चित्रनिवड

शरद तरडे
सोमवार, 4 ऑक्टोबर 2021

चित्र-भान

चित्र स्वच्छ पांढऱ्या भिंतीवर असो किंवा अगदी लाल, पिवळ्या रंगाने रंगविलेल्या भिंतीवर, चित्राचे अस्तित्वच त्या घरातील लोकांचे व्यक्तिमत्त्व, स्वभाव, राहणीमान, कलेविषयी समज हे सर्व क्षणात आपल्या समोर सादर करते.

‘तुम्हाला चित्र कसे सुचते?’, हा प्रश्न आम्हा चित्रकारांना अनेकदा विचारला जातो. चित्र काढतानाची सर्जनशीलता शब्दांमध्ये कशी सांगायची? ते शब्द कसे निवडायचे? हे खूपच कठीण! म्हणूनच कलाकार चित्रातून ते भावविश्व दाखविण्याचा प्रयत्न करीत असतो. ‘अमूक हे बघून चित्र सुचले’, ‘त्या वेळच्या भावनांचा कल्लोळ म्हणजे हे चित्र आहे’, ‘या मूडमध्ये हे रंग वापरले’ असे सांगणे खूप वरवरचे असते. खरे कारण वेगळे असते किंवा कुठले कारणही नसते....

चित्र म्हणजे एक भावविश्वच. चित्र पाहताना, समजावून घेताना पूर्वसंस्कारांचा, अर्थाचा चष्मा काढून टाकावा. संवेदना जागृत करणारी चित्रे असतील तर ती तुम्हाला वेगळ्या भावविश्वात नक्कीच घेऊन जातात. त्यातील रंग, रेषा, आकार हे सगळं ‘स्वच्छ मनाने बघितलं’ तर आपण त्या चित्रातील विषयात सहजपणे वावर करू शकतो.

भावनांनी गुंफलेली, रंगीबेरंगी दुनियेतली चित्रे आपल्या अस्तित्वाने घराचे रूपच बदलून टाकतात. त्यामुळे वास्तुरचनेत चित्रांनी घडवलेली किमया काही औरच असते. चित्र स्वच्छ पांढऱ्या भिंतीवर असो किंवा अगदी लाल, पिवळ्या रंगाने रंगविलेल्या भिंतीवर, चित्राचे अस्तित्वच त्या घरातील लोकांचे व्यक्तिमत्त्व, स्वभाव, राहणीमान, कलेविषयी समज हे सर्व क्षणात आपल्या समोर सादर करते.

मोठमोठ्या पंचतारांकित हॉटेलांतील, कॉर्पोरेट ऑफिसमधील मूर्त, अमूर्त चित्रे म्हणजे कलाकारांच्या भावविश्वाला मिळालेले मोकळे अंगणच! मोठमोठ्या आकाराची चित्रे तर बघणाऱ्याच्या मनोवृत्तीमध्येही बदल घडवितात. त्यातील विषय अमूर्त असले तरीही त्या चित्रातील जाणीव समृद्ध करण्याची कला हेच त्या चित्राचे कार्य असते.

वास्तूची रचना, आशय, त्यातील राहणाऱ्या व्यक्तींच्या स्वभावानुसार व्यक्तिमत्वानुसार चित्र निवडणे हे खरे आव्हानात्मक काम वास्तुरचनाकारावर असते. अशावेळी खरेतर आमच्याकडे जर कोणी चित्र घ्यायला आले तर त्याचा स्वभाव, त्याचे विचार आणि आवड, या गोष्टींचा आम्ही नक्की विचार करतो. एवढेच नव्हे तर जे पेंटिंग ते लावणार आहेत ते सदैव उत्साही, आनंददायी वाटेल अशा पद्धतीने निवडण्यास तत्परतेने मदतही करतो. कारण शेवटी ते चित्र हे त्या कुटुंबाचा एक भाग म्हणूनच सर्वजण बघणार असतात.

चित्रांची नुसती निवड नव्हे चित्रांचा आशय,  रेषा, आकृती, रंगसंगती एवढेच नव्हे; तर त्या चित्रासाठी फ्रेमची निवड या गोष्टी एकमेकांना पूरक असणे फार महत्त्वाचे आहे.

जगप्रसिद्ध चित्रकारांची चित्रे खूप महाग असतात असा सर्वसामान्यपणे समज असतो. परंतु सध्याच्या डिजिटल युगात अनेक जागतिक कीर्तीचे कलाकार जसे पिकासो, पॉल क्ली, मोने, टर्नर किंवा अगदी भारतीय चित्रकारांमध्ये राजा रविवर्मा, हुसेन, रामकुमार, सुब्रह्मणम् अादी चित्रकारांच्या चित्रांच्या फोटो प्रती परवडतील अशा किमतीमध्ये सहजपणे उपलब्ध आहेत. या चित्रांसाठी तुम्ही जर काही वेबसाइटला भेटी दिल्या तर तुम्हाला ही चित्रे अगदी सहाशे रुपयांपासून पुढे मिळू शकतात आणि त्यांचा आकार साधारण १२ इंच x१२ इंच असतो. अर्थात ही चित्रे त्या चित्रकारांच्या चित्रांची एक डिजिटल कॉपी असते, हे लक्षात घेतले पाहिजे. मात्र तुम्हाला आवड असेल, घरात आपल्या एखाद्या आवडत्या चित्रकाराचे चित्र असावे, अशी तुमची मनापासून इच्छा असेल तर हे आता सहज शक्य आहे हे मात्र खरे.

एखाद्या हॉलमध्ये, पॅसेजमध्ये मोठे चित्र लावण्यास जागा नसेल तर उभट आकाराची तीन -चार चित्रे थोड्या थोड्या अंतरावर लावली तर त्या जागेचे रूपच बदलून जाते. हॉल, बेडरूममधील चित्रे निवडताना फर्निचर, पडदे, टाइल्स यांच्या रंगसंगतीचा विचार करावा लागतो.

चित्रे लावताना ती बघण्यासाठी योग्य ते अंतर सोडावे लागते आणि चित्र एकाच नजरेत व्यवस्थितपणे बघता येईल, याची काळजी घ्यावी लागते किंवा दोन -तीन चित्रे शेजारी शेजारी लावली गेल्यास त्यातील विषय, रंगसंगती एकमेकांना पूरक असतील याची खबरदारी घ्यावी लागते. एखाद्या चित्रातील स्ट्रोक्स किती वजनदार, जोरकस आहेत हे समजून घेताना, ते जवळून बघितले तर आकारहीन वाटू शकतात, तेच स्ट्रोक्स जरा अंतरावरून बघितले तर ते एकमेकांत विलीन झाल्यासारखे वाटतात आणि वेगळे चित्र, आकार निर्माण करतात. त्यामुळे चित्र योग्य अंतरावरूनच बघणे आणि लावणे खूप महत्त्वाचे आहे.

चित्रावरील प्रकाशयोजना करताना तो खूप झगझगीत असू नये. त्यामुळे ते चित्र चकाकते आणि ते बघणेही त्रासाचे ठरू शकते. सौम्य, एकसारखी प्रकाशयोजना चित्राचे सौंदर्य वाढवू शकते. शिवाय प्रकाशाचा झोत स्वच्छ पांढरा असावा अन्यथा पिवळसर प्रकाश झोतामुळे चित्रातले रंग वेगळे दिसू शकतात.

काचेच्या चित्रांच्या फ्रेम लावताना त्या काचेवर कुठल्याही खिडकीतील, दरवाजातील प्रकाशाचे परावर्तन होत नाही हे बघणे खूप महत्त्वाचे ठरते.

निसर्गचित्रे, व्यक्तिचित्रे, अमूर्त, मूर्त चित्रे, लोककलांशी निगडित वारली, मधुबनी, कांग्रा शैलीतील चित्रे आशयानुरूप वापरली असता खूपच खुलून दिसतात. एखाद्या सूर्यास्ताचे, सूर्योदयाचे काढलेले छायाचित्र तुम्हाला सर्व तपशील देऊ शकते, पण एखाद्या कलाकाराने काढलेले तेच चित्र, त्यातून वेगळ्या भावना, रंगसंगती आपणापुढे सादर करते. त्यामुळे छायाचित्रापेक्षा चित्राचे महत्त्व वेगळे भासते.

अमूर्त चित्रे नेहमी आपल्या मूडप्रमाणे प्रत्येकवेळी वेगळी भासतात कारण त्यात एकच एक विषय किंवा आकार नसतो. पण त्यांची मांडणी खूप वेगळ्या पद्धतीने साकारलेली असते, त्यामुळे त्याचे घरातील अस्तित्व वेगळेपणा देते.

चित्राची अतितार्किक चिकित्सा करू नये, कारण ते एक भावविश्व असते. त्यातील भाव तुम्हाला पटले, मनाला भिडले की मग चंद्र लाल रंगातला का? सूर्य पांढऱ्या, पिवळ्या रंगात का नाही? असले प्रश्न मनात येतच नाहीत. ते रंग त्या चित्रात योग्य आहेत हे पटवले जाते, भासवले जाते, हे खूप महत्त्वाचे ठरते आणि त्यातच खऱ्या कलाकृतीचा कस लागतो.

एका आर्किटेक्टना त्यांच्या बंगल्यामध्ये निसर्गाची अमूर्त स्वरूपातील चित्र लावण्याची संकल्पना खूप आवडली. त्या चित्रामध्ये झाडाच्या खोडांचे अमूर्त आकार, त्यातील अंतर्गत रचनेतील संवेदना, भावनांनी स्फुरलेले अमूर्त आकार, रेषांनी दर्शवलेली लयबद्धता, एकसुरता, हिरवट निळसर रंगातली हळूवार आवर्तने यातून एक प्रतिसृष्टीच निर्माण झाली होती. रंगातून निर्माण होणारी गूढता, पांढरट, राखाडी रंगाच्या पार्श्वभूमीवर वेगळेच भावविश्व निर्माण करून गेले. अवकाशाला तोलून धरण्याची जाणीव या चित्राने जिवंत करून दाखवली.

राजा रविवर्मा यांचे ओलत्या स्त्रीचे चित्र असो किंवा अमूर्त कलेतील एखादे चित्र- नव्या जाणिवा निर्माण होण्यासाठी लावले गेले, तर ते आजूबाजूचे वातावरण नक्कीच समृद्ध करते आणि बघणाऱ्यालाही त्यांच्या भावविश्वात नेऊन चिंब भिजवतेच!

 

संबंधित बातम्या