चित्रकलेचा प्रवास

शरद तरडे
सोमवार, 2 ऑगस्ट 2021

चित्र-भान

सहाव्या शतकाच्या सुमारास अजिंठा लेण्यांमध्ये वापरलेली फ्रेस्को पद्धतीची चित्र काढण्याची पद्धत आपण अभ्यासली, तर त्या काळीही अनेक नैसर्गिक रंगांचा वापर करून ती साकारलेली आहेत असे लक्षात येते. ही चित्रे गुहेमध्ये असल्यामुळे वातावरणाचा परिणाम होऊनदेखील त्यातली बरीचशी चित्रे अजूनही चांगल्या अवस्थेत असून त्यातील कलेचा आनंद घेता येतो. अशी अनेक प्रकारची फ्रेस्को पेंटिंग तंजावर आणि केरळ या भागातील मंदिरांतही पाहायला मिळतात.

पंधराव्या शतकात क्लॉड मॉनेट या चित्रकाराने निसर्गचित्र वेगळ्या पद्धतीने रंगविण्याची पद्धत विकसित केली. त्यांनी ब्रशच्या साहाय्याने आणि ठिपक्यांच्या आकाराने रंगाचा वापर अशा प्रकारे केला ती लांबून ही चित्रे पाहिली तर जणू  प्रत्येक पान, फूल, खूप बारकाईने काढले असे वाटावे परंतु ते चित्र जवळून पाहिले तर नुसते रंगाचे ठिपके, रेषा आणि फटकारे मारल्यासारखे दिसते हे वैशिष्ट्य आणण्यासाठी या चित्रकाराने बरेच श्रम घेतले होते. या चित्र पद्धतीला ‘इंप्रेशनिझम्’  (Impressionism) म्हणून ओळखले जाऊ लागले. या शैलीत चित्रकारांनी जोरदार रंगांचे फटकारे, भडक रंगसंगती आणि चित्राबाहेर जाणाऱ्या रचना सादर केल्या. या चित्रात त्यांनी भोवतालचे आकार धूसर केले आणि अगदी जवळचे आकार स्पष्ट आणि भरीव केले अशामुळे त्या चित्राला खोली प्राप्त झाली. त्यामुळे चित्रात लक्ष केंद्रबिंदूकडे जाऊन चित्राला समतोलपणा आला. या प्रकारात चित्रे बंदिस्त न वाटता रसिकांना त्या चित्राच्या बाहेर काही गोष्टी आहेत, असाव्यात असा भास होतो. या चित्रांमध्ये विषय मांडण्याची पद्धती वास्तववादापासून दूर गेली. बंदिस्त स्टुडिओच्या बाहेर जाऊन चित्रं काढली गेली. निसर्गचित्रे करताना चित्रकाराच्या मनाच्या पटलावर उमटलेली निसर्गचित्र केली गेली. या असंख्य कलावंतांना पारंपरिक गॅलरीमध्ये प्रदर्शन करायला परवानगी न मिळाल्याने या कलावंतांनी आपल्या चित्रांची प्रदर्शने भुयारी मार्ग किंवा रस्त्याच्या कडेला लावण्यास सुरुवात केली आणि रसिकांनी त्यांना भरपूर प्रतिसाद दिला.
या दरम्यानच्या काळातच स्पेन, पोर्तुगाल, तुर्कस्तान या देशांमध्ये अनेक चित्रकार काम करीत होते. त्यांची संख्या अक्षरशः हजारोमध्ये होती. चित्रकला हा विषय समाजामध्ये बहरला होता. सुतारकाम करणारे, रंगारी, घरं बांधणारे, प्लंबर असे अनेक कारागीर लोक फावल्या वेळात चित्र काढत असत आणि ती चित्रे शनिवारी-रविवारी रस्त्याच्या कडेला ठेवून विकत असत. रसिकही या चित्रांना त्यांना परवडेल अशी किंमत देऊन ती चित्रं विकत घेत असत. त्यांच्या कलेला ते एक प्रकारे पाठिंबा देत असत. त्यामुळे चित्रकला तेथे अगदी घरांमध्ये पोहोचली, लोकांना चित्रं बघण्याची सवय लागली अशा  पद्धतीचे वातावरण तिथे झाल्यामुळे चित्रकलेला हळूहळू चांगले दिवस येऊ लागले.
‘इंप्रेशनिझम्’ नंतरच्या चित्र चळवळीला ‘आयकॉनिक’ (Iconic)  चित्रपद्धती असे म्हटले गेले. या चळवळीत प्रामुख्याने गाजली व्हॅन गॉग यांची चित्रे! या चित्रकाराने पूर्वीच्या इंप्रेशनिस्ट शैलीला विरोध करून चित्रांमध्ये अमूर्त घटक आणि प्रतीकात्मक गोष्टींचा भरपूर वापर केला. ‘तारांकित रात्र’ या चित्रामध्ये त्यांनी निसर्गाचं चित्रण करताना निसर्ग पाहून मनात उमटलेल्या भावना आणि मनाची स्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला. रंग आणि रंगलेपनाच्या वेगळ्या पद्धतीचा वापर करून तो परिणाम साध्य केला असे म्हणता येईल.
झाडाच्या फांद्या, पाने, रात्र, चांदण्या दाखवताना रंगांचा पोत (texture), ब्रशच्या फटकाऱ्यांचे वळणदार आकार यांचा वापर करून गॉग यांनी सर्व चित्रांमध्ये वेगळ्या पद्धतीने जिवंतपणा आणला. ही शैली एवढी वेगळी आणि आकर्षक होती की चित्र काढण्याची ही पद्धत व्हॅन गॉग यांच्या नावानेच ओळखली जाऊ लागली, आणि त्यामुळे त्यांच्या चित्रांनाही भरपूर प्रसिद्धी मिळाली. या चित्रकाराने आपली वेगळी रंगलेपन पद्धती वापरून चित्रांमध्ये जिवंतपणा आणण्याचा प्रयत्न केला. हा काळ होता अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकादरम्यानचा.
याच काळात पॉल गौगिन, पॉल काझे या चित्रकारांनी आपापली वेगळी रंगलेपन पद्धती वापरून चित्रात जिवंतपणा आणण्याचा प्रयत्न केला. 
सोळाव्या शतकानंतर भारतातील चित्रशैलीही वेगळ्या अर्थाने बहरत होती. त्या काळात पौराणिक चित्रे आणि राज परिवाराची चित्रे हे विषय प्रामुख्याने असायचे. ‘मधुबनी’ ही  बिहारमधील एका गावाच्या नावाने ओळखली जाणारी चित्रपद्धती याच काळातली. ही चित्रशैली ‘मिथिला’ या नावानेदेखील ओळखली जाते.
याच दरम्यान ‘तंजावर’ चित्रपद्धती तमिळनाडूतील तंजावर या संस्थानी गावाच्या नावाने प्रसिद्ध झाली. या चित्रपद्धतीत निळा, लाल, हिरवा, पिवळा या मूळ रंगाबरोबरच अलंकार दाखवण्यासाठी काही भाग उठावदार करत असत आणि सोन्याच्या वर्ख वापरून त्यावर रेखाटन केले जाई. यात मौल्यवान खडे, मोती यांचा वापर होत असे. या चित्रांचा विषय प्रामुख्याने गणपती, लक्ष्मी, नटराज अशा देवदेवता असाच असे. काही चित्र लाकडी पट्ट्यांवरही करीत असत या पद्धतीला ‘पलागाई कदम’ या नावाने ओळखले जाते.
सह्याद्रीच्या उत्तरेकडच्या रांगांमधल्या वारली आदिवासींची ‘वारली’ चित्रपद्धतीही भारतीय पारंपरिक चित्रशैलीमधली एक. आदिवासी  महिला -पुरुष, सण, पीक- पाणी, लग्न सभारंभ, शिकारीची दृश्य, प्राणी असे या चित्रांचे विषय असायचे. बराच मोठा काळ वारली घराघरांमध्ये असणारी ही कला आता सातासमुद्रापार गेली आहे. अनेक हॉटेल आणि प्रदर्शने या ठिकाणी सजावटीला उठाव देण्यासाठी वारली चित्रकलेचा उपयोग केला गेला जातो. सध्या तर कोकणातील अनेक रेल्वे स्टेशनच्या भिंती, प्लॅटफॉर्म  या कलेने सजलेल्या आहेत.
ओरिसातील ‘पटचित्र’, त्याच बरोबर ‘मोगल शैली’, ‘राजपूत’, ‘कलमकारी’, आंध्रप्रदेशातील ‘गोंड’ अशा अनेकविध चित्रशैली राजाश्रय आणि लोकाश्रयाने सुरू झाल्या आणि बहरल्या. बंगालमधील लघुचित्र शैलीही याच परंपरेतील. सुरुवातीला ‘काली घाट पटचित्रां’मध्ये देव देवता हाच विषय असायचा. नंतरच्या काळात या सजावटीच्या चित्रात कालानुरूप बदललेले विषय होते - दैनंदिन जीवनात संगीतकार, खेळाडू, शेतकरी, खेडे, हस्तकलेच्या भारतीय संस्कृतीच्या दृश्यांशी संबंधित होते, तसेच अप्सरा, प्राणी आणि इतर सजावटीच्या वस्तूही. कागदावर टेमप्रा रंगांनी रंगवून जाडसर कागदांवर (कार्ड बोर्डवर) चिकटवून ही चित्रं तयार केली गेली. भारतातील समृद्ध लोककला आणि हस्तकलांनी परंपरेकडून घेतलेली तंत्रे वापरली. ह्या 
चित्रशैली अतिशय लोकाभिमुख आहेत 
आणि त्या भारतीय जीवनसंस्कृतीचे दर्शन घडवितात.

संबंधित बातम्या