पुराणिकांची जपानी गाथा

मंगेश कोळपकर
सोमवार, 24 मे 2021

दखल

टोकियोजवळील एदोगावा हे सात लाख लोकसंख्येचे शहर. स्टेट कौन्सिलच्या प्रचाराची धामधूम तेथे सुरू आहे. शहरातील तेरापैकी कोणत्या ना कोणत्या रेल्वे स्थानकाबाहेर सकाळी सातच्या सुमारास हातात माईक घेऊन एक उमेदवार मतदारांना आवाहन करीत असल्याचे दृश्य एदोगावामध्ये सध्या नेहमीचेच आहे. ‘योगी’ या टोपणनावाने परिचित असणारा हा उमेदवार म्हणजे, योगेंद्र पुराणिक. सध्या वास्तव्य जपानमध्ये असले तरी एक अस्सल पुणेकर. या निवडणुकांच्या एकशेवीस वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एक भारतीय नागरिक ही निवडणूक लढवत आहे अन त्यामुळे स्थानिकांसाठी हा कुतूहलाचा विषय झाला आहे. 

जपानमधील निवडणूक रिंगणात असलेल्या पुराणिकांची कथा इंटरेस्टिंग आहे. मुंबई- पुण्यात शिक्षण पूर्ण करून योगेंद्र आता जपानमधील समाजजीवनाशी एकरूप झाले आहेत. योगी ऊर्फ योगेंद्र यांचा जन्म मुंबई जवळच्या अंबरनाथचा. बारावीपर्यंतचे शिक्षण तेथेच झाल्यावर महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील एस. पी. कॉलेजमध्ये झाले. नंतर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून अर्थशास्त्रात त्यांनी एम. ए. केले. दरम्यानच्या काळात आयटीचे पार्ट टाइम अभ्यासक्रम डिप्लोमा पूर्ण करताना रानडे इन्स्टिट्यूटच्या आवारातल्या पुणे विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागातून जपानी भाषेचे धडे त्यांनी गिरविले. त्यानंतर इथेच नोकरीही मिळाली. जपानी भाषेचा अभ्यासक्रम करताना पुराणिकांना पहिल्यांदा एक महिन्यासाठी आणि नंतर एक वर्षासाठी शिष्यवृत्ती मिळाली आणि या दुसऱ्या शिष्यवृत्ती बरोबरच ते जपानला पोचले. ही गोष्ट १९९९ची. 

निवडणुकीच्या निमित्ताने ‘सकाळ साप्ताहिक’बरोबर गप्पा मारताना योगेंद्र यांनी आपला प्रवास मांडला. जपानच्या वास्तव्यात हा देश योगेंद्रना भावला अन पुण्यातील बाडबिस्तरा गुंडाळून त्यांनी जपानमध्येच करिअर करण्याचा निर्णय घेतला. एका तपाच्या वास्तव्यानंतर त्यांना जपानचे नागरिकत्व मिळाले. आयटी कंपनी नंतर एका बँकेतील नोकरी अन्य उद्योग- व्यवसाय करून ते आता रेस्टॉरंटच्या व्यवसायात स्थिरावले आहेत. सात लाखांची लोकसंख्या असणाऱ्या एदोगवामधले त्यांचे ‘रेखा – इंडियन होम फूड’ मराठमोळ्या पुरणपोळीपासून ते उपम्यापर्यंतच्या पदार्थांसाठी फेमस आहे. ‘योगी’ हे त्यांचे दुसरे रेस्टॉरंटही आता लवकरच सुरू होणार आहे. 

जपानमध्ये स्थायिक झाल्यावर अगदी सुरुवातीलाच त्यांच्या लक्षात एक गोष्ट आली - जपानी नागरिक सहसा इंग्रजी भाषेचा वापर करीत नाहीत. दुकाने, बॅंका, रेल्वे स्थानक आदींवरील पाट्याही जपानी भाषेतच आहेत. नोकरी- शिक्षणासाठी परदेशातून येणाऱ्या मंडळींची त्यामुळे  बऱ्यापैकी गैरसोय होत असल्याचे त्यांना जाणवले. एदोगावामध्ये तेथील एका राजकीय नेत्याने निशीकसाई गावात ‘लिटल इंडिया’ची स्थापना करण्याचे ठरविले. आणि पुराणिकांच्या जपानमधल्या वास्तव्याला या ‘लिटल इंडिया’च्या प्रस्तावाने एक नवे वळण दिले. ‘लिटल इंडिया’मुळे दुफळी निर्माण होणार असल्यामुळे त्याला काही भारतीय नागरिकांनी विरोध केला. पुराणिकही त्या मोहिमेत होते. त्यांनी सहकाऱ्यांसह प्रशासनाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यातून ‘लिटल इंडिया’चा प्रस्ताव रद्द झाला. त्या मोहिमेमुळे परदेशातील नागरिकांच्या अडीअडचणींबद्दल प्रशासन अनभिज्ञ असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांना मदत करण्यासाठी त्यांनी काही मित्रांच्या मदतीने ‘ऑल जपान असोसिएशन ऑफ इंडियन्स’ या संघटनेची स्थापना केली. भारतीयांना प्रामुख्याने मदत करण्याचे हे उद्दिष्ट असले, तरी इतर देशांतील नागरिकांनाही ही संघटना मदत करते. या संघटनेच्या माध्यमातून त्यांचा पोलिस, प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि जपानी समाज, संघटनांशी संवाद वाढला. 

दहा वर्षांपूर्वी, २०११मध्ये, जपानमध्ये झालेल्या प्रचंड मोठ्या भूकंपात जखमी झालेले, मृत्युमुखी पडलेले नागरिक, झालेली वित्तहानी; या संदर्भातले पुढचे प्रशासकीय सोपस्कार याबाबत नागरिकांना माहिती देण्यासाठी पुराणिकांनी मित्रांच्या मदतीने एक कॉल सेंटरही सुरू केले. जपानमधील भारतीय दूतावासाकडून त्यावेळी त्यांच्या सगळ्याच अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत, असे ते सांगतात. पण त्यामुळे नाउमेद न होता वर्गणी काढून त्यांनी भूकंपातील जपानी जखमी नागरिकांना जेवण व इतर मदत पुरविली. ही खूणगाठही जपानी नागरिकांच्या मनात कायम आहे. यातूनच २०१७मध्ये झालेल्या एदोगावा शहरातील सिटी ॲसेंम्ब्लीच्या, म्हणजे आपल्याकडच्या महापालिकेसारख्या संस्थेच्या निवडणुकीत ते अपक्ष म्हणून उभे राहिले. या निवडणुकीत संपूर्ण शहरातून ४४ उमेदवारांना निवडून द्यायचे असतात. सर्वाधिक मते मिळविणारे, पहिले ४४ उमेदवार विजयी ठरविले जातात. भारतीय- जपानी मित्रांच्या मदतीने पुराणिकांनी निवडणुकीचा दणक्यात प्रचार केला, आणि ६ हजार ४७७ मते मिळवून ते पाचव्या क्रमांकाने विजयी झाले अन नगरसेवक झाले. यातून त्यांचा जनसंपर्क वाढला. प्रशासन आणि नागरिकांमध्ये आपण दुवा होऊ शकतो, हा आत्मविश्वास वाढला. अन्य देशातून येऊन जपानमधल्या एखाद्या शहराच्या सिटी कौन्सिलच्या निवडणुकीत उभे राहून जिंकून येणारे, पुराणिक पहिले आशियायी नागरिक ठरले. 

हुरूप वाढल्यामुळे आता पुढची पायरी म्हणून ते टोकियो ॲसेंम्ब्लीची निवडणूक लढवीत आहेत. एदोगावाच्या सिटी ॲसेंम्ब्लीमधून टोकियो ॲसेंम्ब्लीत प्रवेश करण्याच्या त्यांच्या या प्रयत्नाबद्दलची त्यांची भूमिका अगदी स्पष्ट आहे. ‘‘निवडणुकीत जय-पराजय हा मुद्दा महत्त्वाचा नाही. आपण प्रशासनाशी संवाद साधून लोकांचे प्रश्न सोडवू शकतो, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्यामुळेच मी निवडणुकीला उभा राहण्याचा निर्णय घेतला,’’ पुराणिक सांगतात. ‘‘येथील निवडणूक शिस्तबद्ध असते. त्यामुळे काही अडचण येत नाही.’’ अशी पुस्तीही ते जोडतात. 

प्रत्यक्ष निवडणूक अजून सहा आठवडे लांब आहे. चार जुलैला या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मात्र जपानमध्ये प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या कॉन्स्टिट्यूशन पार्टीने एदोगावामध्ये उमेदवार निश्चित करण्यासाठी चार वेळा केलेल्या सर्वेक्षणात स्थानिक जपानी उमेदवारांपेक्षा पुराणिक यांची लोकप्रियता जास्त असल्याचे आढळले आहे. त्यामुळे कॉन्स्टिट्यूशन पार्टीने महिन्याभरापूर्वी पुराणिकांची उमेदवारी जाहीर केली.

सकाळी सहा वाजल्यापासून योगेंद्र यांचा प्रचार सुरू होतो. अगदी सकाळी ते प्रचारासाठी रेल्वे स्थानकावर पोचतात अन वृत्तपत्रांतून त्यांची प्रचारपत्रकेही पाठवितात. साडेचार लाख मतदारांच्या एदोगावातून विजयी होण्यासाठी पुराणिक यांना किमान ४० हजार मते हवी आहेत. एदोगावात भारतीयांची संख्या तशी पाच हजारांच्या घरात असली तरी भारतीय मतदार आहेत फक्त दहा. मात्र त्यांना आधी स्थानिक अॅसेंब्लीत निवडून देणाऱ्या जपानी मतदारांवर पुराणिकांचा विश्वास आहे.
 जपानमध्ये परदेशी नागरिक आणि प्रशासन यांच्यात दुवा सांधण्याचे काम पुराणिक गेल्या दीड दशकांपासून करीत आहेत. परदेशी नागरिकांबाबत काही समस्या उद्‌भवली तर, तेथील दूरचित्रवाणी वाहिन्या पुराणिकांना संवादासाठी आवर्जून बोलावतात, त्यामुळे स्थानिक प्रसारमाध्यमांमध्येही ते लोकप्रिय आहेत. पुराणिक यांची ६५ वर्षांची आई रेखा, या त्यांच्यासोबतच जपानमध्ये राहतात तर १८ वर्षांचा मुलगा चिन्मय हा इंग्लंडमध्ये शिक्षण घेत आहे. निवडणुकीसाठी आई आणि मुलाची त्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मदत होतेच. 

या निवडणुकीसाठी पुराणिकांना सुमारे १५ लाख रुपये खर्च येणार आहे. त्यातील पाच लाख रुपये त्यांचा पक्ष खर्च करणार आहे तर, उर्वरित रक्कम ते देणग्यांतून गोळा करणार आहेत. निवडणुकीसाठी परदेशातून मदत घेता येत नाही अन, अवाढव्य खर्चही करता येत नाही. कारण त्यावर निवडणूक घेणाऱ्या यंत्रणेचा काटेकोर लक्ष असते. फोन किती करायचे, पत्रके किती पाठवायचे, रस्त्यावर प्रचार कधी करायचा यावरही निर्बंध आहेत. सध्या ते त्यांच्या पूर्ण वेळ प्रचाराच्या आखणीमध्ये व्यग्र आहेत. जूनच्या २५ तारखेपासून ते निवडणुकीच्या आदल्या दिवसापर्यंत म्हणजे ३ जुलैपर्यंत त्यांना पूर्णवेळ प्रचार करता येणार आहे. या काळात त्यांच्या प्रचार व्हॅनसाठी, चालकासाठी आणि निवेदकासाठी पब्लिक फंडमधूनही निधी मिळतो, अशी माहिती पुराणिक यांनी दिली. 

आपल्याकडे निवडणुकीत जशी फ्लेक्स, होर्डिंगांची रेलचेल असते तशी परवानगी जपानमध्ये नसते. आख्ख्या एदोगावामध्ये मिळून फक्त ५१८ ठिकाणी उमेदवारांचे फोटो लावण्यासाठी परवानगी असते. त्यात सगळे उमेदवार आपले छायाचित्र लावतात. त्याच ठिकाणी पुराणिक यांनाही त्यांचे छायाचित्र लावावे लागणार आहे. निवडणुकीसाठी पुराणिकांची आता शंभर जणांची टीम झाली आहे. त्यात बहुसंख्य जपानी नागरिक आहेत तर थोडेफार भारतीय नागरिकही आहेत. 
 

योगेंद्र पुराणिक म्हणतात... 
निवडणूक लढविण्यासाठी जपानचे नियम फार कोटेकोर आहेत. त्यानुसारच प्रचार करावा लागतो. तसेच जपानी शिष्टाचार महत्त्वाचे ठरतात. आपल्यासारखे नगरसेवक, आमदार आणि खासदार हे टप्पेही जपानमध्ये आहेत. या निवडणुकीत विजयी झाल्यावर खासदार म्हणजेच नॅशनल ॲसेंब्लीमध्येही पोचण्याचा प्रयत्न असेल.

जपानमध्ये करिअर करण्यासाठी खूप संधी आहेत. परंतु, त्यासाठी जपानी भाषा अत्यंत महत्त्वाची आहे. मोठ्या शहरांचा अपवाद वगळता इंग्रजीमध्ये येथे कोणी फारसे बोलत नाही. त्यामुळे जपानी भाषा यायलाच हवी. तसेच जपानी शिष्टाचारही समजून घेणे महत्त्वाचे आहे. नाही तर, गैरसमज होऊ शकतात.

जपानी संस्कृती आणि बिगर जपानी, भारतीय नागरिकांमधील सांस्कृतिक संबंध सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून दृढ व्हावेत, तसेच परदेशी नागरिकांच्या मुलांना जपानमध्ये चांगले शिक्षण मिळावे, त्यासाठी सरकारी इंटरनॅशनल स्कूलची स्थापना व्हावी आणि पेन्शनमधील काही त्रुटी दूर कराव्यात, हे माझे निवडणूक प्रचारातील मुद्दे आहेत.

जपानबद्दल भारतात पुरेशी माहिती नाही. नियमांबाबत जपानी नागरिक काटेकोर आहेत. स्वच्छतेबाबत ते जागरूक असून इतरांचीही काळजी घेतात. जपानी नियम पाळले तर, इथे खूप चांगल्या संधी आहेत. त्यांचा फायदा घेता येऊ शकतो. पण त्यासाठी कष्टाची तयारी हवी. भारतीय नागरिक येथेही यशस्वी होऊ शकतात, हा आत्मविश्वास मला मिळाला आहे.

संबंधित बातम्या