सौंदर्यशास्त्र

शरद तरडे
सोमवार, 28 जून 2021

चित्र-भान

कलेचा विचार करताना वेगवेगळे विद्वान आणि कला समीक्षकांच्या सौंदर्यविषयक व्याख्या थोडक्यात समजून घेऊ या. कलेकडे  बघण्याची आपली दृष्टी त्यामुळे अधिक स्पष्ट होऊ शकेल. 

जॉन रस्कीन यांच्या विचाराप्रमाणे केवळ जसे आहे तसे चित्र बनवणे हे कलेचे कार्य नाही तर कला ही विचाराची आणि भावनांची अभिव्यक्ती असते. त्यांच्या मते उत्कृष्ट कला विचार देते आणि विचार उच्च दर्जाचे असतील तर ते बुद्धीला स्पर्श करतात. ते म्हणतात, कलेतील सत्य  ठरवणे कलाकारांच्या उद्देशावर अवलंबून असते.  कलेमध्ये कल्पनेला फार महत्त्व आहे.  निसर्गाला केवळ कलात्मक रूपात सादर करणे म्हणजे सौंदर्य नाही तर कलाकाराच्या मनावर त्याचा जो परिणाम झालेला असतो त्या भावनेला नव्या स्वरूपात कलाकार रूप देतो, त्यालाच कला म्हणावे. 

रस्कीन यांच्या मते कलेची अनुभूती ही माणसाच्या सहज स्वभावाचा परिणाम आहे. कलाकाराच्या मनात दोन प्रवृत्ती असतात -एक सहज प्रवृत्ती आणि एक काल्पनिक. या काल्पनिक वृत्तीमुळेच कलेच्या सौंदर्याचा अनुभव येतो.

आय. रिचर्ड्स यांच्या मते आपण कुठल्या कलाकृतीला चांगलं किंवा वाईट म्हणणं हे व्यक्तिगत असतं. काळ बदलेल तसेच कलेबद्दलच्या संदर्भात नैतिकतेचे रूपरेषा बदलणार हे नक्की. त्यांच्या मते ज्या अनुभवांना कलाकार महत्त्वाचे समजतो त्याचे चित्रण तो चित्रांमध्ये करतो;  त्यामुळे त्यांनी कलांना ‘जीवनाची कल्पना’ मानले आहे.

कलेमध्ये कारागिरी किंवा तंत्र यांना स्थान नसते, असं कॉलिंगवूड यांना वाटतं.  चित्रं हे खरोखर त्या कलाकाराचे मनोगत असते, संवेदनेला भावनेच्या पातळीवर आणणे हे कलेचे खरे कार्य आहे. कलावंतांमध्ये श्रोता, वाचक आणि रसिक दडलेला असतो, असे ते म्हणतात. कलाकारसुद्धा दुसऱ्या कलाकारांच्या  वैशिष्ट्यांनी प्रभावित होत असतात.

जे काही सुंदर आहे ते सर्व कलेमध्ये येते असे समजण्याची आवश्यकता नाही, असं हर्बर्ट रीड म्हणतात. कलेचे क्षेत्र अत्यंत व्यापक आहे. अनेक कलाकृतींचा सौंदर्याशी काही संबंध नसतो. रीड यांंच्या मते जी कलाकृती आपल्याला आनंद देईल तेथेच सौंदर्य आहे. कलेचा आदर्श कोणताही असू शकतो. एखादी कलाकृती पाहून रसिक त्यांच्या त्यांच्या अनुभवांशी, भावनांशी जवळीक साधत असतात; परंतु सगळ्याच रसिकांना एकच चित्र पाहून समान अनुभूती मिळत नाही. हेच कलेचे वेगळेपण आहे.

कलेद्वारे आपण आपले भाव व्यक्त करतो आणि त्यापासून आपल्याला मुक्ती मिळते. कलाकार आणि रसिक या दोघांनाही ही अवस्था अनुभवता येते. रीड यांच्या मते कलाकार सर्व गोष्टी समाजाकडूनच मिळवितो आणि कलेच्या माध्यमातून आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप पाडतो.   

कला ही केवळ गॅलरी किंवा संग्रहालयात नाही तर आपल्या आजूबाजूला पसरलेली आहे, त्या कलेला आपण जीवनापासून वेगळे करू शकत नाही. बघण्याची, समजावून घेण्याची दृष्टी आपण तयार करायला हवी.

आधुनिक कला प्रतीकात्मक आहे आणि ती नव्या स्वरूपाने आणि दृष्टीने समजण्याची आवश्यकता आहे, असे वर्नन ली आधुनिक कलेविषयी बोलताना सांगतात. नव्या प्रयोगांमुळे कलेकडे बघण्याचे दृष्टिकोन बदलले आहेत एवढे नक्की. मात्र त्यासाठी नव्या प्रकारची नजर हवी. ली यांच्या या म्हणण्याचा अर्थ एवढाच की कालच्या चष्म्यातून तुम्ही आजचे सौंदर्य बघायचा प्रयत्न करत असाल तर ते तुम्हाला नक्कीच दिसणार नाही. 

आपण पूर्वी अनेक रचनात्मक आणि तोल सांभाळलेली चित्रे बघत होतो. आता या आधुनिक काळामध्ये त्यांचा कुठलाही क्रम नसतो, परंतु ते बघण्यात रसिकांना नवे आकर्षण मात्र नक्की आहे.  या प्रकारामुळे चित्राच्या स्वरूपात कलाकार अभूतपूर्व बदल करत आहेत. त्यामुळे आता कलेचा आस्वाद घ्यायचा असेल तर रसिकांना माध्यम, साहित्य, तंत्र पद्धती आणि वैज्ञानिक गोष्टींनुरूप आपली दृष्टी बदलून आजच्या आधुनिक युगातील प्रवृत्तींचे, गोष्टींचे भान ठेवून ती कला बघायला शिकले  पाहिजे.

कला खरोखरच त्या त्या युगाचे प्रतिबिंब असते. आजच्या काळात कला कॉम्प्युटर आर्ट,  इन्स्टॉलेशन, मोबाईल आर्ट आदी गोष्टींच्या माध्यमातून आपल्या समोर आली आहे.

वस्तू कितीही सुंदर आणि चांगली असली तरी तिच्या पुनरावृतीमुळे माणसाला त्याचा कंटाळा येतो आणि तो बदलासाठी अधीर असतो म्हणूनच परिवर्तन हे जीवनाचे महत्त्वाचे अंग आहे. कलेचे व्याकरण तेच राहते. बिंदू ,रेषा, आकार, छटा, रंग, पोत या गोष्टी बदलत नाही. परंतु नवनव्या प्रयोगात त्यांच्या एकमेकांशी असलेल्या नात्यामुळे वेगळी भावना निर्माण होते. आज कलेमध्ये होणारे नवनवे प्रयोग आणि नव्यानव्या सौंदर्य दृष्टी ज्या वेगाने आपल्या समोर येत आहेत तेवढ्या यापूर्वी कधीही येत नव्हत्या; ते लक्षात घेतले पाहिजे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज तंत्र हा कलेचा मुख्य आधार बनला आहेत. या तंत्राचे स्वतःचे असे सौंदर्य आहे,  जे काल माध्यम म्हणून समजले जात

होते. आजची कला मला 

समजून घ्या अशी मागणी 

करते.  आज कलाकार बाह्य 

दृष्टीने सजावटीच्या अनेक 

गोष्टींना बाजूला सारून, 

वस्तूच्या स्थूलतेकडे लक्ष न 

देता सूक्ष्मतेकडे जाऊन सौंदर्याच्या नव्या कल्पना  आपल्यासमोर मांडत आहे. आधुनिक कला ही प्रतिमा नाही तर प्रतीक आहेत, असे ली यांनी सांगितले आहे. आज चित्रकाराला आधुनिक संस्काराची सूक्ष्म जाण आहे.  हे सूक्ष्म  सौंदर्य समजण्यासाठी कलाकार आणि रसिकांना काही गोष्टी लक्षात ठेवायला  लागणार आहेत. कलाकार केवळ वरवर दिसणाऱ्या गोष्टी चित्रातून मांडत नसतो तर त्याला अंतर्मनात जाणवणाऱ्या गोष्टी तो मांडण्याचा प्रयत्न करीत असतो. ते केवळ बाह्य रूपाकडे तो बघत नाही तर तो अंतरंगाचा विचार करत असतो आणि कलेतून ते अंतरंग सादर करून तो खरा आनंद मिळवीत असतो.

आधुनिक चित्रकारांच्या चळवळीत त्यांनी दाखवलेल्या चित्रांचे स्वरूप केवळ शैलीपुरते  मर्यादित नाही तर तो जीवनाचाच एक भाग आहे, एवढेच नव्हे तर त्याचे दर्शन आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

संबंधित बातम्या