चित्रात काय पाहावे?

शरद तरडे
सोमवार, 19 एप्रिल 2021

चित्र-भान

एखादे चित्र पाहताना नेमके काय पहावे, कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात? असा प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो. चित्राचा विषय, योग्य आकार, अवकाश आणि रंगसंगती पाहणाऱ्याच्या मनाचा ठाव घेत असते. ही मांडणी समजून घेतली तर त्या चित्राचा आस्वाद घेता येतो.

‘‘चित्र पाहताना कुठल्या 
गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत?’’ हा प्रश्न रसिकांना नेहमी पडतो. 

चित्रातील विषय, आकार, अवकाश आणि रंगसंगती जर योग्य असेल आणि ती नजरेलाही आनंद देणारी वाटली तर ते चित्र बघणाऱ्याच्या मनाचा ठाव घेते. ते चित्र बघताना त्या चित्राचा आणि आपलाही तोल जात नाही. चित्रकाराला हे सर्व एकाच वेळी कसे करता येते, हे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे.

एखादे डोंगरावरचे छोटे मंदिर आपण लांबून बघतो आणि त्यावेळी ते मंदिर आपल्या नजरेमध्ये बसवण्यासाठी आपण आजूबाजूचा परिसरही डोळ्याखालून घालतो. मग एका जागी आपली दृष्टी स्थिर करून त्या निसर्ग दृश्याचा आनंद घेतो. यालाच चित्रकार, ‘योग्य रचना झाली’, असे म्हणतो. 

एखाद्या तळ्याकाठी निवांत बसल्यावर पाण्यात पडलेले प्रतिबिंब आणि वर दिसणारे स्थिर आकाश, झाडांचे विविध आकार, रंगीत पाने-फुले, उडणारे पक्षी अशी दोन्ही चित्रे आपल्याला एकाच वेळी दिसत असली तरीही आपली नजर मात्र पाण्यात हलकेच हलणाऱ्या चित्रांमध्ये स्थिर होते. तेथे क्षणाक्षणाला दृश्य बदलत असते आणि तेही त्याचा तोल सांभाळत! हीच स्थिती मनाला भावते कारण त्यातून उमटणारे भाव या आपल्या मनाचा ठाव घेतात. तरंगणारी, हवेतून खाली पडणारी रंगीत पाने, फुले आणि त्यासोबत हलकेच हालणाऱ्या झाडांचे प्रतिबिंब हे सगळे मनाला चित्रासारखे भासते. ते देखील जिवंत! कुठलीही हालचाल आपल्याला जिवंतपणाचे लक्षण वाटतेच! 

याच प्रकारे आपण जर चित्रातले अनेक आकार, रंग, आकाश यांची मांडणी कशी केली आहे, हे समजून घेतले तर किंवा चित्र जवळून बारकाईने पाहिले त्यातील पोत (टेक्श्चर) कसा आहे? ते डोळ्यांनी बघता येते. त्यावेळी मनात काय विचार किंवा कल्पना येत आहेत हे लक्षात येते. चित्र जवळून एकदा नीट पाहून घ्यावे आणि लांबूनही बघावे तर त्यातील सर्व गोष्टी म्हणजे रंगसंगती, आकारांची बांधणी आणि संपूर्ण चित्राचा विषय लक्षात येतो. एखाद्या कल्पनेची, विचारांची नव्याने मांडणी करणे म्हणजे चित्र होय!

चित्रकार त्याच्या मनातील अनेक कल्पना आणि विचारांचा चित्रांमध्ये संगम करीत असतो. ह्या अनेकविध विषयांची, कल्पनांची योग्य प्रकारे मांडणी करणे हाच त्याच्या कौशल्याचा भाग असतो. आपल्या मनातील विचार रसिकांच्या मनात उतरणे, हे प्रत्येक चित्रकाराचे स्वप्न असू शकते. ते  तसे उतरत नाही हे सत्य आहे. कारण बघणाऱ्या प्रत्येकाच्या मनाची बैठक वेगळ्या रीतीने तयार झालेली असते. चित्रकार ज्या समाजात राहतो त्या समाजाकडून त्याला मिळणारे संस्कार, त्याचे स्वतःचे विचार, अभ्यास आणि आवड या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. हे सर्व लक्षात घेऊनच रसिक चित्र पाहत असतो. त्यामुळे जो चित्राचा विषय असेल, तोच रसिकाला समजेल असे म्हणणे धाडसाचे ठरेल. 

मध्यंतरी एम. एफ.. हुसेन या जगप्रसिद्ध कलाकाराने मोठ्या गॅलरीत ‘श्वेतांबरा’ या नावाने प्रदर्शन भरवले होते. तेथे कुठले चित्र लावलेले नव्हते तर फक्त पांढऱ्या कापडाच्या वेगवेगळ्या रचना सादर केल्या होत्या. ते पाहून रसिकांना प्रश्न पडला की आता यात नेमके काय बघायचे? माझ्या मनात मात्र या सर्व रचना बघितल्यावर शांत, निर्गुण भाव तयार झाले असे मला वाटले. हे प्रत्येकाचे प्रत्येकाला स्वतंत्र वाटणे, दिसणे खूप महत्त्वाचे आहे. तुमच्या स्वतःच्या अनुभवातून चित्र वाचणे आणि अनुभवणे याला कुठलाही पर्याय नाही. ते चित्र आवडले तर तो अनुभव तुमच्या मनात कायमचा कोरला जातो. आपण अनेकदा चित्रातील आकार पाहून त्याचा अर्थ काढण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु जर अनेक आकार एकमेकांमध्ये गुंतले असतील तर त्याचा एकत्रित परिणाम वेगळा होतो. म्हणून कुठल्या आकाराला कसे महत्त्व दिले गेले आहे, तो मांडला कसा आहे, त्याची रंगसंगती कशी आहे हेही पाहणे खूप महत्त्वाचे ठरते. 

काही आकार खरोखर चित्रात असतात तर काही तसे भासू  शकतात. एखाद्या चित्रात फक्त एखादा पक्षी काढलेला असतो आणि बाकी सर्व अवकाश रिकामे सोडलेले असते. त्या चित्रात पक्ष्यांचा समूह काढल्यानंतर त्याची गती चित्रास मिळू शकते. त्यामागे डोंगर, झाडे, सूर्य काढला तर ते आपण नेहमी दृश्य बघत असतो ते आठवते. पण यात तीनही चित्रांचा आपल्या मनावरचा परिणाम बघितला तर तो वेगवेगळा असतो. नुसता एकटा पक्षी आपल्या मनातील एकटेपणाच्या जवळ वाटतो, तर बाकी विस्तीर्ण अवकाशात तो एकटा आहे ही भावना दुःख घेऊन येऊ शकते.

पक्ष्यांचा थवा जेव्हा बघतो तेव्हा आपल्या मनात आनंद निर्माण होऊ शकतो की तो आता एकटा नाही तर त्यासोबत त्याचे मित्र सहकारी आहेत याचेही भान आपल्याला येते. झाडे, पशुपक्षी, डोंगर एकत्र बघितले तर ते दृश्य मात्र वारंवार पाहत असल्यामुळे त्या चित्राकडे आपण ओळखीचा नजरेने पाहतो किंवा कदाचित दुर्लक्षही करतो. याचा अर्थ चित्रकार चित्रांमध्ये काय काय गोष्टी आणतो याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे एखाद्या विषयाचे निगडित वेगळे चित्र आपल्या मनात वेगळा परिणाम करतात हे लक्षात येते.

काही आकार पोकळ असले तरी तिथे हलके वाटतात तर काही वेगवेगळ्या रंगात रंगविले तरी वेगळीच जाणीव निर्माण करतात. हा फरक रसिकांनी लक्षात घेतला पाहिजे. हे लक्षात घेण्यासाठी अनेक प्रदर्शने पाहिली पाहिजेत. प्रत्येकवेळी आवडलेले चित्र का आवडले? असे स्वतःला वारंवार विचारले पाहिजे. एकदा या प्रश्नाचे उत्तर मिळाले की ते कसे आवडले ह्याचा विचार करायला पाहिजे. हे सर्व लक्षात घेतले तर चित्रांचा आस्वाद वेगळ्या प्रकारे घेता येईल असे वाटते. चित्र पाहताना तुमच्या मनाची अवस्था कशी आहे? यावर ते चित्र तुम्हाला कसे वाटते हे अवलंबून आहे, ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवायला पाहिजे.

संबंधित बातम्या