आठवणीतील गणेशोत्सव

-
गुरुवार, 9 सप्टेंबर 2021

कव्हर स्टोरी

तुम्ही-आम्ही सर्वांनीच आत्तापर्यंत अनेक संस्मरणीय गणेशोत्सव साजरे केले आहेत; कधी घरात, कधी सार्वजनिक मंडळाबरोबर, तर कधी सोसायटीमध्ये! अशाच संस्मरणीय गणेशोत्सवाच्या आठवणी पाठवण्याचे आवाहन ‘सकाळ साप्ताहिक’ने आपल्या वाचकांना केले होते आणि त्याला देश-विदेशासह अनेक ठिकाणांहून भरभरून प्रतिसाद मिळाला. त्यातील काही प्रातिनिधिक आठवणी...

गणेशोत्सवामुळे कला क्षेत्राची आवड 
                                                                                प्राजक्ता माळी
गणेशोत्सव म्हटले की कला हे माझ्या डोक्यातले फिक्स समीकरण आहे. मला कला क्षेत्राची आवड निर्माण झाली ती गणेशोत्सवामुळे. मी पाचवी-सहावीत असताना आईसोबत ‘पुणे फेस्टिवल’ला गेले होते. या कार्यक्रमामध्ये हेमा मालिनीजींचे नृत्य सादरीकरण मला इतके भावले, की मला या क्षेत्रात करिअर करायचे आहे आणि मलाही मोठ्या कार्यक्रमात सादरीकरण करायचे आहे, असा निश्‍चय केला. पुढे मीही अशा कार्यक्रमात सहभाग घेण्यास सुरुवात केली. मी पुणे नवरात्री उत्सवात सलग सहा वर्षे नृत्य सादर केले. कला क्षेत्रात खूप पुढे जायचे, याचे प्रोत्साहन मला गणेशोत्सवातून मिळाले. 

गणेशोत्सवादरम्यान असलेल्या कार्यक्रमात ‘स्टार वंडर्स’ म्हणून आमचा एक ग्रुप होता. त्यात आम्ही तीनजण विविध गणेश मंडळात जाऊन कार्यक्रम करत असू. मी लेझीम पथकातही होते. मला लेझीम खेळायचे होते, परंतु मला वाद्यवृंदात ढकलले. मी काही दिवस ढोल-ताशा वाजवायला सुरुवात केली. 

आमच्या घरी प्रत्येक उत्सवाला वेगवेगळ्या प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ केले जातात. गणेशोत्सव म्हटलं की मोदक हा खास नैवेद्य असतो. घरात सगळ्यांना आवडणारा हा पदार्थ आहे. मला तूप घालून उकडीचे मोदक खायला फार आवडतात. आरतीच्या वेळी घंटा कोण वाजवणार, यावरून आमच्या घरी माझं आणि माझ्या भावाचं भांडण व्हायचं. एक अनोखा संकल्पही मी केला होता, की मंत्र पुष्पांजली आणि सर्व आरत्या अनंतचतुर्दशीपर्यंत पाठ करायच्याच. ते इतकं घोकून पाठ केलं आहे, की आयुष्यभर विसरू शकणार नाही. कोणत्याही प्रकारचे प्लास्टिक किंवा थर्माकोल अशा पर्यावरणाला हानिकारक ठरणाऱ्या गोष्टी सजावटीसाठी वापरायच्या नाही, असे आम्ही ठरवलं आहे. सजावटीसाठी फुलं, पुठ्ठे, रंग, कागद यांचाच वापरतो करतो. आम्ही गणेश मूर्तीसुद्धा शाडूची किंवा गोमयाची आणतो. गेल्या सात- आठ वर्षांपासून आम्ही हा नियम केला आहे आणि तो काटेकोरपणे पाळतो. गोमयाच्या गणपतीचे विसर्जन घरच्या घरी करून त्याचे पाणी झाडांना घालतो. आता ही आमची परंपरा झाली आहे, आणि ही परंपरा आम्ही कधी बदलणार नाही. कोरोनाच्या या काळात मात्र मी पुण्यातल्या मानाच्या पाच गणपतींचं आणि लालबागच्या राजाचं दर्शन घेणं मिस करत आहे.                                                                                     

सणांमधून मिळतो आनंद 
                                                                                 भार्गवी चिरमुले
मला असा वाटतं की कोणताही सण आपल्याला एकत्र कुटुंबाचं आपल्या आयुष्यातील महत्त्व समजावं यासाठीच असतात. लहानपणी आम्ही माझ्या काकाच्या घरी गणपतीसाठी पहिल्या दिवशी किंवा गौरीपुजनासाठी जमत असू. गणपतीत सर्वांत गोड आठवण म्हणजे गौरी प्रतिष्ठापनेचा दिवस. त्या दिवशी आमचं घरात एवढं कौतुक व्हायचं की त्यावरूनही आमची बहिणी-बहिणींची भांडणं व्हायची. आम्ही पाच चुलत बहिणी आहोत. आमच्यातील सर्वांत मोठ्या बहिणीला गौरी आणण्याचा मान मिळत असे. आम्ही तिच्या मागे मागे लुडबूड करायचो. आमच्या घरी खड्याच्या गौरीचे पूजन असते. त्यासाठी काकांच्या विहिरीवरून गोल गोल खडे घरी आणायचे आणि ते स्वच्छ धुवायचे. त्यानंतर त्यांची पूजा करायची. तोंडात पाणी ठेवायचं आणि न बोलता त्या गौरी घरात घेऊन यायच्या. त्यांना पूर्ण घर दाखवायचं. त्यानंतर गौरीचा नैवेद्य दाखवायचा. त्यासाठी माझी काकू पाच वेगवेगळ्या रंगाच्या वड्या करत असे. 
गणपतीच्या निमित्ताने आपण नातेवाईक व मित्रमंडळींच्या घरी जातो, ज्येष्ठांना भेटतो, पाहुणे आपल्याला भेटायला येताना, आनंद घेऊन येतात आणि जातानाही आनंद घेऊन जातात. सर्वत्र वातावरणनिर्मिती होत असते. 
                           

गणेशोत्सवामुळे प्रत्येक गोष्ट सेलिब्रेट करण्याची सवय 
                                                                                     सौरभ गोखले 

माझा प्रत्येकच गणेशोत्सव अविस्मरणीय आहे. मी पक्का पुणेकर आहे, आणि पुणे आणि गणेशोत्सव हे एक वेगळं नातं आहे. गणेशोत्सवामध्ये पुण्यातील वातावरण फार वेगळं असतं. त्याची मला फार लहानपणापासून सवय आहे. 

गणपती म्हटल्यावर सर्वात आधी डोक्यात येतात ते उकडीचे मोदक. घरी आई किंवा आजीच्या हातचे केशर आणि तूप घालून बनवलेले उकडीचे मोदक खाणं म्हणजे एक पर्वणी असते. त्या दिवसापुरता तो मोह अनावर होतो. त्या वेळी डाएट नक्कीच बाजूला ठेवायला लागतं. 

गेलं वर्ष वगळता, सार्वजनिक गणेशोत्सवात काहीच सहभाग नाही, असं एकही वर्ष गेल्याचं मला आठवत नाही; पहिल्या दिवशीच्या मिरवणुका ते विसर्जनाच्या दिवसापर्यंत. पुण्यातलं कल्चरच असं आहे, की गणपती कुठल्याही मंडळाचा असो, आपण नतमस्तक होतो आणि उत्सवामध्ये सहभागी होतो. आम्ही हे लहानपणापासून करत आलो आहोत. त्यामुळे प्रत्येक गोष्ट सेलिब्रेट करण्याची सवय आम्हाला होती. 
शाळेतला गणपती हा माझ्यासाठी सर्वात जवळचा आणि महत्त्वपूर्ण आहे. मी नू.म.वि.चा विद्यार्थी. आमच्या शाळेमध्ये खूप जोरात गणेशोत्सव साजरा केला जायचा. शिक्षक आणि विद्यार्थी एकत्र मिळून उत्सवाच्या दहा दिवस सगळं तयारी करायचे. ढोल पथकाची परंपराही शाळांपासूनच सुरू झालेली आहे. आमच्या शाळेतलंही पथक होतं. त्या पथकात ढोल -ताशा वाजवायला शिकलो, ध्वज नाचवायला शिकलो. नंतर पुढे आम्ही अभिनय क्षेत्रातील मित्रांनी एकत्रित येऊन ठरवलं की, आपण नेहमी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ढोल वाजवतो; तर आपणच कलाकारांनी आपलं एक पथक तयार करूयात, जेणेकरून आपलीही सेवा बाप्पाच्या चरणी रुजू करता येईल. त्यादृष्टीने आम्ही कलावंत पथक सुरू केलं आणि आता या पथकाला आठ -नऊ वर्ष झाली असतील. सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणं, मी कोरोनाच्या काळात प्रचंड मिस करतो आहे. गणेशोत्सवात अनुभवायला मिळणीरी जी धमाल आहे, ती अशी शब्दांत वर्णन करता येणे शक्य नाही. त्यात एक वेगळीच मजा असते.

रात्री उशिरापर्यंत गणपती पाहण्यातील मजा वेगळीच 
                                                                               प्राजक्ता हनमघर

मला माझा लहानपणीचा गणेशोत्सव जास्त आवडतो, त्यात एक वेगळीच जवळीक होती. घरातील दीड दिवसांचा गणपती विसर्जित झाल्यानंतर आई मला गणपती पाहण्यासाठी घेऊन जायची. उत्सवातली सर्व सजावट, दिव्यांची झगमग... त्या सगळ्याचं खूप आकर्षण असायचं. रात्री उशिरापर्यंत गणपती पाहण्यातील मजा तेव्हा फारच वेगळी होती. त्यामुळे मला माझ्या लहानपणीचा गणेशोत्सव खूप प्रकर्षाने आठवतो. त्या आठवणी मला प्रचंड आनंद देऊन जातात. 

सण म्हणजे गाठीभेटी, मित्रमंडळी, मजा, मस्ती आणि आनंद...तो आनंद सर्वांना घेता आला पाहिजे. मी नेहमी हाच प्रयत्न करते, की मला सणाचा आनंद घेता येतो, तसाच माझ्यामुळेही इतरांना तो आनंद उपभोगता येईल. आनंद वाटल्याने त्याची मजा वाढते. गाठीभेटी म्हटलं की जेवणावळी तर आल्या आणि गणपती म्हटलं की मी गोड पदार्थ खाण्याचा मोह आवरू शकत नाही. मला मोदक, मिठाई, पेढे, पुरणपोळी करायला, खायला आणि इतरांना खाऊ घालायलाही खूप आवडतं. त्यामुळे माझं घरात खूप कौतुक केलं जातं. लहानपणापासूनच घरात मी सर्वांची खूप लाडकी आहे. लहानपणी मला माझी आजी देवाला नैवेद्य दाखवण्याच्या आधीच मला मोदक खाऊ घालायची. ‘लहान मुलं ही देवाचंच रूप असतात,’ असं ती म्हणायची. सण ही संकल्पनाच एकत्रित येण्यासाठी आहे. पण, गेल्या वर्षी कोरोनाच्या काळातील गणपती मला वेगळा वाटला. लोकांमध्ये आनंद होता, पण तेवढीच भीती होती. दरवर्षीसारखा उत्साह नव्हता. अशावेळी आपली सामाजिक जबाबदारी वाढते. आपण म्हणतो, आपल्याला समाजभान असायला हवे. समाजाबद्दलचे आपले कर्तव्य पार पाडण्याची व प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याची हीच खरी वेळ असते. मीदेखील घरगुती पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला. 

माझ्याकडे पर्यावरणपूरक शाडूच्या मातीची गणेश स्थापना केली जाते. तो घरीच विसर्जित केला जातो आणि त्याच कुंडीमध्ये एक झाड लावले जाते. ती एक गोड आठवण आपल्या सोबत नेहमी राहते. निसर्गाची देणे निसर्गालाच मिळावे, असे मला वाटते.

गणपती बाप्पा हा एकच विचार 
                                                                         अक्षय वाघमारे 

गणेशोत्सव माझ्यासाठी खूपच स्पेशल आहे. मी लहान असल्यापासून माझ्या घरामध्ये गणेश स्थापनेच्या दिवशी माझ्यासाठी छोले आणि बटाट्याची भाजी केली जाते, हीदेखील एक माझ्यासाठी स्पेशल गोष्ट आहे. माझ्या आईला, माझ्या घरच्यांना सर्वांनाच माहिती आहे, की मला बटाट्याची भाजी आणि छोले खूप आवडतात. त्यामुळे खंड न पडता आता तोच प्रसाद माझ्या घरी केला जातो. 

आमच्या कलाकारांचं एक पथक आहे. या पथकामध्ये मी ताशा वाजवतो. तोही माझ्यासाठी एक वेगळा अनुभव आहे. शेवटच्या दिवशीच्या गणपती मिरवणुकीमध्ये आम्ही सहा ते दहा तास वाजवत असतो. या सर्वच गोष्टी अविस्मरणीय आहेत. ढोल पथकात वाजविण्याचा माझा पहिला अनुभव मी कधीच विसरणार नाही. मी ताशा वाजविण्यात इतका तल्लीन झालो होतो, की मिरवणूक संपल्यावर माझी आई मला म्हणाली, ‘अरे मी तुला तिथे पाहायला आले होते. पण, तुझं माझ्याकडे लक्षच नव्हतं. तू खूप छान वाजवत होतास.’ म्हणजे तो जो एक ताल असतो, तो पकडल्यानंतर आपल्याला बाकीच्या गोष्टींचे भानच राहत नाही. तो एक वेगळा जल्लोष असतो. तो आपण स्वतः अनुभवल्यानंतरच समजण्यासारखा आहे. गणपती बाप्पा हा एकच विचार आपल्या डोक्यामध्ये असतो. बाप्पाच्या चरणी आपण तल्लीन झालेला असतो. फक्त तिथे आपल्याला बाप्पा बाप्पा आणि बाप्पाच दिसतो. 

या वर्षीचा गणपतीही माझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. कारण, पहिल्यांदाच माझ्या घरी बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करणार आहे. कोणती मूर्ती आणायची, कुठे बसवायची, सजावट काय असणार आहे, या सगळ्या गोष्टी सध्या ठरताहेत. मी खूप आतुरतेने या वर्षीच्या गणपतीची वाट बघतो आहे. कोरोना काळात मी गणपती उत्सव खूप जास्त मिस केला. मला असं वाटतं, की मागचं एक वर्षं माझ्या आयुष्यात नव्हतंच. कारण, माझ्या कॉलनीमध्येपण गणपती नव्हता. माझ्या मामाकडे गणपती होता, पण आम्ही तिकडे जाऊन फक्त दर्शन घेऊन आलो. आता पुन्हा एकदा बाप्पाच्या आगमनाच्या तयारीला लागलो आहे.

यंदाचा गणपती आमच्यासाठी खूपच स्पेशल 
                                                                                    आरोह वेलणकर 

आमच्याकडे दीड दिवसांचा गणपती असतो. आमच्यासाठी गणपती उत्सव म्हणजे सर्व घरच्यांनी एकत्र जमणे, गप्पागोष्टी, प्रसाद आणि पूजा. माझ्या घरात माझी एकट्याचीच शास्त्रोक्त पद्धतीने मुंज झाली आहे, त्यामुळे घरातील पूजा मलाच करावी लागते. घरातल्या गणपतीची स्थापनाही मीच करतो. एरवीच्या धावपळीत या सर्व गोष्टींसाठी वेळ मिळत नाही. पूजाअर्चा करण्याच्या संधीही खूपच कमी येतात. त्यामुळे माझ्यासाठी हा खूप महत्त्वाचा सण आहे. 

पूर्वी अजून एक खूप छान गोष्ट असायची. माझ्या आत्याचे मिस्टर आर्मीत असल्यामुळे त्यांच्या आणि आमच्या खूप जास्ती गाठीभेटी व्हायच्या नाही. पण, गणपतीच्या वेळी ते आवर्जून सुटी काढून यायचे. आम्ही सगळे भेटायचो. घरात खूप छान, आनंदाचं वातावरण असायचं. माझ्या घरी तळणीचे मोदक केले जातात. आमच्या घरात सर्वांना ते आवडतात आणि आम्रखंड, श्रीखंड आणि पुरी यांचा प्रसाद माझ्या घरी बाप्पाला दाखवला जातो. 

यंदाचा गणपती हा आमच्यासाठी खूपच जास्त महत्त्वपूर्ण असणार आहे. माझा मुलगा अर्जुनचा हा पहिलाच गणपती उत्सव आहे. तो फक्त सहा महिन्यांचा आहे. मला अर्जुनला सोबत घेऊन पूजेला बसायचं आहे. यंदा आणखी विशेष तयारी म्हणजे, की चांदीची मूर्ती आणायची की मातीची मूर्ती बसवायची असा विचार सुरू आहे. शक्यतो इकोफ्रेंडली मूर्ती आणण्याचा आमचा विचार आहे. आमच्या घरी देवघरामध्ये सर्व देवांच्या मधोमध बसेल अशी गणेशमूर्तीची स्थापना केली जाते. सजावटीसाठी आम्ही जास्तीजास्त फुलांचा वापर करतो. सध्यातरी आम्ही सर्व गोष्टीच्या प्लॅनिंग स्टेजमध्ये आहोत. संधी मिळेल तसं समाजासाठी काही करण्याचा माझा पुरेपूर प्रयत्न असतो. या वेळी ही गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुलांना मोटिव्हेशन देण्यासाठी काही करण्याचा, वेगवेगळ्या व्यवसायांच्या दृष्टीने करिअर गायडन्स देण्याचा विचार आहे. वेगवेगळ्या फोरममध्ये गणेशोत्सवाच्या निमित्ताने मी हे करणार आहे.

(विशेष अतिथी विभागातील सर्व शब्दांकने : शीतल जगताप)

संबंधित बातम्या