गणेश प्रतिष्ठापना...

मोहन दाते, पंचांगकर्ते
सोमवार, 6 सप्टेंबर 2021

कव्हर स्टोरी

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेश चतुर्थी साजरी केली जाते. हा गणपतीचा पूजोत्सव भारतात सर्वत्र होतो. ही चतुर्थी रविवारी किंवा मंगळवारी आल्यास तिचे माहात्म्य अधिकच असते.

श्रीगणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीची मातीची व रंगीत मूर्ती घरी आणून ‘सिद्धिविनायक’ या नावाने तिची पूजा करतात. घरातील गणेशमूर्ती जास्तीत जास्त एक वीतभर उंचीची आणि आसनस्थ असावी. उजव्या सोंडेचा गणपती कडक आणि डाव्या सोंडेचा सौम्य अशी समजूत करून घेणे चुकीचे आहे. ‘सरळ सोंड वक्रतुण्ड त्रिनयना’, असे समर्थ रामदासांनी म्हटले आहे. पार्थिव गणेश स्थापना करण्याचा भाद्रपद शुद्ध चतुर्थी हा एकच दिवस असल्याने त्या दिवशी जमले नाही तर पुढे कोणत्याही दिवशी स्थापना करता येत नाही. एखाद्या वर्षी काही कारणाने लोप झाल्यास पुन्हा पुढील वर्षी गणपती पूजन करता येते. दुकानातून गणपतीची मूर्ती आठ -पंधरा दिवस आधी आणून घरामध्ये ठेवता येते. श्रीगणेश चतुर्थीच्या आधी एक दिवस किंवा त्याच दिवशी सकाळी मूर्ती आणावयास पाहिजे असे नाही.

पार्थिव गणेश स्थापना व पूजन करण्यासाठी विशिष्ट मुहूर्त नाही. प्रात:कालापासून मध्यान्हापर्यंत कोणत्याही वेळी स्थापना व पूजा करता येते. त्यासाठी विशिष्ट नक्षत्र, योग, विष्टि करण इत्यादी वर्ज्य नाहीत, म्हणून ते पाहू नयेत. गणपतीला एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवितात. या प्रसंगी त्याची दहा नावे गुंफलेला पुढील मंत्र म्हणून त्यास एकवीस दूर्वा अर्पण करतात.

गणाधिप नमस्तेऽस्तु उमापुत्राघनाशन ।

एकदन्तेभवक्त्रे च तथा मूषकवाहन ।।

विनायकेशपुत्रेति सर्वसिद्धिप्रदायक । 

कुमारगुरवे तुभ्यं पूजयामि प्रयत्नतः ।।

हा उत्सव प्रामुख्याने दीड दिवस असतो. म्हणजे गणेशचतुर्थीच्या दिवशी पूजिलेला गणपती दुसऱ्या दिवशी सायंकाळी विसर्जित करतात. कित्येक घरी पाच, सात, नऊ व दहा दिवसही गणपती ठेवून त्याची पूजा करतात. कित्येक कुटुंबात ज्येष्ठा गौरीच्याबरोबर गणपतीचे विसर्जन होते. गौरी विसर्जनाबरोबर गणपती विसर्जन असता तो कितवाही दिवस असताना आणि कोणताही वार असताना त्या दिवशी विसर्जन करता येते. घरामध्ये गर्भवती स्त्री असतानाही गणपती विसर्जन करावे. अशा वेळेस विसर्जन न करण्याची प्रथा चुकीची आहे. 

प्राणप्रतिष्ठा करून बसविलेली मूर्ती उत्तरपूजा करून देव्हाऱ्यातून खाली काढतात व तिचे पाण्यात विसर्जन करतात. वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावे असे नसून पाण्यात विसर्जन करावे असे आहे. त्यामुळे तलावात किंवा स्वतंत्र टॅंकमध्ये, तसेच घरी मोठ्या बादलीमधील पाण्यातसुद्धा विसर्जन करता येते. विसर्जनानंतर ती मूर्ती पाण्यात विरघळणे आवश्यक असल्याने शाडूची किंवा मातीची मूर्ती असावी. प्लॅस्टर ऑफ पॅरिस किंवा तत्सम पाण्यात न विरघळणाऱ्या पदार्थांची मूर्ती नसावी. तसेच मातीची किंवा शाडूची तीन -चार इंच उंचीची लहान मूर्ती आणून त्याची प्राणप्रतिष्ठा करून पूजन करता येईल आणि कोणत्याही धातूच्या मोठ्या मूर्तीचे उत्सव मूर्ती म्हणून पूजन करता येईल आणि आरास करता येईल. पाण्यात विसर्जन मात्र लहान मूर्तीचे करावे आणि धातूची श्रीगणेश मूर्ती पुन्हा शोकेसमध्ये ठेवून द्यावी. स्वातंत्र्यपूर्व काळात गणपती उत्सव सार्वजनिक स्वरूपाचा झाल्यानंतर अनंत चतुर्दशीला उत्सवाचे स्वरूप आले आहे. वास्तविक हा दिवस अनंत पूजन व्रताचा आहे.

गौरी (महालक्ष्मी) पूजन : भाद्रपद महिन्यात अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आवाहन करून ज्येष्ठा नक्षत्राचे दिवशी गौरी पूजन केले जाते आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन केले जाते. काही प्रांतात सप्तमीचे दिवशी आवाहन, अष्टमीला गौरी पूजन करून नवमीला विसर्जन केले जाते.

शाडूचे किंवा पितळी असे देवीचे दोन मुखवटे उभे करून किंवा सुगड / तांब्यावर ठेवून पूजन केले जाते. काही जणांकडे पाच खडे वाटीत ठेवून पूजन केले जाते. यामध्ये श्रावण मासातील शुक्रवारी काही जणांकडे महालक्ष्मी स्थापना केली जाते ती लक्ष्मी व भाद्रपदात अनुराधा नक्षत्रावर आणलेली गौरी अशा ज्येष्ठा /कनिष्ठा म्हणून दोन देवींची पूजा केली जाते. तसेच काही जणांकडे भाद्रपद महिन्यात ज्येष्ठा / कनिष्ठा लक्ष्मी भगिनींची पूजा केली जाते. ती नंतर सोळा दिवस करावयाची असते आणि रोज एक दोरा पूजेत घ्यावयाचा असतो. मात्र सध्याच्या काळात ज्येष्ठा नक्षत्रावर सोळा दिवसांचे प्रतीक म्हणून सोळा गाठी मारलेला तातू पूजेत घेऊन नंतर तो दुसरे दिवशी हातात बांधतात.

या देवीची पूजा, कुलधर्म, कुलाचार पद्धतींमध्ये मोठ्या प्रमाणात विविधता दिसून येते. अनेकांकडे गौरीपुढे नैवेद्य दाखवून तो दिवसभर ठेवून दुसऱ्या दिवशी खाण्याची प्रथा आहे, पण ताट तसेच ठेवून दुसरे दिवशी प्रसाद घेणे योग्य वाटत नाही. कारण कोणत्याही देवतेला नैवेद्य समर्पण केल्याबरोबर त्या देवतेने नैवेद्य स्वीकारलेलाच असतो आणि त्यानंतर लगेच प्रसाद म्हणून तो आपण घेऊ शकतो. गौरी विसर्जनाची मर्यादा काही वेळेस सकाळी लवकर असते अशा वेळेस मंत्रांनी जागेवर गौरीविसर्जन करून घ्यावे आणि नंतर संध्याकाळी प्रथेप्रमाणे आवरून ठेवावे किंवा जलाशयात विसर्जन करावे.

यंदाचे वर्षीदेखील कोरोना साथीमुळे गणेशोत्सवाच्या स्वरूपात काही बदल करावे लागल्यास वरील लेखातील काही महत्त्वाचे विचार याप्रमाणे-

यावर्षी बाजारात जर मूर्ती मिळाली नाही तर स्वतः माती आणून आपल्याला जमेल तशी लहान मूर्ती तयार करावी. उत्सव मूर्ती ही धातूची असली तरी चालते. कारण मुख्य पूजन किंवा प्रत्यक्ष विसर्जन त्या धातूच्या मूर्तीचे नसते, ती वर्षानुवर्षे तशीच वापरता येते. आपण तयार केलेल्या मातीच्या मूर्तीचे पाण्यात विसर्जन करावे. आपण केलेली मूर्ती छोटीच असल्यामुळे तिचे विसर्जन एखाद्या बादलीत शुद्ध पाणी घेऊन त्यात करता येईल. विसर्जन करून माती विरघळल्यावर ते पाणी घरातल्या कुंड्यांमध्येसुद्धा टाकता येते. कित्येक गावात वाहती नदी नसल्यामुळे वरील विसर्जनाची पद्धत अधिक सोयीची होऊ शकते. असे केल्याने विसर्जन स्थळीदेखील गर्दी टाळता येईल. बाजारात मूर्ती न मिळाल्यास या प्रमाणे गणेश उत्सव करता येईल. आजही कित्येकजण स्वतः मूर्ती तयार करून उत्सव करतात आहेतच. पूर्वीच्या काळी बाजारातून मूर्ती आणत नव्हते, जशी जमेल तशी घरीच तयार करून पूजन करीत होते, घरी केलेली मूर्ती पाच ते दहा दिवस टिकेल असा पदार्थ त्यामध्ये न घालता मूर्ती केली असेल तर या वर्षी दीड दिवस गणेशोत्सव करावा. दीड दिवसाचा गणेशोत्सव केल्यावरदेखील परंपरेप्रमाणे महालक्ष्मी / गौरी आवाहन-पूजन करता येते.

बाजारात मूर्ती मिळत असेल तर साधारणपणे एक वीतभर उंचीची मूर्ती पूजेसाठी घ्यावी आणि गणेशोत्सव नेहमी प्रमाणे करावा, ही मूर्तीसुद्धा माती किंवा शाडूची घेण्याचा आग्रह धरावा. तसेच ही मूर्ती ८-१० दिवस आधीपण घरी आणून ठेवता येते. गणेश मूर्ती एक दिवस आधी किंवा त्याच दिवशी आणली पाहिजे असे नाही.

अनेकजण दरवर्षी उत्सवासाठी आपल्या गावी जात असतात. यावर्षी त्यांना गावी जाणे शक्य नसल्यास त्यांनी राहत्या घरी वरील प्रमाणे गणेशोत्सव करून आपली गणेशपूजनाची परंपरा अखंडित ठेवावी. यावर्षी कोरोना संकटामुळे ज्या प्रमाणे अनेक बदल आपण अंगीकारले त्या प्रमाणे गणेश उत्सवातसुद्धा आपणास बदल करावा लागेल, तेव्हा अशा प्रकारे श्रीगणेशाचे पूजन करून त्या विघ्नहर्त्याकडे कोरोनाचे संकट जावे अशी प्रार्थना करू या!

पुढच्या वर्षी श्रीगणेश चतुर्थी बुधवार, ३१ ऑगस्ट २०२२ रोजी आहे.

  • यंदाच्या गणेशोत्सवातील महत्त्वाचे दिवस १० सप्टेंबर २०२१, शुक्रवार ः श्रीगणेश चतुर्थी
  • या दिवशी पहाटे ४:५० पासून दुपारी १:५० पर्यंत कधीही घरगुती गणेशाची स्थापना करता येईल.
  • १२ सप्टेंबर २०२१, रविवार ः गौरी आवाहन
  • सकाळी ९:५० नंतर परंपरेप्रमाणे गौरी आवाहन करावे.
  • १३ सप्टेंबर २०२१, सोमवार ः गौरी पूजन
  • १४ सप्टेंबर २०२१, मंगळवार ः गौरी विसर्जन
  • सकाळी ०७:०५ नंतर गौरी विसर्जन करावे. मंगळवार असला तरीही गौरीविसर्जन परंपरेप्रमाणेच करावे.
  • १९ सप्टेंबर २०२१, रविवार ः अनंत चतुर्दशी

संबंधित बातम्या