आता मनोरंजनाचा मास्टरस्ट्रोक

संतोष भिंगार्डे
सोमवार, 25 जानेवारी 2021

प्रीमियर

‘मास्टर द विजय’ हा तमिळ भाषेतील चित्रपट हिंदी तसेच तेलगू भाषांमध्ये डब झाला आणि या चित्रपटाने तीनच दिवसांत तब्बल शंभर कोटी रुपयांचा व्यवसाय केला. आता हिंदीमधीलही अनेक चित्रपटांचे चित्रीकरण सुरू झाले आहे. त्यामुळे या वर्षी अनेक नवीन चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहेत. त्यावर टाकलेला प्रकाशझोत...

अनलॉक जाहीर झाल्यानंतर सरकारने हळूहळू चित्रीकरणास परवानगी दिली. तसेच मागील वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात काही अटींसह चित्रपटगृहेदेखील सुरू झाली. आता तमिळ चित्रपट ‘विजय द मास्टर’ला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे हिंदी चित्रपटसृष्टीतील निर्माते व दिग्दर्शकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यामुळे हिंदीमध्ये मागील वर्षी किंवा तत्पूर्वी तयार झालेले चित्रपट आता मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहेत. 

‘सूर्यवंशी’ आणि ‘८३’ हे दोन मोठे चित्रपट लवकरच चित्रपटगृहात दाखल होतील अशी आशा आहे. या चित्रपटांपाठोपाठ करण मल्होत्रा दिग्दर्शित रणबीर कपूर आणि संजय दत्त यांची मुख्य भूमिका असलेला ‘शमशेरा’ चित्रपट तयार आहे. ‘मि. परफेक्शनिस्ट’ अामीर खानचा ‘लालसिंह चढ्ढा’ चित्रपट मागील वर्षी ख्रिसमसला प्रदर्शित होणार होता, आता हा चित्रपट या वर्षी ख्रिसमसला प्रदर्शित होणार आहे. यामध्ये अामीर खानबरोबर करिना कपूर काम करीत आहे. अक्षय कुमार, धनुष आणि सारा अली खान अशी तगडी स्टारकास्ट घेऊन निर्माता, दिग्दर्शक आनंद एल. राय ‘अतरंगी रे’ हा चित्रपट करीत आहेत. याचे चित्रीकरण अंतिम टप्प्यात आले आहे. अक्षयचा ‘बेल बॉटम’ चित्रपट आता तयार आहे. हा चित्रपट यावर्षी एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र आता या चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. अक्षयचा यशराज बॅनर्सचा ‘पृथ्वीराज’ हा चित्रपटदेखील हळूहळू तयार होत आहे. २०१७ मध्ये मिस वर्ल्ड किताब जिंकणारी मानुषी छिल्लर या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर आगमन करीत आहे. क्रांतिकारक सरदार उधम सिंग यांच्यावरचा चित्रपट सुरुवातीला इरफान खान करणार होता. मात्र आजारपणामुळे तो हा चित्रपट करू शकला नाही आणि यामध्ये विकी कौशलची वर्णी लागली. या चित्रपटाबरोबरच विकीचा फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावर आधारित ‘माणेकशॉ’ चित्रपटसुद्धा प्रदर्शित होणार आहे. संजय लीला भन्साळी यांचा ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाचे चित्रीकरण गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीतील भव्य सेटवर सुरू आहे. हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्याचा भन्साळींचा मानस आहे. बॉलिवूडचा ‘सिंघम’ अजय देवगणचा ‘मैदान’ हा चित्रपट १५ ऑक्टोबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अजयबरोबर प्रियामणी, गजराज राव तसेच रूद्रनिल घोष यांसारखे कलाकार आहेत. बॉलिवूडचा ‘दबंग खान’ सलमान खानचा ‘कभी ईद कभी दिवाली’ हा चित्रपट १३ मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 

अभिनेता टायगर श्रॉफच्या ‘हिरोपंती २’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले आहे. दिग्दर्शक प्रशांत नीलचा ‘केजीएफ २’ या चित्रपटाचे पोस्ट प्रॉडक्शन सुरू आहे. यातील संजय दत्तचा लूक खूप निराळा आहे. ‘तुफान’ या चित्रपटासाठी अभिनेता फरहान अख्तर, मृणाल ठाकूर व परेश रावल हे त्रिकूट एकत्र आले आहे. राधाकृष्ण कुमार यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘राधेश्याम’ या चित्रपटात लव्हस्टोरी आहे. साउथचा सुपरस्टार प्रभास आणि पूजा हेगडे या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे. 

‘बधाई हो’चा पुढील भाग ‘बधाई दो’, ‘बच्चन पांडे’, ‘पठाण’, ‘आरआरआर’,  ‘रश्मी रॉकेट’ असे कित्येक चित्रपट सध्या सेटवर आहेत.

संबंधित बातम्या