‘मला चांगला अभिनेता, व्यक्ती म्हणून ओळखावे’

संतोष भिंगार्डे
सोमवार, 20 सप्टेंबर 2021

प्रीमियर 

अपारशक्ती खुराना, ‘दंगल’, ‘लुकाछुपी’, ‘स्त्री’ अशा काही चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारा अभिनेता. अपारशक्ती आता विविध चित्रपटांमध्ये काम करीत आहे. त्याचा ‘हेल्मेट’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात त्याने मुख्य भूमिका साकारली आहे. त्याच्याशी केलेली बातचीत....

अपारशक्ती... एवढ्यातच तुला कन्यारत्न प्राप्त झाले. बाळाच्या आगमनाचा आनंद कसा साजरा केलात?
अपारशक्ती खुराना : आमचे सगळे कुटुंबीय खूपच आनंदित आहे. त्यातच मी आमच्या घरात छोटा असल्यामुळे अधिक आनंद झाला आहे. सगळे जण एन्जॉय करीत आहेत. खरेतर मला एकाने विचारले होते की तुला मुलगा हवा की मुलगी. मी प्रत्येक वेळी एकच उत्तर सगळ्यांना देत होतो. मला मुलगी हवी आहे. एवढेच नाही तर आम्ही दोघांनी म्हणजे माझी पत्नी आणि मी मुलीचे नावदेखील काय ठेवायचे हे ठरविले होते आणि देवाने आमच्या मनातील प्रार्थना ऐकली, माझ्या पत्नीने गोंडस मुलीला जन्म दिला.

एकीकडे संपूर्ण कुटुंब मुलीच्या जन्माचे सेलिब्रेशन करीत आहे, तर दुसरीकडे तुझा ‘हेल्मेट’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे तुझ्यासाठी डबल सेलिब्रेशन आहे ना?
अपारशक्ती खुराना : नक्कीच. 
कारण पहिल्यांदाच मी मुख्य भूमिका साकारीत आहे. आत्तापर्यंत छोट्या छोट्या विविध भूमिका साकारल्या आहेत. प्रेक्षकांनी माझ्या सगळ्याच भूमिकांना उत्तम प्रतिसाद दिला आहे. आता ‘हेल्मेट’ या चित्रपटातील भूमिकाही उत्तम आहे आणि प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

आपल्याकडे कंडोम, सेक्स याबाबतीत मोकळेपणाने बोलले जात नाही. याबाबतीत जनजागृती करण्याबाबत आपण कमी पडत आहोत की काय?
अपारशक्ती खुराना : नक्कीच. आजही आपण याबाबतीत फारशी चर्चा करीत नाही. औषधांच्या दुकानात कंडोम मागायलादेखील आपल्याला काहीशी लाज वाटते. दुकानदारही आपल्याकडे वेगळ्या नजरेने पाहतो. मेडिकल दुकानदाराने कंडोम दिला तर तो गुपचूप एका पेपरमध्ये गुंडाळून देतो. मला असे वाटते की या विषयावर अधिक चर्चा होणे आवश्यक आहे. मग ती घरात होवो किंवा सार्वजनिक ठिकाणी. परंतु या विषयावर बोलले गेले पाहिजे. त्यामुळे मनातील भीती किंवा लाजाळूपणा निघून जाईल आणि खुले आम या विषयावर बोलले जाईल. आता सॅनिटरी पॅडबाबत बोलले जाते. त्याच्या जाहिराती येतात आणि टीव्हीवर दाखविल्या जातात. मग कंडोमबाबत म्हणावी तशी जनजागृती झालेली नाही. फॅमिली प्लॅनिंगसाठी कंडोम खूप आवश्यक आहे, हे चांगल्या पद्धतीने सांगितले गेले पाहिजे. सरकारने याबाबतीत पुढाकार घेणे आवश्यक आहे.

सध्या थिएटर्स बंद आहेत. त्यामुळे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहेत. साहजिकच हंड्रेड करोड क्लबचे काही टेन्शन तुला नाही. कारण हल्ली चित्रपटाने शंभर कोटी रुपयांचा व्यवसाय केला की दोनशे कोटी रुपयांची कलाकाराला चिंता असते. त्याकरिता काही जणांमध्ये छुपी स्पर्धा लागलेली असते. तुला आता काही याची चिंता नाही ना?
अपारशक्ती खुराना :  ही गोष्ट खरी की चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला की तो किती आणि कशी कमाई करील याची चिंता निर्मात्या-दिग्दर्शकांसह कलाकारांना आणि संपूर्ण युनिटला असते. कारण प्रत्येकाने तितकीच मेहनत घेतलेली असते. परंतु आता थिएटर्स बंद आहेत आणि त्यातच आमच्या चित्रपटाने प्रदर्शित व्हायच्या आधीच चांगली कमाई केली आहे. त्यामुळे आम्हाला काही चिंता नाही. परंतु अधिकाधिक प्रेक्षकांनी चित्रपट पाहावा आणि आमच्या कामाबाबत त्यांची प्रतिक्रिया द्यावी हे टेन्शन असते. कारण आपण केलेले काम प्रत्येक वेळी सगळ्यांना पसंत पडेल असे काही नाही. कुणाला ते आवडते तर कुणाला ते आवडत नाही. एखादे काम आवडले नाही तर पुन्हा चांगले काम करताही येते.

तुला करिअरमध्ये खूप ‘स्ट्रगल’ करावा लागला आहे. आता तुझा स्ट्रगल संपला असे तुला वाटते का?
अपारशक्ती खुराना : ‘स्ट्रगल’ हा शब्द मला खूप भारी वाटतो आणि मी या शब्दाला खूप घाबरतो. कारण स्ट्रगल हा कधीच संपत नसतो. तो सतत आपल्याला करावा लागतो. आता माझी कुठे सुरुवात झाली आहे. आतापर्यंत केलेला स्ट्रगल खूप आहे व पुढेही खूप स्ट्रगल करावा लागणार आहे. चांगले काम करायचे आहे आणि चांगल्या मंडळींबरोबर करायचे आहे. आपले जीवन खूप सुंदर आहे आणि ते आनंदाने जगायचे आहे. लोकांनी मला एक चांगला अभिनेता आणि एक चांगली व्यक्ती म्हणून ओळखावे असेच काम करायचे आहे.  

मुळात तुला अभिनेता व्हायचे होते का?
अपारशक्ती खुराना :  लहानपणापासून मला काही तरी क्रिएटिव्ह काम करायचे होते. परंतु कलाकार व्हायचे आहे असे काही मनात नव्हते. क्रिएटिव्हमध्ये विविध गोष्टी करीत होतो. कधी रेडिओ जॉकी तर कधी कॉमेडीयन, होस्ट अशा प्रत्येक क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर अॅक्टिंग आपल्याला परफेक्ट जमते असे वाटू लागले आणि या क्षेत्रातच करिअर करायचे नक्की ठरले. पहिला ब्रेक ‘दंगल’ या चित्रपटात मिळाला. या चित्रपटातील माझ्या भूमिकेचे प्रेक्षकांनी कौतुक केले. यानंतर मला अनेक चित्रपटाच्या ऑफर्स आल्या आणि आत्तादेखील येत आहेत. लोकांनी मला खूप प्रेम दिले आणि यापुढेही प्रेक्षकांचा असाच प्रतिसाद मिळेल अशी मला आशा आहे.

आतापर्यंत भूमिकेचे महत्त्व पाहून त्या स्वीकारल्या आहेस. ‘हेल्मेट’ चित्रपट साईन करताना कोणता विचार केला होतास?
अपारशक्ती खुराना : मुळातच आपण साकारणार असलेले पात्र प्रेक्षकांवर किती प्रभाव टाकणार आहे, यावरून भूमिकेची निवड केली जाते. आत्तापर्यंत साकारलेल्या भूमिकांमध्ये मी त्या भूमिकेचे जग, ती भूमिका कशा प्रकारे महत्त्वाची आहे आणि या भूमिकेने मी प्रेक्षकांमध्ये कसा प्रभाव पाडू शकेन हे पाहतो आणि मगच ती भूमिका करण्यास होकार देतो. हाच विचार करून मी ‘हेल्मेट’ या चित्रपटाची भूमिकादेखील स्वीकारली. आता हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांना माझी भूमिका आवडली आहे. प्रेक्षकांचे अशा प्रकारे प्रेम मिळते याचे मनाला समाधान वाटते.

एक काळ होता जेव्हा प्रेक्षकांना सिक्स पॅक असलेले कलाकार आवडायचे. मात्र आता प्रेक्षकांना राजकुमार रावही आवडतो आणि आयुषमान खुरानादेखील आवडतो. हा जो बदल झाला आहे त्याकडे तू कसा पाहतोस?
अपारशक्ती खुराना :  ज्या प्रकारचे चित्रपट आम्ही त्यांना करतो, त्या मागचे कारण प्रेक्षक आहेत. कारण प्रेक्षकांना चित्रपट आवडतात तेव्हाच आम्हाला चांगले चित्रपट तयार करण्याची ऊर्जा मिळते. मुळातच प्रेक्षक जास्त दक्ष आणि हुशार झाले आहेत असे म्हणता येईल, कारण प्रेक्षकांना चांगल्या कन्टेन्टची गरज आहे. चांगला कन्टेन्ट असलेल्या चित्रपटांवर ते जास्त प्रेम करतात. प्रेक्षकांना दिखाव्याची गरज नसते. जेवढा आपण सहजसुंदर अभिनय आणि आशय प्रेक्षकांना देऊ तेवढेच ते त्या चित्रपटाला व त्यातील भूमिकेला डोक्यावर घेतात.

सध्या निर्माते अनेक चित्रपटांचे सिक्वेल करण्याच्या तयारीत आहेत. तर निर्मात्यांचा लेखकांच्या नवीन कन्टेन्टवर विश्वास राहिला नाही म्हणून असे होते आहे का?
अपारशक्ती खुराना : मुळातच निर्माते आपले काम चोखपणे बजावत आहेत. कारण जर त्यांना एखाद्या चित्रपटातून जास्त फायदा होत असेल, तर ते तशाच पद्धतीने विचार करणार ना. एखाद्या चित्रपटाचा पहिला भाग यशस्वी झाला तर नक्कीच व्यवसायाच्या एक भाग म्हणून ते दुसरा भाग काढतात. त्यांना असे वाटते की प्रेक्षकांनी पहिल्या भागाला चांगली पसंती दिली आहे तर दुसऱ्या भागालाही देणारच. हा एक व्यवसायाचा भाग झाला आणि येथे कुणी तोट्याचा व्यवसाय करणार नाही. प्रेक्षकांना आवडणारे चित्रपटच करणार. आपल्याकडे आज लेखक आणि दिग्दर्शक यांची हुशार पिढी आहे आणि ते चांगल्या आशयाचे चित्रपट करीत आहेत.

आगामी प्रोजेक्टबद्दल काय सांगशील?
अपारशक्ती खुराना :  प्रोजेक्ट खूप येत आहेत. परंतु सगळ्याच बाबतीत अधिक काही सांगू शकत नाही.

संबंधित बातम्या