मॉडर्न आर्ट

शरद तरडे
सोमवार, 23 ऑगस्ट 2021

चित्र-भान

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला पाश्चिमात्य देशात "क्युबिझम" चित्रशैली चालू झाली. "क्युबिझम" हा शब्द कलासमीक्षक लुई व्हॉक्सेल यांनी १९६०मध्ये एका लेखामध्ये प्रथम वापरला. 

"क्युबिझम" चित्रशैलीत भौमितिक आकारांचा वापर करण्यात आला. त्रिकोण, चौकोन, गोल, अर्धगोल या पद्धतीच्या आकारांची रचना चित्रांमध्ये वेगवेगळ्या प्रकारांनी केली गेली. पूर्वीच्या अनेक चित्र पद्धतींपेक्षा हा प्रकार खूप वेगळा होता. यात देखील रंगांचा अनेक रीतीने वापर करून, आकार कमी वापरून चित्र काढले जात असे. चित्रामध्ये छाया-प्रकाशाचा वापर करून खोली दाखवण्यात कलाकार यशस्वी ठरले होते. 

या चित्रशैलीने अमूर्तसंकल्पनेची जणू सुरुवात करून दिली, जणू त्यापासून प्रेरणा घेत अमूर्त चित्रकला साकारली  गेली, असे म्हणता येईल. या चित्र पद्धतीत प्रामुख्याने पाब्लो पिकासो, जॉर्जेस ब्रेक, जुवान ग्रीस इत्यादी चित्रकारांनी बरेच काम केले. यात पिकासो यांनी "तीन वादक" या चित्रात "कॉमेडीयाडेल" या काल्पनिकतेचे चित्रण केले आहे. पाश्चिमात्य नृत्यप्रकार, वाद्यवृंद्य, वेशभूषा यांचा उत्कृष्टपणे साकारलेला मिलाफ या चित्रात दिसतो. हे चित्र साधारणपणे सहा फूट रुंदीचे असून रंगवताना ते कागदाचे रंगीत तुकडे रंगवावेत आणि एकत्र चिटकावेत अशा पद्धतीचे दिसते. 

एका चौकोनी खोलीत तीन संगीतकार बसलेले आहेत असे या चित्रात दाखवले गेले. एकीकडे गिटार वादक, एक हार्प वादक आणि एक सेक्सोफोन वादक चितारलेला आहे. रंगीत कपडे घातलेले कलाकार, त्यांच्या समोरील टेबलावर एक पाईप आणि इतर वस्तू साकारलेल्या आहेत तर कलाकारांच्या पायापाशी एक कुत्रा दाखवलेला आहे. चित्रांमध्ये तपकिरी रंगाचा एक मजला रंगवलेला आहे. ह्या सर्व गोष्टी एकांत दर्शवतात आणि तरीही संगीत सुरू आहे आणि ऐकू येत आहे असे वाटत राहते. या सर्व गोष्टीतील वस्तू एकमेकांना छेदतात जणू त्या कागदाच्या बनवलेल्या आहेत. "क्युबिझम" शैलीतील या चित्रात विषय एका पातळीवर दिसतो. रेषा आणि वक्राकार आकृत्या याच्यामुळे सर्व चित्रांमधील रंग वापरून खोली निर्माण झालेली दिसते. या चित्रशैलीला "बौद्धिक शैली" म्हणूनही संबोधले गेले आहे. येथे बघणारे रसिकही त्या संगीतात सामावून जातात, हे चित्रकाराचे यश आहे असे म्हणता येईल . 

अतियथार्थवादी चित्रपद्धतीमध्ये कल्पना, प्रतिमा आणि वास्तववादी चित्रशैलीचा जन्म अवास्तव अस्थिरतेतून झालेला आहे. या शैलीत चित्रकाराची सर्जनशीलता वास्तववादी गोष्टी प्रतीकात्मक दृष्टीने वापरून त्या चित्राचे स्वरूप बदलून टाकले जात असे. 

"साल्वादोर दाली" या चित्रकाराने "पर्सिस्टन्स ऑफ मेमरी” या चित्रात घड्याळ आणि मुंगी या वास्तववादी गोष्टींचा वापर काल्पनिक मांडणीतून अशा पद्धतीने केला आहे की चित्र पाहणाऱ्यांच्या मनात ‘हे काय दाखवले आहे? असे असते का?’ असे प्रश्न नेहमी उभे राहतात. या चित्रातील मुंगी हळुवारपणे मार्गक्रमण करणारी आहे, हे आपल्याला माहीत आहे. आणि घड्याळ हे कालगणना करण्याचे साधन आहे. या मुंगीचा हळुवारपणा जीवनाचा प्रतिकात्मक क्षय दाखवतो. पण ही मुंगी एका सोन्याच्या घडाळ्याला चिकटली आहे. पाहणाऱ्याला हे घड्याळ खाण्याची वस्तू वाटते. खरंतर घड्याळ सोन्याचे असो वा साधे, हे कालमापनाचे साधन आहे हे आपणास माहीत आहे. परंतु चित्रकाराने ते घड्याळ सोन्याचे दाखवून ते मुंग्या खायचा प्रयत्न करीत आहे हे दाखवले आहे. कदाचित चित्रकाराला या कलाकृतीतून आपण आपले जीवन नकळत एखाद्या निर्जीव गोष्टीसाठी सुद्धा खर्च करतो असे दाखवून द्यायचे आहे का? असे वाटते. चित्रात एक घड्याळ घडी करून वाळलेल्या झाडांच्या फांदीवर टाकल्यासारखेही दाखवले आहे. आणखी एक घड्याळ टेबलावर एका बाजूस घडी घालून ठेवल्यासारखे दाखवले आहे. ही सर्व घड्याळे कालमापन करतात पण आता ती चित्रात स्तब्ध झाली आहेत असे दिसते. लांबवर जीवंत वाटणारा समुद्रकिनारा आणि एका बाजूला एक निष्क्रिय प्राणी पडलेला आहे, त्याचा विस्फारलेल्या डोळ्यात वेगळीच भावना दिसून येते. सर्व जग गोंधळलेले, थिजलेले आहे. काळ सुद्धा थांबलेला आहे पण मुंगीरूपी जीवन मात्र व्यर्थ गोष्टीच्या मागे लागून संपत चालले आहे असे या चित्रकाराला दाखवायचे असेल का? 

आधुनिक कला (Modern Art) शैलीमध्ये विशेषतः वेगवेगळे आकार, वस्तू यांची एकत्र रचना केलेली असते. 

"पाब्लो पिकासो"ने वेगळ्या पद्धतीची व्यक्तिचित्रे, वस्तू- चित्रे काढली आहे. यातल्या व्यक्तिचित्रामध्ये त्या त्या व्यक्तिमत्वांमधील जी विशेष लक्षणे पिकासोला समजली, दिसली ती त्याने वेगवेगळ्या पद्धतीने चित्रित केलेली आहेत, असे म्हणता येईल. त्याच्या अनेक चित्रात रेखाटलेल्या व्यक्तीरेखा त्याच्या जीवनात प्रेयसीच्या भूमिकेत होत्या. त्यांचे व्यक्तिमत्त्व त्याला पूर्णपणे माहीत झालेले होते. पिकासोने त्याच्या आधुनिक कलाशैलीत त्या व्यक्तीरेखांचे नाक, डोळे, कान, चेहरा हे त्याने पाहिजे ते आकारानुसार काढून रंगवली. तीन डोळ्यांची व्यक्ती, तीन प्रतिमा एक एकत्र दिसतील अशी व्यक्तीचित्रे पिकासोने रेखाटली. त्याच्या मनात त्या व्यक्तीविषयी ज्या भावना होत्या, त्यांचे स्वभाव त्याला जसे जाणवत होते त्या पद्धतीने त्याने ती चित्रे काढली. पिकासोच्या चित्रपद्धतीवर आदिवासी कलांचा, संस्कृतीचा खोल परिणाम दिसून येतो, त्यासाठी त्याने केलेला अभ्यास समजतो. पिकासोच्या शैलीचा भारतीय चित्रकारांवर खूप परिणाम झाला होता. विशेषतः सुझा, हुसेन यांसारख्या त्या काळातील चित्रकारांची (१९५०-१९७०) चित्रे पाहिल्यावर हे लक्षात येते. 

आधुनिक कलेविषयी पिकासोचे एक विधान होते, "अशा प्रकारच्या चित्रात तुम्ही हवे त्या वस्तू, आकार काढा आणि त्यातील काही भाग खोडून टाका, मग ज्या आकृत्या मिळतील त्याचे नव्याने चित्रे तयार होईल. ते आकार एकमेकांत इतके सहज मिळून मिसळून टाका की नव्या आकारामुळे लोकांना ते आधुनिक चित्र अविष्कार वाटेलच!" 

सर्व संस्कृतींमध्ये त्यांची तत्काळ उद्दीष्टे व्यक्त करण्याचे साधन आणि तंत्रे आहेत. मला आवडणारी गोष्ट ही आहे की आज चित्रकारांना स्वतःच्या चित्रासाठी बाहेरील विषय घेण्याची गरज नाही. बरेच आधुनिक चित्रकार वेगवेगळ्या स्त्रोतापासून प्रभावित होऊन काम करतात. तर कधी ते आपले मन ज्यात रमते त्याच्याशी समरस होऊन कला सादर करतात. ... आधुनिक कलाकार अवकाश आणि वेळ यांची सांगड घालत काम करीत आहेत आणि चित्रात त्यांचे वर्णन करण्यापेक्षा त्यातून ते आपल्या भावना प्रतिकांद्वारे व्यक्त करत असतात हे विशेष!

संबंधित बातम्या