स्टर्लिंगच्या अचंबित करणाऱ्या भराऱ्या

निनाद पां. परुळेकर, डोंबिवली
सोमवार, 9 मे 2022

विशेष

मोजण्यापलीकडे असणाऱ्या छोट्या पक्ष्यांचा प्रचंड थवा आकाशातच वेगवेगळे आकार घेत, उंचावरून खाली; खालून वर, वरूनच डाव्या दिशेला, तेथून झपकन उजवीकडे, तेथून तिरकस बाणासारखा परत उंच; तिकडे त्याच जागेवर एकदम गोल पृथ्वीसारखा आकार घेऊन तो सारा अवाढव्य गोळा उंच आसमंतात भटकत दूर दूर अगदी दिसेनासा होतोय न होतोय तोच परत अवतीर्ण होऊन जबर वेगाने आमच्या डोक्यावरच्या आकाशात आला.

पुण्यानजीकच्या भिगवणमधल्या कुंभारगाव येथील भीमा नदीच्या जलक्षेत्रात, दरवर्षीप्रमाणेच गेल्या हिवाळ्यातही हजारो स्थलांतरित पक्षी आलेले होते. मी माझे मित्र उमेश आणि संजय सल्ले यांच्या यांत्रिक बोटीत बसून पक्षीनिरीक्षण-जलयात्रा करीत होतो. दुपारी चार वाजल्यापासून संध्याकाळ होईपर्यंत शेकडो पक्ष्यांचे दर्शन झाले. त्यात रोहित (फ्लेमिंगो), रंगीत करकोचे, बगळे, सीगल्स, स्पूनबील, खंड्या, टर्न  असे कितीतरी. सोबत मार्श-हॅरीअर अन् ऑस्प्रे ह्या शिकारी पक्ष्यांचे केवळ दर्शनच नव्हे, तर त्यांचे मत्स्यभक्षण, आपसातील भांडणे हेही पाहायला मिळाले.

हळूहळू सूर्य मावळतीला आला.

पश्चिम दिशेला आता भगवा झळाळ आला होता. 

भीमेचे पात्रही भगव्या रंगाने न्हाऊन निघालेले होते. त्यात जलपर्णीच्या अन इतर पाणवनस्पतींच्या फांद्यांचे प्रतिबिंब एकूणच देखाव्याला सौंदर्याचा उठाव देत होते.

सूर्य क्षितिजरेषेला टेकला.

तेवढ्यात संजय ओरडला .....

“काका, तिकडे आकाशात बघा, स्टर्लिंगचा मोठ्ठा थवा दिसतोय.”

संजयने दाखविलेल्या दिशेकडे मी बघितले...

मोजण्यापलीकडे असणाऱ्या छोट्या पक्ष्यांचा प्रचंड थवा आकाशातच वेगवेगळे आकार घेत, उंचावरून खाली; खालून वर, वरूनच डाव्या दिशेला, तेथून झपकन उजवीकडे, तेथून तिरकस बाणासारखा परत उंच; तिकडे त्याच जागेवर एकदम गोल पृथ्वीसारखा आकार घेऊन तो सारा अवाढव्य गोळा उंच आसमंतात भटकत दूर दूर अगदी दिसेनासा होतोय न होतोय तोच परत अवतीर्ण होऊन जबर वेगाने आमच्या डोक्यावरच्या आकाशात आला. त्या पाच-दहा हजार पक्ष्यांच्या पंखांचा प्रचंड किलकिलाट शिवाय त्यांचा चिवचिवाट यामुळे एक प्रचंड आणि दुमदुमणारा गुणगुणाट वातावरणात भरून राहिला होता.

ते सारे स्टर्लिंग पक्षी होते, म्हणजे आपण ज्या नेहमी मैना किंवा साळुंक्या पाहतो त्याच कुळातले.

ह्या हजारो (प्रसंगी पन्नास हजार, नव्हे, लाखांतसुद्धा) पक्ष्यांच्या प्रत्येक हालचालीत कमालीची म्हणजे अक्षरशः कमालीची एकवाक्यता, एक कडक शिस्त होती. त्यांचे पुढे जाणे, डावीकडे वळणे, एकदम खाली किंवा वर झेपावणे, सूर मारणे ........

त्या प्रचंड थव्यामधला एकही पक्षी चुकूनही वेगळी हालचाल करत नव्हता, ज्याला ‘एकसमयावच्छेदेकरून’ किंवा स्टार्टलिंग सिंक्रोनायझेशन म्हटले जाते तशी ही एकतानता आपण आजपर्यंत फक्त  सैनिकांच्या परेडमध्ये अथवा हवाईदलाच्या विमानांच्या कसरतींमध्ये पाहिलेली असते.

मुळातच ह्या स्टर्लिंग पक्ष्यांना अशा थवेबद्ध कसरती करण्याची प्रेरणा कशी होते?

त्यांना कुणी सूचना देते का?

त्यांच्या अशा या प्रकारे वागण्याचे कारण काय?

मग ह्या विषयाबद्दल थोडे अधिक जाणून घेतल्यावर असे समजले, की पक्षी जगतात स्टर्लिंग ह्या एकमेव पक्षी जमातीकडून उपरोक्त वर्णन केलेली कृती घडते. हंगेरीतील व्हिएन्ना येथल्या इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट इकॉलॉजीमधील संशोधक मरिओ पेसेन्डोर्फेर यांनी स्टर्लिंग पक्ष्यांच्या ह्या वेगळ्या  वर्तनाचा अभ्यास केला होता. त्यांच्या मते विशिष्ट पक्षी, माशा आणि मासे हे झुंडीने किंवा थव्याने फिरतात त्या पाठीमागे त्यांचा त्यांच्या शत्रूंना किंवा शिकाऱ्यांना घाबरवण्याचा आणि /अथवा झुंड करून स्वतःचे संरक्षण करण्यात यशस्वी होण्याचा हेतू असतो आणि तो अशा शिस्तबद्ध थव्यामुळे साध्य होतो.

दुसरा निष्कर्ष असा, की त्या थव्यातील प्रत्येक पक्षी त्याच्या लगतच्या किंवा आजूबाजूच्या सात जातभाईंशी शरीराने कनेक्ट असतो. अन अशा प्रत्येक सात जणांच्या  कळपाचा मिळून तो महाप्रचंड थवा तयार होतो. आणि हा सात जणांचा ‘बांधलेला’ कळप वाट्टेल ते झाले तरी एकसंध राहतो, भले मग तो थवा कितीही वेगाने अथवा हळू; उलटा-सुलटा; पुढे-मागे कसाही का फिरे ना!

जशी थंडी सुरू होते तसे हे पक्षी थव्यांच्या स्वरूपात नदी काठाला किंवा मोठा तलाव /पाणवठा असल्यास त्याच्या जवळपासच्या आसमंतात जमा होतात. जागा निवडताना त्या पाणवठ्याशेजारी त्यांच्या रात्रीच्या निवाऱ्यासाठी झुडुपांचे रान आहे का, याचीही नीट पाहणी करून मगच जागा पक्की करतात. आणि जसजसा सूर्यास्ताचा समय होतो तसतशा त्यांच्या त्या अद्‌भूत भराऱ्या क्षितिजावर सुरू होतात.

हे स्टर्लिंग पक्ष्यांना निसर्गानेच दिलेले उपजत ज्ञान आहे आणि ह्या चमत्कृतीजन्य आणि डोळ्यांना आनंद देणाऱ्या अद्‌भूत कसरतींचे आम्हा मानवांनाच कौतुक!

पण खरेतर ह्या नेत्रदीपक भराऱ्या प्रत्यक्ष पाहण्यातच गंमत आहे!

संबंधित बातम्या