‘शिकत राहिले पाहिजे...’

संतोष भिंगार्डे
सोमवार, 5 एप्रिल 2021

सदुसष्टाव्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट विभागातील कोकणी भाषा विभागात ‘काजरो’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. ‘द गोवन स्टुडिओ’ची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन भास्कर यांनी केले आहे. त्यानिमित्त त्यांच्याशी केलेली बातचीत.

दिग्दर्शक होण्याचा विचार तुमच्या मनात केव्हा आणि कसा आला?
नितीन भास्कर ः मुळात मला या क्षेत्रात यायचे नव्हते. अगदी योगायोगानेच मी या क्षेत्रात आलो. खरेतर मला यूपीएससीची परीक्षा देऊन आयएएस व्हायचे होते. त्या दृष्टीने माझी तयारी सुरू होती. प्रवीण वानखेडे माझा पक्का मित्र. आम्ही जळगाव आकाशवाणीवर कॅज्युअल असिस्टंट म्हणून काम करीत होतो. एक दिवस तेथील सगळा गाशा गुंडाळून आम्ही पुण्यात आलो. पुण्यात आल्यानंतर पुन्हा तोच प्रश्न आता करायचे काय? मग आमचा स्ट्रगल सुरू झाला. मग एक फेज अशी आली की मी दिग्दर्शक झालो आणि प्रवीण प्रॉडक्शनमध्ये गेला.

सहायक दिग्दर्शक म्हणून तू कोणाकडे काम केलेस?
नितीन भास्कर ः नंदू क्षीरसागर यांच्याबरोबर मी पद्मश्रीची जाहिरात केली. त्यानंतर श्याम बेनेगल यांच्याबरोबर सहायक म्हणून ‘झुबेदा’ चित्रपट केला. दयाल निहलानी यांच्यासोबत मी असिस्टंट म्हणून ‘लाखों मैं दो या’ चित्रपटासाठी काम केले. एका हिंदी मालिकेसाठीही काम केले. मग मी परत पुण्याला आलो. स्मिता फडकेबरोबर भेट झाली. आम्ही पुण्यामध्ये एक स्टुडिओ सुरू केला. ‘त्यानंतर महिमा अन्नपूर्णा देवीचा’ आणि ‘नवस मल्हारीचा’ असे दोन चित्रपट मी माझ्या दिग्दर्शनाखाली तयार केले. त्यानंतर आम्ही २००९ मध्ये ‘मिळाला मौका मारला चौका’ हा तिसरा चित्रपट मी दिग्दर्शित केला. वैभव जोशी या चित्रपटाला प्रोड्युसर म्हणून लाभले. त्यानंतर मला उत्तम उत्तम प्रोड्युसर मिळाले. यानंतर ‘रंग अबोली’ नावाचा सस्पेन्स थ्रीलर चित्रपट केला होता. 'मोनेल माया', 'महाप्रयाण' असे चित्रपट केले आणि माझा प्रवास सुरू राहिला. यानंतर आम्ही शोधकार्य सुरू केले. काही वेगळ्या कथा शोधायचा आम्ही प्रयत्न केला. मग आम्ही गोव्यात जाऊन चित्रपट तयार करायचा विचार केला.

'काजरो' चित्रपटाचा विषय आणि कलाकार यांच्या निवडीबद्दल सांगाल का?
नितीन भास्कर ः गोव्याला मी तीनेक वेळा गेलो होतो आणि त्याच दरम्यान माझी राजेश पेडणेकर यांच्याशी ओळख झाली. आम्ही खूप गप्पा मारल्या. तेव्हा ते म्हणाले, तुमची टीम खूप छान आहे. तुमच्या टीमबरोबर काम करायला मला नक्कीच आवडेल. त्यानंतर आम्ही पुण्यामध्ये भेटलो. तेव्हा त्यांना मी सांगितले की मला एक प्रोड्युसर हवा आहे. मग ते म्हणाले, मीच होतो प्रोड्युसर आणि अशा पद्धतीने मला या चित्रपटासाठी प्रोड्युसर मिळाले. त्यानंतर आमचे काम सुरू झाले. डॉ. प्रकाश परियनकर यांना मी विचारले, तर त्यांनी कथा लिहायला होकार दिला. आता आम्ही कलाकारांच्या शोधात होतो. मी शशांक शेंडे यांच्याबरोबर बोललो. त्यांनी विठ्ठल काळे नावाच्या कलाकाराची ओळख करून दिली. त्याने लगेचच होकार दिला आणि आम्ही या चित्रपटाला सुरुवात केली. विठ्ठल काळेबरोबरच ज्योती बागकर-पांचाळ, पांडुरंग पांगण, अभय जोग, नकुल वेळूस्कर, गोपाळ डिंबर आदी कलाकारांनीही काम केले आहे. प्रवीण वानखेडे कार्यकारी निर्माता आहे, तर संवाद भूषण पाटील यांनी लिहिले आहे. माझा भाऊ समीर भास्कर डीओपी आहे. हा भावनिकदृष्ट्या गुंतवून ठेवणारा चित्रपट आहे.
 
 एकाच शेड्युलमध्ये (अनकट) या चित्रपटाचे चित्रीकरण तुम्ही संपवले. ते कसे काय जमले आणि असे करण्याचे कारण काय?
नितीन भास्कर ः या चित्रपटाचे कथानक दोन तासांचे आहे आणि या कालावधीत एखाद्याच्या आयुष्यात काय आणि कशा घडामोडी घडतात ते सलग येणे आवश्यक आहे, म्हणून आम्हाला अनकट शूटिंग करावे लागले. जागा आणि वेळ यांचे सातत्य ठेवावे लागले. त्याकरिता आमची सलग एकोणीस दिवस रीहर्सल झाली. प्रत्येक दिवशी आम्हाला नवनवीन आव्हानांना सामोरे जावे लागले आणि आम्ही ती आव्हाने पेलली. विसाव्या दिवशी सकाळी नऊ वाजता आम्ही शूटिंग सुरू केले आणि ते रात्री ११.५३ला पूर्ण केले. ३० मार्च २०१९ला आम्ही हा चित्रपट शूट करून पूर्ण केला. जवळपास शंभरजणांची टीम होती. त्यामध्ये साठ कलाकार होते व बाकी सगळे क्रू मेंबर होते. गाव, जंगल, नद्या अशा वेगवेगळ्या सात ते आठ ठिकाणी आम्ही शूटिंग केले होते. यासाठी प्रत्येकाने प्रचंड मेहनत घेतली.

हा चित्रपट कोकणी भाषेत आहे, तर कोकणी भाषा तुम्ही कशी आत्मसात केली?
नितीन भास्कर ः माझे २०११-१२ पासून सारखे गोव्याला येणे-जाणे होत होते. त्यामुळे तेव्हापासूनच या भाषेचे खूपच आकर्षण होते. खूप गोड आणि भावनात्मक अशी ही भाषा आहे. गोवन कोकणी भाषा यामध्ये आम्ही वापरली आहे. मला दहा टक्के तरी ही भाषा येते. मी गोव्याला गेल्यानंतर तेथील मंडळींशी त्याच भाषेत संवाद साधतो.

या चित्रपटातील विषयाबद्दल काय सांगाल?
नितीन भास्कर - संपूर्ण जगामध्ये वर्णभेद, जातिभेद याबरोबरच आर्थिक विषमता आहे. याच सगळ्या विषयवार प्रकाश टाकण्याचे काम या चित्रपटातून केले आहे. समाजातील जातीय आणि वर्णव्यवस्थेची स्थिती, गती तसेच नीती यावर या चित्रपटात भाष्य करण्यात आले आहे. लेखक डॉ. प्रकाश परीयनकर यांनी ही कथा ऐकविली आणि ती बोल्ड पद्धतीने मांडू शकतो असे मला वाटले.  

राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे?
नितीन भास्कर ः खूप आनंद झाला आहे. आम्ही सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आहे आणि त्या मेहनतीचे हे फळ आहे. आमच्या संपूर्ण टीमचे हे यश आहे. सिनेमा हा असा विषय आहे की तो एका माणसाने होऊ शकत नाही. त्याकरिता अनेकांची मेहनत आणि कष्ट असतात. त्यामुळे मला मोठा आनंद झाला आहे. मात्र जबाबदारीही तितकीच वाढली आहे. आता यापुढील प्रोजेक्ट यापेक्षाही सरस व उत्तम असले पाहिजेत. हा सिनेमा झाला म्हणजे सगळे संपले असे काही नाही. हा व्यवसाय असा आहे की येथे जो विद्यार्थी राहतो तोच टिकतो आणि विद्यार्थी प्रत्येकाने असले पाहिजे असे मला वाटते. सतत काही ना काही शिकत राहिले पाहिजे.

यावर्षी प्रादेशिक भाषांतील चित्रपटांनी राष्ट्रीय पुरस्कारांवर आपली मोहोर मोठ्या प्रमाणात उमटविली आहे. त्याबाबत तुमचे मत काय?
नितीन भास्कर ः राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यामुळे एक प्रकारचे मोटिव्हेशन मिळते आणि आत्मविश्वासही वाढतो. त्यामुळे अधिकाधिक प्रादेशिक भाषांतील चित्रपट तयार होतात. त्यांचे आर्थिक गणित छानपैकी जमते. अधिक चित्रपट तयार झाले की रोजगार उपलब्ध होतो. विशेष म्हणजे नवनवे विषय समाजासमोर येतात. सिनेमा ही एक कला आहे आणि त्याद्वारे चांगल्या कलाकृती निर्माण होतात व समाजप्रबोधनही होते. कुठलीही कला समाजाला एक प्रकारचे ज्ञान देते, तसेच शिकवण देते. प्रादेशिक भाषांमध्ये सध्या उत्तमोत्तम चित्रपट तयार होत आहेत.

संबंधित बातम्या