म्युरल

शरद तरडे
सोमवार, 15 नोव्हेंबर 2021

चित्र-भान

वास्तुशास्त्रामध्ये जसजसे बदल होत गेले, तसे सजावटीलाही खूप महत्त्व येऊ लागले. आधुनिक वास्तुप्रकल्पामध्ये इमारत देखणी, भारदस्त आणि सौंदर्यपूर्ण कशी दिसू शकेल; तसेच त्याचा अंतर्भागही नावीन्यपूर्ण व लयबद्ध कसा दिसू शकेल, याचा विचार होऊ लागला. त्यामुळे ‘म्युरल’ या संकल्पनेला खूपच महत्त्व प्राप्त झाले आहे.

इमारतीमध्ये प्रवेश करताना मन प्रसन्न करणारे म्युरल (भित्तिचित्र) बघितले, तर इमारतीच्या अंतरंगाचे स्वभावदर्शन होऊ शकते. इतकेच नव्हे, तर योग्य संकल्पना आणि इमारतीतील निगडित वस्तू यांची योग्य सांगड म्युरलच्या विषयात आणली गेली तर इमारतीच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाजही येऊ शकतो. म्युरल इमारतीचा भारदस्तपणा वाढवतात, संपन्नतेचे दर्शनही घडवतात. इमारतीतील दुकाने, ऑफिस यांना एक वेगळे व्यक्तिमत्त्व प्रदान करतात.

खरेतर म्युरल किंवा मोठ्या इमारतींमध्ये चित्त आकर्षित करणारी भित्तिचित्रे तयार करणे आपल्याकडे नवीन नाही. अजिंठा-वेरूळ येथील भित्तिचित्रे जगप्रसिद्ध आहेतच; तसेच दक्षिणेकडील अनेक देवळेही त्यासाठी प्रसिद्ध आहेत. या संकल्पनेची काळानुरूप आधुनिकतेशी सांगड घालून विविध माध्यमे वापरून अनेक कलाकार नावीन्यपूर्ण म्युरल बनविण्याचा प्रयत्न करीत आहेत. पंचतारांकित हॉटेल, कॉर्पोरेट ऑफिस, मॉल, सिनेमागृहे, नाट्यगृहे, गृहसंकुले, बंगले, स्मृतिस्थळे इत्यादी ठिकाणी प्रवेशद्वारापासून ते अंतरंगापर्यंत म्युरलचा वापर केला जातो.

बंगालमधील शांतिनिकेतनचा परिसर असो वा राजस्थान, गुजरात मधील घरावरचे कवडी काम असो. या राज्यांमधल्या अनेक गावात तर गावकऱ्यांनी केलेली आणि आपल्या रोजच्या जीवनातील प्रसंग रंगवलेली म्युरल मी बघितलेली आहेत. एखादी छोटी झोपडी असली तरीही दरवाज्याच्या बाजूला छोट्या जागेत ही म्युरल सुंदररीतीने तयार केली आहेत आणि त्यासाठी माती, चुना आणि गेरूचा रंग या स्थानिक गोष्टींचा वापर करून त्यात स्थानिक मातीचा सुगंध जपला आहे आणि त्या म्युरलचे तेच वेगळेपण खूप महत्त्वाचे आहे.

खरे तर जीवनात कलेचे भान आदिम कालपासूनच आहे. छोटे पाडे, वस्त्या, गावांमध्ये राहणारा शेतकरी असो वा कष्टकरी तो त्याच्यात्याच्या परिस्थितीनुसार कला जोपासत आलेला आहे. मग एखाद्या गृहिणीने दरवाजात काढलेली रांगोळी असो अथवा घराच्या भिंतीवर तयार केलेले छोटे म्युरल  असो. भारतातील प्रादेशिक हवामानानुसार माणूस कला आणि रोजच्या जगण्याची सांगड घालून राहत आहे. 

म्युरल (भित्तिचित्रे) म्हणजे उठावदार चित्र! म्युरल तयार करणे हे आव्हानात्मक काम आहे. यामध्ये प्रामुख्याने उठाव, रंग, रेषा, आकार, पोत (टेक्स्चर), आभास या गोष्टींची विचारपूर्वक रचना केली जाते. ज्या आकारांना प्राधान्य द्यायचा असेल, ते आकार जास्त उठावपूर्वक दर्शविले जातात. विषयानुसार आणि इमारतीच्या अंतर्गत रचनेनुसार, सजावटीनुसार रंगसंगती केली जाते. वेगवेगळ्या प्रकारच्या उठावामुळे, प्रकाशयोजनेमुळे म्युरलची आकर्षकता वाढवली जाते. वास्तूची रचना ज्या वेळेस वास्तुरचनाकाराकडून साकारली जाते, त्याच वेळी म्युरलची योग्य जागा ठरविली जाते. म्युरल कलाकारास बोलावून म्युरलचा आकार ठरविला जातो. इमारतीतील कार्यालये, दुकाने यांची वैशिष्ट्ये, इमारतीचे बाह्यरूप इत्यादी गोष्टींची जाणीव कलाकाराला दिली जाते. त्या सर्व गोष्टींचे अस्तित्व ‘म्युरल’मध्ये आणण्याचे कौशल्य कलाकाराला जपावे लागते. त्याच्या मनातील संकल्पना काम करून प्रथम कलाकार कागदावर उतरवितो आणि वास्तुरचनाकारास सादर करतो. संकल्पनेचे चित्र मान्य झाल्यावर त्याच्या छोट्या प्रतिकृती निर्माण केल्या केली जातात. अनेक रंगसंगती, कमी-जास्त उठावाच्या प्रतिकृती इमारतीच्या मॉडेलवर लावून बघितल्या जातात. त्यामुळे एका परिपूर्ण चित्राचा अंदाज येऊ शकतो. या प्रकारे केलेले काम अचूक होतेच, शिवाय कलाकार, रचनाकार यांनाही म्युरल, इमारतींचे सौंदर्य आदी गोष्टींचा वस्तुनिष्ठ अभ्यास करता येतो. म्युरल अनेक वेगळ्यावेगळ्या माध्यमांमध्ये तयार केली जातात. धातू, फायबर ग्लास, लाकूड, सिमेंट, काच, सिपोरेक्स, सिरॅमिक इत्यादी माध्यमे प्रामुख्याने वापरली जातात. धातू, फायबर ग्लास, सिमेंट या माध्यमातून केलेली म्युरल कुठल्याही हवामानात, ऊन, पाऊस यांचा परिणाम न होता वर्षानुवर्षे राहू शकतात. फायबर ग्लास हे माध्यम हलके असल्याने मोठ्या आकाराची म्युरल फायबर ग्लास वापरून तयार केली जातात. अनेक तुकड्यांमध्ये  काम करून जागेवर मोठ्या आकाराचे म्युरल सहजपणे उभारता येते. 

अशा प्रकारच्या मोठ्या म्युरलमध्ये तांत्रिक बाजूचा विचार बारकाईने करावा लागतो.

त्यासाठी कलाकारास फॅब्रिकेशन, सुतारकाम यांनी सखोल माहिती असणे खूप गरजेचे असते.

आपल्या घरातसुद्धा म्युरल लावायचे असेल तर सध्या ती आर्ट शॉप  किंवा एखाद्या

फर्निचर मॉलमध्ये सहज उपलब्ध असतात. ही म्युरल अनेक विषयांची असतात आणि आपल्याला आवडेल त्या विषयाची म्युरल बनवून मिळू शकते.

वारली पेंटिंग किंवा आदिवासी कला या चित्र पद्धतीमध्ये अनेक ठिकाणच्या भिंती अनेक विषय घेऊन रंगविल्या गेल्या आहेत. कोकण रेल्वेचे रत्नागिरी आणि इतरही अनेक रेल्वे स्थानके वारली चित्रपद्धतीमध्ये रंगवून त्यातील वेगळेपणा दाखवला गेला आहे. प्लॅटफॉर्मच्या प्रचंड मोठ्या आणि लांबलचक भिंतीवर हे चित्र रंगविणे हे खरोखरच कौशल्याचे आणि चिकाटीचे काम आहे. परंतु ते चित्रकारांनी करून दाखवले आहे हे विशेष.

पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील ‘इंटरनॅशनल कन्व्हेशन सेंटर- आयसीसी’ टॉवरच्या एका विंगमध्ये एक म्युरल लावण्यात आले आहे. या विंगमध्ये पार्किंगकडे जाणाऱ्या रस्त्यावर डाव्या हाताला असलेल्या लांबलचक भिंतीवर अनेक टप्प्यांमध्ये सुंदर ‘लँडस्केपिंग’ करण्यात आले आहे. त्यांतील काही भागांमध्ये कारंजेही निर्माण करण्यात आले. या कारंजाच्या मागील भिंतीवर ८० फूट लांब आणि १० फूट उंचीचे म्युरल आहे. अत्याधुनिक, चकचकीत काचांच्या इमारतीमध्ये उठून दिसणारे; परंतु त्या इमारतीच्या अंतर्गत भागात सामावून जाणारे म्युरल ही त्या इमारतीची गरज होती. सतरा वेगवेगळ्या आकारांमध्ये त्या म्युरलची रचना बनवली गेली होती. वेगवेगळ्या टप्प्यामध्ये खाली-वर, पुढे-मागे असे हे तुकडे भिंतीवर लावण्यात आले त्यामुळे इमारतीमध्ये प्रवेश केल्यावर वेगवेगळ्या कोनांमधून हे म्युरल वेगवेगळ्या डिझाईनचे दिसते.

काळ्या आणि चंदेरी रंगामध्ये हे सर्व तुकडे रंगविले गेल्यामुळे म्युरल अधिकच खुलून दिसते आणि इमारतीच्या काळ्या, चकचकीत रंगसंगतीमुळे ते अंतरंगातही मिळून गेले. त्याखाली असणाऱ्या कारंजाच्या पाण्यामधील त्याचे प्रतिबिंबही खूप आकर्षक दिसते. 

या अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या म्युरलमुळे त्या त्या वास्तूंचे व्यक्तिमत्त्व खुलण्यास मदत होते. शिवाय वास्तुरचनाकार, कलाकार यांच्या संकल्पनेचे ते एक ‘सौंदर्यस्थळ’ म्हणूनही त्यास मान्यता मिळते हे मात्र नक्की.

संबंधित बातम्या