सिद्धिविनायकाच्या प्रतिमांचे ‘कलावैभव'

प्रशांत रॉय, नागपूर
सोमवार, 6 सप्टेंबर 2021

कव्हर स्टोरी

श्रीगणरायाच्या मूर्ती व प्रतिमांशी संबंधित असणाऱ्या अनेक दुर्मीळ व कलात्मक वस्तूंचा पिढीजात संग्रह नागपुरातील सातपुते परिवाराकडे आहे. उपराजधानीतील गिरीपेठ भागातील ‘कलावैभव’ वास्तूत त्याचे संवर्धन-जतन केले आहे. देश विदेशातून आणलेल्या श्री विनायकाच्या विविध आकारातील, प्रकारातील, मुद्रांमधील आकर्षक प्रतिमा बघणाऱ्याला मंत्रमुग्ध करतात. 

श्रावण महिन्यात विविध सणांची रेलचेल असते. तेव्हापासून भाविकांना विघ्नहर्ता गणरायाच्या आगमनाचे वेध लागतात. गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू होते. गणरायाच्या सजावट साहित्यांनी बाजारपेठा गजबजू लागतात. यानिमित्ताने ‘श्रीं’ची नानाविध रूपे पाहायला मिळतात. नागपूरमधील चित्रकार - संग्राहक रमेश सातपुते आणि त्यांच्या कुटुंबीयांनी अशाच काही दुर्मीळ, आकर्षक व मनमोहक मूर्तींचे जतन केले आहे. परदेशासह भारतातील विविध राज्यातून सातपुते कुटुंबीयांनी या मूर्ती आणलेल्या, मिळवलेल्या आहेत. ‘कलावैभव’ संग्रहालयातील श्रीगणेशाची प्रत्येक मूर्ती परमानंदाची अनुभूती देते.
सातपुते यांच्या संग्रहातील चांदीच्या भरीव श्रीविघ्नेश्वर मूर्ती व पितळी धातूच्या श्रीलंबोदराच्या प्रतिमा अतिशय सुंदर आहेत. तसेच विभिन्न पाषाणातून सुबक-कोरीव काम केलेल्या श्रीगजमुखाची मूर्ती मन मोहून घेतात. रात्री अंधारात चमकणाऱ्या रेडियमची लंबोदर मूर्तीही आकर्षक आहे. या संग्रहात श्रीगणरायाच्या विभिन्न रूपातील आकर्षक प्रतिमांमध्ये बाल गणेश, ध्यानस्थ गणेश, नृत्य मुद्रेतील गणेश, नटराज मुद्रेतील गणेश, वाद्यवृंदा समवेत श्रीगणेश, श्री गीतारहस्य लिखाण करताना लोकमान्य टिळकांच्या वेषातील गणेश, लॅपटॉपवर अध्ययन करताना श्रीगणेश अशा मूर्तींबरोबरच शंखशिंपल्यांनी तयार केलेली वक्रतुंडाची मूर्ती, आंबा, नीम, 
चिंच, सागवान, नारळ, चंदन अशी विविध झाडांच्या लाकडांमधून कोरलेल्या गणेशमूर्तींचा समावेश आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासूनच्या भटकंती दरम्यान अनेक माध्यमातील, अनेक मुद्रांमधील श्रीविनायकाच्या आकर्षक प्रतिमा विभिन्न ठिकांणांवरून आणून त्यांचे जतन-संवर्धन करणाऱ्या सातपुते परिवारातील चित्रकार शकुंतलाबाई सातपुते, भाग्यलक्ष्मी सातपुते, पुर्णिमा काळे व चित्रकार व सामाजिक कार्यकर्ते रमेश सातपुते या सर्वांना असलेली कलेची जाण, विविध कलाकृती जमविण्याचा छंद आणि भक्तिभावाला या संग्रहाचे सर्व श्रेय द्यावे लागेल. 

श्रीगणेशाच्या प्रतिमा व मूर्तींबरोबरच ‘कलावैभवमध्ये पितळी वस्तू, मूर्ती, भांडी, सिरॅमिक व काचेची विदेशी बनावटीची भांडी, अनेक आकारांचे आणि प्रकारांचे शंख-शिंपले, विभिन्न भारतीय आणि विदेशी भाषांमधील ध्वनिमुद्रिका, तीन आकारातील ध्वनिमुद्रिका (व्हिनाईल रेकॉर्ड्‌स), देश विदेशातील सुगंधी अत्तराच्या विभिन्न आकार व प्रकारातील कुपींचाही संग्रह आहे.

आजोबांचा वारसा
माझे आजोबा ब्रिटिश आर्मीत सर्जन होते. त्यामुळे देशातील विविध भागात त्यांना भेट देता आली. भटकंतीचा हाच वारसा पुढे आई-वडील आणि मी व माझ्या बहिणींनी चालवला. जेथे श्रीगणेशाची सुंदर, वेगळे वैशिष्ट्ये असलेली मूर्ती दिसेल ती आपल्या संग्रही असावी असा प्रयत्न असतो. काही मूर्ती परदेशातूनही भेट मिळाल्या आहेत. आमच्या राहत्या घरीच याचा संग्रह केला आहे. माझ्या भगिनींसह मी दिवसरात्र या प्रतिमांच्या स्वच्छतेविषयी, त्या खराब होऊ नये यासाठी प्रयत्नरत असतो. दररोज भाविक, पर्यटक या संग्रहालयाला भेट देण्यास येतात.  
- रमेश सातपुते

फोटो फीचर

संबंधित बातम्या