आठवणीतील गणेशोत्सव

-
शनिवार, 11 सप्टेंबर 2021

कव्हर स्टोरी

तुम्ही-आम्ही सर्वांनीच आत्तापर्यंत अनेक संस्मरणीय गणेशोत्सव साजरे केले आहेत; कधी घरात, कधी सार्वजनिक मंडळाबरोबर, तर कधी सोसायटीमध्ये! अशाच संस्मरणीय गणेशोत्सवाच्या आठवणी पाठवण्याचे आवाहन ‘सकाळ साप्ताहिक’ने आपल्या वाचकांना केले होते आणि त्याला देश-विदेशासह अनेक ठिकाणांहून भरभरून प्रतिसाद मिळाला. त्यातील काही प्रातिनिधिक आठवणी...

कुवेत ः गणेशोत्सव २०२० 
ही गोष्ट आहे कुवेतमध्ये साजरा झालेल्या श्रीगणेशोत्सवाची. कोरोना शिखरावर... संपूर्ण लॉकडाउन! दरवर्षी कुवेतमधील भारतीय दूतावासात श्रीगणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना व्हायची. पण या वर्षी मंडळाचा अर्ज सुरुवातीला तत्त्वतः फेटाळला गेला. तरीही मंडळाचे अध्यक्ष राघव साडेकर सतत पाठपुरावा करतच होते. दरम्यान सी. बी. जॉर्ज यांनी कुवेतमधील भारताचे नवीन राजदूत म्हणून कार्यभार हाती घेतला. त्यांच्याकडे पुन्हा अर्ज पोहचताच त्यांनी परवानगीचे आदेश दिले, ‘माझी नवीन देशी कारकीर्द सुरू होत असताना श्रीगणेशोत्सव हा पहिला सण दूतावासात साजरा होण्याची संधी मिळावी यापेक्षा सुवर्णयोग काय?’ गणपतीबाप्पा मोरया!!
नंतर प्रश्न श्रीगणेशमूर्तीचा. विमाने बंद. भारतातून मूर्ती येणार कशी? मंडळाचे माजी अध्यक्ष सुनील विपट यांचा फोन आला. ‘राघव, मंडळाची जुनी मूर्ती माझ्या घरी जतन करून ठेवली आहे, ती घेऊन जा.’ मूर्तीचे बरेच रंग उडाले होते. आता काय? राधिका साडेकर (मंडळाच्या फर्स्ट लेडी) यांनी परस्पर सांगितले ‘मिलिंद करेल सगळं!’ क्षणभर पोटात गोळा आला. हौस म्हणून चित्र काढणे वेगळे आणि श्रीगणेशाची मूर्ती रंगवायची? घरी आलो. रंग आणि कुंचले घेतले. साडेकरांच्या घरी मूर्तीसमोर बसलो. नमस्कार केला. ‘बाप्पा, तू सगळं व्यवस्थित करून घे.’ काय सुंदर मूर्ती तयार झाली म्हणून सांगू? अगदी नव्यासारखी. 

मग श्रीगणेश चतुर्थीच्या दिवशी राघव आणि राधिकाच्या हस्ते आणि प्रकाश ठाकूर यांच्या पौरोहित्याखाली श्रीगजाननाची प्राणप्रतिष्ठापना भारतीय दूतावासाच्या सभागृहात यथासांग पार पडली. ढोलताशाच्या तालावर, कार्यकारिणी सदस्य, दूतावास अधिकारी आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीत मस्त मिरवणूकही निघाली. अशाप्रकारे कोरोनाच्या काळातही महाराष्ट्र मंडळ कुवेतचा श्रीगणेशोत्सव  २०२० दणक्यात साजरा झाला. 
 

मिलिंद कुलकर्णी, कुवेत

 

नैरोबी ः आठवणीतला बाप्पा!

केनियातील वास्तव्यात मला २००० साली नैरोबी महाराष्ट्र मंडळाच्या कार्यकारी समितीत सचिव या पदावर काम करण्याची संधी मिळाली. मंडळात गणपती उत्सव पाच दिवस साजरा व्हायचा. नैरोबीमध्ये त्यावेळी फक्त महाराष्ट्र मंडळातच गणपती बसवला जायचा, त्यामुळे रात्रीच्या आरतीला आणि प्रसादाला नैरोबीतील इतर भारतीय आवर्जून यायचे. एकंदरीतच गणेश उत्सवाची मोठी जबाबदारी माझ्यावर होती. 
मी उत्सवाकरिता डोनेशन मिळवण्याच्या कामास लागले, हे मोठे काम असते. अर्थात सगळेच मेंबर्स त्यांच्या ओळखीच्या कंपन्यांकडून डोनेशन घेऊन यायचे. माझ्या कंपनीचे काही क्लायंट भारतीय होते. ते दरवर्षी गणपती उत्सवात तेल, तूप आणि दूध पुरवायचे. दरवर्षी गणपतीची मूर्ती भारतातून आणली जायची. त्यावर्षी बाप्पाची मूर्ती मुंबईतून आणण्याचे भाग्य मला मिळाले. मी गणपतीची मूर्ती एका खोक्यात आजूबाजूला पेपर घालून हॅण्डबॅगेजमध्ये ठेवली. चेकिंग करताना काउंटरवरच्या तरुणीला सोबत बाप्पा आहे असे सांगितले, त्यावर ती नमस्कार करून हसली. त्यादिवशी विमानात खूप गर्दी होती, त्यामुळे माझी धाकधूक वाढली होती. पण बाप्पा माझ्या शेजारच्या सीटवर बसून नैरोबीला सुखरूप पोचला. 

बाप्पाला जास्वंदीच्या फुलाची सजावट केली. सकाळ-संध्याकाळ आरती आणि ५००-६०० लोकांच्या जेवणाच्या पंगती झाल्या. त्यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले. श्री निर्मला देवींच्या भक्तमंडळींनी, म्हणजेच माझ्या सहजयोगी मित्रमैत्रिणींनी गणपतीसमोर अथर्वशीर्ष म्हणून दाखवले आणि मंडळातील लोकांना अचंबित केले. केनियातील मोठे उद्योगपती, मूळ भारतीय वंशाचे, डॉ. मनू चांदरिया यांच्या हस्ते यशस्वी कलाकारांना बक्षीसे देण्यात आली. 

शेवटच्या दिवशी थाटामाटाने मिरवणूक काढून, नैरोबीजवळच्या नैसर्गिक धबधब्याखाली असलेल्या तळ्यात बाप्पाचे विसर्जन झाले. पुढच्या वर्षी परत या असे सांगत सगळ्यांनी बाप्पाला मोठ्या जड अंतःकरणाने निरोप दिला. सगळ्यांच्या मदतीने गणपती उत्सव छान पार पडला होता आणि माझ्यातील इव्हेंट मॅनेजर मला दिसला होता.

सुमेधा कुलकर्णी, पुणे

अबुधाबी ः ४५ वर्षांची परंपरा
परदेशात दोन मराठी माणसे एकत्र आली की ते पहिल्यांदा महाराष्ट्र मंडळ सुरू करतात आणि त्याला गावाचे नाव देऊन आपले कार्य चालू करतात. बाकीचे कार्यक्रम होवो न होवोत पण गणेशोत्सव मात्र नक्की साजरा करतात. अबुधाबीमध्ये गणेशोत्सवाला सुरुवात झाली त्यालाही आता ४५ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. 
गणेशोत्सव साजरा करायचे ठरले, तेव्हा सर्वात मोठा प्रश्न होता तो गणेशाची मूर्ती कशी आणायची हा. एअर इंडियातील अधिकाऱ्यांनी भारतातून मूर्ती आणून द्यायला मदत केली. एअर इंडियाची ही साथ पुढची २०-२५ वर्षे दुबईत मंदिराजवळच्या दुकानात गणपतीच्या मूर्ती मिळेपर्यंत कायम होती. 

दरवर्षी गणेशोत्सव जवळ आला की मूर्तीचा प्रश्न यायचा आणि त्यावेळी जुलै ऑगस्टमध्ये भारतात सुट्टीवर गेलेल्या कुटुंबाकडे ही जबाबदारी दिली जायची. मुंबईहून एका आंब्याच्या वा तत्सम पेटीत थर्माकोलचे तुकडे वा कुरमुरे मूर्तीच्या आसपास भरून ती मूर्ती सुरक्षित पॅक करायची आणि इथे एअरपोर्टवरून बाहेर काढायची ही मोठी कसरतच होती. मुंबईहून निघताना मूर्ती हॅण्डबॅगेज म्हणून जवळ ठेवायला परवानगी मिळायची, पण अबुधाबीत स्क्रिनिंगच्यावेळी टेन्शन यायचे. अशावेळी एअर इंडियाचे कर्मचारी मदतीला धावायचे. विमानतळाबाहेर मूर्ती येईपर्यंत चिंतेत उभे असलेल्या कार्यकर्त्याच्या जिवात जीव नसायचा. मूर्तीचे आगमन झाल्यावर दुसरा प्रश्न स्थापना कुठे करायची हा असायचा. सुरुवातीच्या कालखंडात इंडिया सोशल सेंटरमध्ये स्थापना होत होती. पण एकेवर्षी भारतात दंगली झाल्या आणि आयएससीने अगदी शेवटच्या क्षणी नकार दिला. सर्वांची धावपळ झाली आणि एका कार्यकर्त्याच्या घरीच गणपतीची स्थापना झाली. त्यानंतर २०१०पर्यंत गणपती बाप्पा अनेकांच्या घरी असे विराजमान झाले. बाप्पाच्या दर्शनासाठी येणारे भक्तगण नुसते मराठी समुदायापुरते मर्यादित नव्हते तर गुजराती, सिंधी, तमीळ, कानडी असे सर्व प्रकारचे गणेशावर श्रद्धा असलेले लोक असायचे. 

सुरुवातीच्या काळात मंडळात पूजा सांगायला भटजींचा शोध घ्यावा लागे. अशावेळी काही हिंदी भाषिक भटजीदेखील पूजा सांगायला चालायचे. पण नव्वदच्या दशकात गुरुदत्त जोशी नावाचे शास्त्रशुद्ध पूजा सांगणारे भटजी मंडळाला लाभले आणि पुढील दहा वर्षे निर्विघ्नपणे गणपतीची पूजा पार पडली. त्यानंतर आजतागायत धनंजय मोकाशी आणि नरेंद्र कुलकर्णी यांनी ही जबाबदारी यथोचित पार पाडली आहे. अबुधाबी मंडळाच्या गणेशोत्सवाचे वर्णन करताना त्याच्या सजावटीचा, मखराचा उल्लेख झाला नाही तर ते वर्णन अधुरे राहील. नव्वदच्या दशकात गजाभाऊ वऱ्हाडकर नावाचा अतुलनीय कलाकार मंडळाला लाभला आणि दरवर्षी गणपतीबरोबरच गणपतीचा देखावा पाहण्यासाठी लोकांची गर्दी होऊ लागली. गजाभाऊच्या अफाट कल्पनाशक्तीतून मुंबई-पुण्यासारखे वेगवेगळ्या प्रकारचे देखावे लोकांच्या डोळ्यांची पारणे फेडू लागले.

दीड दिवसाच्या गणपतीनंतर वेध लागायचे ते गणपती विसर्जनाचे. विसर्जनही तसे सांभाळूनच करावे लागे. अशावेळी मंडळातले वरिष्ठ आपले कॉन्टॅक्ट्स वापरून दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी जागा बदलत साहाय्य करायचे. कधी अबुधाबी इंटरकॉन्टिनेंटलच्या मागे गुजराती मच्छिमारांच्या बोटी उभ्या असत. दोन बोटींतून बाप्पाला समुद्राच्या मध्यभागी घेऊन जात. मग बोटीतच बाप्पाची आरती करून तिथूनच विसर्जन करायचे. तर कधी एखाद्या निर्जन किनाऱ्यावर बोटीतून उतरून विसर्जन व्हायचे. नंतर काही वर्षे टुरिस्ट क्लबच्या मेरेडीयन हॉटेलच्या मागून ५०-६० माणसे मावतील अशा मोठ्या बोटीतून ढोलकी वाजवत, गजाननाचा जयजयकार करत सादियात आयलंडवर जायचे आणि तिथे जेट्टीवर उतरून किनाऱ्यावर उतरायचे. मग जोरजोरात आरत्या म्हणून बाप्पाला निरोप द्यायचा. अशावेळी तिथे कोणीही आजूबाजूला नसल्याने सगळ्यांचे कंठ जरा जास्तच सुटायचे. आता उत्सवात खूप स्वागतार्ह बदल झाले आहेत. जागा मोठी असल्याने मोठमोठ्या रांगोळ्या घातल्या जातात, स्टेजवर लेझीम, ढोल ताशांच्या साथीने नृत्यसंगीताचे कार्यक्रम होतात. मंडळाचे सभासद त्यात उत्साहाने भाग घेतात. भारतात साजऱ्या केलेल्या गणपतीच्या आठवणी त्यानिमित्ताने जाग्या होतात. सासर-माहेरच्या गणपतीची आठवण, हुरहूर काही प्रमाणात दूर होते. परदेशातील माहेरघर म्हणून मंडळाबद्दल एक आपलेपणा, आपुलकीचा भाव निर्माण होतो. दीड दिवसाचा गणपती वर्षभराचा आनंद पदरात देऊन जातो. विसर्जनाला जाताना घरातल्या गणपतीच्या आठवणीने मन व्याकूळ होते. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या म्हणताना आवाज कातरतो, डोळे पाणावतात आणि जड  पावलांनी सर्व घरी परततात ते पुढच्या वर्षीच्या गणपतीची वाट पाहत.

प्रशांत कुलकर्णी, अबुधाबी

व्यापक गणेशोत्सव
मी १९९९ साली डॉक्टर होऊन धुळ्याहून आलो आणि सर्वप्रथम आमच्या जुन्या बॉक्सिंग क्लबमध्ये गेलो. तिथे सुनील नेवरेकर सरांना भेटलो. तिथेच मला त्यांचे मित्र पुरंदरे सर भेटले. त्यांनी गणेशोत्सवाची तयारी सुरू केली होती. ते दृष्टिहीन मुलांना चहा, भजी, बटाटे वडे करण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांचा वडापावचा स्टॉल लावत असत. या मुलांना भजी, वडे कसे करता येतील? असा माझा प्रश्न होता. सर म्हणाले, ‘योग्य ट्रेनिंगनंतर अशक्य काही नाही!’  

गणेशोत्सवाच्या काळात हत्ती गणपतीजवळ या मुलांचा स्टॉल आहे असे समजले. तिथे मला अद्वैत परिवारचे खंदे कार्यकर्ते संतोष डिंबळे, प्रवीण गुजराथी व महिपाल राठोड यांचा परिचय झाला. दृष्टिहीन मुले अतिशय सहज, सावधतेने भजी, वडे तळत होती; चहा करत होती. एक पार्शल ब्लाइंड (धूसर दृष्टी) असलेला मुलगा पैसे देणे-घेणे बघत होता, तर एक छोटी मुलगी ब्रेल पाटीवर हिशोब लिहून ठेवत होती! या मुलांना स्वादिष्ट बटाटे वडे करण्याचे ट्रेनिंग नेवरेकर सरांनी दिले होते. तर स्टॉलसाठी जागा व लागणारी भांडी हत्ती गणपती मंडळाचे अध्यक्ष शामराव मानकर यांनी स्वतःच्या घरातून दिली होती. या उपक्रमाबरोबर २००० सालापासून मी जोडला गेलो, तो आजतागायत. खूप अनोखे विश्व जवळून पाहायला मिळाले. समाजातल्या चांगल्या माणसांचा चांगुलपणा समजला. मानकर यांनी एकदा मुलांना सरळ मूर्तीपाशी नेऊन स्पर्शाने मूर्ती समजावून दिली. 

कॅम्पमधील उत्सव संवर्धक मंडळ, मोदीखाना हे तर गेले काही वर्षे त्यांच्या श्रींच्या मूर्तीची स्थापना दृष्टिहीन मुलांच्या हस्ते करतात. मध्यंतरी काही वर्षे काही तृतीयपंथी व्यक्ती स्टॉलवर या मुलांच्या मदतीसाठी येत. 

गेल्या वीस वर्षांत मी नित्यनेमाने या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करतोय. नवी- जुनी मंडळी दरवर्षी भेटतात. जुने-जाणकार नव्यांना वडा, भजी, चहा करायला शिकवतात; मार्केटिंग शिकवतात. गणपतीबाप्पाच्या साक्षीने ज्ञान देत, अडचणींवर, व्यंगावर मात करून पुढे जायला शिकवतात. माझा कौटुंबिक गणेशोत्सव इतका व्यापक कधी झाला ते कळलेच नाही. गणपती बाप्पाची सर्वांवरच सदैव अशीच कृपा राहू दे!
 

 डॉ. अमोल सप्तर्षि, पुणे

बाप्पा आणि वर्ल्ड कप!
लहानपणापासून मला दोन गोष्टींचे प्रचंड वेड आहे. एक म्हणजे क्रिकेट आणि दुसरे गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीचे दहा दिवस. त्यामुळे २००७चा गणेशोत्सव माझ्यासाठी खूप संस्मरणीय ठरला. २००७ साली ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटचा पहिला विश्वकरंडक मुकाबला होणार होता. तोही ऐन गणपतीत. गणपतीला मी तमाम हिंदू देवदेवतांचा ‘हिरो’ मानीत आलोय म्हणून की काय, पहिल्या सामन्यापासून मी मनात ठरवून टाकले होते की भारत प्रत्येक सामना जिंकणार! 

पहिलाच सामना पावसामुळे रद्द झाला, तर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानतबरोबर आपला टाय झाला. मी आरास करत होतो. टीव्हीवरचे ते दृश्य पाहून अजून स्टॉलमध्येच मुक्काम असलेल्या माझ्या गणपतीला म्हटले, ‘हे काय निदान हा सामना तरी जिंकवायचास,’ आणि काय जादू! सामन्याचा निर्णय म्हणे बॉल आऊटने होणार. भारताने ३-०ने पाकला धुळ चारली. दुसऱ्या दिवशी दुप्पट उत्साहाने गणपतीला घरी आणले. आदल्या रात्री ‘युवी युवी,’ हे जितक्या जोरात ओरडलो, त्याच्या दसपट आवाजात आरत्या झाल्या. मोदकांचा मनसोक्त आस्वाद घेतला आणि आईकडे ‘वर्ल्डकप जिंकला की पुन्हा मोदक कर,’ अशी फर्माईश केली. 

एक एक करत भारत सामने जिंकत होता आणि मला स्फुरण चढत होते. इंग्लंडविरुद्ध युवीने सलग सहा षटकार मारले तेव्हा गणपती बाप्पा मोरयाच्या जल्लोषाने मी आणि मित्रांनी कॉलनी दणाणून सोडली. विसर्जनाच्या आदल्या दिवशी फायनल होती. तीही पाकिस्तानबरोबर. मी तो सामना थोडा घरी थोडा मंडळात पहिला. ‘श्रीशांत टेक्स इट, इंडिया विन्स,’ असे रवी शास्त्री ओरडला आणि आम्ही ढोल ताशाचा एकच आवाज केला. भारताने विश्वकरंडक जिंकला. तो गणपतीत जिंकला हा योगायोग असेल. पण कुसुमाग्रज म्हणतात ‘देव जर कल्पना असेल तर कल्पना कुठून येतात,’ तसे ‘हा योगायोग असेल तर योगायोग कोण घडवून आणतो?’

सुजित काळे, कॅलिफोर्निया

गोव्याचा गणेश
देवभूमी गोमंतकात चतुर्थी हा सगळ्यात मोठा उत्सव. घरोघरी दीड दिवस आणि पाच दिवस चतुर्थीचा उत्साह ओसंडून वाहत असतो. आमच्या बेतकी गावातील मोठ्या पूर्वजांच्या वाड्यात फार थाटामाटात हा उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. एक दिवस अगोदर गौरीपूजन होते. चार राजांगणाचा वाडा. चार लांब रुंद चौक्या. यातल्याच एका चौकीवर गणपतीची स्थापना करतात. त्यासाठी जवळ जवळ दीड-दोनशे वर्षांची जुनी लाकडी नक्षीकाम केलेली घुमटी. आदल्या दिवशी तऱ्हेतऱ्हेच्या विशिष्ट रंगाच्या कागदांनी ही घुमटी रंगविण्याचे काम लहानथोर मोठ्या भक्तीने आणि उमेदीने करतात. चतुर्थीच्या सकाळी घुमटीच्या वर भली मोठी माटोळी सजविली जाते. माटोळीला आंब्याचे ताळे, त्याचप्रमाणे सुपारी, नारळ आणि विविध प्रकारच्या रानटी फळांची आरास केली जाते. 

सकाळी नऊ-साडेनऊ वाजता गावातील सुताराने हाताने तयार केलेली मातीची मूर्ती वाजत गाजत घरी आणली जाते. मोठ्या भक्तिभावाने त्याची पूजाअर्चा आणि त्यानंतर दीड दोन तास आरत्या. यावेळी दारूकामाची जी आतषबाजी होत असे, ती आता प्रदूषणामुळे कमी झाली आहे. दुसऱ्या दिवशी अर्थवर्शीषाची एक हजार आठ आवर्तने आणि त्याचप्रमाणे तेवढ्याच दूर्वा अर्पण करण्याचा कार्यक्रम होतो. नारायण भट्ट खेडेकर दूरवरच्या सावयवेरें गावातून त्यावेळी न चुकता हजर असत. त्यांच्या धीरगंभीर आवाजाने वाडा एकदम मंगलमय वातावरणाने भरून जायचा. 
या चतुर्थीला दुःखाची पण एक किनार आहे. माझा चुलत भाऊ डॉक्टर मेजर प्रकाश शेटये, जो सगळ्या पंचक्रोशीत लोकांना हवाहवासा होता, तो त्याच्या ऐन उमेदीच्या काळात आम्हाला सोडून गेला. दर चतुर्थीला त्याची उणीव भासते त्याला उपाय नाही. 
                                         

  उमाकांत डी. शेटये, खांडोळा, माशेल – गोवा

संबंधित बातम्या