गौरी-गणपतीच्या निमित्तानं

राजेंद्र अत्रे
सोमवार, 6 सप्टेंबर 2021

कव्हर स्टोरी

गणेशोत्सवात विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जायच्या. वेगवेगळ्या विषयावर व्याख्यानं व्हायची. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत त्याचा खूप मोठा फायदा व्हायचा.

भारतीय हवामान, पर्जन्यमान, ऋतुमान, पीकमान, प्रादेशिकता,  भौगोलिकता, आहार विज्ञान इत्यादी बाबतचे सखोल चिंतन आपल्या कृषिप्रधान संस्कृतीच्या रचनेत ठासून भरलेलं आहे. आपली दैनंदिन जीवन जगण्याची शैली, आहार-विहार इत्यादी बाबी त्यावरच अवलंबून आहेत आपल्या सणावारांचाही त्यात समावेश आहे. एकमेकांच्या आऱ्या एकमेकात गुंतून अखंड फिरणारं हे चक्र आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आजपर्यंत हे चक्र सुरक्षितपणे फिरत आलं आहे. यात जीवनाचं पोषण करणाऱ्या निसर्गातल्या पंचमहाभूतांचा खूप मोठा सन्मान केलेला आहे. त्यांचं ऋणही व्यक्त केलं गेलं आहे. 

आपल्या सणावारात पोळ्याच्या सणापासून सणांची गर्दी सुरू होते. ग्रामीण भागात म्हणूनच म्हण आहे, ‘पोळा आणि सण झाले गोळा’. आमच्या लहानपणी तर दिवाळीची चाहूल पोळ्यापासूनच लागायची. लहान मुलांसह थोरांमध्येही या सणांचा उत्साह असायचा. त्यावेळी आजच्यासारखी करमणुकीची किंवा मनोरंजनाची इतर काहीच साधनं नव्हती. सण-वार, उत्सव हेच दैनंदिन जीवनातलं नावीन्य असायचं. सणांमुळे जगण्यात एक प्रकारचं नवचैतन्य आलेलं असायचं. त्यावेळी, ऊठसूट इतर गावी जाणं, प्रवास करणं नव्हतं. गाव हेच गावाचं विश्व असायचं आणि हे विश्व आनंदानं भरून गेलेलं असायचं.‌

आपल्या गणेशोत्सवाची परंपरा तशी खूप जुनी आहे. असं सांगितलं जातं की व्यासमुनी सांगत असलेले महाभारत लिहून घेण्याची जबाबदारी त्यांनी श्रीगजाननावर सोपवली होती. महाभारत कथा लिहून घेत असताना गणपतीच्या अंगाचा दाह व्हायला लागला म्हणून गणपतीच्या अंगावर मातीचा लेप चढविण्यात आला. नंतर दाह कमी झाल्यानंतर तो लेप गळून पडला म्हणजेच विसर्जित झाला. तेव्हापासून गणपती मूर्ती करणे व विसर्जित करणे ही पद्धत सुरू झाली आणि त्याचाच हा उत्सव झाला. 

लहानपणी शाळेत गणपती बसवले जायचे. सकाळी -संध्याकाळी त्या गणपतीची आरती व्हायची. चुरमुऱ्याचा नैवेद्य दाखवला जायचा. नारळ फोडला जायचा. प्रसाद म्हणून आम्हाला मूठभर चुरमुरे आणि एक खोबऱ्याचा तुकडा मिळायचा. त्यात डाळे -शेंगदाणे असं काही नसायचं. त्या कुरकुरीत चुरमुऱ्याची आणि खोबऱ्याच्या तुकड्यांची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे.

घरोघरीही गणपती बसवले जायचे. आम्ही गणपती बघायला घरोघर जायचो. त्यावेळी गणपतीला आत्ताच्याप्रमाणे विशेष अशी काही सजावट नसायची. तरीपण रंगीत कागदाचे रंगीबेरंगी पंखे, छोट्या मण्यांचे स्त्रियांनी विणून केलेले कासव, राधाकृष्ण, मोर असलेले विविध प्रकारचे पडदे, आंब्याचे फाटे, कर्दळी अशा वस्तूंनी सजावट केली जायची.

त्याकाळात गणपतीच्या मूर्ती बाहेर विकत मिळत नसायच्या. मूर्ती घरीच तयार केल्या जायच्या. पोळा संपला की लगेच दुसऱ्या दिवसापासूनच गणपतीच्या मूर्तीची तयारी सुरू व्हायची. त्या मूर्ती शाडूच्या असायच्या. काही जण मातीच्याही मूर्ती करायचे. पण त्याचं प्रमाण अत्यल्प असायचं. जे मातीची मूर्ती करत, त्यांनी पोळ्याच्या वेळी बैलांच्या मूर्ती करतानाच ती तयार केलेली असायची. या मूर्ती करण्याचीही एक विशिष्ट पद्धत होती. माती आणून कुटूनकुटून बारीक करून मग त्याचा चिखल करायचा. त्यात कापूस घालून तो चिखल खूप कुटून एकजीव करायचा. मग त्याचे चिखलाचे गोळे करून ते माळवदाच्या खांडावर फेकून मारायचे. ते गोळे तिथं चिकटून बसत. दोन-तीन दिवस ते तसेच राहू द्यायचे. नंतर ते काढून घ्यायचे. ते किंचित सुकलेले असत. त्यात थोडं पाणी घालून ते कुटायचे. आता तो चिखल लोण्यासारखा मऊशार झालेला असायचा. त्याच्या मूर्ती केल्या जायच्या. मूर्ती करताना डोके, हात-पाय जोडण्यासाठी सांध्यांच्या ठिकाणी काड्यांचा वापर केला जायचा. त्यामुळं मूर्तीत एकजीवता यायची. शाडूच्या मूर्तीही त्याच पद्धतीने केल्या जायच्या. फक्त शाडूचा चिखल खांडावर मारून चिकटवून ठेवीत नसत, कारण त्यासाठी कालावधी कमी असायचा.

पुढे हायस्कूल, कॉलेजसाठी शहरात आल्यावर गणेशोत्सवाचं वेगळं रूप बघायला मिळालं. गणेशोत्सवात विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जायच्या.  वेगवेगळ्या विषयांवर व्याख्यानं व्हायची. संगीताचे कार्यक्रम व्हायचे. नाटकं बसवली जायची. दैनंदिन अभ्यासाव्यतिरिक्त या वेगळ्या उपक्रमांबाबत विद्यार्थ्यांमध्ये आकर्षण असायचं. आनंद असायचा. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत त्याचा खूप मोठा फायदा व्हायचा. आजही हे उपक्रम होतात, पण त्यात उत्सवी स्वरूप आणि दिखाऊपणाच अधिक प्रमाणात आला आहे. त्यातील गुणवत्ता आणि खिलाडूवृत्ती काहीशी कमी होत जाताना दिसते आहे.

गणेशोत्सवाच्या दहा दिवसात येणारा सण म्हणजे गौरी आगमन. म्हणजेच महालक्ष्मी. हा सण आजही घरोघरी मोठ्या भक्तिभावानं साजरा केला जातो. त्यातील भक्तीभावाचा पाया म्हणजे निसर्गातल्या शक्तीविषयीची कृतज्ञता व ऋण व्यक्त करणे हाच समजला जातो.

लक्ष्मी म्हणजे विष्णूपत्नी व गौरी म्हणजे पार्वती. महालक्ष्मीची पूजा धन-धान्याच्या स्वरूपात व पार्वतीची पूजा पृथ्वीमातेच्या स्वरूपात मानली जाते. सौभाग्य धन-धान्य समृद्धी व आनंद याचे वरदान महालक्ष्म्यांना मागितले जाते. अनुराधा, ज्येष्ठा आणि मूळ या तीन नक्षत्रांवर तीन दिवस महालक्ष्मीचे पूजन केले जाते. मूळ नक्षत्रावर विसर्जन केले जाते. ही नक्षत्रे खडतर समजली जातात. म्हणून महालक्ष्म्यांची खूप काळजी घेतली जाते. महालक्ष्मी पुढे खूप मोठी सजावट व खूप छान आरास केली जाते.

महालक्ष्म्यांच्या पोटात धनधान्य व लाडू करंज्या ठेवल्या जातात. केल्या जाणाऱ्या आराशीतही धान्याच्या राशी,  पक्वान्नांचा, सोन्यानाण्याचा समावेश असतो. आपल्या सर्व समृद्धीचीच जणू ही पूजा असते. महालक्ष्म्यांच्या मांडणीत आपापल्या परंपरेनुसार वैविध्य असते. तीन दिवसातल्या मधल्या दिवशी महालक्ष्म्यांना महानैवेद्य दाखवला जातो. त्यात पंचपक्वान्ने व सोळा रानभाज्यांचा समावेश असतो. ह्या तीन दिवसांत ग्रामीण भागात सर्व व्यवहार ठप्प झालेले असतात. जणू सर्वजण महालक्ष्म्यांच्या पूजेत एकाग्रतेने तल्लीन झालेले असतात.               

आज रोषणाईसाठी आणि सजावटीसाठी अनेक साधने उपलब्ध आहेत पण आमच्या लहानपणी अतिग्रामीण भागात त्यावर खूप मर्यादा होत्या. तीन दिवस समयांचा मंद प्रकाश मनाला उल्हसित करायचा. त्यात सजावटीच्या फुलांचा कापूर -उदबत्तीचा आणि ओल्या पानांचा मंद सुगंध भरलेला असायचा. लाडू -करंज्या, चकल्या खायला मिळायच्या. छोटी दिवाळीच असायची ती. महालक्ष्म्यांचे राखण करीत बसायची जबाबदारी मुलांवर असायची. महालक्ष्म्यांच्या पोटात तळलेले पदार्थ ठेवलेले असल्याने कुत्र्या -मांजरांचा धक्का लागण्याची भीती असायची. असं काही झाल्यास तो अपशकून समजला जायचा. अशा अपशकुनाचे काही किस्सेही मी ऐकले आहेत. 

या काळात पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असायचा. त्यामुळे शेतीची कामंही ठप्प झालेली असायची. वातावरण कुंद असायचं. अशा दिवसात आहारही पौष्टिक असावा, तळलेले पदार्थ खाल्ल्यानं शरीरात उष्णता निर्माण होते, इत्यादी आहारविज्ञानाचाही विचार यात आलेला दिसतो. सामाजिक एकता आणि प्रेमवृद्धीही या सणाचा पाया ठरतो. हळदी -कुंकुवासाठी सुवासिनी गावात एकमेकींच्या घरी जायच्या. सुवासिनींना एकमेकींच्या घरी जेवायला सांगितलं जायचं. त्यासाठी ‘नाही’ हा शब्दच नसायचा. कोणाची कोणाशी भांडणं नसायची. पूर्वीची काही असली तरी ती मिटवली जायची. पुन्हा नव्यानं सगळे एकत्र यायचे आणि एक दिलानं पुढचा काळ आनंदी व्हायचा. म्हणून मी सुरुवातीलाच म्हटलं आहे की, आपल्या भारतीय कृषीसंस्कृतीतील सणावारात सर्व प्रकारचा विचार झाला असून तो खूप मोलाचा आहे. ह्या परंपरा जतन करणं आणि त्याकडं सकारात्मकतेनं आणि डोळसपणे पाहणं हे आपलं कर्तव्य आहे. आपल्या सगळ्याच सणांना खूप मोठा अर्थ आहे. पण गौरी-गणपतीच्या निमित्ताने तूर्त एवढंच.

संबंधित बातम्या