चित्र पहावे वाचून!

शरद तरडे
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

चित्र-भान

चित्रप्रकार कुठलाही असो त्यामागची रंग संवेदना समजून घेणे खूप महत्त्वाचे ठरते. त्या समजून घेताना रसिकांनी त्यांच्या मनाप्रमाणे, आवडीने त्याचा आस्वाद घ्यावा हेही खूप महत्त्वाचे आहे.

एखादे चित्र पाहत असताना आपल्या मनात जे विचार येतात त्याप्रमाणे ते चित्र आपल्याला दिसते, असे म्हटले जाते. पण क्षणभर तुम्ही जर हा विचार बाजूला ठेवून चित्रातील आकारांची, आकृत्यांची मांडणी, रंगसंगती, रंगांची एकमेकांशी जुळलेले नाते समजून घेतले तर मात्र तुम्हाला ते चित्र तुमच्या त्या वेळच्या मूड प्रमाणे वेगळे भासेल. आपल्या आजूबाजूचे जग, आपले आवडते काम, लोकांशी असलेले नातेसंबंध, ताण तणाव इत्यादी अनेक गोष्टींवर आपली मनःस्थिती अवलंबून असते. ती एकसारखी बदलतही असते. त्यामुळे एकच चित्र आपल्याला आपल्या त्या त्या वेळच्या मूडप्रमाणे वेगळे भासू शकते.

एवढेच नव्हे तर सकाळ, दुपार आणि संध्याकाळच्या वातावरणातही चित्रं नक्कीच वेगळी भासतात. याचा आपण विचार केला तर चित्राची असलेले भावनिक नाते आणखीनच घट्ट होते. विचार समृद्ध होतात आणि त्यामुळे चित्राची भाषा ही कळते. चित्र बघताना, त्या चित्राच्या पलीकडेही बरेच काही आहे हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतो त्यावेळेला आपण ती चित्रभाषा विस्ताराने शिकलो असे म्हणावे लागेल. एखादे चित्र पाहताना आपण ते का पाहतो आहे? आपल्याला ते का आवडले किंवा आवडते? असे प्रश्न स्वतःला विचारणे खूप महत्त्वाचे आहे. आपल्या मनातील अशा अनेक प्रश्नांना आपणच उत्तरे देऊ शकतो. ते चित्र वरवर पाहणे हे योग्य नाहीच. पण चित्राबद्दल आपणच आपल्याला काही प्रश्न आपल्याला विचारले तर आपल्या मनात ते चित्र ‘वाचण्याची’ प्रक्रिया चालू होते. ही प्रक्रिया वारंवार घडू लागली तरच आपल्या मनात त्या चित्रांच्याबद्दलचा एक संवाद चालू होतो. आणि हा संवाद सुरू झाला की तुम्हाला ते चित्र समग्र भावते. एकदा ही सवय लागली की कुठलेही चित्र तुम्हाला लवकरही उमजते हेदेखील लक्षात येईल. 

आता चित्रकाराच्या दृष्टीने चित्राचा थोडा विचार करू. चित्रकार ज्यावेळेस चित्र काढत असतो त्यावेळेस रंग, आकार, अवकाश याचा मनमोकळा वापर तो करीत असतो. अनेक वेळा एका विचाराने काढलेले चित्र पूर्ण झाल्यावर चित्रकाराच्या दृष्टीलाही वेगळ्याच विचाराचे वाटू शकते, कारण ते चित्र पूर्ण होत असताना अनेक विचारांचे मंथन मनात चालू असते. प्रत्येक रंग, प्रत्येक रेष चित्रकाराशी वेगवेगळ्या वेळी वेगवेगळा संवाद करत असते. त्यामुळे चित्र प्रत्यक्षात तयार होताना कधीकधी चित्रकाराच्या मनातल्या पहिल्या विचारांपासून ते खूप वेगळ्या दिशेने जात असते. त्याच्या मनात त्या वेळी अनेक विचारांची आंदोलने सुरू असताना चित्रकार चित्रातील खेळाची मजा अनुभवत असतो. असे जन्मलेले चित्र रसिकांशी बहुअंगाने संवाद साधू शकते.

चित्रकाराच्या मनःस्थितीचे वर्णन मी मुद्दाम  केले आहे. कारण चित्ररसिकांना, ‘चित्रकाराने काय विचाराने हे चित्र काढले असेल?’ असा प्रश्न नेहमी पडत असतो. त्यावेळी त्या चित्रकर्त्याच्या नजरेतून आपण ते चित्र बघावे अशी रसिकांची इच्छा असते. चित्रप्रदर्शनात ‘तुम्ही ही चित्रे कुठल्या मूडमध्ये काढली आहेत? तुम्ही हा रंग वापरला आहे, म्हणजे तुम्ही कुठल्या मनःस्थितीत होतात?’ असे प्रश्न रसिक आवर्जून विचारतात. एवढेच नव्हे तर लाल, पिवळा रंग वापरला तर आनंदी आणि काळा रंग वापरला तर दुःखी अशा प्रकारच्या रंग भावनाही त्यांच्या मनात असतात. पेंटिंगमधले सर्व रंग, आकार वेगवेगळे असले तरी प्रत्येकाला स्वतःचे असे वेगळे अस्तित्व असतेच, पण हे सगळे असूनसुद्धा पूर्ण चित्रालाही वेगळे अस्तित्व असतेच, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. खरे सांगायचे तर तसा रंगांचा आणि  चित्रकाराच्या मनःस्थितीचा सबंध क्वचितच असतो, हेही लक्षात घेतले पाहिजे. अमूर्त चित्रांबाबत हे जास्त जाणवते.

माझ्या प्रदर्शनात अनेक रंगांची चित्रे असतात. त्यावेळी ज्या रंग भावना माझ्या मनात असतात त्याच भावना रसिकांपर्यंत पोहोचतील अशी मुळीच खात्री नसते. प्रदर्शनात कुणाला ती चित्रे आनंदी वाटतात तर काहींना ती भडक वाटतात. निळ्या रंगातील चित्रे कुणाला शांत, अथांगतेची प्रतीक वाटली होती, तर अन्य काही लोकांना ती गूढ, रहस्यमय अशी वाटत होती. तांबड्या रंगाचे चित्र आनंदाचे प्रतीक वाटले तर काही रसिकांना ते अस्वस्थतेचे लक्षण वाटले. 

लेखासोबतच्या पहिल्या चित्रात तुम्हाला कुठल्याही आकारांचा संदर्भ लागणार नाही, पण जे रंग वापरले आहेत त्यातून उत्साह, आनंदी वातावरणाची निर्मिती होऊ शकेल असे मला वाटते, पण कदाचित तुमच्या मनात वेगळ्या भावना निर्माण होतील आणि तसे चित्र पाहणे हेही बरोबर आहे. दुसऱ्या चित्रात मात्र तुम्हाला आकार दिसतील आणि तुमच्या मनात चित्राविषयी जवळीक वाटेल. हे आकार कदाचित तुम्हाला मोठ्या खडकाप्रमाणे वाटतील, वर आकाश दिसेल, खाली पाणी वाटू शकेल, आडवी लाल, काळी पट्टी किनारा वाटू शकेल. सर्व स्थिर असूनसुद्धा जिवंतपणा वाटेल कारण खडकाशेजारील वेगळा रंग आल्याने तो खडक तरंगतो आहे असा भास होईल. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की चित्र बघण्याचा प्रक्रियेत मनातील गोष्टी दिसल्या तर ते चित्र आपल्याला कसे दिसते. 

त्याचप्रमाणे चित्रात वापरलेल्या आकारांचेही. चित्रातील चौकोनी, त्रिकोणी आकार काही लोकांना शिस्तबद्ध जीवनाचे प्रतीक वाटत होते. पण ते चित्र काढताना माझा दृष्टिकोन कधीच तसा नव्हता. आकार शोधण्याचा प्रयत्न नेहमीच रसिक करतात. त्यापेक्षा चित्र आपल्या मनात कोणत्या भावनेची निर्मिती करतात, त्यातून कशी रसनिष्पत्ती होते, हे समजावून घेऊन चित्र समजून घ्यायला पाहिजे, असे माझे मत आहे. ही रस- निष्पत्ती भारतीय कलेमध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावते. एखाद्या हृदयद्रावक प्रसंगाचे चित्र आपण बघितले तरी ते बघून समाधान मिळते. ते चित्र बघावेसे वाटते कारण चित्रातील बारकावे, हावभाव आपल्या मनाचा ठाव घेतात.

खूप चित्रे पाहणे, त्यांचा वेगवेगळ्या प्रकारे विचार करणे आणि ती चित्रे आपल्या परीने समजून घेणे हेच ‘चित्राचे व्याकरण’ आहे असे मला वाटते. आणि हे व्याकरण प्रत्येकाचे वेगवेगळे असते हेही लक्षात ठेवले पाहिजे.

संबंधित बातम्या