या घरीपण गणपती बसवला पाहिजे. सजावट, घरी बाप्पाच्या दर्शनासाठी आलेले पाहुणे, मोठ्या आवाजातल्या आरत्या आणि प्रसाद (मोदक, खिरापत) खाण्यापेक्षा वाटण्याचा आनंद मला घ्यावा वाटायचा. गावातली वेगवेगळी मंडळं गणपती बाप्पाच्या मोठमोठ्या मूर्त्या आणायची तेव्हा उत्साहाने त्या मी खिडकीतून बघायचे. 

आमच्या शाळेतही गणपती बसवला जायचा. रोज एका वर्गाचे विद्यार्थी समोर येऊन आरती करणार असे ठरवलेले होते. जेव्हा आम्ही आरती करण्यासाठी समोर असायचो तेव्हाचा तो आनंद वेगळाच! माझी आई प्रत्येक सणाच्या दिवशी सडा टाकत असे. आम्ही गणपती बसवत नव्हतो तरीपण गणेश चतुर्थीच्या दिवशी ती सडा घालत असे. एके वर्षी वडिलांनी घरी गणपती बसवण्याचे ठरवले, पण आधी त्याची घरात कोणालाच काही कल्पना नव्हती. आई सडा टाकत असताना वडिलांचा फोन आला. ‘आपण यावर्षी गणपती बसवूयात,’असे शब्द कानावर पडले आणि माझा आनंद गगनात मावेना. घरात अजून उत्साहाने बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झाली. नवीन साड्या, रंगीबेरंगी लायटिंग आणि इतर काही घरात उपलब्ध असलेल्या वस्तूंचा वापर करून मी आणि माझ्या भावाने सजावट केली. ताईने रांगोळी काढली. वडील गणपतीची मूर्ती घेऊन आले. मग आरतीच्या वेळी शेजारचे घरी जमले. आईने केलेले स्वादिष्ट मोदक सर्वांना वाटले. अकरा दिवस असेच वातावरण होते. माझ्या घरी साजरा झालेला गणपती बाप्पाचा उत्सव माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. तेव्हापासून दरवर्षी आम्ही गणपती बसवतो.
                                                                  प्रतिक्षा जाधव , शिरेगाव. (जि. नगर)

पुण्यात पाहिलेली पहिली विसर्जन मिरवणूक
तीन वर्षांपूर्वी मी पहिल्यांदाच अनुभवलेला पुण्यातला गणेशोत्सव माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. इंजिनिअरिंगसाठी मी २०१८मध्ये पुण्यात आले. कॉलेजमधल्या माझ्या ग्रूपमधले इतरही काही मित्र मैत्रिणी वेगवेगळ्या ठिकाणांहून पुण्यात शिकण्यासाठी आले होते. उत्सवाच्या शेवटच्या दिवशी आम्ही सर्व गणपती विसर्जन मिरवणूक पाहायला गेलो होतो. ठरल्याप्रमाणे अप्पा बळवंत चौकात जमून आम्ही आधी मानाच्या पाचही गणपतींचे दर्शन घेतले. मिरवणुकीसाठी रांगेत असलेल्या गणपती मंडळांमध्ये अजून एक वेगळीच मजा होती ती म्हणजे बाप्पाचा प्रसाद. मिरवणुकीत सामील झालेल्या आमच्यासह अनेकांनी ढोल ताशाचा नाद केव्हा पकडला ते समजलंच नाही. ढोल ताशांच्या तालावर आम्ही सगळ्यांनीच ठेका धरला होता. 
मधेच आलेल्या रिमझिम पावसाने एकच धांदल उडवली. मग आम्ही सर्वजण आडोसा शोधत एका वडापावच्या गाड्यावर पोचलो. गरम गरम भजी, तळलेल्या मिरच्या आणि वडापावचा आस्वाद घेऊन आम्ही पुन्हा मिरवणुकीत सामील झालो.

गणपती विसर्जनाच्या त्या मिरवणुकीने मला माझ्या गावच्या जत्रेची आठवण करून दिली. सकाळी दहा वाजता सुरू झालेली ही मिरवणूक दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजेपर्यंत कशी चालली. कधीही रात्री न जागणारी मी, पण त्या दिवशी रात्रभर त्या मिरवणुकीचा आनंद घेतला. बाप्पाला निरोप देताना नकळत डोळे पाणावल्याचं मला अजून आठवतं. या सारखा अविस्मरणीय क्षण माझ्या आयुष्यात असूच शकत नाही. आणि हो, या अनुभवाची सांगता झाली ती दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी खाल्लेले नळ स्टॉपचे पोहे आणि कॉलेजमध्ये घेतलेल्या ‘कॉमन ऑफ’नी!
                                                     शीतल जगताप, पणदरे, ता. बारामती (पुणे)

शाळेच्या दिवसातील गणेशोत्सव अजून आठवतो
शाळेच्या दिवसातले घरातले गणेशोत्सवाचे वातावरण आजही आठवते. आमच्या घरी गौरी गणपती असतात. श्रीगणेशाच्या आगमनापूर्वीच घरातील वातावरण बदलेले असायचे. घराची साफसफाई करणे, डेकोरेशनसाठी साहित्य जमा करणे ही सगळी कामे एक महिना आधी सुरू व्हायची.  ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात लहानपणी दिवसाची सुरुवात होत होती. 

आई दरवर्षी घरीच लाडू, शंकरपाळी, करंजी इत्यादी पदार्थ गौरीच्या स्वागतासाठी करते. तिच्या या कामात घरातल्या सर्वांचाच हातभार असतो. दिवाळीचा सगळा फराळ या निमित्ताने आधीच खायला मिळतो. गणपतीच्या मूर्तींच्या स्टॉलवरील सुबक मूर्त्या पाहून घरी कोणती मूर्ती आणायची हेपण याच दरम्यान ठरवले जायचे.  उत्सवाच्या दिवसांत सकाळी लवकर उठून शेजारच्या बागेत किंवा मैदानावर जाऊन दूर्वा गोळा करण्यात वेगळाच आनंद असायचा. गणपतीसाठी  हार घरीच करत असू, आरतीसाठी कापूर, धूप वगैरेपण आधीच आणून ठेवायचो.

घरातल्या गणपतीसाठीची सजावट सर्वांच्या पसंतीने आदल्याच दिवशी पूर्ण झालेली असायची. गणेश चतुर्थीच्या दिवशी मुहूर्त बघून गणेशाचे घरात आगमन व्हायचे. डोक्यावर पांढरी टोपी घालून, पायात चप्पल न घालता मूर्ती आणून श्रींची प्रतिष्ठापना करून देवाच्या आवडत्या मोदकांचा नैवेद्य दाखवला जायचा.  पुढे तीन दिवसांनी गौरींचे आगमन होत असे. गणपतीच्या मूर्ती शेजारी गौरी बसवायचो. घरातील वातावरण एकदम बदललेले असायचे. आई गौरींसमोर सगळा फराळ ठेवायची. त्या घरी आल्यामुळे खूप आनंदी आहेत, असे वाटायचे.  उत्सवाचे दहा दिवस कधी संपायचे ते कळायचेच नाही. विसर्जनाच्या दिवशी सकाळीच मोदक करून देवापुढे ठेवले जायचे. विसर्जनासाठी नदीवर जाताना मनात गेल्या दहा दिवसांच्या अनेक आठवणी दाटून यायच्या. ‘गणपती बाप्पा निघाले गावाला, चैन पडेना आम्हाला’, अशा जयघोषात बाप्पाला निरोप देताना नकळतपणे कंठ दाटून यायचा.
                                                                        प्रवीण भांगे, पुणे

आम्हा बच्चेकंपनीचा गणेशोत्सव
गणेशोत्सव म्हणजे अवघ्या महाराष्ट्राच्या आनंदाचं लोभस रूप. समाजाला बांधून ठेवणारा, एकत्र आणणारा हा उत्सव. माझ्या आठवणीतील गणेशोत्सवही असाच सामाजिक मूल्यांची शिकवण देणारा ठरला.

माझ्या लहानपणीची गोष्ट. आमचं घर होतं आठ घरांच्या लहानशा कॉलनीत. घरोघरी बाप्पाचं आगमन होत असलं तरी सार्वजनिक गणेशोत्सवाची गंमत त्यात नसे. ही उणीव भरण्यासाठी आम्ही बच्चेकंपनीने कॉलनीचा एक गणेशोत्सव करण्याचा संकल्प सोडला. 

पण नमनालाच वडिलधाऱ्यांनी ‘तुमचं तुम्ही बघा’, असा फतवा काढला. मात्र त्याक्षणी वाईट वाटण्यापेक्षा दुप्पट उत्साहाने तयारीला सुरुवात झाली. वर्गणीचा प्रस्ताव नाकारण्यात आल्याने आम्हाला मूर्तीदेखील स्वहस्ते घडवायची होती. पण त्याकाळी यूट्यूब नसल्याने ‘५ मिनिटात घडवा बाप्पाची मूर्ती’, असा पर्याय आमच्याकडे नव्हता. अखेरीस बाप्पाची मूर्ती कशी असावी यावरही एकमत झाले. सजावट आणि मखराची तयारीही ताई-दादांना मस्का मारून पूर्ण झाली. 

शेवटी उरला प्रश्न फक्त बाप्पाच्या नैवेद्याचा. त्यासाठीही जर समस्त आईवर्गाने मदत केली नाही, तर काय करावे यावर चर्चा सुरू होती. मात्र त्यातील पाककृती एका दोस्ताच्या आईने ऐकल्यावर, त्यांच्या डोळ्यासमोर स्वयंपाकघराचे भीषण चित्र आले; आणि आमचा हा मनसुबा पूर्ण होणार नाही, याची खबरदारी घेत नैवेद्याची जबाबदारी त्यांनी स्वतःकडे घेतली. 

अखेर कष्टांना फळ मिळालं आणि गणेशोत्सवाचे दहा दिवस धामधुमीत साजरे झाले. त्यावेळी वडिलधाऱ्यांना हरवत गणेशोत्सव यशस्वी करून दाखवल्याची भावना होती. मात्र नकळतपणे त्यांनी आमच्यावर कष्ट, मेहनत, सांघिक प्रयत्न या मूल्यांची शिकवण बिंबवली होती, याची जाणीव आज होते. बाप्पाने अशा अनेक गोष्टी यापूर्वीही अनेकांना शिकवल्या आहेत. इथून पुढेहीहीच परंपरा कायम राहो, हीच गणराजाचरणी प्रार्थना.
                                                                                   महिमा ठोंबरे, पुणे

हॉस्टेलमधला गणपती
लहान असल्यापासून गणेशोत्सव म्हणजे उत्साह आणि आनंदाची पर्वणीच असायची. ही माझी आठवण आहे, मी आठवीत असतानाची. वसतिगृहातील शिक्षण आयुष्याला दिशा देणारे असते असे माझ्या वडिलांचे मत असल्याने मी त्यावेळी एका संस्थेच्या वसतिगृहात राहात होतो. माझ्यासोबत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून अनेक मुले इथे शिकायला होती. संस्थेच्या नियमांमुळे त्यावेळी आम्हाला गणेशोत्सवामध्ये सुट्टी मिळत नव्हती. गणपती उत्सव जवळ आला की आम्हा मुलांना गावाकडची ओढ लागायची. गावाकडील गणपतीच्या आठवणीत आपण ती मज्जा गमावतो असं वाटायचं अन कधी कधी तर रडूसुद्धा यायचं. मग आम्ही कोणाला कळू न देता उत्सवाच्या तयारीला लागायचो. 

उत्सवाच्या आधी दोन दिवस राहिले की आमच्या ग्रुपमधला एकजण पोटदुखीचं नाटक करून डॉक्टरांकडे जाण्यासाठी रेक्टरची रीतसर परवानगी घेऊन गुपचूप गणपती घेऊन येत असे. आणलेली मूर्ती आम्ही कपाटामध्ये लपवून ठेवत असू. गणपतीच्या बसण्याच्या दिवशी आम्ही कपाटामध्ये एक कप्पा सजावट करून ठेवत आणि मध्यरात्री रेक्टर झोपल्यानंतर आम्ही कपाटामध्ये गणपतीची प्रतिष्ठापना करीत असू. रोज रेक्टर आणि सगळ्या लोकांना न सांगता आरतीदेखील व्हायची. कुणाला कळू देत नसू. अनंत चतुर्दशी दिवशी बाहेरचा विसर्जन मिरवणुकीचा आवाज ऐकून आम्ही आमचा गणपती हॉस्टेलमधील आडात विसर्जित करत असू. 
                                                                                 आकाश देशमुख, पुणे

संबंधित बातम्या