कुटुंबाला चित्रकलेशी जोडणारा दुवा

शरद तरडे
सोमवार, 25 जानेवारी 2021

चित्र-भान
 

बहुतेकवेळा चित्र काढण्याची, चित्रात रमण्याची सुरुवात लहानपणापासून होते. नव्या नव्या गोष्टी शिकण्याचे ते वय असते आणि बघत असलेल्या, मनात रुजलेल्या गोष्टी, वस्तू, निसर्ग दृष्य, माणसे यांची चित्रे काढण्याचा प्रयत्न होत असतो. यातून चित्रकलेची आवड घरच्यांकडून बरेचदा जोपासली जाते. चित्राला शाबासकी मिळते. जमल्यास ते चित्र चारचौघांना दाखवले जाते.

पूर्वीपेक्षा आता समाजात चित्रांबाबतची जाणीव काहीशी वाढली आहे. त्यामुळेच कलेला समाजात महत्त्वाचे स्थान मिळू शकेल असे वाटते. आताच्या काळात आई-वडिलांकडून, कुटुंबातल्या इतरांकडून मुलांचे छंद, त्यांच्या आवडी-निवडी जोपासण्यासाठी खूप महत्त्व दिले जाते. एवढेच नव्हे तर पालकांना त्यांच्या आयुष्यात ज्या गोष्टी मिळू शकल्या नव्हत्या त्या आपल्या मुलांना मिळाव्यात अशी त्यांची इच्छा असते, आपापल्या पद्धतीने आई-वडील, आजी-आजोबा मुलांच्या इच्छा पूर्ण करत असतात. त्यात त्यांनाही धन्यता वाटते. या मुलांना जर कलेसाठी योग्य वातावरण घरातूनच मिळाले तर त्यांच्यातले हे गुण अजून फुलू शकतात हे मात्र नक्की!
चित्र कसेही असले तरी

ते काढतानाचा आनंद घेणे, त्यात रमणे, त्याचा सदैव विचार करणे हे खूप महत्त्वाचे आहे. चित्रकलेत रमणारे हे सगळेच ‘कला-यात्री’ असतात. हे सर्व ‘कला यात्री’ स्वतःसाठी चित्र काढत असतात. खरे तर तेच खरे कलाकार असतात कारण ते कोणाला दाखवायला म्हणून किंवा कोणासाठी म्हणून चित्र काढत नाहीत. मोठा चित्रकार झालेली प्रत्येक व्यक्ती कधीतरी याच वाटेने जात असते.

कुठल्याही कलेची मनापासून आवड असणे ही गोष्ट जर पालकांनी लक्षात घेतली, मुलांना कशात आनंद मिळतो आहे त्याकडे पालकांनी बारकाईने लक्ष दिले तर मुले ती कला मनापासून जोपासण्याची, त्या कलेत प्रावीण्य मिळण्याची शक्यता नक्कीच वाढते. 

आपल्यासाठी चित्र काढणाऱ्या अशा ‘कला-यात्रीं’मध्ये लहान मुले, गृहिणी, वयोवृद्ध व्यक्ती तर आहेतच पण एरवी खूप व्यग्र असणारे डॉक्टर, इंजिनिअर, आर्किटेक्ट अशा व्यवसायातलेही अनेकजण या कलायात्रेचे प्रवासी आहेत. या शिवाय व्याधीग्रस्त, आजाराने एका जागी खिळून असलेल्या व्यक्तीही आनंद, मनःशांती मिळवण्यासाठी कलेचे साहाय्य घेतात. आर्ट थेरपीसारखी उपचार पद्धतीही आता बरेच लोक वापरंत आहेत. 

डॉक्टर अनिल अवचट हेदेखील असेच एक छांदिष्ट चित्रकार आहेत. ‘मी स्वतःच्या आनंदासाठी चित्र काढायचा विरंगुळा शोधलेला एक माणूस आहे. चित्र काढायचं आणि बाकी सगळे विसरून जायचं! निसर्गात माणूस सोडून कुठल्याही प्राण्याकडे अशी निर्मितीची प्रेरणा नाही मग ती आपण पुढे होऊन सांभाळली पाहिजे,’ असे ते नेहमी म्हणतात. अशा ‘कलायात्रीं’ची संख्या वाढते आहे, ही गोष्ट फक्त चित्रकलेसाठीच नव्हे तर सर्वच कलांसाठी उत्साहवर्धक आहे. एखाद्या अशा कला-यात्रिकामुळे कुटुंब, कुटुंबातला प्रत्येक जण त्या विशिष्ट कलेशी जोडला जात असतो आणि अंतिमतः कलेबरोबरच्या या नात्यामुळे एक संवेदनशील समाज तयार होण्यास मदत होते.

आपल्याकडे मुले दहावी-बारावीत उत्तम मार्क मिळवून पास झाली तर पालकांचा ओढा त्याला किंवा तिला इंजिनिअरिंगच्या किंवा डॉक्टरच्या अभ्यासक्रमात घालावा असाच असतो. आणि तसे अनेकदा घडतेही. परंतु अशी काही हुशार मुले मात्र विज्ञानाची किंवा चित्रकलेसारख्या एखाद्या सर्जनशील कलेची वाट धरणे पसंत करतात. त्यांना त्यांच्यातील ‘कलात्मकता’ नव्याने पडताळून पाहायच्या असतात आणि ही काही क्षेत्रे कल्पकतेला पुरेपूर न्याय देणारी आहेत. आपल्या आजूबाजूलाही असे क्वचित घडताना दिसते, पण परदेशात अशा वेगळ्या वाटांवरून चालणारी खूपशी मुले-मुली दिसतात. 

पालकांनी मुलांना त्यांच्या पद्धतीने, त्यांच्या विचाराने चित्र काढून द्यावे. त्यात कुठली, कुणाची बरोबरी, स्पर्धा, चांगले-वाईट असा भेद नसावा. गीतसंगीतासारखीच ‘चित्रकले’बाबत समाजात जाणीव, प्रेम निर्माण होण्यासाठी नुसती चित्रे काढून उपयोग नाही तर पालकांनी मुलांसह चित्रप्रदर्शने वारंवार पाहणे, चित्रकारांची बोलणे, त्यांना अनेक प्रश्न विचारून आपले समाधान करून घेणे, चित्रकारांच्या स्टुडिओला भेट देणे यासारख्या गोष्टी होणे खूप गरजेचे आहे. प्रदर्शन बघून आल्यानंतर मुलांना आपण त्यातील आवडलेली चित्रे पुन्हा त्यांच्या पद्धतीने काढावयास सांगितली पाहिजेत. त्यामुळे त्या मुलाच्या मनामध्ये त्या चित्राचा काय परिणाम होतो आणि काय आवडीने ते बघितले आहे हे लक्षात येते. यामुळेही चित्रकलेतील त्याची जाणीव आपसूकच प्रगल्भ होऊ शकते.

अनेक वेळा मुलांनी, स्वतःपुरतीच कला जोपासत रहाणाऱ्या कलायात्रींनी काढलेली चित्रे लोकांना खूप आवडतात, त्यांचे भरमसाट कौतुकही होते व कधी कधी ती चित्र रसिकांकडून कौतुकाने खरेदीही केली जातात. काहीवेळा अनेक चित्र स्पर्धेमध्ये भाग घेऊन काही बक्षीस मिळाले तर त्या मुलाला, व्यक्तीला लगेच ‘चित्रकार’ म्हणून गणले जाते आणि हा कदाचित मोठा धोका असतो. आपल्याला आता सगळे काही कळते असा विचार त्यामुळे त्या पारितोषिक-विजेत्यांच्या मनाचा ताबा घेऊ शकतो. तेव्हा यापासून मात्र ‘कलायात्रीं’नी स्वतःला कटाक्षाने दूर ठेवले पाहिजे. चित्रकार होण्यासाठी आयुष्यभर त्या चित्रांचा अभ्यास, रियाझ करावा लागतो, प्रदर्शनांमधून आपली कला रसिकांसमोर सादर करावी लागते आणि या गोष्टी सोप्या नाहीत हे मी नक्की सांगू शकतो.

पण हा झाला कलायात्रेचा खूप पुढचा टप्पा. सध्या चित्रकलेत रमणाऱ्या व्यक्तींनी, मुलांनी आपल्या आनंदासाठी चित्र काढत राहावे, त्यात मग्न राहावे हे उत्तम.

संबंधित बातम्या