क्वारंटाईनचे वरदान

हेमा देवरे
सोमवार, 18 जानेवारी 2021

विशेष

डिसेंबरचा महिना! दिल्लीत कोविड, प्रदूषण आणि थंडी यांचा कहर चालू असताना सिंगापूरहून लेकीचा फोन आला आणि तिने तिथे येण्याचा प्रस्ताव मांडला...

‘‘सिंगापूर, छे, छे! भारतातून सिंगापूरला कोणत्याही फ्लाईट्स जात नाहीत. तिथे यायला भारतीयांना परवानगीच मिळत नाही आणि मिळालीच तर १४ दिवसांचे कडक क्वारंटाईन! आम्ही आपले पुण्याला जाऊ.’’

‘‘म्हणजे आगीतून फुफाट्यात. पुणे इतके दिवस कोविड नं. एक होते.’’

‘‘अगं, बाकी लोक भारतात राहतातच ना? आम्ही पण राहू.’’

‘‘ते काही नाही! जगातल्या सर्वात सुरक्षित जागी तुम्ही येणार आहात.’’ फायनल व्हर्डिक्ट आले आणि आठवडाभरात आमची परवानगी आली हे सांगायला तिचा फोनही आला.

‘पंधरा दिवसांची मुदत आहे. तेवढ्यात यावे लागेल नाहीतर परवानगी रद्द!’ हाही फतवा आला. पण विलगीकरणाचे काय? तिथे चौदा दिवस हॉटेलच्या बंद खोलीत राहावे लागते. दरवाजा बंद झाला की बाहेरच्या जगाशी संपर्क संपला, मग आत तुमचे काही का होईना. खिडकीसुद्धा उघडता येत नाही. अशी सर्व माहिती मिळालेली. मला एव्हाना रक्तदाब वाढल्याची चिन्हे जाणवू लागली होती.

या सगळ्यावर अमेरिकेत राहणाऱ्या जावयाची मुक्ताफळे उधळून झाल्यावर दुसऱ्या जावयाची त्यावरही कडी! ‘‘हम तुम एक कमरे में बंद हो और चाबी खो जाए - असे समजा आणि बॉबीतल्या नायक-नायिकेसारखे चौदा दिवस मजेत राहा.’’

‘‘अगं दुसरा, (तिसरा, चौथा की पाचवा?) हनिमून साजरा करा. अशी संधी परत परत थोडीच मिळते? तरी बरे, तुम्ही दोघे बरोबर आहात.’’ मैत्रिणीचा अनाहूत सल्ला.

मला धाप लागल्यासारखे होत होते, त्याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नव्हते. ‘‘हे सर्व मानसिक आहे. मी त्यांना बाल्कनी असलेली खोली द्यायला विनंती करते, मिळेल याची शाश्वती नाही.’’ मुलीचा संयम सुटत चालला होता. हो, ना करता करता शेवटी सिंगापूरला जायचा निर्णय झाला. नशिबाने त्या १५ दिवसांतली एअर इंडियाची ‘बबल’ फ्लाईट मिळाली. म्हणे ७२ तास आधी कोविडची टेस्ट करा. एक तास पण पुढे मागे चालणार नाही. आयसीएमआरची मान्यता असलेलीच लॅब हवी. लॅबकडून आरटीपीसीआरच्या चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट आणि तोही पासपोर्ट नंबर आणि जन्मतारखेसकट हवा. यात काहीही गल्लत झाल्यास विमानतळावरून परत पाठवण्यात येईल.

...आणि तसे खरेच व्हायची वेळ आली होती. दिल्लीतल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुकशुकाट होता. एअर इंडियाच्या काउंटरवर थोडेफार लोक होते. प्रत्येक व्यक्तीची अर्धा अर्धा तास छाननी चालू होती. बरोबरच्या कागदपत्रातला शब्द न शब्द तपासला जात होता. मला आमच्या कम्युनिस्ट रशियातल्या वास्तव्याची आठवण झाली. साध्या पोहायच्या तलावात शिरण्यापूर्वीसुद्धा अशीच कसून चौकशी व्हायची. एव्हाना त्या ड्युटी अधिकाऱ्याने आम्हाला थांबवले होते.

‘‘तुमच्या चाचणीला ७२ तास उलटून गेले आहेत. तुम्ही सिंगापूरला जाऊ शकत नाही.’’ ते ऐकून माझ्या छातीचा ठोका चुकला.

‘‘कसे शक्य आहे? आम्ही तास मोजून त्याप्रमाणे चाचणी केली होती.’’ काउंटरवरचा अधिकारी गणितात कच्चा असावा. अजूनही विमान सुटायला दोन तास बाकी आहेत, तोपर्यंत आमचे ७२ तास होत नाहीत, हे त्याला पटवून देता देता नाकी नऊ आले. शेवटी जवळचा राजनैतिक पासपोर्ट परत एकदा दाखवला आणि मग फारशी वादावादी न करता त्याने पुढे जाऊ दिले. 

एअर इंडियाचे विमान बऱ्यापैकी भरलेले होते. दिल्लीहून निघालेले विमान चेन्नईला थांबले. तिथे प्रवाशांना घेऊन मजल, दरमजल करीत सिंगापूरला पोहोचले. विलगीकरणाची भरलेली धडकी डोळ्याला डोळा लागू देत नव्हती. त्यातून, तुमची अवस्था आता पिंजऱ्यातल्या पक्ष्यासारखी होणार असा आशीर्वाद नणंदेकडून प्रवासाला निघण्यापूर्वीच मिळालेला! त्याने तर उरली सुरली झोप पळाली होती.

रात्री निघून सकाळी सिंगापूरच्या विमानतळावर पोहोचलो. तिथेही तुरळक माणसे होती. सर्व ड्युटी फ्री दुकाने उघडी होती, पण त्यात कुठे औषधालाही माणूस नव्हता. इमिग्रेशन पार करून सामान हाती आल्यावर एयर इंडियाच्या सर्व प्रवाशांना रांगेत उभे करण्यात आले. तुरुंगात नेण्यापूर्वी कैद्यांना असेच उभे करत असतील असेही वाटून गेले. इमिग्रेशन खात्याने बसेसची सोय केली होती. विलगीकरणाच्या प्रवाशांना त्यात भरून वेगवेगळ्या हॉटेलांमध्ये नेण्यात येत होते. प्रत्येक बसमध्ये एक मख्ख चेहऱ्याचा अधिकारी होता. तो सर्व कागदपत्रे परत परत तपासत होता. तुमच्या वाट्याला कोणते हॉटेल येणार ते तिथे पोचेपर्यंत कळत नसे. चौदा दिवसांच्या विलगीकरणाचे पैसेही ते प्रवाशांनाच लावतात म्हणे. आमचे भवितव्य ठरवणाऱ्या हॉटेलपाशी बस येऊन थांबली. आमच्याबरोबर अजून चार-पाच उतारू होते. सर्वांना खाली उतरवले. रिसेप्शन काउंटरवरच्या वहीत आमच्या नावापुढे टिकमार्क करण्यात आले.

आम्हाला थेट छप्पनाव्या मजल्यावर आणण्यात आले. भारतात छप्पन्न या आकड्याला गेल्या काही वर्षात बरेच महत्त्व प्राप्त झाले आहे. आम्हाला त्याच क्रमांकाचा मजला मिळावा या योगायोगाची गंमत वाटली. हॉटेलच्या कर्मचाऱ्याने खोली उघडून दिली, सामान बाहेर ठेवले आणि तो अचानक अंतर्धान पावला. सर्व सामान आत घेऊन आम्ही दरवाजा बंद केला आणि क्वारंटाईनच्या अध्यायाला सुरुवात झाली. आता हीच आमची दुनिया असणार होती. दहा बाय बारा फुटाची खोली, त्यात एक मोठा बेड, एक टेबल, एक छोटा सोफा आणि एक छोटे चहा कॉफीचे उभे कपाट! त्याच्या खालच्या भागात छोटासा फ्रिज, वर इलेक्ट्रिकची किटली. खोलीच्या एका भागात चिमुकला कॉरीडोअर, नाटकाचा सेट असावा तशी खोली, तिला एक तीन फुटी बाल्कनी! आणि पूर्ण आकाशच खोलीत येईल असे वाटणारी संपूर्ण उभी काचेची खिडकी. क्षणभर या देखाव्याने आम्ही लुब्ध होऊन गेलो. बाल्कनी नावापुरतीच. तिचा उपयोग दारात पाय ठेवावा इतकाच होता. पण त्या दारातून एक वेगळेच जग दिसत होते. वर आकाशाची निळाई होती, त्याला भिडणारे गगनचुंबी इमारतींचे कळस होते आणि खाली सिंगापूर शहर पायघड्या घालीत होते. हायवेज, त्यावर धावणाऱ्या गाड्या, मधून छोटी तळी आणि झाडी! पलीकडे हिंद महासागर आणि प्रशांत महासागरांना जोडणारी सिंगापूरची सामुद्रधुनी. त्यात चालणाऱ्या नौका आणि एखादे लक्झरी क्रूज लायनर! एका कडेला पहारेकऱ्यासारखी उभी असलेली मरीना बे सँड्सची इमारत आणि पार समुद्रापलीकडे इंडोनेशियाच्या सरहद्दीवरचे बितान बेट.

‘आकाशाशी जडले नाते धरणीमातेचे’, ही उक्ती इथे सर्वार्थाने खरी वाटत होती. क्षितिज जणू धरतीला टेकत होते आणि पुढे समुद्राची अथांगता पसरली होती. विमान आकाशात थांबवून ठेवावे आणि खिडकीतून टेहळणी करताना जे दृश्य दिसेल ते इथे कायम दिसत राहणार होते. या विजनवासाला असे सिल्व्हर लायनिंग असेल याची कल्पनाही आली नव्हती. ‘‘अगं, तुझ्या छातीत दाटून आल्यासारखे होत होते ना, बरी आहेस का तू?’’ जवळच्या मैत्रिणीने फोन करून काळजीच्या सुरात विचारले. ‘‘अं, हो, मी बरी आहे.’’ मी फोटो काढता काढता तिला सांगितले. परत एकदा भातुकलीचा संसार सुरू झाला होता. हॉटेलमधून जेवण येत असे. ते दारावर टांगलेले असायचे. त्यात तीन कप्प्यांचे ट्रे असत. रोज तीच करी. त्यात तरंगणारे पदार्थ फक्त बदलायचे. कधी तोफू, कधी चिकन, कधी मटार तर कधी राजम्याचे दाणे. एका कप्प्यात राईस केक नाहीतर चिनी पकोडे. भाताचे रंग रोज बदलायचे. पुढे मुलीने जेवण पाठवून तोही प्रश्न सोडवला होता. केरसुणी, ब्रश, स्पंज आणि साबणापासून कॉर्नफ्लेक्स, दूध, दही, फळे ती सर्व हॉटेलच्या लॉबीत आणून ठेवायची. बेलबॉय ते सावकाश केव्हातरी दाराशी आणून ठेवायचा आणि पसार व्हायचा.

छप्पनाव्या मजल्यावरच्या दाराच्या चौकटीत उभे राहून निसर्गाशी हितगूज करण्याचे व्यसनच जडले मला या चौदा दिवसांत. आकाशात काळेकुट्ट ढग दिसले की मन सैरभैर व्हायचे. तेच आकाश स्वच्छ सूर्यप्रकाशात उजळलेले पाहिले, की चित्तवृत्ती फुलून यायच्या. आकाशाची निळाई समुद्रात परिवर्तित होत असताना बघण्याचा नादच लागला मला. पण वरून खालचे जग बघताना कुठली तरी दिव्य शक्ती अद्‍भुतात आहे याची जाणीव कायम राहते.

जगाचे व्यवहार नेहमीप्रमाणे चालू आहेत. रहदारीला खंड नाही. तेच शहर रात्री दिव्यांच्या रोषणाईत अभिसारिकेसारखे शृंगारते. इतके की ते आकाशातल्या ताऱ्यांनाही झाकोळून टाकते. पण निसर्गाने रौद्र रूप धारण करायचे ठरवले तर ढगांना काजळी लागल्यासारखा अंधार दाटून येतो आणि बघता बघता आकाश काळेमिट्ट होते. घनगर्जना होऊ लागते. दैवी शक्तीने धनुष्यबाण सोडावा तशी विद्युत लहर चमकून जाते आणि खालचे जग एकदम निष्प्रभ दिसू लागते. निसर्गाचे ते रूप भीतिदायक असते.

सकाळी उठून पहावे तर तोच अवकाश सूर्यप्रकाशात सचैल न्हालेला असतो आणि समुद्राच्या पाण्यात त्या किरणांचे कवडसे टाकत असतो. हा आसमंत नितळ पारदर्शी असतो. निसर्ग जर स्वतःला असा अंतर्बाह्य बदलू शकतो, तर आयुष्याच्या या टप्प्यावर स्वर्ग केवळ सात बोटे उरला असताना आपणही मनातली किल्मिषे दूर करून मनावर धरलेली काळी जळमटे काढून जगाकडे पाहण्याची आपली दृष्टी अशीच पारदर्शी करू शकलो तर? निसर्ग आपल्याला हेच शिकवण्याचा तर प्रयत्न करीत नाही ना, हे मला या उंचीवर राहिल्यावर नव्याने जाणवले.

संबंधित बातम्या