बाप्पासाठी नैवेद्य

सुजाता नेरूरकर
सोमवार, 6 सप्टेंबर 2021

कव्हर स्टोरी

गणपती दीड दिवसाचा असो अथवा दहा दिवसांचा, जेवढे दिवस असतो तेवढे दिवस त्याचे लाड होतातच. गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो. बाप्पाच्या नैवेद्यासाठी काही वेगळ्या पदार्थांच्या रेसिपीज... 

कंदी पेढे

साहित्य : दोन कप मिल्क पावडर, ४ टेबलस्पून साजूक तूप, अर्धा कप दूध (अर्ध्या कपाला थोडेसे कमी घ्यावे, म्हणजे साधारणपणे २ टेबलस्पून), पाव टीस्पून वेलची पावडर व जायफळ, अर्धा कप बुरा शक्कर (तगार).
कृती : नॉनस्टिक पॅन गरम करून त्यामध्ये २ टेबलस्पून तूप गरम करावे. त्यामध्ये मिल्क पावडर घालून मिक्स करावी. मंद विस्तवावर थोडा ब्राऊन रंग येईपर्यंत गरम करून घ्यावे. मिल्क पावडर सारखी हलवत राहावी, नाहीतर पेढ्याला करपट वास येऊ शकतो. मधून मधून १-१ टेबलस्पून तूप घालून मिक्स करावे. मिल्क पावडरला ब्राऊन रंग आल्यावर त्यामध्ये अर्धा कप दूध मिक्स करून विस्तव बंद करावा. दूध घालताना एकदम सर्व दूध घालून नये, थोडे थोडे दूध घालून मिक्स करावे. मग मिश्रण एक प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवावे. मिश्रण थंड झाले की एकदा मिक्सरमध्ये ग्राइंड करावे. त्यामध्ये तगार, वेलची पावडर, जायफळ पावडर घालून एकदा मिक्सरमध्ये थोडेसे ग्राइंड करावे. म्हणजे सर्व छान एकजीव होईल. किंवा हाताने चांगले मळून घ्यावे. जास्त कोरडे वाटले तर अजून १ टेबलस्पून तूप घालून मळावे. एका प्लेटमध्ये थोडे तगार घ्यावे. मग मळलेल्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून प्लेटमधील तगारमध्ये घोळवावेत. सर्व पेढे करून झाले की डब्यात भरून ठेवावेत.

शेवयांची बर्फी
साहित्य : पन्नास ग्रॅम बारीक शेवया (भाजलेल्या), १ टेबलस्पून तूप, अर्धा लिटर दूध, अर्धा कप साखर,
पाव कप डेसिकेटेड कोकोनट, २ टेबलस्पून मिल्क पावडर, अर्धा टीस्पून वेलची पावडर, ६-७ बदाम व पिस्ते (तुकडे करून), १ टीस्पून पिठीसाखर.
कृती : शेवया थोड्या कुस्करून घ्याव्यात. ड्रायफ्रूटचे तुकडे करावेत. एका पॅनमध्ये तूप गरम करून कुस्करलेल्या शेवया घालाव्यात. २ मिनिटे भाजून बाजूला ठेवावे. मग डेसिकेटेड कोकोनट मिनीटभर भाजून बाजूला ठेवावे. पॅनमध्ये दूध गरम करून ५-७ मिनिटे उकळावे. मग त्यामध्ये साखर घालून ३-४ मिनिटे उकळावे. आता त्यामध्ये भाजलेल्या शेवया व डेसिकेटेड कोकनट घालून मिक्स करावे. थोडे घट्ट होईपर्यंत आटवावे. मग त्यामध्ये मिल्क पावडर व वेलची पावडर घालून मिक्स करावे व विस्तव बंद करावा. एका स्टीलच्या प्लेटला किंवा ट्रेला तूप लावून त्यामध्ये मिश्रण काढावे. मिश्रण एकसारखे थापून वरून ड्रायफ्रूटने सजवावे. थंड झाल्यावर वड्या कापून डब्यात भराव्यात.
टिप : या वड्या लवकर संपवाव्यात.

गव्हाच्या पिठाचे पेढे

साहित्य : एक कप गव्हाचे पीठ, अर्धा कप पिठीसाखर किंवा बुरा शक्कर, ४ टेबलस्पून साजूक तूप किंवा वनस्पती तूप, ३ टेबलस्पून मिल्क पावडर, पाव टीस्पून वेलची पावडर, थोडेसे जायफळ पावडर, सजावटीसाठी २ टेबलस्पून बुरा शक्कर.
कृती : प्रथम बुरा शक्कर तयार करून घ्यावी, बुरा शक्कर नसेल तर पिठीसाखर करून घ्यावी. एका नॉनस्टिक पॅनमध्ये गव्हाचे पीठ मंद विस्तवावर गुलाबी रंग येईपर्यंत भाजावे. गव्हाच्या पिठाला गुलाबी रंग आला की त्यामध्ये २ टेबलस्पून साजूक तूप घालून थोडेसे भाजून घ्यावे. परत १ चमचा तूप घालून परतावे. शेवटी १ टेबलस्पून तूप मिक्स करावे. त्यामध्ये मिल्क पावडर घालून परत थोडे परतावे. मिल्क पावडरचासुद्धा रंग बदलला पाहिजे. मग विस्तव बंद करून मिश्रण कोमट होऊ द्यावे. गव्हाचे पीठ कोमट झाले की त्यामध्ये पिठीसाखर किंवा बुरा शक्कर, वेलची पावडर, जायफळ पावडर घालून मिक्स करावी व त्याचे छोटे छोटे गोळे करावेत. एक गोळा घेऊन बुरा शक्करमध्ये घोळवून घ्यावा. अशा प्रकारे सर्व गोळे करून साखरेमध्ये घोळवावेत व डब्यात भरून ठेवावेत.

गूळ व गव्हाच्या पिठाचे गुलगुले

साहित्य : एक कप गव्हाचे पीठ, २ टेबलस्पून रवा, १ टेबलस्पून दही, पाव कपापेक्षा थोडासा जास्त गूळ (किसून), १ टीस्पून बडीशेप (कुटून), अर्धा टीस्पून वेलची पावडर, मीठ चवीनुसार, अर्धा कप पाणी, तेल गुलगुले तळण्यासाठी. 
कृती : प्रथम गूळ किसून घ्यावा. बडीशेप थोडी जाडसर कुटून घ्यावी. एका बाऊलमध्ये गव्हाचे पीठ, रवा, दही, बडीशेप, वेलची पावडर, गूळ व मीठ मिक्स करावे. त्यामध्ये हळूहळू अर्धा कप पाणी घालून मिक्स करावे. गुठळ्या राहता कामा नयेत. मग १० मिनिटे तसेच झाकून ठेवावे. 
एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये तयार केलेले मिश्रण चमच्याने घालावे. वरून झाऱ्याने तेल शिंपडावे म्हणजे गुलगुले छान फुलून येतील. दोन्ही बाजूंनी मस्तपैकी थोडा ब्राऊन रंग येईपर्यंत तळावे. गरम गरम गुलगुले सर्व्ह करावेत.

शेंगदाण्याची काजू कतली
साहित्य : एक कप शेंगदाणे, १२-१५ काजू, १ कप साखर, १ टेबलस्पून मिल्क पावडर, अर्धा टीस्पून वेलची पावडर किंवा ४-५ ड्रॉप रोज इसेन्स, १ टीस्पून पिठीसाखर, १ टीस्पून तूप पेपरला लावायला.
कृती : प्रथम शेंगदाणे मंद विस्तवावर भाजून घ्यावेत. पण भाजताना त्याच्यावर काळे डाग येणार नाहीत याची काळजी घ्यावी. शेंगदाणे भाजून झाल्यावर त्याचे साल काढून टाकावे. मिक्सरच्या भांड्यात भाजलेले शेंगदाणे व काजू बारीक वाटून घ्यावेत. कढईमध्ये एक कप साखर व अर्धा कप पाणी घेऊन मंद विस्तवावर एकतारी पाक करावा. साखरेच्या पाकात ग्राइंड केलेले शेंगदाणे व काजू घालून मंद विस्तवावर परत थोडे घट्ट होईपर्यंत ठेवावे. थोडे घट्ट व्हायला आले की मिल्क पावडर, वेलची पावडर घालून मिक्स करावे. मिश्रण थोडे घट्ट झाले की विस्तव बंद करावा. जर मिश्रण थोडे सैल वाटले तर एक टीस्पून पिठीसाखर घालून चांगले मिक्स करावे. एका प्लॅस्टिकच्या पेपरला तुपाचा हात लावून तयार झालेले मिश्रण त्यावर घालून लाटण्यानी थोडे जाडसर लाटावे. मग त्याच्या शंकरपाळीसारख्या वड्या कापाव्यात. थंड झाल्यावर डब्यात भराव्यात.

स्वीट कॉर्न मोदक

साहित्य : 
सारणासाठी : दोन कप स्वीट कॉर्न (किसून), पाव कप तूप, २ कप दूध, १ कप साखर, १ टीस्पून वेलची पूड, पाव टीस्पून केशर (दुधात भिजवून).
आवरणासाठी : दोन कप मैदा, अर्धा कप रवा, पाव कप तूप (गरम), तूप मोदक तळण्यासाठी.
कृती : 
सारणासाठी : एका कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये किसलेले स्वीट कॉर्न घालावेत. रंग बदलेपर्यंत परतून घ्यावे. मग त्यामध्ये दूध व साखर घालून घट्ट होईपर्यंत आटवावे. नंतर त्यामध्ये वेलची पूड व केशर घालून मिक्स करून मिश्रण थोडे कोरडे करून घ्यावे. मग त्याचे एकसारखे २० गोळे करावेत. 
आवरणासाठी : मैदा, रवा व कडकडीत तुपाचे मोहन एकत्र करून घट्ट पीठ मळावे व २० मिनिटे बाजूला ठेवावे. मग त्याचे २० एकसारखे गोळे करावेत. एक एक गोळा घेऊन पुरीसारखा लाटावा. त्यामध्ये एक कॉर्नचा गोळा ठेवून पुरीला मोदकाचा आकार द्यावा. असे सर्व मोदक करावेत. कढईमध्ये तूप गरम करून मोदक गुलाबी रंग येईपर्यंत तळावेत.

बिना खव्याचे गुलाबजाम

साहित्य : एक टेबलस्पून तूप, १ कप बारीक रवा, दीड कप दूध, १ टीस्पून साखर, तेल गुलाबजाम तळण्यासाठी.
पाक करण्यासाठी : एक कप साखर, दीड कप पाणी, १ टीस्पून वेलची पूड.
कृती : एका पॅनमध्ये तूप गरम करायला ठेवावे. तूप गरम झाले की त्यामध्ये बारीक रवा मिक्स करावा व मंद विस्तवावर ७-८ मिनिटे भाजावा. मग त्यामध्ये हळूहळू दूध मिक्स करून त्यामध्ये एक चमचा साखर घालावी. रवा मंद विस्तवावर चांगला शिजू द्यावा. दुसऱ्‍या एका भांड्यात एक कप साखर व दीड कप पाणी घालून एकतारी पाक करायला ठेवावा. पाक तयार झाला की त्यामध्ये वेलची पावडर मिक्स करून विस्तव बंद करावा. मग शिजलेला रवा एका प्लेटमध्ये काढावा. कोमट झाला की चांगला मळून घ्यावा. मळलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्यावेत. जाड बुडाच्या कढईमध्ये तेल गरम करायला ठेवावे. तेल गरम झाले की त्यामध्ये छोटे छोटे गोळे ब्राऊन रंग येईपर्यंत तळावेत. साखरेचा पाक गरम करायला ठेवून त्यामध्ये तळलेले गोळे घालावेत व दोन मिनिटे गरम करावे. मग एक तास तसेच झाकून बाजूला ठेवावे म्हणजे ते पाकामध्ये छान मुरतील. नंतर सर्व्ह करावेत.

होम मेड म्हैसूरपाक
साहित्य : एक कप बेसन, अर्धा कप तेल, अर्ध्या कपापेक्षा थोडे जास्त साजूक तूप, १ कप साखर, पाव टीस्पून बेकिंग सोडा, १ कप पाणी.
कृती : सर्वप्रथम बेसन चाळून घ्यावे. मग एका जाड बुडाच्या कढईमध्ये साखर व पाणी घालून मिक्स करून मंद विस्तवावर साखर पूर्ण विरघळवून घ्यावी. दुसऱ्या एका कढईमध्ये तूप व तेल गरम करायला ठेवावे. (तुम्हाला फक्त तूप वापरायचे असेल तरी चालेल) एका स्टीलच्या प्लेटला तुपाचा हात लावून ठेवावा. साखर पूर्ण विरघळली की त्यामध्ये हळूहळू थोडे थोडे बेसन घालावे व सारखे हलवत राहावे, गुठळी होता कामा नये. बेसन मिक्स करून झाले की त्यामध्ये ४-५ वेळा थोडे थोडे करून गरम तेल-तूप घालत राहावे व मिश्रण हलवत राहावे. जेव्हा मिश्रण थोडे घट्ट होऊन कढईमध्ये तेल-तूप सुटायला लागेल तेव्हा विस्तव बंद करावा. तयार झालेले मिश्रण लगेच तूप लावलेल्या प्लेटमध्ये ओतावे. १० मिनीट तसेच ठेवावे व मग त्याच्या वड्या कापाव्यात. म्हैसूरपाक पूर्ण थंड झाल्यावर स्टीलच्या डब्यात भरून ठेवावा. 
टिप ः ही थोड्या मऊ म्हैसूरपाकाची पाककृती आहे. तुम्हाला कडक हवा असेल तर मिश्रण अजून थोडे आटवावे.

रवा नारळ वड्या

साहित्य : दोन कप बारीक रवा, १ कप ओला नारळ (खवून), २ टेबलस्पून साजूक तूप, १ टीस्पून वेलची जायफळ पूड, ३ कप साखर. 
कृती : एका कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये बारीक रवा मंद विस्तवावर गुलाबी रंग येईपर्यंत भाजावा. रवा जास्त भाजू नये. रवा भाजत आला की त्यामध्ये ओला खोवलेला नारळ घालून परत २-३ मिनिटे भाजावे. रवा भाजून होईपर्यंत एका जाड बुडाच्या भांड्यात साखर व पाणी घेऊन पाक करायला ठेवावा. पाक होईपर्यंत रवा भाजून होतो. पाक एकतारी करावा. पाक झाला की विस्तव बंद करून पाकामध्ये भाजलेला रवा मिक्स करावा. मिश्रण थंड करायला ठेवावे. अधूनमधून मिश्रण हलवत राहावे. मिश्रण थोडे कोमट असताना त्याच्या वड्या कापून घ्याव्यात.
टिप : रवा वडी करताना रवा जास्त भाजू नये कारण बारीक रवा पटकन भाजला जातो. तसेच वड्यासुद्धा छान पांढऱ्‍या होतात, म्हणजे अगदी खव्याच्या बर्फीसारख्या दिसतात. नारळाऐवजी आपण खवासुद्धा वापरू शकतो.

बटरस्कॉच मिठाई
साहित्य : दोन टेबलस्पून साजूक तूप, १ कप मैदा, पाऊण कप साखर, १ टेबलस्पून मिल्क पावडर, १ टेबलस्पून टुटीफ्रुटी, ४-५ थेंब बटरस्कॉच इसेन्स.
कृती : एका पॅनमध्ये तूप गरम करावे. मग त्यावर मैदा घालून ५ मिनिटे मंद विस्तवावर भाजावेत. मैदा भाजून झाल्यावर एका प्लेटमध्ये काढावा. पॅनमध्ये साखर व अर्धा कप पाणी घेऊन दोनतारी पाक करावा. पाक झाला की त्यामध्ये भाजलेला मैदा घालावा व घट्ट होईपर्यंत गरम करावे. मग त्यामध्ये मिल्क पावडर, बटरस्कॉच इसेन्स व टुटीफ्रुटी घालून थोडे आणखी गरम करावे. एका स्टीलच्या प्लेटला तूप लावावे व त्यामध्ये मिश्रण काढून एकसारखे थापावे. थंड झाल्यावर त्याच्या वड्या कापाव्यात.

नारळाचे झटपट मोदक

साहित्य : एक कप डेसिकेटेड कोकनट, अर्धा कप मिल्क पावडर, २ टेबलस्पून दूध, २ टेबलस्पून पिठीसाखर, अर्धा टीस्पून वेलची पावडर, १ टेबलस्पून टुटीफ्रुटी, ७-८ केशर काड्या.
कृती : प्रथम केशर एक चमचा दुधामध्ये भिजत ठेवावे. एका बाऊलमध्ये डेसिकेटेड कोकनट, मिल्क पावडर, पिठीसाखर, वेलची पावडर, टुटीफ्रुटी, केशर दूध घालून मिक्स करावे. नंतर अजून एक टेबलस्पून दूध घालून मिश्रण चांगले मळून घ्यावे. मिश्रणाचे दोन भाग करावेत. एका भागाचा गोल किंवा चौकोनी रोल करावा. मग फॉईल पेपरमध्ये किंवा प्लॅस्टिक पेपरमध्ये रोल घट्ट बांधून फ्रीजरमध्ये १० मिनिटे ठेवावा. १० मिनिटे झाल्यावर प्लॅस्टिक पेपर किंवा फॉईल पेपर काढून त्याचे एक सारखे तुकडे कापून घ्यावेत. दुसरा भाग घेऊन त्याचे एक सारखे ५ गोळे करावेत व त्याला मोदकाचा आकार द्यावा.

संबंधित बातम्या