रंग उत्सव! भाग - 2

शरद तरडे
सोमवार, 17 मे 2021

चित्र-भान

निसर्गातील रंगांचा उत्सव आणि चित्रातील रंगोत्सव हे काही वेगळे नसतात. निसर्गात जे काही घडत असतं त्याचा परिणाम चित्रकाराच्याही मनामध्ये आणि मग त्याच्या चित्रातून आपसूकच उतरत असतो. निसर्गातल्या ऋतुचक्रानुसार रंगसंगतीही बदलत असते. वसंत ऋतूची चाहूल लागताच ज्याप्रमाणे हिरव्यागार पालवीने भरलेल्या गुलमोहराला हळूहळू एकएक नारिंगी -लाल रंगाचं फूल यायला सुरुवात होते; आणि म्हणता म्हणता फुलांचा घोस बहरतो आणि महिनाभरातच पूर्ण झाड हिरवेपणा विसरून लालभडक रंगाने भरते. आपला रंगांचा अभ्यास इथेच चालू होतो. हिरवा रंग आणि त्याच्याविरुद्ध असलेला लाल रंग याची वेगवेगळी, बदलती रूपे आपल्याला एकाच ठिकाणी बघायला मिळतात. यालाच विरोधी रंगसंगती असे म्हणतात.

हिरवेकंच दिसणारे झाड इवल्याशा नारंगी, लाल रंगाच्या फुलांनी बहरताना आपण पाहतो, आणि काही दिवसात लालबुंद फुलांनी भरलेले तेच झाड आपण पाहतो. शांत वाटणाऱ्या हिरव्या रंगाचे काही दिवसातच हे जे लालजर्द रंगात जादुई रूपांतर होते ते उत्साह आणि आनंदाचे प्रतीक म्हणून मनात भरते. ही किमया निसर्ग जशी आपल्यासमोर घडवतो तशीच जवळपास भासणारी किमया चित्रकारही आपल्या चित्रात हवी तशी घडवितो. त्याच्या मनात बहरणारा निसर्ग तो पाहिजे त्या स्वरूपात चित्रात आणतो- हेच त्याचे स्वातंत्र्य असते.

शिशिर ऋतूत जी पानगळ होते त्यातील निसर्गाचा आविष्कार आपण अनुभवला असणार. बदामाच्या हिरव्यागार पानांचे रूपांतर पिवळसर, तांबूस रंगात व्हायला सुरुवात होते. त्यावेळी बदामाच्या झाडाचे जे रंगीबेरंगी रूप दिसते ते खरेच अप्रतिम असते. या तांबड्या, पिवळसर, हिरव्या रंगाची अनुभूती देणाऱ्या झाडाचा वेगळा आकार बघूनच मन भरते. मग त्यावर पडलेले सकाळचे कोवळे ऊन असो वा दुपारचे रखरखीत ऊन, दोन्ही वेळा ते झाड ज्या दिमाखाने रंग लेऊन उभे असते ते दृष्य खरोखर विलोभनीय असते. 

उन्हातल्या त्या पानांतून कधी तुम्ही आकाशाकडे  बघितले आहे का? त्यातील शिरांचे आकार आपल्याला पानांचे वेगळे रूप दाखवत असतात. त्याच्यातील बारीक रेषा झाडाला जीवनरस पुरवून सावरत असतात हे बघून मन अचंबित होते.

पानगळीच्या काळात आपल्याला अनेक रंगीबेरंगी पाने  दिसतात. तिथेच आपल्याला एकरंग तत्त्वाची (Monochrome) ओळख होते. कलेमध्ये अभ्यासलेले रंग खरंतर आपल्या इतके जवळ असतात, फक्त निरीक्षणातून हे जास्त अनुभवता येते. हीच पाने पिवळी, तपकिरी, तांबड्या रंगाची झाली की झाडाच्या पायाशी लोळण घेतात आणि जणू गालिचा पसरलेल्या सारखा अनुभव आपल्या डोळ्यांना मिळतो, तो खरंच शब्दात सांगता येत नाही. 

हे सर्व चित्रात आणण्याचा प्रयत्न मी अनेक वेळा केला. पण निसर्गाच्या दृश्याची सर कधीही मला चित्रात आणता आली नाही.

तुम्ही कधी असा विचार केला आहे का, की रंगावरून चालत गेले तर कसे वाटेल? निसर्गाने हा अनुभव आपल्याला देऊ केला आहे. रस्त्यावर अशी रंगीबेरंगी पाने पसरलेली असताना तुम्ही त्या पानावर चालून पाहा. अगदी हळुवारपणे पहिले पाऊल ठेवा आणि डोळे मिटून घ्या! त्या रंगीत पानांचा स्पर्श तुम्हाला रंगानुसार जाणवेल हे मी नक्की सांगू शकतो. हिरव्यागार पानाचा स्पर्श, तांबड्या, पिवळ्या पानांचा स्पर्श आणि वाळलेल्या पानांचा स्पर्श तुम्हाला वेगळा जाणवेल. ही जी जाणीव असते तीच खूप महत्त्वाची आहे. हा प्रयोग तुम्ही जमेल तेव्हा नक्की करून पहा. चित्रातील रंग पाहून तुम्हालाही अशीच जाणीव होईल हे नक्की!

अनेक चित्रकारांनी कॅनव्हास, पेपर  जमिनीवर अंथरून त्यावर रंगांच्या पावलाने चालण्याचा प्रयोग केला आहे तसेच पूर्ण अंगावर वेगळे रंग लावून ते कॅनव्हासवर उमटवून वेगळ्या प्रकारच्या चित्र-अनुभव घेण्याचाही प्रयत्न केला आहे.

मी अनेक वेळा ही पाने हळूच उचलून घरी आणली आणि ती कागदावर ठेवून त्याचे चित्र काढण्याचा प्रयत्न केला, पण तसे कधी जमलेच नाही. मला याचे दुःख झाले नाही, पण आनंद मात्र झाला. कारण निसर्ग किती महान कलाकार आहे याची जाणीव मला झाली. ही दृश्ये आपण अनेक ऋतूंमध्ये बघतो, ते डोळ्यात, मनात खोलवर साठवतो यापेक्षाही जसे ते दिसते आहे त्याचा आनंद घेणे हेच खरे!

हे निसर्गाचे रंगवैभव प्रत्येक ऋतूमध्ये वेगळेपण जगते. ऐन वैशाखात आपण जर हिमालयात गेलो तर तिथल्या निसर्गाचे रूप वेगळे असते. पांढऱ्याशुभ्र बर्फासोबत दिसणारी सुरूची उंच झाडे, निळेशार आकाश आणि आरशासारखे स्वच्छ, नितळ वाहणारे पाणी बघून मन उल्हसित होते. तिथल्या दगडांचे रंगही खूप वेगळे असतात. पिवळसर, भुरकट रंगाचे दगड आणि थंड हवामानाने झाडावर साठलेले शेवाळे त्यांच्यातील तांबूस, पांढरा, पिवळा रंगही आलेला तुम्हाला दिसून येतो. पावसाळ्यात धुक्यामुळे कुंद वातावरणात तर कुठलाही रंग असो त्याचे वेगळेच अस्तित्व आपल्याला जाणवते. ते रंग एकमेकांत मिसळून जातात तरीही त्यांचे स्वतःचे रूप आपल्याला जाणवते.

अनेकदा हे सगळे रंग वैभव बघून चित्रकारसुद्धा ते वापरण्यास कमी पडतो. अशा सर्व रंगांच्या म्हणजेच अगदी मूळ रंगापासून त्याच्या रंगचक्रापर्यंतच्या सर्व रंगाचे दर्शन आपल्याला निसर्गातूनच होत असते. ऋतुबदलाचे अत्यंत बारकाईने निरीक्षण केले तर हे सर्व रंगचक्र आपल्या लक्षात येतेच. ऋतू कुठलाही असो, रंग वापरायची निसर्गाची किमया खूप वेगळी आणि मनमोहक आहे हे लक्षात येते. निसर्गाच्या रंगोत्सवची ही अनुभूती घेताना येणाऱ्या ऋतूंमध्ये निसर्गाकडे तुम्ही नव्या नजरेने पहाल अशी आशा आहे, आणि याच दृष्टिकोनातून जर तुम्ही चित्राकडे पाहिले तर तुम्हाला नक्कीच नव्याने चित्र- अनुभव येऊ शकतो.

संबंधित बातम्या