प्रीमियर

संतोष भिंगार्डे
सोमवार, 11 जानेवारी 2021

 एंटरटेनमेंट  

समांतरचा दुसरा भाग लवकरच
‘समांतर’ वेबसीरिजच्या पहिल्या सीझनच्या यशानंतर आता दुसऱ्या सीझनची प्रतीक्षा प्रत्येकालाच लागलेली आहे. आता हा दुसरा सीझनही लवकरच येणार आहे. दुसऱ्या पर्वामध्ये स्वप्निल जोशी आणि नितीश भारद्वाज यांच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार यांच्या नेतृत्वाखालील ‘जीसिम्स’ची (ग्लोबल स्पोर्ट्स एंटरटेन्मेन्ट अँड मीडिया सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड) निर्मिती असलेल्या ‘समांतर’च्या पहिल्या सीझनला तब्बल २० कोटी हिट्स मिळाले होते आणि तो एक विक्रम मानला जातो. यामध्ये सुदर्शन चक्रपाणीची भूमिका नितीश भारद्वाज यांनी साकारली होती, तर स्वप्निल जोशीने कुमार महाजनची भूमिका केली होती. या दोन्ही भूमिकांना प्रेक्षकांनी चांगली दाद दिली. त्यामुळे आता नव्या पर्वात कोणकोणत्या घडामोडी घडणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे. 
पहिला सीझन सतीश राजवाडे यांनी दिग्दर्शित केला होता आणि आता दुसरा सीझन समीर विद्वांस दिग्दर्शित करत आहेत. अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार म्हणाले, ‘‘समांतर’ ही आमची निर्मिती असलेली पहिली वेबसीरिज आहे. मराठी प्रेक्षक हा कथेच्या बाबतीत फार चोखंदळ असतो. सुहास शिरवळकर यांच्या दर्जेदार लेखणीतून साकारलेल्या कादंबरीवर आधारित ही वेबसीरिज असल्याने ती रसिकांना खूप आवडली. उत्तम कथेबरोबरच सकस अभिनय, तेवढेच ताकदीचे दिग्दर्शन आणि खिळवून ठेवणारी हाताळणी यामुळे वेबसीरिजच्या पहिल्या पर्वाला उत्तम प्रतिसाद मिळाला. दुसऱ्या पर्वातही आम्ही तेवढीच दर्जेदार हाताळणी केली आहे.

अनोखी आदरांजली

आपल्या आवडत्या कलाकारासाठी त्यांचे फॅन्स काय काय करतील हे काही सांगता येत नाही. अभिनेता सोनू सूदने कोरोना काळात अनेकांना मदतीचा हात दिला. त्यामुळे त्याला गोरगरिबांचा मसिहा असे संबोधले गेले. बिहारमध्ये त्याचा पुतळा उभारला गेला आहे आणि आता त्या पाठोपाठ प्रख्यात गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी पाँडिचेरी येथे त्यांचा एक चॉकलेटचा पुतळा उभारला आहे. एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे तीन महिन्यांपूर्वी निधन झाले होते. 
बालसुब्रमण्यम यांचा हा पुतळा जुका चॉकलेट कॅफे येथील शेफ राजेंद्रन यांनी आपल्या टीमसह तयार केला आहे. हा पुतळा ५.८ फूट आहे आणि तो तयार करण्यासाठी सुमारे ३३९ किलो चॉकलेट वापरण्यात आले आहे. बालसुब्रमण्यम गानमुद्रेतला पुतळा असून पुतळ्याच्या माईकवर झुका असे लिहिलेले आहे. हा पुतळा तयार करण्यासाठी सुमारे सात दिवस लागले. एस. पी. बालसुब्रमण्यम यांनी १६ भारतीय भाषांमध्ये ४० हजारहून अधिक गाणी गायली आहेत.

संबंधित बातम्या