गणपती-गौरीची आभूषणे

ज्योती बागल 
सोमवार, 6 सप्टेंबर 2021

कव्हर स्टोरी

‘गणपती-गौरी येति घरा तोचि उत्सव खरा,’ असे म्हणून सर्वचजण उत्सवाची जय्यत तयारी करतात. या तयारीमध्ये गौरी-गणपतीच्या मूर्ती, पूजेचे साहित्य, आभूषणे, सजावट, देखावे, प्रसादाचे विविध पदार्थ अशा कितीतरी गोष्टी येतात. या सर्वांत गौरी गणपतीच्या मूर्तींना अधिक देखणेपण आणणाऱ्या आभूषणांना विशेष महत्त्व आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या गौरी-गणपतीच्या आभूषणांविषयी थोडक्यात... 

गौरींसाठीचे दागिने  
गौरींसाठी गळ्यातील हारांमध्ये कोल्हापुरी हार, जोंधळी हार, लॉँग गोल्डन हार, राणी हार, चपला हार, बोरमाळ, मोहनमाळ, कॉइन हार इत्यादी प्रकारचे हार उपलब्ध आहेत. कोल्हापुरी हार ५५० रुपयांपासून १२०० रुपयांपर्यंत मिळतो. जोंधळी हार साधारण ४०० रुपयांपर्यंत मिळतो. चपला हार, राणी हार, लाँग गोल्डन हार यांच्या साधारण किमती २५० ते १२०० रुपयांपर्यंत आहेत. गौरींसाठी हारांबरोबरच आवर्जून घेतला जाणारा दागिना म्हणजे ठुशी. गोल्डन आणि मोती दोन्ही प्रकारात ठुशी मिळतात. यांच्या किमती साधारण १६० रुपयांपासून १२०० रुपयांपर्यंत आहेत. यामध्ये साधी ठुशी १६० रुपयांपासून, तर कोल्हापुरी ठुशी १९० रुपयांपासून मिळते. कोल्हापुरी हार आणि ठुशी या दोन्हीचा सेटही मिळतो. हा सेट अधिक आकर्षक दिसतो. मोहनमाळेची किंमत ५५० रुपये आहे. गौरींसाठी वन साइड हारही सुंदर दिसतात. यांची किंमत ५५० रुपयांपासून पुढे घेऊ तशी आहे. या हारांना मायक्रो फिनिशिंग केलेले असते, त्यामुळे ते दीर्घकाळ टिकतात. तसेच गौरींसाठी मोठे गंठणही उपलब्ध आहेत. हे गोल्डन पत्ता आणि काळे अशा टेम्पल ज्वेलरी प्रकारात उपलब्ध आहेत. यांची जोडी ३००, ४०० आणि ६०० रुपयांमध्ये मिळते. त्याबरोबरच दोन पदरी, तीन पदरी असे मोती हारही उपलब्ध आहेत. हे हार गौरी-गणपती दोघांनाही घालता येतात. यांच्या किमती ३५० रुपयांपासून पुढे घेऊ तशा आहेत. गौरींसाठी गोल्डन तसेच मोत्याच्या बिंदीही मिळतात. यांच्या किमती साधारण ५०-१०० रुपयांच्या दरम्यान आहेत. याव्यतिरिक्त नेहमीचे म्हणजेच प्लॅस्टिक आणि कापडी फुलांचे हारदेखील उपलब्ध आहेत. यामध्ये लहान हार २२० रुपयांपासून उपलब्ध आहेत, तर मोठे हार ३८० रुपयांपासून पुढे घेऊ तसे मिळतात. अशाच प्रकारचे मोत्यांचे हारदेखील उपलब्ध आहेत. हे हार २५०, ३०० आणि ४५० अशा रेंजमध्ये उपलब्ध आहेत. गोल्डन, मोती, प्लॅस्टिक या सर्व हारांच्या किमती साईजनुसार ठरतात.   

सण-समारंभांना साडी नेसल्यावर महिलांसाठी जसा कंबरपट्टा आणि बाजूबंद आवश्यक असतो, तसाच तो गौरींसाठीदेखील असतो. असे सुंदर आणि आकर्षक गोल्डन, मोत्याचे कंबरपट्टे आणि बाजूबंद उपलब्ध आहेत. गोल्डन कंबरपट्टा १५० रुपयांपासून तर मोत्याचे कंबरपट्टे १८० रुपयांपासून पुढे घेऊ तसे आहेत. बाजूबंद साधारण ७० रुपयांपासून उपलब्ध आहेत. 

गौरी-गणपतीचे रूप अधिक उठून दिसावे म्हणून गोल्डन मुकुटांना जास्त मागणी दिसते. मात्र यामध्ये गोल्डनबरोबरच डायमंड आणि मोत्याचे मुकुटही उपलब्ध आहेत. गोल्डन मुकुटांच्या किमती साधारण २५० रुपयांपासून पुढे आहेत, तर मोत्याचे मुकुट १३० रुपये जोडी उपलब्ध आहेत. अर्थात यांच्या किमती आकार आणि क्वालिटीनुसार ठरतात.    

झुब्यांमध्ये साखळी झुबा, ट्रिपल झुबा, डबल-सिंगल झुबा इत्यादी प्रकारदेखील बाजारात उपलब्ध आहेत. गौरींसाठी विशेषतः मोठेच झुबे घेतले जातात, जेणेकरून ते लांबूनही उठून दिसतात. शिवाय लांब गोल्डन हारांवर ते जास्त शोभून दिसतात. सिंगल आणि डबल झुब्याच्या किमती १५० रुपये, १७० रुपयापासून पुढे घेऊ तशा आहेत. तसेच मोत्यांचे झुमकेदेखील बाजारात उपलब्ध आहेत. त्यांच्या किमती साधारण ५० रुपयांपासून पुढे आहेत. नथींमध्ये सिम्पल गोल्डन नथीला जास्त मागणी आहे. यामध्ये बानू नथ, म्हाळसा नथ, डायमंड आणि मोत्याची नथ उपलब्ध आहे. गोल्डन नथ ५० पासून १२० रुपयांपर्यंत मिळते. गोल्डन नथींमध्ये मोराच्या नक्षीला जास्त मागणी आहे. मोत्यांची नथ ३० रुपयांपासून उपलब्ध आहे. बानू आणि म्हाळसा नथ १९० ते २१० रुपये दरम्यान मिळतात. डायमंड नथ २४० रुपयांपासून उपलब्ध आहेत.  

 गौरींसाठी घेतले जाणारे इतर दागिने म्हणजे बांगड्या, पैंजण, अंबाडा इत्यादी. बांगड्या गोल्डन, मोती, प्लॅस्टिक आणि काचेच्या प्रकारात मिळतात. गोल्डन बांगड्यांचा सेट १५० रुपयांपासून पुढे घेऊ तसा उपलब्ध आहे. तर मोत्यांच्या बांगड्या २०० रुपयांना एक सेट मिळतो. प्लॅस्टिकच्या बांगड्या अगदी १५ रुपयांपासून उपलब्ध आहेत. पैंजण हे सिल्व्हर आणि गोल्डन अशा दोन्ही प्रकारांत उपलब्ध असून यांच्या किमती २५० रुपयांपासून पुढे आहेत. गौरींसाठी अंबाडादेखील खरेदी केला जातो. गोल्डन अंबाडा १५० रुपयांना जोडी मिळते. हल्ली बरेचजण गौरींसाठीदेखील ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी घेत आहेत. ट्रेंड आहे मग तो फॉलो तर केलाच पाहिजे ना.. 

श्रीगणेशाची आभूषणे  
गणपतीसाठी मोदक हार, मोती हार, जास्वंदी फुलांचा हार, दूर्वा हार इत्यादी प्रकार उपलब्ध आहेत. मोदक हार फक्त गोल्डनमध्ये उपलब्ध असून लहान आकाराचा हार २७० रुपयांना आहे, तर मोठ्या आकाराचा हार ११०० रुपयांपर्यंत मिळतो. मोती हार साधारण ३५० रुपयांपासून पुढे घेऊ तसे उपलब्ध आहेत. जास्वंदी हाराची किंमत ३५० रुपये आहे; यामध्ये सोनेरी फुलांना लाल रंगाचे पॉलिश केलेली असते. दूर्वा हारही २५० रुपयांपर्यंत मिळतो. याशिवाय साध्या मोत्याच्या माळाही उपलब्ध आहेत. यांच्या साधारण किमती ५० रुपये ते २०० रुपयांच्या दरम्यान आहेत. 

गणपतीसाठी लागणारा शेला गोल्डन आणि कापडी अशा दोन प्रकारांत उपलब्ध आहे. साधा कापडी शेला ३० रुपयांपासून पुढे घेऊ तसा आहे, यावर वेलव्हेटचा कपडा आणि रेशमी गोल्डन दोऱ्याची किनार असते. गोल्डन शेल्यावर जाळीदार आणि रंगीत खड्यांची नक्षी पाहायला मिळते. यामध्ये लहान शेला ७००-८०० रुपयांदरम्यान आहे, तर मोठा शेला ११०० रुपयांपर्यंत मिळतो. गोल्डन सोंडपट्टी १५० ते ६५० रुपयांदरम्यान उपलब्ध आहे. याला सोंड झूल असेही म्हणतात. गणपतीच्या पुढ्यात ठेवण्यासाठी मूषक आणि जास्वंदीचे फूल, मोदक, सुपारी, दूर्वा, पान असे पूजा साहित्यही लागते. हे साहित्य स्वतंत्र किंवा एकत्रितही घेता येते. जास्वंदीचे फूल साधारणपणे १३० रुपये, मोदक १०० रुपये, सुपारी ६० रुपये, दूर्वा १०० रुपये, पान १०० रुपये आणि मूषक ३५० रुपये अशा किमतीत हे सर्व साहित्य उपलब्ध आहे.

गणपतीचे कापडी आसन हे ४० रुपयांपासून अगदी २५० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. वेलव्हेटमध्ये लाल, पिवळा, निळा अशा गडद रंगांत हे उपलब्ध आहे. कापडी आणि पुठ्ठ्यांचे फेटेही बाजारात उपलब्ध आहेत. यांच्या किमती १५ रुपयांपासून १५० रुपयांपर्यंत आहेत. गणपतीच्या हातात घालण्यासाठी सोनेरी कडाही उपलब्ध आहे. याच्या किमती २५०-५०० रुपये दरम्यान आहेत. मुळातच देखण्या असलेल्या आपल्या लाडक्या बाप्पाला आणि गौराईला ही विविध आभूषणे अधिक शोभून दिसतात. इतर वस्तूंप्रमाणे गौरी-गणपतींसाठीचे दागिनेदेखील विक्रीसाठी ऑनलाइन उपलब्ध आहेत. ॲमेझॉनवर मुकुट, गळ्यातला हार, कंबरपट्टा, बाजूबंद असा मोत्यांच्या दागिन्यांचा सेट फक्त ८०० रुपयांमध्ये उपलब्ध आहे. शिवाय गौराईसाठीच्या दागिनांच्यादेखील बऱ्याच व्हरायटी ऑनलाइन मिळत आहेत. जर सध्या बाजारातील गर्दीत जाणे टाळायचे असेल तर ऑनलाइन खरेदी हा उत्तम पर्याय आहे.

(लेखात दिलेल्या किमतींत बदल होऊ शकतो.)

सध्या म्हणावा तसा व्यवसाय होत नाही. पुन्हा लॉकडाउन होईल अशी ग्राहक आणि विक्रेत्यांमध्ये भीती असल्याने विक्रेत्यांनीच जेमतेम माल ठेवला आहे. खरेदीला बरेच लांबून लोक येतात म्हणून आम्ही बाकीची काळजीही घेत आहोत. ग्राहकांसाठी सॅनिटायझरही ठेवले असून मास्क लावला असेल तरच दुकानात प्रवेश दिला जातो.
- मनोज मारणे, विक्रेते

आम्ही गौरी-गणपतीसाठी विशेषतः बेन्टेक्स गोल्ड कव्हरिंगच्या दागिन्यांची विक्री करतो. कोणतेही आर्टिफिशियल दागिने साधारण २५० रुपयांपासून पुढे असतात. सध्या पूर्वीसारखा व्यवसाय नसला तरी ७०-८० टक्के तरी व्यवसाय होत आहे. थांबलेली उलाढाल भरून निघत नाहीये. कोरोनाची विशेष भीती लोकांमध्ये दिसत नाहीये, फक्त आर्थिक तंगी असल्याने लोक खरेदीकडे पाठ फिरवत असावेत.
- विदुल केळशीकर, विक्रेते

संबंधित बातम्या