सेलिब्रिटींचे सेकंड होम

संतोष भिंगार्डे
सोमवार, 12 जुलै 2021

प्रीमियर 

हिंदी चित्रपटसृष्टीत मिळणारा पैसा आणि ग्लॅमरची चर्चा सगळीकडे होत असते. कारण एकूणच येथील थाटमाट वेगळा असतो. कलाकारांचे विविध ड्रेस, त्यांचे दागिने इथपासून ते त्यांच्या खाण्या-पिण्याच्या सवयी, त्यांचा फिटनेस ते त्यांचे देखणे, आलिशान घर इथपर्यंत चर्चा रंगते. एकूणच त्यांच्या लाइफस्टाइलची जोरदार चर्चा त्यांच्या चाहत्यांमध्ये ऐकायला मिळते. त्यांच्या लक्झरी कारबरोबरच त्यांच्या आलिशान आणि आरामदायी व्हॅनिटी व्हॅन पाहून थक्क व्हायला होते. एखाद्या फाइव्ह स्टार हॉटेलप्रमाणेच त्यांची व्हॅनिटी व्हॅन असते आणि त्याला त्या कलाकाराचे दुसरे घरच समजले जाते.

शाहरुख खानपासून हृतिक रोशन, संजय दत्त, आलिया भट, रणबीर कपूर अशा बहुतेक कलाकारांच्या स्वतःच्या व्हॅनिटी व्हॅन आहेत. एकेका व्हॅनिटी व्हॅनची किंमत ऐकली तर तुम्ही थक्क व्हाल. कारण आज बहुतेक कलाकारांकडे व्हॅनिटी व्हॅन आहेत आणि त्या निरनिराळ्या आकाराच्या, रंगाच्या आणि डिझाइनच्या आहेत. सगळ्यात महागडी व्हॅनिटी व्हॅन बॉलिवूडचा किंग खान शाहरूखची आहे. शाहरुखच्या मन्नत बंगल्याबाहेर ही व्हॅनिटी व्हॅन सगळ्यांचे लक्ष वेधून घेते. त्याचे चाहते मन्नतबाहेर उभे असतात आणि तेथे फोटो काढीत असतात. त्याच्या या व्हॅनिटी व्हॅनची किंमत जवळपास चार-पाच कोटी रुपये आहे, असे सांगितले जाते. चौदा मीटर लांब असलेल्या या व्हॅनिटीमध्ये बेडरूम, मीटिंग रूम, टीव्ही, लाउंज विभाग, बाथरूम अशा सगळ्या सोयी आहेत. विशेष म्हणजे यामध्ये छोटी जीमदेखील आहे. या व्हॅनची खासियत म्हणजे व्हॅन सुरू नसताना असलेल्या जागेपेक्षा याची जागा दुप्पट होते. अशी हायड्रॉलिक प्रणाली असणारी ही पहिली भारतीय व्हॅनिटी व्हॅन आहे. 

शाहरुख पाठोपाठ बॉलिवूडचा ‘हँडसम हंक’ अभिनेता हृतिक रोशनच्या व्हॅनिटीमध्ये ५२ इंचाचा एलसीडी आहे. शिवाय बेडरूम, मीटिंग रूम अशा सगळ्या सुखसोई आहेत. ही व्हॅनिटी बारा मीटर लांबीची आहे आणि तिची किंमत साधारण तीन ते साडेतीन कोटी रुपये आहे.

खरेतर व्हॅनिटी व्हॅनचा ट्रेंड अभिनेत्री पूनम धिल्लाँने सुरू केला असे म्हटले जाते. सर्वप्रथम त्यांच्याकडे व्हॅनिटी व्हॅन आली आणि नंतर एकेक कलाकारांकडे. बॉलिवूडचे संजू बाबा म्हणजेच संजय दत्तकडेही लक्झरी व्हॅनिटी व्हॅन आहे. संजयकडे ‘रोस बोस’ डिझाइन केलेली ‘व्हॅन एएक्सएल’ आहे. संजय दत्तच्या व्हॅनमध्ये सेंट्रल पॉवर ५२ इंचाचे दोन स्क्रीन व गेमिंग सुविधा आणि एक संगणक उपलब्ध आहे. जाणकारांच्या मते या व्हॅनची किंमत ३.१५ कोटी रुपये आहे. 

भाईजान सलमान खानची व्हॅनिटी व्हॅन सर्व नवीन गॅजेट्सने सज्ज आहे. सलमानच्या लक्झरी व्हॅनिटी व्हॅनमध्ये दोन खोल्या, हॉल, टॉयलेट आणि वॉशरूमसह अनेक सुविधा आहेत. शाहरुखच्या व्हॅनिटी व्हॅनप्रमाणेच सलमानची व्हॅनिटी व्हॅनदेखील दिलीप छाब्रिया यांनी डिझाइन केली आहे. सलमानच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये पार्किंगची सुविधादेखील उपलब्ध आहे. त्याची किंमत सुमारे चार कोटी रुपये आहे.

बॉलिवूडचा सिंघम म्हणजे अजय देवगणची व्हॅनिटी व्हॅन स्पोर्ट्स कारसारखी दिसते. या व्हॅनिटी व्हॅनचा आकार सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारा असाच आहे. या पांढऱ्‍या मोठ्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये त्याचे ऑफिस, शौचालय आणि स्वयंपाकघर समाविष्ट आहे. त्याची किंमत जवळपास तीन कोटी रुपये आहे. 

या यादीमध्ये बॉलिवूडच्या ‘चॉकलेट बॉय’ रणबीर कपूरचेही नाव आहे. रणबीरच्या व्हॅनिटीमध्ये बेडरूम, टॉयलेट आणि वॉशरूमशिवाय गेमिंग झोनदेखील आहे. या व्हॅनची किंमत सुमारे २.६ कोटी रुपये आहे. ‘खिलाडी’ कुमार अक्षयने आपल्या व्हॅनला ‘अगस्त्य’ असे नाव दिले आहे. अक्षय कुमार परदेशात शूटिंग करीत असताना त्याला आवश्यक अशी व्हॅन न मिळाल्याने त्याने बल्गेरियातून व्हॅन मागविली. त्याची ही व्हॅन एका घरासारखी आहे. किचन, मोठे बेडरूम, मसाज चेअर अशा सगळ्या सुविधा यामध्ये आहेत.

बॉलिवूडच्या अभिनेत्यांप्रमाणेच अभिनेत्रींकडेही व्हॅनिटी व्हॅन आहेत. बॉलिवूडमधील स्टायलिश ग्लॅमगर्ल आलिया भट्टची व्हॅनिटी व्हॅनसुद्धा खूपच सुंदर आणि स्टायलिश आहे. ती किंग खानची पत्नी गौरी खान यांनी डिझाइन केली आहे. आलियाच्या या व्हॅनमध्ये तंत्रज्ञानाचा जास्त वापर झालेला नाही. अतिशय सिम्पल आणि क्युट अशी आलियाची व्हॅनिटी व्हॅन आहे. सगळ्या आवश्यक सुविधांनी ही भरलेली आहे.  

याच्या भिंतीवर वेगवेगळे चांगले थॉट्स लिहिलेले आहेत. आलियाबरोबरच दीपिका पदुकोन, अनुष्का शर्मा आदी नायिकांकडेसुद्धा आलिशान व्हॅनिटी व्हॅन आहेत आणि त्यांच्या किमती काही कोटींच्या घरात आहेत. 

बॉलिवूडबरोबरच दाक्षिणात्य कलाकारांकडेही स्वतःच्या व्हॅनिटी आहेत. मराठीतील पहिली व्हॅनिटी व्हॅन अभिनेता भरत जाधवने घेतली. या व्हॅनची मराठी इंडस्ट्रीत खूप चर्चा झाली. एकूणच सांगायचे तर आज कलाकारांना या व्हॅनिटी व्हॅन म्हणजे त्यांचे सेकंड होम वाटत आहे. मीटिंगसाठी तसेच आराम करण्यासाठी या व्हॅन खूप उपयोगी पडत आहेत; किंबहुना आज तीदेखील एक गरज झाली आहे. भविष्यात बहुतेक कलाकारांनी गरजेपोटी व्हॅनिटी व्हॅन घेतल्यास नवल वाटायला नको.

पंचतारांकित हॉटेलच जणू
व्हॅनिटी व्हॅन कलाकारांसाठी खूप फायदेशीर असतात. एखाद्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये प्रत्येक जण आपापल्या सोयीनुसार बदल करून घेतो किंवा आपल्याला हवी आहे तशी व्हॅनिटी व्हॅन तयार करून घेतो. आराम करणे, झोपणे, वेशभूषा किंवा रंगभूषा करणे अशा सगळ्याच गोष्टी या व्हॅनमध्ये करणे सोयीचे जाते. यात सोफा कम बेडपासून टॉयलेट, बाथरूम, बसण्यासाठी खुर्च्या, वॉशबेसिन, आरामदायी पलंग इत्यादी सर्व सुखसोयी असतात. कलाकारांचा खासगीपणा जपण्याची खूप मोलाची कामगिरी या या व्हॅन करतात. चाळीस ते पन्नास लाख रुपयांपासून या व्हॅनिटी व्हॅनची किंमत सुरू होते आणि चार कोटी रुपयांच्या पुढेही जाते. अत्यंत आधुनिक आणि सगळ्या सुखसोयींनी युक्त अशा व्हॅन असतात. काही कंपन्या भाड्यानेही अशा व्हॅन पुरवतात. या व्हॅनिटी व्हॅन म्हणजे चालती- फिरती पंचतारांकित हॉटेलच जणू.

संबंधित बातम्या