प्रकाश आणि सावल्या! 

शरद तरडे
सोमवार, 31 मे 2021

चित्र-भान

प्रत्येक ऋतूमध्ये छायाप्रकाशाचा खेळ खूप विलोभनीय असतो. त्यासाठी आपण नजरेने तयार झालो असलो तर आपण चित्राकडेही त्या दृष्टीने पाहू शकतो.

प्रत्येक निसर्ग चित्रात अगदी आवर्जून नाटकीय प्रवेश करणारा प्रकाश बघितला की त्या चित्रात दूर दूर पर्यंत अनेक गोष्टी त्यांच्या  खोलीनुसार सुस्पष्ट आणि काहीवेळा अंधूकही दिसतात .

एखाद्या गावातील वळणदार वाट, कौलारू घरे, डाव्या किंवा उजव्या बाजूचे पडणारे कोवळे ऊन आणि त्या उन्हानेच निर्माण केलेल्या घरांच्या, झाडांच्या सुरेख सावल्या! या सावल्यांमध्ये अनेक रचना पाहता येतात आणि ती रचना सादर करताना चित्रकाराचे कौशल्यही पणाला लागते.

या प्रकाश सावलीचा खेळ प्रत्येक ठिकाणी वेगळा भासतो. शहरातील उंच इमारती, चकचकीत रस्ते, दुतर्फा अनेक रंगांच्या फुलांनी डवरलेली, एका रेषेत शिस्तीत वाढलेली झाडे, ठरावीक अंतरावरून रस्त्यांच्या कडेला वाकून प्रकाशाचे झोत रस्त्यावर अंथरणारे विजेचे सुबक खांब, उंच इमारतीतील अनेक खिडक्यांमधून  पाझरणारे प्रकाश रंग!

ही दृश्ये प्रत्येक शहरामध्ये बघितली तरी वेगळीच वाटतात कारण प्रत्येक ठिकाणच्या सूर्य प्रकाशाची प्रखरता, हवामान, ऋतुबदल हे इतके वेगळे भासतात की ती दृश्य जन्मभर लक्षात राहतातच! आता या टळटळीत उन्हातदेखील आपण लहानपणी मित्रांबरोबर क्रिकेट, फुटबॉल, विटी दांडू खेळ अगदी आरामात खेळायचो, पण जसे वय वाढत जाते तसा आपल्याला त्याचा त्रास जाणवू लागतो, आणि काही वर्षानंतर टळटळीत उन्हात खिडकीबाहेर आपण बघायचेदेखील टाळतो आणि चुकून बाहेर गेलोच तर लगेच सावलीला जवळ करतो. 

अशा उन्हात तुम्ही एखाद्या देवळात गेलात तर तिथला काळासावळा उजेड डोळ्यांना सुखावह वाटतो आणि तिथला गारवा तर हवाहवासा वाटतो. मनही शांत होते.

अशा वेळी देवळाच्या एखाद्या खांबाला टेकून बसल्यावर, दरवाजातून येणारा तो प्रकाश कितीही प्रखर असला तरी डोळ्यांना सुखावतो कारण आजूबाजूला असलेले धीरगंभीर, अंधुरके वातावरण! अशा वेळी देवळाच्या गाभाऱ्यातील एका मिणमिणत्या पणतीच्या प्रकाशात दिसणारी देवाची मूर्ती सुंदरच वाटते! त्या अंधारलेल्या थंड जागेत आपले मन रमते. ही सगळी छायाप्रकाशाच्या खेळाची जादू असते, ज्या जादूचा खेळ आपणा वारंवार अनुभवीत असतो. 

अनेक चित्रकार या वातावरणाचा परिणाम चित्रांमध्ये हुबेहूब उतरवितात आणि ते चित्र आपल्या मनाचा ठाव घेतेच! त्या चित्रात मग देव प्रत्यक्ष जरी दिसत नसला तरी छाया प्रकाशाच्या खेळाचा असा अद्‌भुत वापर केल्यामुळे देवाचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याचा अनुभव आपल्याला येतो! 

अशाच वेगळ्या प्रकारच्या प्रकाशाची मोहिनी अनेक शतके चित्रकारांवर पडली आहे. तो प्रकाश म्हणजे पणतीचा, मेणबत्तीचा प्रकाश! अनेक लहान-मोठ्या चित्रकारांनी या प्रकाशाच्या अनेक प्रकारे उपयोग करून विविध प्रकारची चित्रे काढली आहेत.

सभोवती काळाकुट्ट अंधार आणि हातामध्ये पणती घेऊन एका खोलीतून दुसरीकडे जाणारी एक मोहक स्त्री, तिच्या हातातून आरपार दिसणारा प्रकाश. त्यामुळे गुलबट दिसणारे तिचे हात, चेहऱ्यावर पडणारा हळुवार  मिणमिणता प्रकाश, अंगावरती जरतारीची वस्त्रे त्यावर पडणारा पिवळसर प्रकाश! अशी हजारो चित्र आतापर्यंत चित्रकारांनी काढली आहेत आणि ह्या प्रकाश रचनेमुळे रसिकांनाही ती भावली. एक प्रसिद्ध चित्र मी प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालयात पाहिले होते. ते चित्र इतके हळुवारपणे साकारले गेले होते की त्या मेणबत्तीच्या प्रकाशात साकारलेली प्रत्येक वस्तू, परिसर अंधारात असूनसुद्धा प्रकाशमय वाटत होती. सगळे कसे स्वच्छ भासत होते डोळ्यांना. खरेतर अशा जागेतील वस्तूंचा आकार रंगांमध्ये दाखवणे ही खरोखरच कसबी चित्रकाराची हातोटी म्हणायला हवी!  नवशिक्या कलाकारचे हे कामच नव्हे!

माझ्या एका मित्राच्या चित्रांमध्ये हा प्रकाश सावल्यांचा खेळ तो उत्तम रीतीने तो साकारतो. तो नेहमी हरिद्वार, वाराणसी इथल्या मंदिरांची, घाटांची चित्रे काढतो. यामध्ये तो ज्या पद्धतीने छाया प्रकाशाचा खेळ दाखवतो तो खरोखर पाहण्यासारखा असतो. लांबवर पसरणारे घाट, त्यात  छोटी होत जाणारी मंदिरे, नदीच्या पाण्यावर हेलकावे खाणाऱ्या लहान मोठ्या होड्या आणि घाटावरच्या पायऱ्या, तो अशा रीतीने रंगवतो की आपण जणू तिथे उभे राहून सर्व दृश्य डोळ्यात साठवून घेत आहोत असे वाटते.

अनेक चित्रकारांनी काढलेली गंगा आरतीची चित्रे ही अशीच वेधक आहेत. किनाऱ्यावरील घाटावर अनेक पुजाऱ्यांच्या हाती  मोठमोठ्या दिव्यांनी सजलेल्या दीपमाळा, त्यांच्या पिवळसर प्रकाशाने नाह्यलेला आजूबाजूचा परिसर, भक्तिभावाने जमलेले भक्तगण आणि प्रत्येकाच्या हातात द्रोणातील एक पणती, जी ते हलकेच गंगेच्या पाण्यात सोडत आहेत. हे सर्व दृश्य एका चित्रात आणणे हे किती अवघड आहे हे चित्रकारच जाणे!

पण ही दृश्ये आपण जेव्हा चित्रात बघतो त्या वेळी आपल्या मनात छाया प्रकाशाच्या खेळाचे वैभव पुन्हा पुन्हा प्रकट होत असते. नदीमध्ये पडणारे पणत्यांचे प्रतिबिंब बघत बघत आपणही त्या लाटेबरोबर वाहत असतो, हे मात्र नक्की! मनामध्ये दाटणारी हूरहूर आणि प्रकाशाचे ते छोटे छोटे तुकडे नव्या स्वप्नांची दारे उघडत जातात आणि त्या अंधाराचे भय आता आपल्याला वाटत नाही. काहीतरी नव्याने घडणार आहे असेच मन आपल्याला बजावत असते. ही चित्रांची जी दुनिया आपल्या समोर उभी राहते ती छायाप्रकाशाच्या जादूमुळेच असे मला वाटते. मग ती जंगलातली सोनेरी प्रकाशात नाह्यलेली उंच उंच झाडे असोत किंवा वळणदार रस्त्यावर पडलेली प्रकाश किरणे असोत, त्यातील नाट्यमय प्रकाश रचना आपल्याला नेहमीच भुरळ घालते.

हल्ली फोटोग्राफीमध्येही या प्रकारच्या प्रकाश-सावल्यांचा खेळ वेधकपणे मांडता येतो. मोबाईल फोटोग्राफीमध्ये पाहिजे त्याक्षणी हवा तसा फोटो काढता येतो. आतातर फोटोग्राफीलाही चित्रकलेसारखी एक कला म्हणून जागतिक मान्यता मिळाली आहे.

प्रत्येक ऋतूमध्ये छायाप्रकाशाचा हा खेळ हा खूप विलोभनीय असतो. त्यासाठी आपण नजरेने तयार झालो असलो तर  आपण चित्राकडेही त्या दृष्टीने पाहू शकतो आणि चित्रानंद द्विगुणित करू शकतो हे  मात्र नक्की.

संबंधित बातम्या